उन्हाळ्यासाठी 'कूल पेये' 

विजयालक्ष्मी साळवी 
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना काही फळे, पेये मात्र तो सुसह्य करण्यासाठी मदत करतात. सरबतातील बर्फामुळे नाही तर त्यातील घटकांमुळे आपली तहान शमते; तसेच ताजेतवाने होण्यासही मदत होते. 

उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना काही फळे, पेये मात्र तो सुसह्य करण्यासाठी मदत करतात. सरबतातील बर्फामुळे नाही तर त्यातील घटकांमुळे आपली तहान शमते; तसेच ताजेतवाने होण्यासही मदत होते. 

आंबा आइस्क्रिम 
हे आइस्क्रिम तयार करण्यासाठी आंबे, लिंबू आणि आले वापरले जाते. एका भांड्यामध्ये आले, साखर आणि एक कप पाणी घ्यावे. पाच- सात मिनिटे हे मिश्रण गॅसवर हलवत राहावे. त्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यावे. त्यात एका लिंबाचा रस घालावा. मग त्यात आंब्याचा रस घालावा. हे सर्व एकत्र करून फ्रिजरमध्ये घट्ट व्हायला ठेवावे. त्यात बर्फ तयार व्हायला हवा. नंतर ते बाहेर काढून त्यातील बर्फाचे कण तुटेपर्यंत ते हलवत राहावे. पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवावे. पुन्हा याच पद्धतीने बर्फ वितळेपर्यंत करून पुन्हा सेट करावे. खायला देण्याआधी पंधरा मिनिटे फ्रिजरमधून काढून फ्रिजच्या खालच्या कप्प्यात ठेवावे. म्हणजे मिश्रण थोडे सैल होईल. आइस्क्रीम स्कूपमध्ये गोळा वाढून तो आंब्याच्या फोडी आणि पुदिन्याच्या पानांनी सजवावे. 

पन्हे 
पन्हे हे आपल्याकडील अस्सल देशी सरबत. ग्लासभर पन्हे प्यायल्याने उन्हाने झालेली काहिली कमी होते. त्याची आंबटगोड चव जिभेवर रेंगाळते आणि पोटाला थंडावा देते. पन्हे उकडलेल्या कैरीपासून बनवतात. त्यात वेलदोडा आणि केशर घातले जाते. पन्हे प्यायल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहाण्यास मदत होते. पन्हे तयार करण्यासाठी कैरी उकडून घ्यावी. त्याची साल काढून टाकून त्याचा गर काढून घ्यावा. गर गाळून घ्यावा. त्यात पिठीसाखर किंवा गूळ घालावा. केशर मिसळावे आणि चांगले एकत्र करून बाटलीत भरून ते फ्रिजमध्ये ठेवावे. पन्हे तयार करताना एक चमचा मिश्रण ग्लासमध्ये घेऊन त्यात गार पाणी घालून हलवून प्यायला द्यावे. 

कॉफी आइस्क्रीम 
कॉफीचा वास आला की कॉफीप्रेमींना राहावत नाही. मुलांनाही कॉफीचा फ्लेवर आवडतोच. म्हणून कॉफी आइस्क्रीम हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कॉफीच्या फ्लेवरला थोडी व्हॅनिलाची जोड दिली की मस्त चव लागेल. त्यासाठी दूध आणि साय यांच्या योग्य मिश्रणातून आइस्क्रीम तयार करावे. 
थोड्याशा गरम पाण्यासोबत कॉफी विरघळवून घ्यावी. कॉर्नफ्लॉवर आणि दूध यांचे एका भांड्यात मिश्रण करावे. ते बाजूला ठेवावे. दूध आणि साखर नॉनस्टिक पॅनमध्ये एकत्रित करावी. अधूनमधून हलवत पाच ते सहा मिनिटांसाठी मध्यम आचेवर राहू द्यावी. त्यातच कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण घालावे. ढवळून चार मिनिटांसाठी मध्यम आचेवर उकळवावे. मग त्यात कॉफी आणि पाण्याचे मिश्रण घालावे. पूर्ण थंड होऊ द्यावे. गार झाल्यावर त्यात व्हॅनिला इन्सेन्स आणि फेटून साय घालावी. हे मिश्रण ऍल्युमिनिअम पातेल्यात घालून, फॉईल लावून फ्रिजमध्ये सहा तास सेट करावे. थोडेसे घट्ट झाले की हे मिश्रण मिक्‍सरमध्ये घालून फिरवावे आणि पुन्हा ऍल्युमिनिअमच्या पातेल्यात घालून सेट करावे. यासाठी दहा तास लागतील. आइस्क्रीम तयार झाल्यावर लगेच गोळा खायला द्यावा. 

ताक 
दही घुसळून पाणी घालून बनवलेल्या ताकाला उन्हाळ्यात काही पर्याय नाही. सहज उपलब्ध होणारे आणि स्वस्तात मस्त असे पेय आहे. ताक प्यायल्याने उन्हामुळे होणारी काहिली शांत होते. यात जिरे पावडर खूप महत्त्वाची आहे. थंड ताकात जिऱ्याची पावडर घालून दुपारच्या वेळी प्यावे. 

अंबिल 
नाचणी हे महाराष्ट्रात मिळणारे आणि वापरले जाणारे धान्य. नाचणीचे पापड, भाकऱ्या काही ठिकाणी खाल्ल्या जातात. मात्र नाचणीपासून बनवण्यात येणारी अंबिल ही बहुतांश लोकांच्या आवडीची असते. नाचणीचे सत्त्व गरम करून त्यामध्ये ताक, लसूण, कोथिंबीर, मीठ घालून बनवलेली अंबिल पौष्टिक आणि थंडावा देणारी असते. जेवणानंतर एक ग्लासभर अंबिल प्यायल्यास दुपारच्या उन्हात काही क्षण विश्रांती घेण्याचा मोह टाळणे कठीणच. 

Web Title: summer special drinks