करारनामा (सुहासिनी पांडे)

suhasini pande
suhasini pande

शरदराव आणि नाना पहाटेच उठून फिरायला जात आणि येताना भाजी, दूध घेऊन येत. दुपारी बारा वाजता सुमनताई आणि माईंचा स्वयंपाक झाल्यावर चौघं एकत्र बसून जेवण करायचे. चारचा चहा झाल्यावर शरदराव-नाना फिरायला जायचे, आणि माई- सुमनताई मंदिरात जायच्या. शरदराव आणि नानांची चांगलीच गट्टी जमली होती. माई तर सुमनताईंवर बेहद्द खूष होत्या. रात्रीचे 10-11 वाजले, तरीही त्यांच्या गप्पा संपायच्या नाहीत.

माई टीव्हीवर भजनाचा कार्यक्रम बघण्यात गुंग झाल्या होत्या. एकीकडं हातानं वाती वळणं सुरू होतं. इतक्‍यात नानांनी हाक मारली ः 'अहो, ऐकताय ना?'' माईंनी त्यांच्याकडं प्रश्‍नार्थक नजरेनं पाहिलं. 'हो हो. वाचा ना काय लिहिलयं ते.''
'हं ऐक,'' असं नाना म्हणाले आणि त्यांनी वाचायला सुरवात केली ः 'गरज आहे प्रेमळ सोबत्यांची. तरी गरजवंतांनी संपर्क साधावा. उमेदवार खालील अटींमध्ये बसणारा असावा. वय 60 ते 65 वर्षांचे असावे. शक्‍यतो जोडपे असावे. विनापाश असल्यास प्राधान्य. कमीत कमी वर्षभराचा करार करावा लागेल. प्रत्येकाने आपली माहिती पोस्टाने पाठवावी. माहिती मिळाल्यावर मुलाखतीसाठी बोलावले जाईल.''
'वा वा!,'' माई म्हणाल्या. 'अगदी शिक्षकी पेशाला शोभेल अशीच जाहिरात लिहिलीत.''
'हं! ठीक आहे ना? मग बंद करू का पाकीट?'' 'हो हो. अगदी छान आहे. करा बंद.''
'हं! मग जाऊन येतो वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये,'' असं म्हणून पायात चपला अडकवून वसंतराव बाहेर पडले. आठ-दहा दिवसांतच त्यांच्या घरी दहा-पंधरा पाकिटं येऊन पडली. नानांनी सगळी पत्रं वाचून काढली आणि त्यातलं एक पत्र निवडून त्यांच्याकडं संपर्क साधला.

दुसऱ्या दिवशी सरदेशपांडे सपत्नीक नानांकडं मुलाखतीसाठी हजर झाले. नाना आणि माईंनी त्यांचं हसतमुखानं स्वागत केलं. 'या या. आम्ही आपली वाटच पाहत होतो,'' असं ते म्हणाले. त्या जोडप्यानं नाना आणि माईंना हात जोडून नमस्कार केला.
'मी शरद सरदेशपांडे आणि माझी पत्नी सुमन सरदेशपांडे. मी आमची माहिती आपल्याला कळवली आहेच. आपण पाठवलेली जाहिरात आवडली, म्हणून चौकशी करायला आलो.''
'नुसती जाहिरात आवडली, की त्यावर विचार करणार आहात?''
'अर्थात पूर्ण विचार करूनच आम्ही इथं आलो आहोत. तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहेत. फक्त एक प्रश्‍न विचारतो.''
'हो हो. विचारा ना. अगदी निःसंकोचपणे विचारा.''
'आपल्या महिन्याच्या खर्चाचं काय?''
'हं! बर झालं विचारलंत ते. अहो, जो काही खर्च होईल तो आपण वाटून घेऊया,'' नाना म्हणाले.
'हं! ठीक आहे.''
'आणखी काही शंका नाही ना मनात?'' माईंनी सुमनताईंना विचारलं.
'छे हो. तुमची दोघांची सोबत मिळतेय हे काय कमी आहे? आम्ही उद्याच रहायला येतो.''
'हं. करा तर मग सही या पेपरवर...''
नानांनी कागद पुढं केला. नानांच्या हातातलं पेन घेऊन सरदेशपांडे पती-पत्नी यांनी कागदावर सह्या केल्या आणि नाना-माईंचा निरोप घेऊन ते परत गेले.
दुसऱ्या दिवशी पहाटेच माई उठल्या. घराची झाडलोट, सडा, रांगोळी झाल्यावर त्यांनी चहाचं आधण ठेवलं. इतक्‍यात सरदेशपांडेची रिक्षा दारात येऊन थांबली. सरदेशपांडेंनी त्यांचं सामान घरात आणून ठेवलं. माईंनी सर्वांना चहा दिला. तो दिवस आवराआवर आणि स्वच्छता करण्यातच गेला. दुसऱ्या दिवसापासून त्यांचं रुटीन सुरू झालं.
शरदराव आणि नाना पहाटेच उठून फिरायला जात आणि येताना भाजी, दूध घेऊन येत. मग ते दोघंजण चहाबरोबर बिस्किटं किंवा मोड आलेली कडधान्यं असा हलकाफुलका नाश्‍ता करायचे. आंघोळी आटोपल्यावर नाना देवाची पूजा करायचे. तासभर त्यांची पूजा चालायची. शरदराव मात्र बाहेर बागेची साफसफाई करायचे. दुपारी बारा वाजता सुमनताई आणि माईंचा स्वयंपाक झाल्यावर चौघं एकत्र बसून जेवण करायचे. चारचा चहा झाल्यावर शरदराव-नाना फिरायला जायचे, आणि माई- सुमनताई मंदिरात जायच्या. शरदराव आणि नानांची चांगलीच गट्टी जमली होती. माई तर सुमनताईंवर बेहद्द खूष होत्या. रात्रीचे 10-11 वाजले, तरीही त्यांच्या गप्पा संपायच्या नाहीत.

माई स्वयंपाकात अतिशय सुगरण होत्या. आज त्यांनी जेवणात मसालेभात आणि कारल्याची भाजी केली होती. मंदाग्नीवर शिजवल्यामुळं भाजी फारच चवदार लागत होती. जेवायला बसल्यावर माईंना जोरदार ठसका लागला. 'माझ्या अवीला फार आवडते हो कारल्याची भाजी...'' असं म्हणून त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या जेवणावरून तशाच उठल्या.
'हं! माई आपलं काय ठरलं आहे? डोळ्यांत पाणी आणायचं नाही. मग विसरलीस?'' अण्णांनी त्यांना दटावलं. 'तुमचं सगळं खरं आहे हो; पण मला होतं असं कधी कधी...,'' माईंनी स्वतःला सावरलं.
संध्याकाळी नाना आणि शरदराव फिरायला गेल्यावर माई अंगणात पाय पसरून बसल्या. 'सुमनताई, आज काही मन लागत नाही. मंदिरातही जावंसं वाटत नाही. आपण घरीच बसू या का? गप्पा मारू या,'' त्या म्हणाल्या. 'हो हो. चालेल ना,'' असं म्हणत सुमनताईंनी कापूस आणि वातीचा डबा आणला.
'सुमनताई, आज वाती पण वळायच्या नाहीत. आज नुसत्या गप्पा मारू या.''
'बरं बरं. ठीक आहे,'' असं म्हणत सुमनताईंनी वातीचा डबा उचलून बाजूला ठेवला. 'सुमनताई, आज मला जेवताना रडू आलं. तुम्हाला काही मी यापूर्वी बोलले नाही. मला रवी आणि अवी अशी दोन मुलं आहेत. दोघंही अमेरिकेला आहेत. एक मुलगा डॉक्‍टर आणि दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर. त्यांच्या बायका पण नोकरी करतात. मला दोन नातवंडं पण आहेत; पण गेल्या सात-आठ वर्षांत आमच्या गाठीभेटी नाहीत. आम्हाला ते तिकडं बोलावतात; पण ते मात्र आई-वडिलांच्या भेटीला येत नाहीत. पैसे मात्र न चुकता पाठवतात. यजमानही तेवढेच स्वाभिमानी आहेत. त्या पैशातली कपर्दीकही ते खर्च करत नाहीत. सगळे अनाथाश्रमाला दान देऊन टाकतात. विचार करायचा नाही म्हटलं, तरीही कधीकधी असं होतं आणि मनातल्या मनात कुढत राहिल्यामुळं माझं काहीतरी आजारपण सुरू होतं. मुलांनी कितीही तोडलं, तरी अंतःकरणातले मायेचे पाश कसे सुटतील?,'' माईंनी डोळ्याला पदर लावला.

'माई, शांत व्हा बघू. आता आपण आहोत ना एकमेकांना. अहो, तुमचा मुलगा अमेरिकेत आहे; पण मला तर एकुलता एक मुलगा आहे आणि तोही मुंबईतच आहे. सून मुद्दाम नात्यातलीच केली. दोघंही डॉक्‍टर आहेत. वांद्रयाला मोठं हॉस्पिटल आहे. खोऱ्यानं पैसा ओढतात; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून ते आमच्याकडं सणावारालाही आले नाहीत. आम्हाला प्रवासही सोसत नाही. मग काय आम्ही विचार करणंच सोडून दिलंय. कधी त्यांना आठवण आली, तर फोन करतात. नाहीतर महिनोन्‌ महिने आमचा संपर्कही नसतो.''
सुमनताईंचं बोलणं ऐकून माई आश्‍चर्यचकीत झाल्या. 'सुमनताई, इतके दिवस तुम्ही मला काहीच कसं बोलला नाहीत? अहो गेल्या पाच-सहा वर्षांपासून आम्ही खूप एकटेपणा अनुभवला आहे; पण तुम्ही दोघं इथं राहायला आल्यापासून या सात-आठ महिन्यांतच जणू काही सख्ख्या बहिणीप्रमाणं आपलं नातं निर्माण झालं आहे,'' असं त्या म्हणाल्या. 'आणि खरं सांगू का माई? मनात येऊनही मी माझा मुलगा व सून यांच्याबद्दल तुमच्याशी बोलले नाही,'' सुमनताईंचं उत्तर.
माईंनी सुमनताईंचा हात हातात घेतला. 'चला सुमनताई, आपण समदुःखी आहोत; पण आपण तरी दुःख का करायचं?''
'जाऊ द्या माई. तुमच्या मनातलं मळभ तरी निघून गेलं. चला, मी फर्स्टक्‍लास चहा करते आलं घालून,'' असं म्हणत सुमनताई लगबगीनं आत गेल्या.
'अहो सुमनताई, 25 डिसेंबरला यांचा वाढदिवस आहे बरं का. सत्तर संपून एक्काहत्तरावं वर्ष लागतंय. आपण चांगलं सेलिब्रेशन करू या,'' दुपारी जेवताना एके दिवशी माईंनी विषय काढला. 'हो हो. ठरवा ना. आपण दोघी जणी छान बेत करू या जेवणाचा.''

'छे छे. आपण त्या दिवशी बाहेर जेवायला जाऊ या.''
'अगंबाई! सोसवेल ना आपल्याला बाहेरचं जेवण?''
'अहो, पालक पनीर, जीरा राईस आणि ज्वारीची भाकरी असं मागवायचं आणि पनीर काढून पालकची भाजी खायची.''
'वाढदिवसाला ज्वारीची भाकरी का हो?''
'अहो, चालते; पण बाहेर जेवायला जायचं हे मात्र नक्की.''
25 डिसेंबरला संध्याकाळी सातलाच सगळेजण बाहेर पडले. हल्ली लाईटचाही गोंधळ असतो, म्हणून बॅटरीही सोबत घेतली. नाक्‍यावरचा ओळखीचा रिक्षावाला ठरवला. 'देखो, हमको होटल में ले जाने का और रात को घर छोडने का...,'' शरदरावांनी त्या रिक्षावाल्याला समजावलं. ठरल्याप्रमाणं हसतखेळत जेवणं आटोपली. स्वीट डिश म्हणून फ्रूट सॅलड खाताना नानांना ठसका लागला.
'काय झालं नाना?,'' शरदरावांनी विचारलं. 'काही नाही हो.. जरा विचार करत होतो. आज 25 डिसेंबर. आपल्या कराराला एक वर्ष पूर्ण झालं. आज आपण माझा वाढदिवस साजरा करून आनंद साजरा केला; पण आज आपल्या कराराचा शेवटचा दिवस. उद्या सकाळी मला तुमचा पक्का निर्णय सांगा,'' नाना म्हणाले.
फ्रूट सॅलड खाताना सगळ्यांचे हात तसेच खोळंबले. जाताना हसतखेळत गेलेले सर्वजण येताना शांतपणे परत आले. दुसऱ्या दिवशी नाना पहाटे उठून अंगणात फेऱ्या मारायला लागले. शरदरावही अंगणात खुर्चीवर येऊन बसले. सुमनताईंनी चहाचा ट्रे बाहेर आणला. 'हं काय ठरवलंत?,'' नानांनी विचारलं. सगळे एकमेकांकडं प्रश्‍नार्थक नजरेनं पहायला लागले. माईंनी विचारलं ः 'सुमनताई, तुमचं काय मत आहे?'' 'माई, खरं सांगू? आपण चौघंही जण रात्रभर तळमळत होतो. चौघंही जण रात्रभर जागेच होतो. सगळ्यांचेच चेहरे सांगत आहेत. त्यामुळं निर्णय साफ आहे.''
'काय ते सांगा ना,'' माई म्हणाल्या.

'आपण एक वर्षाचा करार केलेला असला, तरीही आता मात्र आजन्म एकत्रच राहणार आहोत. कोणीही एकमेकांना सोडून राहू शकत नाही, हे सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. त्यामुळं ते कराराचे कागद फाडून टाका आणि जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे, तोपर्यंत आपण एकमेकांना सोबत करायची हे पक्कं ठरवा,'' सुमनताईंनी आपल्या मनातले विचार बोलून दाखवले.
'सुमनताई, अगदी माझ्या मनातलं बोललात. काय हो पटलंय ना तुम्हाला?'
'अहो पटलं म्हणून काय विचारताय?'' ः अण्णा. "चला, चहा करा आलं टाकून. चला लवकर शरदराव आपली फिरायला जायची वेळ झाली.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com