खेळ मनाचे! (सुहास परळे)

सुहास परळे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

"प्रियांका, सांभाळ हं, आमच्या घरी जे झालं ते तुझ्या घरी होऊ देऊ नकोस. त्यासाठी आधीच काळजी घे,' असा सल्ला मैत्रिणीनं तिला दिला होता. तेव्हा फार्महाऊसच्या बाबतीत तसं काही असेल तर काय करता येईल, याचा प्रियांका विचार करू लागली.

"प्रियांका, सांभाळ हं, आमच्या घरी जे झालं ते तुझ्या घरी होऊ देऊ नकोस. त्यासाठी आधीच काळजी घे,' असा सल्ला मैत्रिणीनं तिला दिला होता. तेव्हा फार्महाऊसच्या बाबतीत तसं काही असेल तर काय करता येईल, याचा प्रियांका विचार करू लागली.

"पुढच्या आठवड्यात येत आहे....' बंधुराजांचा असा निरोप आल्यापासून प्रियांका आनंदात होती. तिचा दादा बंगळूरला असतो. तो एका मोठ्या कंपनीत उच्चपदस्थ आहे. कंपनीनं राहायला ऐसपैस बंगला दिलेला आहे. विविध उद्योगपती, कंपन्यांचे सीईओ, डायरेक्‍टर, फायनान्सर अशा मोठमोठ्या लोकांत त्याची ऊठ-बस असते. वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी त्याच्या देश-विदेशात वारंवार फेऱ्या होत असतात. कंपनी, प्रॉडक्‍ट्‌स, टार्गेट्‌स, मार्केट हे त्याच्या बोलण्याचे आवडीचे विषय. बाकी, कौटुंबिक बाबींमध्ये तो सहसा पडत नाही. मुलांचं शिक्षण, नात्यातले समारंभ, इतर सांसारिक कामं यांची चिंता त्याला वाहावी लागत नाही. ती आघाडी वहिनी तिच्या परीनं सांभाळते. लग्न, वास्तुशांत आदींसारख्या मोठ्या समारंभांना यायला त्याला जमत नाही. मोठी आजारपणं, मृत्यू यांसारख्या दु:खद प्रसंगीदेखील त्याची उपस्थिती कुणीही गृहीत धरत नाही. त्याच्या वतीनं सगळ्या कार्यक्रमांना वहिनीच हजेरी लावते. त्याची उणीव काही अंशी भरून काढते. भाऊबीज व राखीपौर्णिमा हे दोन दिवस सोडले, तर प्रियांकाच्या घरी दादाचं येणं जवळपास नसल्यासारखंच! त्याची ही अडचण प्रियांकाही जाणून आहे. त्यामुळं तीच अधूनमधून दादाकडं जात असते. वहिनी, दादाची मुलं यांची त्यानिमित्तानं गाठ पडते. दोन गोष्टी बोलता येतात. नाहीतर महिनोन्‌महिने भेटी-गाठी होत नाहीत. पूर्वी आई-बाबा तिथं असताना दादाकडं बऱ्याचदा जाणं होई; पण ते दोघं गेल्यापासून तेही कमी झालं. एकूण काय, दादाची भेट हा "कपिलाषष्ठीचा योग' असतो. म्हणून तर दादा येणार, या बातमीनं तिला आनंद झाला होता. दादा किती दिवस राहाणार? त्याच्याबरोबर कोण येणार? त्याच्यासाठी आपण काय काय करायचं? या विचारांनी ती अधिकच उत्साही झाली. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला, तो कशासाठी येणार असावा? त्याचं काय काम असेल? त्याला अचानक वेळ कसा मिळाला? असे अनेक प्रश्नही तिला सतावू लागले.
चार-पाच वर्षांपूर्वी आईच्या आजारपणात तिला घेऊन दादा आणि वाहिनी आले होते. दादा दोन दिवस राहिला. त्यानंतर तिच्या दुसऱ्या भावाच्या - प्रवीणच्या - मुलीच्या लग्नाला दादा उभाउभी आला होता. पुढं आई देवाघरी गेली, तेव्हा प्रियांकाच तिकडं गेली होती. त्यानंतर गेल्या तीन-वर्षांत दादाकडचं कुणीच आलं नव्हतं. आजकालच्या व्हॉट्‌सप इत्यादी आधुनिक संवादसाधनांच्या या काळात फोनवरसुद्धा दादाशी विशेष बोलणं होत नाही. क्वचित वहिनीचा फोन येतो. प्रवीणकडून काही वेळा एखादी बातमी समजते; पण तोही कारणाखेरीज तिच्या घरी फिरकत नाही. प्रियांकाच्या यजमानांचा - माधवरावांचा - बिझनेस असल्यानं त्यांनाही दादाकडं जायला जमत नाही. म्हणूनच "दादा येणार, सगळ्यांच्या गाठी पडणार', या विचारानं तिला आनंद झाला होता.
तसा दादा बऱ्याचदा मुंबईला येतो; पण ऑफिसच्या कामासाठी. अशा वेळी तो घरी कधीच राहायला येत नाही. त्याचा मुक्काम "स्टार' हॉटेलमध्ये असतो. ते त्याला सोईचं असतं. तिथंच त्यांच्या मीटिंग्ज होतात. मग प्रियांकाच त्याला हॉटेलमध्ये जाऊन भेटते. या वेळी मात्र तो घरी येणार म्हणाला म्हणजे नक्कीच वेगळं काही कारण असणार! काय असावं बरं, हा विचार तिच्या मनात राहून राहून येत होता. "सौरभचं लग्न ठरलं का? की ऋचा कुठं परदेशी शिकायला निघाली असावी? की ऋचाचंच लग्न ठरलं असावं...?' अनेक शक्‍यता मनात धरून प्रियांका मनाशी खेळत राहिली.
***
प्रियांकाला अचानक त्यांच्या पुण्याच्या फार्महाऊसची आठवण झाली. बाबांनी मोठ्या हौसेनं ते फार्महाऊस घेतलं होतं. खूप छान होतं. शहरापासून दूर, मस्त डोंगरउतार, थोडीशी झाडी...तिथं राहायला बरं वाटायचं. तिथल्या आठवणी फोटोंच्या स्वरूपात सगळ्यांनी आजही जपून ठेवल्या आहेत. बाबांच्या शेवटच्या आजारपणात त्यांनी ते उत्पन्नाचं साधन म्हणून त्यांच्या एका मित्राला चालवायला दिलं होतं. बाबा गेल्यावर ते फार्महाऊस दादाच्या ताब्यात आलं; पण ते दुर्लक्षितच राहिलं. प्रियांका आणि प्रवीण मुंबईला, तर दादा बंगळूरला. मग पुण्याच्या फार्महाऊसकडं लक्ष देणार कोण? आई-बाबा गेल्यावर फार्महाऊस विकून टाकण्याविषयीची चर्चा झाली होती; पण तो विषय मागं राहिला. फार्महाऊसची आजच्या बाजारभावानं मोठी किंमत येत असणार. दादा आणि प्रवीण दोघांनी मध्यंतरी किमतीचा अंदाज घेतला होता. कदाचित हाच व्यवहार करायला दादा येत असावा, असं प्रियांकाला वाटलं. आजकाल वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलींचादेखील हक्क असतो. दादानं याबाबतीत काहीतरी निश्‍चित ठरवलं असावं. तिला तिच्या एका मैत्रिणीची आठवण झाली. त्या मैत्रिणीच्या घरी वडिलोपार्जित मालमत्तेमुळं भांडणं झाली होती. भाऊ भाऊ भांडून एकमेकांपासून दूर गेले होते. मैत्रीण तडजोड करायला गेल्यानं वाईट ठरली. त्या कुटुंबाचं स्वास्थ्य नष्ट झालं.
"प्रियांका, सांभाळ हं, आमच्या घरी जे झालं ते तुझ्या घरी होऊ देऊ नकोस. त्यासाठी आधीच काळजी घे,' असा सल्ला मैत्रिणीनं तिला दिला होता. तेव्हा फार्महाऊसच्या बाबतीत तसं काही असेल तर काय करता येईल, याचा प्रियांका विचार करू लागली.
मैत्रिणीच्या घरी घडलेल्या प्रसंगाविषयी ती यजमानांशी यापूर्वीच बोलली होती. "तुझे भाऊ योग्य वेळी फार्महाऊसबद्दल काय ते ठरवतील. आपण नको काळजी करायला,' असं ते म्हणाले होते; पण अजून तरी काही कानावर आलं नव्हतं. दादा आणि प्रवीण दोघंही आर्थिकदृष्ट्या भक्कम आहेत. आपली परिस्थितीदेखील चांगली आहे. जी किंमत येईल ती तिघांत वाटून घेऊ आणि प्रश्न सोडवून टाकू, असा विचार तिच्या मनात आला. तोच दुसरं मन म्हणालं, "पण तुझा हक्क ते दोघं मानतील का...? नाहीतर "तुझ्या लग्नात तुला जे द्यायचं होतं ते बाबांनी दिलं, आता काही नाही' असंही म्हणतील कदाचित! मग आपण काय करायचं? गप्प बसायचं? आपला हक्क सोडायचा? यजमानांना ते पटेल का? ते काय म्हणतील?' अशा अनेक प्रश्नांनी प्रियांकाचं मन बेजार झालं. काळजी, चिंता, भीती यांसारख्या भावना मनात दाटून आल्या. दादाच्या येण्याच्या बातमीनं झालेला आनंद झाकोळून गेला.

दादा येण्यापूर्वीच याविषयी यजमानांशी बोलायला हवं, असं तिनं मनोमन ठरवून टाकलं; पण नेहमीच्या घाईत यजमानांशी निवांतपणे बोलायला तिला सवड मिळाली नाही. दरम्यान, मैत्रिणीला फोन करून तिनं अशा बाबतीत कोणते पर्याय असतात, कायदा काय सांगतो याची माहिती घेतली. जरूर पडल्यास कोणत्या वकिलांना नेमावं, हेदेखील तिनं विचारून घेतलं! नंतर यजमानांशीही बोलणं झालं; पण त्यांनी ते फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. "समोर येईल तेव्हा बघू' असा त्यांचा नेहमीचा खाक्‍या असतो. प्रियांकाला ते पटत नाही. शेवटी, दादा येण्याचा दिवस जवळ आला.

'आई, मामा आला,'' हे दीदीचं वाक्‍य कानी पडताच प्रियांका पुढच्या हॉलमध्ये धावली. दादा, वाहिनी आणि ऋचा आली होती. रविवार असल्यानं सकाळच्या वेळी सगळे घरीच होते. मुलं ऋचाला भेटली. तिला आपल्या खोलीत घेऊन गेली. चहापाणी झालं. अवांतर गप्पा झाल्या. आता दादा काही बोलेल म्हणून प्रियांका वाट पाहू लागली; पण "कामाचं बघून येतो' म्हणून दादा बाहेर निघून गेला. वहिनी आणि ती, दोघी स्वयंपाकाचं बघायला गेल्या. आल्या आल्या "तुम्ही का आला आहात?' असं कुणालाही विचारणं हे सभ्यतेला धरून नसतं; त्यामुळं तिनं वहिनीला याबाबत काही विचारलं नाही. ऋचा मुलांशी काही बोलली का, याचाही प्रियांकानं हळूच कानोसा घेतला; पण तिनंही काही दाद लागून दिली नव्हती. मुलं मस्त खेळत होती. एकमेकांची चेष्टामस्करी सुरू होती. खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रियांकानं वरवर जरी शांततेचा मुखवटा चढवला असला, तरी आतून तिचं मन भिरभिरलं होतं. दादाच्या येण्याचं नक्की कारण समजल्याशिवाय तिला स्वस्थता लाभणार नव्हती.

सुमारे दोन तासांनी दादा घरी परतला. त्याच्या हातात एक पार्सल होतं. ते त्याने हॉलमधल्या टेबलवर ठेवलं. सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि म्हणाला ः 'तुम्हा सगळ्यांसाठी मी काही गिफ्ट्‌स आणली आहेत. बघा, आवडतात का!'' त्यात प्रियांकाला एक उंची साडी, ड्रेस मटेरिअल, मुलांना शर्टपीस, जर्किन्स, मिठाई अशा काही वस्तू होत्या. मेहुण्यांनासाठीसुद्धा भेट होती. मुलं पार्सल उघडून बघत असताना तिचं मन पुन्हा विचारात पडलं. कदाचित दोन्ही भावांनी परस्पर व्यवहार उरकला असेल, पैसे वाटून घेतले असतील...आपली संमती आहे हे गृहीत धरून! आता फक्त आपल्याला हे सांगण्यासाठी दादा आला असावा. कदाचित कागदपत्रांवर सह्या हव्या असतील...आपल्याला वाटा द्यायला नको म्हणून तर या भेटी आणल्या नसतील ना दादानं! पण आपण गप्प बसता कामा नये...दादाला याचा जाब विचारायलाच हवा! तिला आता गप्प बसणं अवघड होऊन बसलं. यजमानांना खूण करून, "तुम्ही बोला. विचारा त्या व्यवहाराविषयी' असं ती खुणावू लागली; पण ते काहीच बोलले नाहीत. मग प्रियांकाला राग येऊ लागला. आता ती काहीतरी बोलणार इतक्‍यात दादा म्हणाला ः
'ताई, मी पंधरा दिवस सुटी घेतली आहे. काही दिवस मी तुझ्याकडं राहीन. नंतर आपण प्रवीणकडं राहू या. नंतर तुम्ही सगळे माझ्याकडं चला. मस्त एंजॉय करू या. माझ्या बिझी रुटीनचा मला अगदी कंटाळा आला आहे. थोडा चेंज हवा आहे...'' दादाचं बोलण तिला आवडलं; पण अपेक्षित माहिती न मिळाल्यानं मनातून ती थोडी नाराजही झाली. तेवढ्यापुरतं स्वत:ला सावरून ती स्वयंपाकघरात निघून गेली.
दादा तिच्या घरी चार दिवस राहिला. एक दिवस "गेट वे ऑफ इंडिया' बघितलं, तिथं बोटिंग केलं. एकदा जुहू बीचवर भेळपुरीचा कार्यक्रम झाला. मराठी नाटकसुद्धा पाहिलं. दादा जरासा रिलॅक्‍स झाला. त्यानं फार्महाऊसचा विषय मात्र काढला नाही. चार दिवसांनी सगळे प्रवीणच्या घरी राहायला गेले. सगळ्यांनाच बदल हवाहवासा वाटत होता. सगळे एकत्र भेटल्यामुळं प्रवीण आणि त्याची बायको खूश झाली. काय करू आणि काय नको, असं त्या दोघांना झालं. तिथं एक दिवस आमरस-पुरीचा झकास बेत झाला. कर्नाळा किल्ला पाहायला, फोटोसेशन करायला खूप मजा आली. मुलं ऋचाला घेऊन मुद्दाम लोकलच्या प्रवासाला गेली. येताना विद्यापीठाच्या आवारात चक्कर मारून आली. ऋचा खूश झाली. दिवस मजेत चालले होते. एक दिवस पुण्याला जायची टूम निघाली.
'तिथलं घर, फार्महाऊस पाहून बरेच दिवस झालेत, आपण सगळेच गाडी करून तिकडं जाऊ या,'' असं प्रवीण म्हणाला. सगळ्यांना आनंद झाला. फार्महाऊसचा विषय निघताच प्रियांकानं कान टवकारले.
दादा प्रियांकाच्या यजमानांना म्हणाला ः 'बाबांनी हौसेनं घेतलेलं फार्महाऊस सध्या दुर्लक्षित आहे, हे तुम्हाला माहीत आहे ना, भाऊजी?''
'हो ना. तुम्ही त्यात लक्ष घालायला हवं.''
'इतक्‍या लांबून काय लक्ष ठेवणार? मुलं त्यांच्या करिअरच्या नादात. प्रवीणदेखील त्याबाबत फारसा उत्साही नाही.''
'मग काय करावं?''
'ते तुम्ही सांभाळावं, अशी आम्हा दोघांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं?''
'पण मी...''
'पणबीण काही नाही. माधवराव, आम्ही ते फार्महाऊस ताईच्या नावावर करणार आहोत.''
दादाच्या तोंडून हे ऐकताच प्रियांकाला क्षणभर काही सुचेना! तिला स्वत:चीच लाज वाटली. आपले दोन्ही भाऊ तिला हिमालयाहून मोठे भासले! नकारात्मक कल्पना करत बसायची सवय ही किती घातक असते, याची तिला चांगलीच कल्पना आली. भारावल्यागत ती दादाकडं झेपावली. तिनं दादाला मिठीच मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले....

Web Title: suhas parale write article in saptarang