
दीर्घ अवकाशात या आशयाचे प्रत्यंतर जितक्या उत्कटपणे येते तितका त्या कवितेचा परिणाम वाचक मनावर राहतो.
एकांतातील आर्त लकेर
- प्रा. सुजाता राऊत
‘अभिरामप्रहर’ हे कथनकाव्य त्यातील चिंतनामुळे, लयबद्धता व शब्दरम्यतेमुळे वाचनीय आहे. एका अर्थाने ती मानवी आयुष्यातल्या एकाकीपणाचीही गाथा आहे. ती एका संवेदनक्षम मनाच्या एकांतातली आर्त लकेर आहे, जी वाचकाच्या मनात आरपार उतरते. एक सखोल अर्थघन अनुभव देणारी ही दीर्घ कविता आहे. दीर्घ कवितेत एक केंद्रबिंदू असतो व तो कवितेच्या परिघावर पसरत जातो. दीर्घ अवकाशात या आशयाचे प्रत्यंतर जितक्या उत्कटपणे येते तितका त्या कवितेचा परिणाम वाचक मनावर राहतो.
मानवी आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या काही सनातन भावना आहेत. प्रेम- मग ते केवळ प्रियकर-प्रेयसीचे नाही, तर इतर नात्यांतलंही असो, ही आयुष्याला वेढून टाकणारी भावना आहे. त्यातून येणारी गुंतवणूक, त्याचे पडसाद, विफलता आणि त्यापाठोपाठ येणारा शोक, नैराश्य, एकटेपणा या गोष्टीही अटळपणे येतात. मराठी भाषेत व इतरही अनेक भाषांमध्ये कवितांमधून अनेक वेळा या भावनेची आवर्तने अनुभवायला मिळाली आहेत. मुळात कविता हा भावसंवेदन टिपणारा साहित्यप्रकार असल्याने तरल भावना व्यक्त करण्यासाठी बहुतांश हा वाङ्मयप्रकार हाताळला जातो.
ज्येष्ठ कवयित्री भारती बिर्जे-डिग्गीकर यांचा ‘सृजनसंवाद प्रकाशन’ने नुकताच प्रकाशित केलेला ‘अभिरामप्रहर’ हा दीर्घ कवितासंग्रह मानसिक आंदोलनांचा एक प्रगाढ अनुभव देतो. जो मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो. एखाद्या दुःखार्त गाण्याची लकेर ते गाणे संपल्यावरही मनात रेंगाळत राहावी, अशी ही मनस्पर्शी कविता आहे.
मराठीमध्ये दीर्घ कविता त्या मानाने कमी प्रमाणात लिहिलेली दिसते. मुळात दीर्घ कविता लिहिण्यासाठी अनुभवाचा एक विस्तृत पट असावा लागतो. त्या कवीला त्या अवकाशात अनुभवाला साक्षात मूर्त रूप देण्यासाठी आवश्यक असणारी कवित्वशक्तीचे वरदान असावे लागते व कविता या साहित्य प्रकारावर प्रभुत्व असणेही जरुरीचे असते.
भारती बिर्जे-डिग्गीकर या छंदात्मक, वृत्तबद्ध अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘मध्यान’, ‘नीलमवेळ’ हे पूर्वी प्रसिद्ध झालेले कवितासंग्रह त्याची साक्ष देतात. ‘अभिरामप्रहर’ हे दीर्घ कथनकाव्यदेखील विलक्षण कौशल्यपूर्ण अशा वृत्तबद्ध रचनेत गुंफलेले आहे. तरी त्यातील कथानकाला तसूभरही धक्का लागत नाही.
किंबहुना या रचनेमुळे ते अधिक सरस ठरते. ‘देवी’ या पायाने अधू असणाऱ्या, महानगरात राहणाऱ्या, नोकरी करणाऱ्या मुलीच्या मनाची स्पंदने यामध्ये कवयित्रीने टिपली आहेत. हे एक कथनकाव्य असल्याने टप्प्याटप्प्याने त्यातील एकरेषीय कथानक स्पष्ट होत जाते. महानगरातील नोकरी करणारी ही अविवाहित तरुणी आहे देवी.
ती कविमनाची, संवेदनशील व्यक्ती आहे. तिच्या आजूबाजूच्या पर्यावरणाकडे, भवतालाकडे ती सजगपणे पाहते. तिच्या मनात उमटणाऱ्या तरंगांना ती काव्यरूप देते. तिच्या जीवनजाणिवा प्रगल्भ आहेत. ती मानवी आयुष्याविषयी, त्यातील दुःख भोगांविषयी चिंतन करते. तिच्या लहान भावाचा अपघाती मृत्यू होतो.
त्या दुःखभाराने तिचे मन थिजून जाते. तिच्या आयुष्यात प्रांजल, आदिनाथ, तोफी असे मित्र आहेत. पण ती कुठेही मनाने स्वतःला बांधून घेऊ शकत नाही. या महानगरात देवीला अनाहूतपणे भेटलेले सुकन्या इंदुलकर हे पात्रही ओझरते आपल्याला भेटते.
या सर्व व्यक्तिरेखा या कथाकाव्यात सहजपणे येतात व एखाद्या कथनात्मक साहित्य प्रकारात जशा व्यक्तिरेखा समोर साकारतात तितक्याच ठळकपणे या कवितेतूनही त्या येतात. हे या कवयित्रीच्या लेखनाचे सामर्थ्य आहे. पूर्ण कथनकाव्य वृत्तबद्ध आहे, लयदार आहे; पण देवीच्या कविता किंवा स्वगत हे मात्र मुक्तछंदात आहे. परंतु ते मुक्तछंदही अंगभूत लय असणारे आहेत. उदाहरणार्थ,
‘देवी लिहिते-
पण मी शेवटी नक्कीच ठवेन
माझ्या पावलाखाली अंथरलेला
तुझा श्वास विरत गेलेला
मूठभर अक्षरांचा गुलाल माखलेले क्षण
उत्सवाच्या प्रहरानंतरचा रितेपण
आयुष्य सीमेशी भिडलेलं तुझं अंगण...’
देवी अतिशय संवेदनशील आहे. भावाच्या मृत्यूने तिच्या मनातला घाव अतिशय खोलवर गेला आहे. त्यातून वर येणारे एकटेपण, रितेपण, तिच्या अस्तित्वाचा आजूबाजूच्या भोवतालाशी असणारा संबंध, महानगरीय जीवनातला कोरडेपणा, वरपांगीपणा, त्यातून येणारी परात्मता या सगळ्यांचे प्रतिबिंब या कथनकाव्यात पडलेले दिसते.
आजच्या समकालीन कवितेत कवितेची भाषा खूप बदलत चाललेली दिसते. गद्यसदृश्य लेखन ‘कविता’ या प्रकाराखाली केले जाते. भावना अतिशय भडकपणे, बडबटीतपणे मांडण्याचाही कल दिसतो. अशा पार्श्वभूमीवर ही कवयित्री देवीचे चिंतन, तिच्या मनातली आवर्तने अतिशय संयमी स्वरात व छंदोबद्ध लयीत व्यक्त करते. कवितेची जी एक काव्यभाषा असते त्या भाषेने ही पूर्ण दीर्घ कविता समृद्ध झालेली आहे. ‘तारकांची आदिद्रव्ये’, ‘पुस्तकांच्या मंत्रमोहछाया’, ‘ओसाडीच्या ओसरीतील दिवा स्वप्नं’, ‘उत्खननातील चिन्हलिपी’ अशी शब्दकळा या कवितेचे वेगळेपण अधोरेखित करते.
लेडी शॅलॉट, टॉलस्टॉय, ड्यू मॉरिएची रिबेका या व्यक्तिरेखांचे निर्देश इथे येतात. यामुळेही या कथनकाव्याला एक वेगळीच उंची लाभली आहे. ‘अभिराम’ या शब्दाचा अर्थ रमणीय. ‘अभिरामप्रहर’मधली देवी खरंतर सर्वार्थाने एकटी पडलेली.
भावाचा मृत्यू, प्रेमभावनेत न गुंतलेली, भवतालाचा विचार करून स्वतःच्या अंतरंगाकडे तटस्थपणे पाहणारी आहे. ती महानगराच्या वेगवान जीवनात मिसळून गेलेली आहे. मग हा सुंदर रमणीय प्रहर कसा असेल तिच्या आयुष्यात? पण देवी एका टप्प्यावर ज्यावेळी स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ उलगडू पाहते तोच हा खरा ‘अभिरामप्रहर’ आहे.
शीर्षकासकट वेगळेपण लाभलेली ही कविता; वाचकाला कवितेचे नवे वेगळे अर्थ लावायला भाग पाडते. अनेकाअर्थ हा चांगल्या कवितेचा विशेष आहे. ‘अभिरामप्रहर’ वाचल्यानंतर प्रत्येक वाचकाला काही वेगळा अर्थ उमगू पाहण्याच्या शक्यता दिसतात.
इथे स्वतः ‘देवी लिहिते’ म्हणून ज्या कविता मुक्तछंदात आलेल्या आहेत त्या शब्द, आशय, रचना सर्वच दृष्टीने उन्नत आहेत. प्रज्ञा हरणखेडकर यांचे मुखपृष्ठ महानगरीय जीवनातली परात्मता रेखाटणारे असून प्रतिकात्मक आहे. प्रा. डॉ. प्रतिभा कणेकर यांची अतिशय अभ्यासपूर्ण, त्याचबरोबर लालित्यपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. गीतेश शिंदे यांनी रेखाटलेली रेखाचित्रेही उजवी असून या कथनकाव्याला न्याय देणारी आहेत.