गाण्यातले ‘शास्त्रीय’ उस्ताद ! (सुहास किर्लोस्कर)

सुहास किर्लोस्कर suhass.kirloskar@gmail.com
रविवार, 15 जानेवारी 2017

रिचर्ड अटनबरो यांच्या "गांधी' सिनेमात गांधीजी भारतदर्शनासाठी रेल्वेमधून प्रवास करत असतात. त्या प्रवासाच्या पार्श्‍वसंगीतामध्ये सतार वाजवली आहे पंडित रविशंकर यांनी. त्याबरोबरच उस्ताद सुलतान खां यांच्या सारंगीनं साधलेला परिणाम अनुभवण्यासाठी हे दृश्‍य जरूर पाहावं असं.

रिचर्ड अटनबरो यांच्या "गांधी' सिनेमात गांधीजी भारतदर्शनासाठी रेल्वेमधून प्रवास करत असतात. त्या प्रवासाच्या पार्श्‍वसंगीतामध्ये सतार वाजवली आहे पंडित रविशंकर यांनी. त्याबरोबरच उस्ताद सुलतान खां यांच्या सारंगीनं साधलेला परिणाम अनुभवण्यासाठी हे दृश्‍य जरूर पाहावं असं.

अनेक ‘उस्तादां’नी, ‘पंडितां’नी सिनेमाची गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्या गाण्यांना स्वरसाजही दिला आहे. राहुलदेव बर्मन हे पंडित सामताप्रसाद यांच्याकडं तबला शिकले. ऱ्हिदम, मिक्‍स ऱ्हिदम यातून ते शिक्षण जाणवत राहतं. ‘शोले’मध्ये बसंतीचा पाठलाग केला जात असताना जे पार्श्वसंगीत वाजतं, त्यामध्ये पंडित सामताप्रसाद यांनी रेला वाजवला आहे. ‘महबूबा’ सिनेमातल्या ‘मेरे नैना सावन भादो (लता मंगेशकर) आणि ‘गोरी तोरी पैंजनिया’(मन्ना डे), तसंच ‘किनारा’मधल्या ‘मीठे बोल बोले’ या गाण्यांतला पंडितजींचा बनारसी बाज असलेला तबला ऐकण्यासारखा आहे.

पंजाब घराण्याचे विख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखा यांनी ए. आर. कुरेशी या नावानं अनेक हिंदी सिनेमांना संगीत दिलं. तलत महमूद यांनी गायिलेलं ‘दिल मतवाला लाख संभाला,’ शमशाद बेगम यांचं ‘ताना दे रे ना ताना’, आशा भोसले यांचं ‘जाने नजर देख इधर’ अशी बरीच श्रवणीय गाणी यासंदर्भात सांगता येतील. ओ. पी. नय्यर यांनी लोकप्रिय केलेला ठेका त्यापूर्वीच्या उस्ताद अल्लारखा यांच्या गाण्यात ऐकायला मिळतो!

उस्ताद झाकीर हुसेन यांनीही काही हिंदी गाण्यांना तबल्याची साथ केली आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘बावर्ची’ या सिनेमातलं संगीतकार मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेलं कैफी आझमीलिखित ‘भोर आई, गया अंधीयारा’ हे गाणं. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका निर्मलादेवी (अभिनेता गोविंदाच्या मातुःश्री), मन्ना डे, किशोरकुमार आणि हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी हे गाणं गायिलं आहे. बिलावल रागावर आधारित गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी स्टुडिओत काय धमाल माहौल असेल !

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा पहिला सिनेमा ‘पारसमणी’. यातल्या महंमद रफी यांनी गायिलेल्या ‘रौशन तुमही से दुनिया, रौनक तुमही जहॉं की...सलामत रहो’ या गाण्यात तबल्याची साथ आहे झाकीर हुसेन यांची. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याच ‘सुनो सजना’(आये दिन बहार के) या लता मंगेशकर यांनी गायिलेल्या गाण्याला तबल्याची साथ झाकीर हुसेन यांनी तबला-डग्गा यांचा सुरेख ताळमेळ साधत डग्ग्याची नजाकत दाखवली आहे. सिनेसंगीतात हे तसं अभावानंच आढळतं. झाकीर हुसेन यांनी ‘साज’ या सिनेमाचं सह संगीतदिग्दर्शनही केलं आहे आणि त्याच सिनेमात संगीतदिग्दर्शकाची भूमिकाही वठवली. ‘क्‍या तुमने है कह दिया’ या गाण्यातला तबला, तसंच त्याकाळी राहुलदेव बर्मन यांनी सिनेसंगीतात आणलेले ट्रेंड्‌स यांचं यथोचित दर्शन त्यांनी घडवलं आहे. या सिनेमात नायक (झाकीर हुसेन) आणि नायिका (शबाना आझमी) यांच्यातला विसंवाद सुरू असताना तबला-तरंग पार्श्‍वसंगीत म्हणून वाजतो. दोघांचे सूर जुळलेले नाहीत हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या स्वरात लावलेले तबले वाजवून जो परिणाम साधला आहे, ती कल्पकतेची परमावधीच! ‘परझानिया’व्यतिरिक्त झाकीर हुसेन यांनी संगीत दिलेला सिनेमा म्हणजे ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’. अपर्णा सेन यांच्या या सिनेमामध्ये गायक आहेत उदय भवाळकर, उस्ताद सुलतान खां आणि स्वतः झाकीर हुसेन (गाणं If I know).

सिनेमासुद्धा आवर्जून बघण्यासारखा आणि ‘ऐकण्यासारखा’ आहे. उस्ताद सुलतान खां यांनी बऱ्याच हिंदी गाण्यांमध्ये सारंगी वाजवली आहे. त्याशिवाय ‘आओगे जब तुम’ (जब वी मेट), झीनी मिनी झिनी (मक्‍बूल) अशी गाणीही गायिली आहेत. अहीर भैरव रागातली चीज ‘अलबेला साजन आयो री’ सुलतान खां, शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात आणि वेगवेगळ्या ढंगात ऐकायला मिळते ती ‘हम दिल दे चुके’ सनम या सिनेमात. हे गाणं श्रवणीयतेबरोबरच प्रेक्षणीयही आहे. कारण, विक्रम गोखले यांचा गायकाच्या भूमिकेतला लाजवाब अभिनय. विख्यात अभिनेते व विक्रम गोखले यांचे पिताश्री चंद्रकांत गोखले यांचा तबला वाजवत गाणं शिकवणाऱ्या गायकाचा अभिनय पाहण्यासाठी ‘सुवासिनी’ सिनेमातली ‘आज मोरे मन लागो’ ही चीज अवश्‍य बघावी. पंडित भीमसेन जोशी आणि ललिता फडके, आशा भोसले, उस्ताद अली अकबर खां यांचा ‘लेगसी’ हा अल्बम आवर्जून ऐकण्यासारखा आहे. तानसेन यांच्यापासून चालत आलेल्या परंपरागत बंदिशी (गुरुवंदना, होरी, ख्याल, तराणा, धृपद गायन) आशा भोसले यांनी ‘लेगसी’मध्ये गायिल्या आहेत. त्यांना साथ अली अकबर खां यांच्या सरोदची आणि तबल्यावर पंडित स्वपन चौधरी. उस्ताद विलायत खां यांनी संगीत दिलेलं आणि आशा भोसले यांनी गाइलेलं ‘अंबर की इक पाक सुराही’ (गीतलेखन अमृता प्रीतम!) हे गाणं म्हणजे संगीतरसिकांसाठी अनमोल ठेवा होय.

रिचर्ड अटनबरो यांच्या ‘गांधी’ सिनेमात गांधीजी भारतदर्शनासाठी रेल्वेमधून प्रवास करत असतात. त्या प्रवासाच्या पार्श्‍वसंगीतामध्ये सतार वाजवली आहे पंडित रविशंकर यांनी. त्याबरोबरच उस्ताद सुलतान खां यांच्या सारंगीनं साधलेला परिणाम अनुभवण्यासाठी हे दृश्‍य जरूर पाहावं असं. पंडित रविशंकर यांनी संगीतबद्ध केलेली ‘सावरे सावरे’, ‘हाये रे वो दिन’ (अनुराधा) ही गाणीसुद्धा श्रवणानंद देणारी...

अलीकडंच कालवश झालेले उस्ताद हलीम जाफर खां यांनी ‘ये जिंदगी उसी की है’ (अनारकली, संगीत ः सी. रामचंद्र) या गाण्यात सतार वाजवली आहे. हे गाणं म्हणजे भीमपलास, काफी आणि किरवाणी या रागांचा त्रिवेणी संगम. ‘मधुबन मे राधिका नाचे रे’ (नौशाद-शकील बदायूनी) या महंमद रफी यांनी गायिलेल्या हमीर रागावर आधारित गाण्यातल्या ताना उस्ताद अमीर खां यांनी घेतलेल्या आहेत व सतार वाजवली आहे उस्ताद हलीम जाफर खां यांनी. अशी ही यादी बरीच मोठी आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी. पुढच्या लेखात पाहू या अंतरा आणि मुखडा यांत जे वेगवेगळे प्रयोग केले गेले आहेत, त्या गाण्यांविषयी...

Web Title: suhas kirloskar's article in saptarang