अडचणींतून मार्ग (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

‘प्रो-कबड्डी’ची लोकप्रियता वाढत आहे, तसतसे अनेक अंधारातले नायकही प्रकाशात यायला लागले आहेत. वेगवेगळी गावं, दुर्गम भागांतून आलेले हे खेळाडू. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या, कथा वेगळ्या. रोहितकुमार, गिरीश एर्नाक, दीपक हुडा हे असेच खेळाडू. त्यांच्या संघर्षाच्या या चकित करणाऱ्या कहाण्या.

‘प्रो-कबड्डी’ची लोकप्रियता वाढत आहे, तसतसे अनेक अंधारातले नायकही प्रकाशात यायला लागले आहेत. वेगवेगळी गावं, दुर्गम भागांतून आलेले हे खेळाडू. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या, कथा वेगळ्या. रोहितकुमार, गिरीश एर्नाक, दीपक हुडा हे असेच खेळाडू. त्यांच्या संघर्षाच्या या चकित करणाऱ्या कहाण्या.

‘‘आम्हाला मॅच बघायला यायचं आहे...कसंही करून चार पासेस मिळव,’’ माझ्या बहिणीनं कधी नव्हे तो हुकूम सोडला.
‘‘एकदम चार शक्‍य नाहीत हं...कारण बहुतांशी भारतीय खेळाडूंचे पुण्यात कोणी ना कोणी नातेवाईक किंवा मित्र असतात. तरी मी प्रयत्न करतो; पण पुण्यातल्या क्रिकेट स्टेडियमला जायला आणि यायला जरा दगदग होते हे अगोदरच सांगतो,’’ मी मुद्दा मांडला.
‘‘क्रिकेटबद्दल कोण बोलतंय?...आम्हांला प्रो-कबड्डी लीगचे सामने पुण्यात होणार आहेत ते बघायला बालेवाडीला जायचं आहे... तेव्हा आता कोणतीही सबब सांगू नकोस. चार पास मिळव,’’ बहिणीनं एकदम आक्रमक सूर धरला.

दहा दिवसांनी पुण्यात एकदिवसीय सामना रंगणार असला, तरी आत्ताच्या घडीला चर्चा क्रिकेटपेक्षा पुण्यात होणाऱ्या प्रो-कबड्डी लीगची आहे यात शंका नाही. भारतीय खेळांची मजा मजा वेगळी आहे. लंगडी, खो-खो, मल्लखांब या सोबतीला कबड्डी एक अत्यंत रांगडा खेळ समजला जातो. मातीतल्या याच खेळाचं चित्र बघताबघता बदललं आहे. विराट कोहली, पी. व्ही. सिंधू या सध्याच्या प्रचंड लोकप्रिय खेळाडूंचा जसा भारतभर गवगवा आहे, तशी दीपक हुडा, प्रदीप नरवाल, अजय ठाकूर, राहुल चौधरी ही नावं भारतीय खेळरसिकांच्या अगदी तोंडावर असतात. प्रो-कबड्डी लीगनं हा बदल घडवून आणला आहे. प्रो-कबड्डी लीगचे चाहते इतके वाढले आहेत, की घराघरांत हे खेळाडू हिरो बनले आहेत. लक्षणीय बाब अशी, की नुसतं पुरुषांमध्ये नव्हे, तर कबड्डीच्या महिला प्रेक्षकांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

चालू मोसमात ‘पुणेरी पलटन’ संघानं सातत्यपूर्ण चांगला खेळ करून जोरदार मुसंडी मारली आहे. शुक्रवारपासून पुण्यातल्या छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात प्रो-कबड्डी लीगच्या सामन्यांना प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सगळे संघ पुण्यात आले असल्याचा फायदा उचलत तीन खेळाडूंशी बातचीत केली, तेव्हा त्यांच्या आयुष्याच्या कथा ऐकल्यावर चकित व्हायला झालं.

खेळानं तारलेला रोहितकुमार
‘बेंगलोर बुल्स’ संघाचा मुख्य खेळाडू रोहितकुमार मूळचा निझामपूरचा. दिल्ली हरियाना सीमारेषेवर निझामपूर आहे. ‘‘शाळेत असताना मी ॲथलेटिक्‍सच्या सर्व प्रकारांत जोमानं भाग घ्यायचो. आमच्या गावी कबड्डीचं वेड सगळ्यांना आहे. ‘मिट्टीसे जुडे हुए इस खेलने मुझे भी पागल बना दिया.’ लहानपणापासूनच मला कबड्डी खेळायला आवडायचं,’’ रोहितकुमार सांगत होता. ‘‘मोठा झाल्यावर कबड्डी मनापासून खेळण्यामागं एकच उद्देश होता तो म्हणजे नोकरी मिळवणं. खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकू लागला, की कबड्डीपटूला नोकरी मिळायची. आमच्याकरता तेच मोठं आकर्षण होते. प्रो-कबड्डी लीगनं आमचं आणि खेळाचं सर्व रंगरूप चांगल्या अर्थानं बदलून टाकलं. आता भारतात चांगल्या कबड्डीपटूला सगळे ओळखतात, मान देतात. नव्या जमान्यातल्या कबड्डीनं खेळाला वेग आणला आणि त्यातला नकारात्मकपणा साफ काढून टाकला. ‘डू ऑर डाय रेड’ म्हणजेच जिंकू किंवा मरू चढाईचा नियम मोठा बदल करून गेला आहे. चढाई करताना सतत आक्रमक विचार मनात ठेवण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. ‘प्रो-कबड्डी’ लीगनं खूप नाव कमावून दिलं. आयुष्यातले भयानक चढउतारही मला अनुभवावे लागले. त्या अर्थानं गेली तीन वर्षं म्हणजे माझ्याकरता ‘रोलर कोस्टर राइड’ ठरली आहे,’’ रोहितकुमार म्हणाला.
रोहितकुमारचे मित्र सांगतात ः ‘पत्नीनं आत्महत्या केल्यानं रोहितकुमारचं जीवन डगमगलं होतं. केवळ कबड्डीच्या प्रेमानं त्याला तारलं. सर्वोत्तम कबड्डीपटू बनायचं ध्येय डोळ्यासमोर असल्याने रोहित कुमार निराशेच्या गर्तेत खेचला गेला नाही. त्याअर्थाने रोहित हा कबड्डीने तारलेला खेळाडू आहे.’

कल्याणचा हिरो ः गिरीश एर्नाक
महाराष्ट्रात कबड्डीचं प्रेम अव्याहत टिकून असलेला अजून एक भाग म्हणजे ठाणे-कल्याण. कल्याण गावात वाढलेल्या गिरीश एर्नाकला लहान वयात कोळी नावाच्या निपुण गुरूचं मार्गदर्शन लाभलं. कल्याणचा ‘ओम कबड्डी संघ’ आणि कोळसेवाडीतला ‘शिवशंकर कबड्डी संघ’ म्हणजे दोन नावाजलेली नावं. दोघांमध्ये कबड्डीच्या प्रांतात सर्वोत्तम ठरायची सतत चढाओढ. दोन दर्जेदार संघांमधली हीच सकारात्मक खुन्नस कल्याणमधल्या कबड्डीला पोषक ठरली. गिरीश एर्नाकनं आपली कथा सांगताना ‘‘मी ओम कबड्डी संघाचा खेळाडू आहे,’’ असं अभिमानानं सांगितलं ते उगाच नाही.
‘‘ठाणे-कल्याणच्या भागांतल्या बऱ्याच गावांत कबड्डीच्या विविध स्पर्धा सतत होतात. प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादानं गावागावांतल्या स्पर्धांना स्थानिक प्रायोजक लाभतात. माझ्या घरची परिस्थिती तशी बेताची असल्यानं कबड्डी चांगले खेळलो, तर आपल्याला नोकरी मिळू शकते, हे सर्वांत मोठं प्रोत्साहन असायचे मेहनत करायला. ओम कबड्डी संघाकडून चमक दाखवल्यावर मला अचानक मोठी संधी लाभली. एअर इंडिया संघाला ‘लेफ्ट कव्हर’ची गरज होती. प्रथितयश खेळाडूंनी नकार दिल्यावर अशोक शिंदे सरांनी मला खेळायची संधी दिली. त्यावेळी मी बारीक होतो. एअर इंडिया संघाकडून खेळताना मला मोठमोठ्या संघांविरुद्ध खेळता आलं, ज्यामुळं माझ्या खेळात गुणात्मक सुधारणा झाली. भरवशाचा ‘लेफ्ट कव्हर’ म्हणून नाव कमावल्यानं मला प्रो-कबड्डी लीग संघात निवडलं गेलं,’’ गिरीश एर्नाक घडाघडा बोलत होता.

‘‘प्रो-कबड्डी लीगनं आम्हा खेळाडूंना दिलेलं प्रसिद्धीचं वलय अजब आहे. चांगला खेळ केला, तर गावातलेच नाही तर संपूर्ण देशभरातले प्रेक्षक आपला खेळ बघतात ही गोष्ट मोह पाडते आणि शिस्तपूर्ण मेहनत करायला आम्हाला भाग पाडते. चालू मोसमात दीपक हुडाच्या नेतृत्वाखाली पुणेरी पलटन संघानं चांगला खेळ केला आहे. संघाच्या यशात मी माझं योगदान देतो आहे, याचं समाधान वाटतं. बाद फेरी गाठण्याच्या मोक्‍याच्या टप्प्यावर संघ असल्यानं पुण्यात म्हणजेच होम ग्राऊंडवर होणारे सामने मोलाचे ठरणार आहेत,’’ गिरीश उत्साहानं सांगून गेला

अजब कहाणी दीपक हुडाची   
पुणेरी पलटन संघाला यंदाच्या मोसमात यशाची योग्य दिशा दाखवण्यात कर्णधार म्हणून दीपक हुडाचा मोठा वाटा आहे. हरियानातल्या रोहतक गावाजवळच्या चमारीया नावाच्या छोट्याशा गावात दीपक हुडा लहानाचा मोठा झाला. ‘‘शाळेनं भरवलेल्या प्रत्येक खेळ प्रकारात भाग घेणं हा माझ्याकरता आनंदाचा भाग होता. धावणं, लांब आणि उंच उडी खूप आवडायचं मला. त्याच वेळी मला कबड्डी खेळणं आवडू लागलं. दुर्दैवानं माझी आई मी खूप लहान असताना देवाघरी गेली. वडिलांनी आणि मोठ्या बहिणीनं मला वाढवलं. मला अभ्यासात गती होती. विज्ञान आणि गणित माझे लाडके विषय होते. सगळं सुरळीत चालू असताना मी बारावीत होतो, तेव्हा अचानक वडील देवाघरी गेले. बहिणीचं लग्न झालं होतं; पण तिच्या काही घरगुती समस्यांमुळं ती माहेरी राहायला आलेली. तेसुद्धा दोन लहान मुलांना घेऊन. मला शिक्षण सोडावं लागलं आणि पैसे कमवायचा विचार करावा लागला. सांगून आश्‍चर्य वाटेल; पण बारावी शिकलो असताना मी दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवू लागलो. शाळा मला नोकरी देत नव्हती; पण थोडे पैसे देत होती- ज्यातून आमचा कसातरी उदरनिर्वाह व्हायचा,’’ पाणावल्या डोळ्यांनी दीपक हुडा कहाणी सांगत होता.

‘‘अडचणी कितीही आल्या, तरी कबड्डी खेळणं संपलं नाही. माझं नशीब चांगलं होतं, की मला जगमालसिंग नरवाल यांच्यासारखे गुरू लाभले. कबड्डी शिकायला मी आडवड्यातून तीन वेळा आमच्या चमारीया गावापासून २८ किलोमीटर दूर असलेल्या रींढाणा गावी जायला लागलो. प्रदीप नरवालसारखे अनेक चांगले खेळाडू जगमाल सरांकडं कबड्डी शिकत होते. दर्जेदार खेळाडूंच्यात सतत खेळल्यानं माझ्या खेळात, तंत्रात सुधारणा झाली. मला एअर इंडियानं कंत्राट तत्त्वावर खेळाडू म्हणून घेतलं. एअर इंडिया संघातून खेळू लागल्यानं मोठ्या स्पर्धांमध्ये खेळायला मिळणं शक्‍य झालं. २०१४मध्ये पाटण्याला झालेल्या नॅशनल कबड्डी स्पर्धेत मला खेळायला मिळालं. तिथं छाप पाडल्यानं प्रो-कबड्डी लीगचे दरवाजे माझ्याकरता उघडले,’’ दीपक हुडाच्या डोळ्यासमोरून जणू इतिहास सरकत होता.

‘‘गेल्या वर्षी पुणेरी पलटनच्या संघमालकांनी मला संघाची धुरा सांभाळण्याचं आव्हान दिलं. माझ्यावर त्यांनी दाखवलेला विश्‍वास मला भावला. संघात कोणते खेळाडू हवेत, याकरता आम्ही एकत्र बसून योजना आखली. संघ समतोल करण्यात आम्हाला यश आले. त्याचं चांगलं चित्र यंदाच्या मोसमात दिसत आहे. देवकृपेनं आणि खेळाच्या कृपेनं सगळं चांगलं झालं आहे. मतभेद संपून माझी बहीण परत सासरी राहायला गेली आहे. माझी भाची बॉक्‍सिंग उत्तम करू लागली आहे आणि भाचा माझ्याच गुरूंकडं म्हणजे जगमालसिंग सरांकडं कबड्डीचे धडे गिरवत आहे. मला दोघांनाही मोठे खेळाडू बनवायचं आहे. जी शक्‍य आहे ती सर्व मदत त्यांना करायची आहे. माझ्या आयुष्यात इतके सकारात्मक बदल घडतील, याचा कधी विचार केला नव्हता. याला कारण मला एकच वाटतं, की मी निष्ठा राखत कबड्डीची साधना केली. म्हणून माझ्याकरता कबड्डी हा फक्त ‘खेळ’ नाहीये,’’ दीपक भावुक होत म्हणाला.

प्रो-कबड्डी लीगनं खेळाडूंच्या जीवनात काय बदल केले ते आजच्या कबड्डी हिरोंना भेटल्यावर समजतं. हे बदल फक्त मैदानापुरते मर्यादित नाहीत ही बाब सर्वांत लक्षणीय वाटते. कबड्डीनं लोकप्रियतेचं नवं शिखर पादाक्रांत केल्यानं संयोजक स्टार स्पोर्टस काहीसं लोभी झाल्यासारखं वाटत आहे. स्पर्धेतले संघ वाढवले गेल्यानं सामन्यांत मोठी वाढ झाली आहे. साहजिकच मोसम खूप लांबत चालला आहे. कबड्डी हा रांगडा आहे, तसाच अत्यंत धसमुसळा खेळ आहे. खासकरून रेडर म्हणजे चढाई करणाऱ्या खेळाडूला होणाऱ्या दुखापती मोसमातल्या शेवटच्या टप्प्यात उग्र स्वरूप धारण करू लागल्या आहेत. एकीकडं खेळाची लोकप्रियता टिकवायला दोन स्पर्धांत खूप मोठा कालावधी नसला पाहिजे हे सत्य आहे; तसेच दुसऱ्या बाजूला खेळाडू तंदुरुस्ती टिकवायला धडपडताना दिसत आहेत. संयोजक हीच तारेवरची कसरत कशी पूर्ण करणार हे बघायचं आहे.

Web Title: sunandan lele write article in saptarang