खेळाचं 'गेम्स' झालं... तिथंच सगळं चुकलं! (सुनंदन लेले)

sunandan lele write article in saptarang
sunandan lele write article in saptarang

खेळांची आणि तंदुरुस्त राहण्याची गोडी लहान मुलांना लागावी, यासाठीचा आदर्श मोठ्यांनी लहानांसमोर ठेवायला हवा. शाळा-महाविद्यालयांतल्या अभ्यासक्रमात इतर विषयांबरोबरच खेळांचाही समावेश व्हावा, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. अशक्‍य काहीच नाही. गरज आहे ती छोटी छोटी पावलं उचलण्याची...मोबाईल-फोनचा आणि टीव्हीचा नाद सोडून खेळाकडं, मैदानाकडं आणि व्यायामशाळेकडं पावलं वळवण्याची.

सोशल मीडियावर येणाऱ्या बऱ्याच गोष्टी न बघता-वाचताच फॉरवर्ड केल्या जातात. त्यातलं टेक्‍स्ट अर्थात मजकूर हा बहुतेकदा फॉरवर्ड करणाऱ्यानंच लिहिलेला किंवा रचलेला असतो असं नाही. बहुतेकदा तो इतर कुणाचा तरीच असतो आणि न वाचता तसाच "पुढं ढकलला' जातो. मात्र, काही काही विचार, सुभाषितं, कविता, बोधपर मजकूर खरोखरच मनाला भावून जातो. काही दिवसांपूर्वी डॉ संजय उपाध्ये यांची अशीच एक अर्थपूर्ण कविता सोशल मीडियावर माझ्या वाचनात आली. ती कविता अशी आहे ः

आईची मम्मी झाली
चवीची यम्मी झाली
वडिलांचं डॅड झालं
पतंगाचं काईट झालं
विमानाचे फ्लाईट झालं
कावळ्याचे क्रो झालं
भावाचं ब्रो झालं
पोळीचं फ्रॅंकी झालं
रुमालाचं हॅंकी झालं
भाताचं राईस झालं
छानचं नाईस झालं
श्‍शी चं शिट झालं
सामानाचं किट झालं
स्थानकाचं स्टेशन झालं
नात्याचं रिलेशन झालं
शांतीचं पीस झालं
बहिणीचं सिस झालं
तिथेच मोठा गोंधळ झाला

या कवितेत मला एकच ओळ वाढवायचा मोह आवरता आला नाही व ती ओळ म्हणजे ः
खेळाचं "गेम्स' झालं, तिथंच सगळं चुकलं! असो.
***

...आणि विराट निराश झाला
खेळाचं साहित्य तयार करणाऱ्या "प्युमा' या जगप्रसिद्ध कंपनीनं भारतात नुकतीच एक पाहणी केली. भारतातल्या 18 मुख्य शहरांतल्या 18 ते 40 वयोगटांतल्या जवळपास चार हजार लोकांना भेटून ही पाहणी करण्यात आली. या पाहणीत सहभागी झालेल्या लोकांच्या खेळांसंदर्भातल्या आवडी-निवडी कशा आहेत, ते पडताळण्यात आलं. जेव्हा या पाहणीचे निष्कर्ष बाहेर आले आणि विराट कोहलीच्या कानावर पडले तेव्हा तो कमालीचा निराश झाला. कारण अगदी स्पष्ट होतं व ते म्हणजे, "एका वर्षात आम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला नाही की खेळप्रकारातही भाग घेतला नाही,' असं एक तृतीयांश लोकांनी या पाहणीदरम्यान कबूल केलं होतं! म्हणजे अगदी योगासनं, पोहणं किंवा चालणं
हे प्रकारही या लोकांनी वर्षभरात केलेले नव्हते. विराटच्या निराशेचं कारण हे होतं.
"तुम्ही कुठलाच व्यायाम का केला नाही?' किंवा "कोणताच खेळ तुम्ही का खेळला नाहीत?' असं जेव्हा या लोकांना विचारण्यात आलं, तेव्हा बहुतेकांचं उत्तर एकच होतं ः "वेळच मिळत नाही!'
सामन्यासाठी विराट पुण्यात आलेला असताना त्याची भेट झाली व तीसुद्धा व्यायामशाळेत. मुंबईहून प्रवास करून पुण्यात पोचलेल्या विराटला सायंकाळी चार ते सहा संघाच्या सरावाला जायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी महेंद्रसिंग धोनी याच्या चेन्नई संघाविरुद्ध सामना होता. असं असूनही विराटनं व्यायाम करायचा दिनक्रम चुकवला नव्हता. विराट म्हणाला ः ""व्यायाम ही आता माझी जीवनपद्धतीच बनून गेली आहे. एखाद्या दिवशी आंघोळ न केल्यास जसं चुकल्यासारखं वाटतं, तसंच मी व्यायाम करून घाम गाळला नाही तर मला चुकल्यासारखं वाटतं, म्हणून मी अगदी रोज काही ना काही व्यायाम करतोच. मला व्यायामाचं महत्त्वं तर कळलेलं आहेच; शिवाय तो केल्यानं खूप आनंद मिळतो, समाधान वाटतं, हेही मला उमगलेलं आहे. मात्र, भारतातल्या 18 शहरांत केलेल्या पाहणीच्या अहवालातली माहिती जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा मी हताश-निराश झालो. "गेल्या वर्षभरात आम्ही कोणताही व्यायाम केलेला नाही वा खेळप्रकारातही भाग घेतलेला नाही,' असं पाहणीत सहभागी झालेले एक तृतीयांश लोक म्हणतात... बाप रे! व्यायामाशिवाय किंवा खेळाशिवाय कसे काय राहू शकतात हे लोक? मला वाटतं की आधुनिक तंत्रज्ञानानं आणि सोशल मीडियानं घात केला आहे आपल्या जीवनशैलीचा.

"सोशल मीडियाचा वापर करू नका किंवा त्याचा आनंद घेऊ नका,' असं मी अजिबात म्हणत नाही. फक्त सोशल मीडियाला किती वेळ द्यायचा ते ठरवून घ्या आणि त्यानुसार वागा. तेवढा वेळ सोशल मीडियाला देऊन झाला की मग त्या दिवशी पुन्हा त्यात गुंतू नका. तुम्ही कोणता खेळ खेळता किंवा कोणता व्यायामप्रकार करता याला माझ्या लेखी महत्त्व नाही...तुम्ही ती गोष्ट रोज करता की नाही याला माझ्या दृष्टीनं फार महत्त्व आहे...''

"खेलो इंडिया'चं मोल
भारताची ताकद त्याच्या युवकवर्गात आहे, असं सगळे जण सांगतात आणि ते खरंही आहे; परंतु हा युवकवर्ग तंदुरुस्त असेल तेव्हाच तो कामाला येईल, हेसुद्धा खरं आहे. नेमक्‍या याच उद्देशानं भारत सरकारनं "खेलो इंडिया' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला. "खेलो इंडिया' या मोहिमेची घोषणा करताना भारतातल्या समस्त शाळकरी मुला-मुलींनी कोणत्याही खेळात मनापासून सहभागी व्हावं, हाच सरकारचा मुख्य उद्देश होता. देशाच्या विविध भागांतले साडेचार हजार शाळकरी खेळाडू या मोहिमेत सहभागी झाले होते. "भारतीय खेल प्राधिकरणा'नं या मोहिमेतून गुणवान खेळाडू आणि खेळाला वाहून घेतलेले गुणी प्रशिक्षकही हेरले. आता या निवडक चमूवर पुढं काम सुरू राहणार आहे.

खेळा आणि खेळू द्या
खेळांबाबतचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर बदललं...या बदलाला आपण सगळेच कारणीभूत आहोत, असं नाही वाटत तुम्हाला? "स्वातंत्र्यपूर्वकाळ' हा शब्द जसा वारंवार वापरला गेला, वापरला जातो, तसा "मोबाईल-फोनपूर्वकाळ' हा शब्द इथून पुढच्या काळात प्रचलित झाल्यास नवल वाटायला नको!
एखाद्या उपयुक्त गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच तोटेसुद्धा असतात, हे मोबाईल-फोनसंदर्भात आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं. मोबाईल-फोनच्या अतिवापरामुळं मुलांची मान दुखण्यापासून ते डोळ्याला जाड भिंगांचा चष्मा लागण्यापर्यंतच्या अनेक गोष्ट घडलेल्या आहेत. मोबाईल-फोनच्या अतिरिक्त वापरानं पती-पत्नीत भांडणं होऊन घटस्फोटापर्यंत मजल गेल्याचीही काही उदाहरणं आहेत. या उदाहरणांवर विश्‍वास ठेवणं कठीण जरी जात असलं तरी ती वस्तुस्थिती आहे. मोबाईल-फोन हे संपर्काचं अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे. ज्ञानाचं भांडारही या मोबाईल-फोनच्या रूपानं आपल्या हातात असतं. मात्र, मोबाईल-फोन आपल्या सोईसाठी आहे, आपलं अस्तित्व त्या मोबाईल-फोनसाठी नाही, हे कटाक्षानं लक्षात घ्यायची वेळ आता आलेली आहे.

सुरक्षेच्या नावाखाली लहान मुलांच्या हाती पालक मोबाईल-फोन देतात आणि मग ती मुलं त्या "वेड्या खेळण्या'त गुंग होऊन जातात. एवढंच नव्हे तर, एका वर्षाच्या आसपासच्या लहान बाळांना जेवायला घालताना बरेच शहरी पालक मोबाईलमध्ये कार्टून लावून देण्यात धन्यता मानतात, तेव्हा हसावं की रडावं हे समजत नाही!

मुलांना वळवा मैदानाकडं
मुलांचे पाय मैदानाकडं वळवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी पालकांची आहे. सुटीच्या दिवसांत मुलांबरोबर वेळ घालवून त्यांच्याशी विविध खेळ खेळणं हा सगळ्यात सोपा उपाय त्यासाठी आहे. बाहेर ऊन्ह रणरणत असताना घरात पत्त्याचा डाव खेळला किंवा कॅरम खेळलं तर मुलं खूश होतात, हे खरं. मात्र, उत्साही पालक मुलांसोबत क्रिकेट-बॅडमिंटन खेळतात. ज्या पालकांना खेळांची विशेष आवड नाही, त्यांनी मुलांसोबत पोहायला जाणं किंवा टेकडीवर-माळरानावर त्यांना घेऊन फिरायला जाणं असं केल्यास चांगला व्यायाम होऊ शकतो. शिवाय, व्यायामाबरोबरच मुलांच्या सहवासात तेवढाच वेळही घालवता येतो आणि त्यांच्याशी हितगूजही साधता येतं. ही बाब फार मोलाची असते.

मुलांना सायकल शिकवून नंतर त्यांना फिरण्याच्या बाबतीत "स्वतंत्र' करणं हे किती मजेचं असतं! शहरात तीनचाकी सायकलवर लहानग्याला बसवून मागं ती सायकल पालक धरतात ते केवळ अतिकाळजीपोटी. धक्का बसला तरी तीनचाकी सायकलवरून मूल पडत नाही, हे माहीत असलं तरी अतिसुरक्षेच्या विचारानं शहरी पालकांना ग्रासलेलं असतं. याउलट गावाकडं गेलं तर दिसतं की तिथं मोजक्‍याच सायकली आहेत; मग गावातल्या सगळ्या पोराटोरांना सायकल चालवता कशी येते, याचं आश्‍चर्य वाटल्यावाचून राहत नाही.

गावाकडच्या मुलांना अजून मोबाईल-फोनची आणि टीव्हीची बाधा शहरी मुलांइतकी झालेली नाही, असं ढोबळमानानं म्हणता येईल. गावाकडच्या मुलांपेक्षा शहरातल्या मुलांच्या संदर्भात हे धोके जास्त प्रमाणात आहेत. वेगवेगळे खेळ खेळण्यापेक्षा कॉम्प्युटर गेम्स खेळण्यात शहरी मुलांना धन्यता वाटते. मैदानावर जाऊन एक तास फुटबॉल खेळण्यापेक्षा बार्सिलोना, रिअल माद्रिद, अर्सेनल किंवा मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबचे सामने रात्री जागून बघणं आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांवर चर्चा करणं हे शहरी मुलांना जास्त आवडतं! परिस्थिती हाताबाहेर जायच्या बेतात आहे, म्हणून हे चित्र या लेखातून मांडावंसं वाटलं. उपाय अजूनही आपल्या हाती आहेत.

खेळांची आणि तंदुरुस्त राहण्याची गोडी लहान मुलांना लागावी, यासाठीचा आदर्श मोठ्यांनी लहानांसमोर ठेवायला हवा. शाळा-महाविद्यालयांतल्या अभ्यासक्रमात इतर विषयांबरोबरच खेळांचाही समावेश व्हावा, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. अशक्‍य काहीच नाही. गरज आहे ती छोटी छोटी पावलं उचलण्याची... मोबाईल आणि टीव्हीचा नाद सोडून खेळाकडं, मैदानाकडं आणि व्यायामशाळेकडं पावलं वळवण्याची...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com