ताल से ताल मिला (सुहास किर्लोस्कर)

ताल से ताल मिला (सुहास किर्लोस्कर)

‘मेरे हमसफर’ या सिनेमातलं ‘किसी राह में किसी मोड पर’ हे लता मंगेशकर-मुकेश यांनी गायलेलं गाणं रूपकमध्ये आहे; पण या गाण्याचं चित्रीकरण तालाप्रमाणे नाही. नायक आणि नायिका ट्रकमधून प्रवास करत असतात...ताल आणि सिनेमा यांच्यातली लय जुळत नाही. गाणं आधी तयार करून नंतर सिनेमात वापरलं असावं किंवा गाण्यातल्या प्रसंगाबद्दलची माहिती संगीतकाराला दिली गेली नसावी.

कवितेला चाल दिली की अथवा स्वर-तालात बांधलं की गाणं तयार, असं आपल्याला वाटतं; पण ही प्रक्रिया एवढी सोपी नसते. सिनेमामधला प्रसंग काय आहे, कोण कुणासाठी गाणं म्हणतंय, भावना काय आहेत यावर गाण्याची लय आणि ताल ठरत असतो. गाणं संथ-मध्यम-द्रुत गतीमध्ये आहे म्हणजे तालाच्या दोन मात्रांमधलं अंतर किती आहे, यावर लय ठरते. गाण्याचे शब्द कसे लिहिले आहेत, यावर त्याचा ताल ठरतो. म्हणजे तालाचं एक आवर्तन किती मात्रांचं (Beats) आहे हे ठरतं. ‘सत्ते पे सत्ता’ या सिनेमामधलं ‘प्यार हमे किस मोड पे ले आया’ हे गाणं सहाजण निराश असल्यामुळं संथ लयीत सुरू होतं. नंतर त्यांचा सातवा भाऊ त्यांना विश्‍वास देतो आणि म्हणतो ः ‘चलो लडकियों को लेके आते है।’ आनंदात असल्यामुळं गाण्याची लय वाढते आणि सगळे वरच्या पट्टीत गातात. याशिवाय संगीतकार धून करत असतानाच अनेक धून सुचत जातात. त्या तशाच ठेवल्या जातात आणि नंतर गीतकाराला त्याप्रमाणे, त्याच मीटरमध्ये गाणं लिहायला सांगितलं जातं. एकदा लक्ष्मीकांत-प्यारेलाल एक चाल गीतकार जावेद अख्तर यांना ऐकवत होते. चाल ऐकवताना ‘डा डा डा डा’ किंवा ‘ला ला ला ला’ असे शब्द न वापरता ‘एक दो तीन चार पाच छे’ असं त्यांनी ऐकवलं. जावेद अख्तर यांनी तेच शब्द घेऊन गाणं लिहिलं. ‘... बारा तेरा...तेरा करूं दिन गिन गिन के इंतजार, आजा पिया आयी बहार’ (‘तेजाब’मधलं हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं, हे सांगणे न लगे). ही चाल संगीतकारांना ‘गोविंदा आला रे आला’ यावरूनही सुचली असेल. कुणी सांगावं?
कारण, या ज्या दोन धून आहेत, त्या दोहोंचाही ताल एकच आहे ः ‘ढाककू माकूं, ढाककू माकूं’ रूढार्थानं याला आपण ‘ठेका’ असं म्हणत असलो, तरी तो ‘ताल’ आहे  आणि त्याचं नाव आहे ‘केरवा.’ या तालात बरीच गाणी ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ ः किशोरकुमार यांनी गायलेलं ‘पायलवाली देखना’ हे गाणं (संगीतकार ः चित्रगुप्त) मारुबिहाग रागावर आधारित आहे. केरवा तालाचं वजन वेगवेगळ्या पद्धतीनं वापरून केलेली बरीच गाणी आहेत.

१६ मात्रांच्या ‘तीन ताल’मध्येही बरीच गाणी ऐकायला मिळतात आणि अजाणतेपणी आपण त्याची लय पकडतो. गाणं तालाच्या दृष्टीनं ऐकण्याची ही पहिली पायरी. ‘सूरसंगम’ सिनेमातलं पंडित राजन-साजन मिश्रा यांनी गायलेले ‘आए सूर के पंछी आए’ हे मालकंस रागावर आधारित गाणं (संगीतकार ः लक्ष्मीकांत-प्यारेलाल) तीनतालात आहे. १६ मात्रांचाच अद्धा तीन ताल वेगळ्या वजनानं वाजवला जातो. मन्ना डे यांनी गायलेली दोन गाणी अद्धा तीन तालाचं उदाहरण म्हणून सांगता येतील ‘आयो कहाँ से घनश्‍याम’ (खमाज रागावर आधारित) आणि ‘तेरे नैना तलाश करे’ (छायानट रागावर आधारित) ही ती दोन गाणी. ‘तलाश’ सिनेमातल्या गाण्यात तबला तीन तालात आणि मृदंग अद्धा तीन तालातला वाजतो. झपताल या १० मात्रांच्या तालात गाणं बांधणं अवघड असावं, असं मला वाटत होतं; पण या तालात आपल्या परिचयाची काही गाणी आहेत. यमन रागावर आधारित मुकेश यांनी गायलेलं ‘आंसू भरी है ये जीवन की राहें’ हे गाणं (संगीतकार ः दत्ताराम), शिवरंजनी रागावर आधारित असलेलं लता मंगेशकर-महंमद रफी यांच्या आवाजातलं ‘आवाज दे के हमे तुम बुलाओ’ हे गाणंसुद्धा (संगीतकार ः शंकर-जयकिशन) झपतालात आहे.

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या संगीतदिग्दर्शनात किशोरकुमार यांनी मोजकीच गाणी गायलेली आहेत. त्यातलं ‘इक बार मुस्कुरा दो’ या सिनेमातलं ‘सवेरे का सूरज तुम्हारे लिये है’ हे यमनकल्याण रागावर आधारित गाणं १० च्या मीटरमध्ये आहे.
सिनेसंगीतात ताल वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा सिनेमातल्या प्रसंगानुसार वाजवला जातो; पण या गाण्यातल्या झपतालाचे बोल स्पष्ट ऐकू येतात. एकाच तालातली गाणी सलग ऐकत राहिल्यास आपल्याला त्या तालातली इतरही अनेक गाणी आठवत राहतात. ‘अभिमान’ सिनेमातलं ‘तेरी बिंदिया रे...’ (संगीतकार ः सचिनदेव बर्मन) हे लता मंगेशकर-महंमद रफी यांचं गाणं आणि ‘चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है’ ही गुलाम अली यांनी गायलेली गझल सात मात्राच्या रूपक तालामध्ये आहेत. ‘जोडी तारे नाइचीनी गो शेकी’ हे किशोरकुमार यांनी गायलेले रवींद्रसंगीतातलं गाणं श्रवणीय आहे. याच चालीवर ‘अभिमान’ सिनेमातलं ‘तेरे मेरे मीलन की ये रैना...’ आहे तसं बेतलेलं आहे. हृषीकेश मुखर्जी यांचा ‘अभिमान’ हा सिनेमा प्रख्यात सतारवादकांच्या जीवनावर आधारित असल्याचं म्हटलं जातं. मात्र, सिनेमात त्यांनी वादकांऐवजी दोघंही गायक दाखवले आहेत. ‘तेरी बिंदिया रे’ गाण्यातला तबला आणि रूपक ताल स्पष्टपणे ऐकू येतो. या गाण्यात वाद्यं जास्त नाहीत. तबला, सतार, बासरी अशी मोजकीच वाद्यं आहेत. ‘मुझे तुमसे कुछ भी न चाहिए’ (गायक ः मुकेश), ‘हुई शाम उनका खयाल आ गया’ (महंमद रफी), ‘बावरा मन देखने चला एक सपना’ (स्वानंद किरकिरे) ही आणखी काही गाणी. ‘मेरे हमसफर’ या सिनेमातलं ‘किसी राह में किसी मोड पर’ हे लता मंगेशकर-मुकेश यांनी गायलेलं गाणं रूपक या तालात आहे; पण या गाण्याचं चित्रीकरण तालाप्रमाणे नाही. नायक आणि नायिका ट्रकमधून प्रवास करत असतात...ताल आणि सिनेमा यांच्यातली लय जुळत नाही. गाणं आधी तयार करून नंतर सिनेमात वापरलं असावं किंवा गाण्यातल्या प्रसंगाबद्दलची माहिती संगीतकाराला दिली गेली नसावी. एकेका तालातली वेगवेगळी गाणी ऐकल्यानंतर तालामध्ये अभिनव प्रयोग करून कोणती गाणी संगीतबद्ध केली गेली आहेत, याविषयी पुढच्या लेखात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com