धनासाठी साधना करू नकोस! (सुहास व्यास)

suhas vyas write article in saptarang
suhas vyas write article in saptarang

मंचावर पूर्ण समर्पित होऊन गावं लागतं. आवाजाची फेक, आवाजातलं मार्दव, सूर-बंदिश-लय-ताल या गोष्टींचा पक्का रियाज झाला तरच अष्टांगप्रधान गायकी आत्मसात होते. यातलं आपल्याला नेमकं किती व काय साध्य होईल, हा भाग वेगळा असतो. मात्र, बाबांनी मला एक सांगितलं होतं ः "" "षड्‌जा'ची साधना करताना धनाची आणि कार्यक्रमाची अपेक्षा ठेवून साधना करू नकोस, म्हणजे तुझा "सा' आपोआप व्यवस्थित लागेल.''

माझ्या बाबांमुळे (चिंतामण रघुनाथ व्यास उर्फ पंडित सी. आर. व्यास) गाणं आमच्या घरातच होतं. मला सतीश व शशी हे दोन धाकटे भाऊ. सतीशला संगीताची आवड पहिल्यापासूनच होती. सतीश संतूरवादक म्हणून प्रसिद्ध आहे. शशी गात नसला तरी तो अभिजात संगीताच्या प्रसाराचं काम उत्तमरीत्या करतो. बाबांचा पहाटे साडेचार वाजता नियमितपणे रियाज सुरू होत असे. शक्‍यतो कोणताही मोठा गायक-वादक आपला स्वतःचा रियाज दुसऱ्याला ऐकवत नाही. मात्र, आम्ही सगळी भावंडं व माझा चुलतभाऊ अनिल, बाबांचा रियाज ऐकायला बसायचो. संगीत हे संस्कारांमुळंच अधिक समृद्ध होतं, असं माझं मत बनलं. या ऐकण्याच्या रियाजामुळं मला संगीतात रुची निर्माण झाली. मात्र, आमच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाला बाबांनी प्राधान्य दिल्यानं, वयाच्या पंधराव्या वर्षी माझं सांगीतिक शिक्षण सुरू झालं. मुंबईला आमच्या माटुंग्याच्या तीन खोल्यांच्या छोट्या घरात अनेक मान्यवर गायक बाबांकडं येत असत. ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित यशवंतबुवा मिराशी यांचे पट्टशिष्य पंडित राजारामबुवा पराडकर हे माझ्या बाबांचे पहिले गुरू. पुढं पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडं बाबा गाणं शिकले. मी लहानपणी थेट गायन शिकणं सुरू केलं नसलं, तरी बाबांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असे. माझा "मनापासून गाणं ऐकण्याचा' रियाज फार मोठा होता. बहुदा ते सन 1967 असावं. मुंबईत (दादर) पंडित रविशंकर यांची एक मैफल झाली होती. तबल्याच्या साथीला उस्ताद अल्लारखां होते. ही मैफल रात्री साडेनऊ वाजता सुरू झाली आणि सकाळी सहा वाजता संपली! त्या वेळी कलाकारांची काय ताकद होती. या मैफलीनं मी अक्षरशः भारावून गेलो.

सन 1965 मध्ये पुरोहितबुवांच्या एकसष्टीच्या व गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात बाबा "कौशिकरंजनी' राग गायले. बुवा स्वतः ऐकायला उपस्थित होते. त्यांच्या शेजारी माणिक वर्मा, जितेंद्र अभिषेकी, रामभाऊ मराठे हे बुवांचे शिष्य बसले होते. या कार्यक्रमामुळेच मी "दोन तानपुऱ्यांत बसून गाणं गायला शिकायचं' अशी खूणगाठ मनाशी बांधली. सन 1969 मध्ये गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर बाबांनी मला गाण्याबाबत वैयक्तिक मार्गदर्शन सुरू केलं. गाणं शिकायला सुरवात झाली खरी; परंतु माझा आवाज फुटला. त्यामुळे संगीतसाधनेवर बंधनं आली. बाबा मला नुसता "सा' लावून बसायला सांगायचे. ""तू सी. आर. व्यास यांचा मुलगा आहेस, हे डोक्‍यातून पूर्णतः काढून टाक आणि मग माझ्यासमोर बस,'' असं सुरवातीलाच बाबांनी मला बजावलं होतं. पुढं 13 जुलै 1974 रोजी बाबांच्या शिष्यांनी आणि आम्ही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम केला. या वेळी खऱ्या अर्थानं माझं पहिलं गाणं झालं.

आपण राग शिकतो की गाणं? तर आपण गाणं शिकत असतो. आपण कितीही राग शिकलो तरी ते आपल्याला पचनी पडतील एवढेच शिकावेत व गावेत. त्यासाठी आपल्याकडं रियाजाचे काही खास राग आहेत. सकाळी "भैरव', "तोडी', "बिलावल', "वृंदावनी सारंग', दुपारी "भीमपलास', "मुलतानी', सायंकाळी "मारवा', "यमन', "पूरिया' तर पुढं "बिहाग', "मालकंस' अशा या प्रचलित रागांचा रियाज कलाकाराला शेवटच्या श्वासापर्यंत करावा लागतो. माझ्या पहिल्या गाण्यापर्यंत यातले मोजकेच राग मी शिकलो होतो. आवाज फुटल्यानंतर माझी आवाजाची साधना सन 1980
पर्यंत चालली. माझा आवाज जेव्हा पूर्ण अनुकूल झाला तेव्हा बाबांनी मला गाणं शिकवायला रीतसर सुरवात केली. गाणं हे लयीत व्हावं लागतं. ताल हे केवळ कालवाचक माप मोजण्याच्या मात्रा आहेत. तालाचं गणित जरी अचूक समजलं तरी लय सापडावी लागते. लय ही दोन मात्रांच्या मध्ये असते. पहिला "धिन' व दुसऱ्या "धिन'ची लय तबलजीनं दिल्यावरच तुम्ही गाऊ शकता. बंदिश पाठ केलेली असली तरी लय ही आपली आपल्यालाच शोधावी लागते. प्रत्येकाची बोलण्याची, चालण्याची एक लय असते. एवढंच नव्हे तर, विश्वाचीदेखील एक लय ठरलेली असते. ही लय समजण्यासाठी काही काळ जावा लागतो व ती समजल्यावर लक्षात येतं, की विश्व किती मोठं आहे. तबलजीला जशी बंदिश व गाणं माहीत असावं लागतं, तसा गायकालादेखील तबला माहीत असावा लागतो. माझे बाबा किंवा पूर्वीचे सगळे मोठे गायक उत्कृष्ट तबलावादक असत. पंडित मिराशीबुवा हे त्यांच्या उतारवयात आमच्याकडं महिनामहिनाभर मुक्कामाला असत (त्या वेळी ते राहायला पुण्यात होते). मिराशीबुवा रात्री दोनपर्यंत बाबांना तालीम द्यायचे. स्वतः बुवा डग्ग्यावर ठेका धरून बसायचे. मग तो तिलवाडा असू दे, झुमरा असू दे, नाहीतर अडाचौताल असू दे. त्यांची तालीमच अशी असायची. अतिशय सत्त्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून मिराशीबुवांचा लौकिक होता.

ता. एक फेब्रुवारी 1985 रोजी वाशी इथं "न्यू बॉम्बे म्युझिक सर्कल'तर्फे दोन दिवसांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचं मला आमंत्रण आलं. मी तिथं "मारुबिहाग' गायलो. ही माझ्या सांगीतिक कारकीर्दीतली पहिली व्यावसायिक मैफल. मंचावर पूर्ण समर्पित होऊन गावं लागतं. आवाजाची फेक, आवाजातलं मार्दव, सूर-बंदिश-लय-ताल या गोष्टींचा पक्का रियाज झाला तरच अष्टांगप्रधान गायकी आत्मसात होते. यातलं आपल्याला नेमकं किती व काय साध्य होईल, हा भाग वेगळा असतो. मात्र, बाबांनी मला एक सांगितलं होतं ः "" "षड्‌जा'ची साधना करताना धनाची आणि कार्यक्रमाची अपेक्षा ठेवून साधना करू नकोस, म्हणजे तुझा "सा' आपोआप व्यवस्थित लागेल.''
""कोणत्याही रागाचा "सा' हा "उघडा' येत नाही. तो काहीतरी घेऊन येतो. तो जे घेऊन येतो ते आपल्याला समजलं पाहिजे,'' असं पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासारख्या मोठ्या गायकानं म्हणून ठेवलं आहे. "यमन'मध्ये "निरेग निरेगरेसा' यात जो "सा' लागतो तो शब्दांत सांगता येणार नाही किंवा "पूरिया'मध्ये ऋषभ बदलल्यानं हाच "सा' वेगळा येतो. "भैरव'चा "सा' अजून वेगळा आहे. कारण, तो स्वरसंगतीवर अवलंबून असतो. राग गाणं म्हणजे त्या रागाचं "स्केल' गाणं नव्हे. प्रत्येक रागाची इमारत ही वेगवेगळ्या स्वरसंगतीवर उभारलेली असते. "राग शिकणं' आणि "गाणं शिकणं' यांत बराच फरक आहे. तो समजणं अवघड आहे; पण समजल्यानंतर त्याचा आनंद अवर्णनीय असतो. मुळात गाणाऱ्याला व ऐकणाऱ्याला गाण्यानं आनंद मिळायला हवा. म्हणजेच ज्ञानेश्वरांनी म्हटल्यानुसार, "या हृदयीचे त्या हृदयी घातल्या'प्रमाणे गाणं जमायला हवं.

"माझं गाणं कसं झालं?' असं मी बाबांना कधीच विचारलं नाही व बाबांनीदेखील मला ते कधी सांगितलं नव्हते. कारण, स्तुती माणसाला खाली आणते! एकदा मुंबईत पंडित प्रभाकर कारेकर यांनी एक कार्यक्रम ठेवला होता. त्यात मी सकाळी एक तास पाच मिनिटं "तोडी' गायलो. घरी आल्यावर बाबा आपणहून मला एवढंच म्हणाले ः ""तुला आता योग्य मार्ग सापडला आहे.''"तोडी'मधली ती त्रितालातली बंदिश मी स्वतः रचलेली होती. त्या बंदिशीचा अर्थ होता ः "हे मना, तू समजून घे, कोण मित्र आहे आणि कोण वैरी.'त्र, अंतऱ्यात मी म्हटलं आहे ः "प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ असतो. तू कशाला उगीच विचार करतोस?' कलाकार सगळ्यांच्या बरोबर असतो; परंतु तरीदेखील तो एकटा असतो. कारण, तो त्याच्या विश्वात रममाण झालेला असतो. गणिती पद्धतीनं चार हजार 484 एवढे राग होतात. यातले आपल्याला किती समजतील हा प्रश्न आहे. सगळेच राग एकाच कलाकाराला गाता येणं शक्‍य नाही. शिवाय, बंदिशींच्या संख्येचा इथं विचार केलेला नाही! बाबांनी मला प्रचलित रागांबरोबरच काही अनवट रागही शिकवले. मिराशीबुवांनी बाबांना "मालव', "चंपक' यांसारखे राग शिकवले होते. "चंपक' रागाला मिराशीबुवांनी त्यांच्या पुस्तकात "मारुबिहागचे प्रकार' असं म्हटलेलं आहे. माझं नशीब एवढंच, की घरातच गाणं असल्यानं मला गाणं शिकण्यासाठी कोणत्याही खस्ता खाव्या लागल्या नाहीत. सन 2007 मध्ये बैजू आणि गोपाळलाल यांच्या जीवनावरच्या "संगीत मृगारंजनी' या नाटकाला मी संगीत दिलं. अशोक पाटोळेलिखित हे नाटक "बालगंधर्व संगीत रसिक मंडळी'नी रंगमंचावर आणलं. विविध रागांत मी एकूण 12 पदं त्यासाठी संगीतबद्ध केली. बहुतेक चाली स्वतंत्र आहेत. त्या कुठल्याही बंदिशींवर आधारित नाहीत.

शेवटी मला एकच सांगावंसं वाटतं, की कलाकारांनी एकमेकांचा सन्मान ठेवायला हवा. विद्वत्ता सगळ्यांकडं असतेच असं नाही; परंतु भावना सगळ्यांमध्ये असते. प्रत्येक कलाकाराला प्रत्येक रागात काहीतरी नवीन सुचू शकतं. पूर्वी गुरुपदाला असणारे मोठे कलाकार नव्या कलाकारांना दाद व प्रेरणा देण्यासाठी त्यांचं गाणं ऐकण्यासाठी बसत असत, उपस्थित राहत असत. ही भावनाच आता संपुष्टात येत चालली आहे. आता "नेट'वर दिग्गज व नवोदित अशा सगळ्याच गायक-वादकांचं गायन-वादन ऐकायला मिळतं; परंतु स्वतःच्या व संगीताच्या समृद्धीसाठी कलाकारांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे. "असं गाणं ऐकल्यानं दुसऱ्या गायकीचा आमच्यावर परिणाम होईल,' असं काही कलाकारांचं म्हणणं असतं.

मी विचारतो ः "अरे, काय परिणाम होणार आहे? मग तुम्ही रियाज कसला करता!'
-मी तरी केवळ गाण्यावर प्रेम करतो. "धोतर-टोपी', "शर्ट-पॅंट', "कुर्ता-पायजमा' घातल्यावर केवळ रूप बदलतं! म्हणून मुख्यत्वे गाण्यावर प्रेम करावं, घराण्याचा दुराग्रह नसावा.

"जय जय भारत देश हमारा...'
सन 2007 मध्ये चीन (झियामेन) इथं "ब्रिक्‍स कल्चरल फेस्टिव्हल' झाला. या "फेस्टिव्हल'साठी भारतातून मला निमंत्रित करण्यात आलं होतं. सन 1955 मध्ये पंडित डी. व्ही. पलुस्कर यांनी चीनमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर केलं होतं. यानंतर थेट 62 वर्षांनंतर असं भाग्य लाभणारा मी होतो. एक हजार आसनव्यवस्था असलेलं सभागृह प्रवेशमूल्य असूनही "हाऊसफुल' होतं. मी डॉ. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब यांची रचना निवडली. त्रितालात "यमन' रागात, "जय जय भारत देश हमारा, नमन प्रथम करि मंगल गावे। दस दिस कीरत जस उजियारा, जग में न्यारा देश हमारा।' ही रचना मी गायलो. याचं भाषांतर चिनी भाषेत करून वाचून दाखवण्यात आलं. रसिकश्रोत्यांनी उभं राहून उत्स्फूर्त दाद दिली. माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य मला मिळाल्यानं मला खूप अभिमान व आनंद वाटला.

(शब्दांकन ः रवींद्र मिराशी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com