आधीच्या ‘ठेक्‍या’चा नंतर झाला ‘झंकार’! (सुहास किर्लोस्कर)

आधीच्या ‘ठेक्‍या’चा नंतर झाला ‘झंकार’! (सुहास किर्लोस्कर)

शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया या जोडीनं संतूर आणि बासरी बऱ्याच हिंदी-मराठी गाण्यांमध्ये वाजवली आहे. दोघांनी ‘शिव-हरी’ या जोडनावानं ‘सिलसिला’, ‘चाँदनी’, ‘लम्हें’ यांसारख्या चित्रपटांना सुमधुर-श्रुतिमनोहर संगीत दिलं आहे. आनंदघन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘रेशमाच्या रेघांनी’ हे गाणं संतूर, बासरी, ढोलकी आणि खंजिरी अशा मोजक्‍या वाद्यांनी सजलं आहे. हे गाणं रेकॉर्ड करताना स्टुडिओमध्ये कोण कोण असेल? लता मंगेशकर, आशा भोसले, हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा!

अभिजात संगीतात कीर्ती मिळवलेल्या गायक-गायिका-वादकांनीही हिंदी-मराठी सिनेसंगीत/भावगीत या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. या भागात अशीच काही गाणी पाहू या... ‘मुगल-ए-आझम’चा किस्सा तर सर्वश्रुत आहे. उस्ताद बडे गुलाम अली खाँ सिनेमासाठी गाणं गायला तयार नव्हते; त्यामुळं निर्माता के. असीफ यांना तसा थेट नकार न देता, खाँसाहेबांनी बिदागीची मोठी रक्कम सांगितली; जेणेकरून असीफ यांनी सिनेमासाठी गाण्याचा आग्रह पुन्हा धरू नये. मात्र, झालं उलटंच. असीफ यांनी ती रक्कम मान्य केली आणि खाँसाहेबांच्या आवाजात ‘प्रेम जोगन बन के’ हे अप्रतिम गाणं तयार झालं. सोहोनी रागातलं हे गाणं दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्या त्या प्रसिद्ध प्रणयप्रसंगाचं पार्श्‍वसंगीत म्हणून प्रसंगोचित आणि चपलख बसलं. या गाण्यापेक्षा उत्तम पार्श्‍वसंगीत दुसरं कुठलं असू शकेल? शास्त्रीय संगीताबरोबरच सिनेमा-नाटक या क्षेत्रात लीलया मुशाफिरी करणारं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. ‘कट्यार काळजात घुसली’मधली नाट्यगीतं, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर गायलेली ‘टाळ बोले चिपळीला’, कानडा राजा पंढरीचा’ यांसारखी भजनं, ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’, ‘कुणि जाल का, सांगाल का’, ‘राहिले ओठातल्या ओठात माझ्या...’ यांसारखी भावगीतं यांचा गोडवा काय वर्णावा! ‘अष्टविनायक’ सिनेमातलं ‘दाटून कंठ येतो’ हे गाणं आणि गाण्यातला अभिनय म्हणजे गाण्यातल्या भाव-भावनांचा प्रत्ययकारी अनुभव. त्यामानानं कमी ऐकलं गेलेलं; पण श्रवणीय आणि प्रेक्षणीय गाणे म्हणजे ‘रंगीबिरंगी’ या सिनेमात वसंतराव यांनी फैयाजसह गायलेला ‘मृगनयनी चंद्रमुखी’ हा टप्पा. टप्पा हा शास्रीय गाण्यातला पंजाबमधून आलेला एक प्रकार होय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, या टप्प्यात प्रत्येक शब्द टप्प्याटप्प्यानं वाढणाऱ्या तानांनी नटवला जातो. संगीतकार राहुलदेव बर्मन (आरडी) यांनी या या गाण्यासाठी टप्पा गाण्याची विनंती केली ती वसंतरावांना! आरडींच्या कल्पकतेला दाद द्यायलाच हवी. पडद्यावर अभिनेता ओमप्रकाश यांनी असा काही अभिनय केला आहे, की ते स्वतःच प्रत्येक शब्दावर ताना घेत गात आहेत असंच वाटतं. पंडित भीमसेन जोशी यांचा लौकिक ‘अभंगवाणी’द्वारे सर्वसामान्यांमध्ये सर्वदूर पोचला. ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’, तसंच मन्ना डे यांच्याबरोबर त्यांनी ‘केतकी गुलाब जुही’ ही गाणी म्हटली. त्या वेळच्या जुगलबंदीचा किस्सा मन्ना डे यांनी अतिशय बहारीनं सांगितला आहे. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी ‘राम-श्‍याम गुणगान’ अल्बममधली (संगीतदिग्दर्शन श्रीनिवास खळे) हिंदी भजनं गाजली. ‘कृपासरोवर’, ‘बाजे रे मुरलिया बाजे’’ ही भजनं सुंदर आहेत हे निर्विवादच; पण त्यात वाजणाऱ्या ‘टाळा’कडं बारकाईनं लक्ष देऊन ही भजनं ऐकली तर जाणवेल, की पंडितजी आणि लताबाई यांचं रेकॉर्डिंग वेगवेगळं झालेलं आहे. ‘अनकही’ या अमोल पालेकर यांच्या हिंदी सिनेमातली ‘रघुवर तुम को मेरी लाज’, ‘ठुमक ठुमक पग कुमक कुंज मग चपल चपल चरण हरी आये’ ही खास ‘भीमसेनी’ गाणी (संगीतदिग्दर्शन जयदेव) फारच सुंदर आहेत.

शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया या जोडीनं संतूर आणि बासरी बऱ्याच हिंदी-मराठी गाण्यांमध्ये वाजवली आहे. दोघांनी ‘शिव-हरी’ या जोडनावानं ‘सिलसिला’, ‘चाँदनी’, ‘लम्हें’ यांसारख्या चित्रपटांना सुमधुर-श्रुतिमनोहर संगीत दिलं आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’ हे गाणं (संगीतदिग्दर्शन आनंदघन) संतूर, बासरी, ढोलकी आणि खंजिरी अशा मोजक्‍या वाद्यांनी सजलं आहे. हे गाणं रेकॉर्ड करताना स्टुडिओमध्ये कोण कोण असेल? लता मंगेशकर, आशा भोसले, हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा! असंच एक गाणं ‘तेरे मेरे सपने’ या सिनेमातलं व ते म्हणजे ‘जीवन की बगिया महकेगी’. हे गाणं ( संगीतदिग्दर्शन सचिनदेव बर्मन) शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या संतूर-बासरीच्या अंगानं जरूर ऐका. अंतरा भावपूर्ण करणारी बासरी आणि संतूरमधला रिदम, दोन्ही अंतऱ्यांमधले ‘फीलर्स’ या बाबी आपल्याला गाणं वारंवार ऐकायला भाग पाडतात. बर्मन पिता-पुत्र, ओपी नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांमध्ये संतूर ऐकायला मिळेल. ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘जाइए आप कहा जाएंगे’, ‘हम को तो यारा तेरी यारी’, ‘महबूबा महबूबा’ या गाण्यांमधले संतूरचे ‘फीलर्स’ तितकेच श्रवणीय आहेत. ‘महबूबा महबूबा’मधल्या इराणी संतूरबद्दल  शिवकुमार शर्मा म्हणतात ः ‘वो तो पंचम का कमाल है!’ ‘मोगरा फुलला’ हे हृदयनाथ मंगेशकर यांचं गाणं हरिप्रसाद चौरसिया यांच्या सुमधुर बासरीनं सुरू होते. ‘चिंगारी कोई भडके’ या गाण्यातली भावुकता किशोरकुमारच्या बरोबरीनं हरिप्रसाद चौरसिया यांच्याही बासरीतून व्यक्त होते. ‘बुड्‌ढा मिल गया’ या सिनेमामधलं ‘जिया ना लागे मोरा’सारखी बरीच गाणी (संगीतदिग्दर्शन राहुलदेव बर्मन) सांगता येतील, ज्या गाण्यांमध्ये हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं त्या त्या गाण्याला बहार आली आहे. ‘हीरो’ सिनेमातली ती सुप्रसिद्ध धून हरिप्रसाद चौरसिया यांचीच. पंडित शिवकुमार शर्मा यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये संतूर वाजवलं आहे; पण ‘तुम्ही ‘गाइड’मधल्या ‘मोसे छल किए जा’ या गाण्यात तबला वाजवावा,’ असा मित्र राहुलदेव बर्मन यांचा आग्रह ते मोडू शकले नाहीत. शिवकुमार शर्मा यांनी आपली कारकीर्द तबल्यानं सुरू केली होती. जम्मू रेडिओवर पंडित जसराज याच्या गायनाला त्यांनी तबलासाथ केली होती; पण नंतर त्यांनी संतूर या वाद्यात आपलं ‘करिअर’ केलं आणि त्या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ‘मोसे छल किए जा’ या झिंझोटी रागावर आधारित गाण्यात शिवकुमार शर्मा यांनी वाजवलेला तबला फक्त ठेक्‍याचाच नाही, तर त्या गाण्यात रेला आणि काही तुकडेही त्यांनी वाजवले आहेत. त्यामुळं तबल्याच्या अंगानंसुद्धा हे गाणं ऐकण्यासारखं आहे. पुढच्या लेखात गीतलेखन आणि संगीतदिग्दर्शन या अंगानं अंतरा-मुखडा यांमध्ये जे वेगवेगळे प्रयोग झाले आहेत, त्या गाण्यांबद्दलची माहिती घेऊ या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com