‘विराट पन्नाशी’! (सुनंदन लेले)

‘विराट पन्नाशी’! (सुनंदन लेले)

एकदिवसीय सामन्यांत ३२ आणि कसोटी सामन्यांत १८ शतकं करून धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं एक अजब झेप घेतली आहे! सध्याच्या घडीला तो जगातला सर्वोत्तम फलंदाज मानला जात आहे. सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट नक्की पार करेल, असा विश्‍वास सगळ्यांना वाटू लागला आहे. मात्र, विराटचं लक्ष्य वेगळं आहे. भारतीय संघानं परदेशात कसोटी सामने जिंकायला हवेत, या ध्येयानं सध्या तो झपाटला गेला आहे.

ही  गोष्ट आहे २००८ मधली. भारतीय संघानं विराटच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांच्या आतल्या विश्‍वचषकावर नाव कोरलं. विराटनं स्पर्धेत लक्षणीय कामगिरी केल्यानं पहिल्या आयपीएल स्पर्धेप्रमाणेच भारतीय ‘अ’ संघाचे दरवाजे त्याच्यासाठी लगेच उघडले गेले. अपेक्षांचं ओझे विराटला झेपलं नाही आणि पहिल्या आयपीएल स्पर्धेत त्याला काहीच ठसा उमटवता आला नाही. ‘अ’ संघाकडून मिळालेल्या संधीचं सोनं विराटला त्या वेळी करता आलं नव्हते. ११ जणांच्या संघात त्याचं नाव पटकन लिहिलं जात नव्हतं. एकदा भारतीय ‘अ’ संघ दौऱ्यावर गेला असताना सलामीच्या फलंदाजाला दुखापत झाली आणि प्रशिक्षक प्रवीण आमरेनं विराटला अजून एक संधी देण्याचा विचार पक्का केला. विराटनं सलामीला फलंदाजीला जाऊन १२० नाबाद धावा न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध केल्या; टीम साउदी, कुरे अँडरसन आणि ख्रिस मार्टिन यांच्यासारखे चांगले गोलंदाज असताना! विराटचं नशीब जोरावर होतं. कारण, नेमका तो सामना बघायला  निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष दिलीप वेंगसरकर थेट विमानतळावरून मैदानावर आले होते. विराटची फलंदाजी बघून त्याला भारतीय संघात घ्यायचा विचार त्यांनी त्या वेळी पक्का केला.

तो काळ असा होता की तामिळनाडूचा फलंदाज बद्रिनाथ भरपूर धावा करत होता. एन. श्रीनिवासन यांची बद्रिनाथवर मर्जी होती; पण वेंगसरकर यांनी बद्रिनाथच्या नावाचा विचार न करता विराटची निवड केली. वेंगसरकर यांना क्रिकेटच्या निवडीच्या बाबतीत रत्नपारखी म्हटलं जातं, ते उगाच नव्हे! कोणता खेळाडू स्थानिक मैदानाचा राजा आहे आणि कोणता खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकू शकतो, याचा वेंगसरकर यांचा अंदाज अचूक असतो, हे विराटनं दाखवून दिलं आहे.

अडखळती सुरवात
विराटची गुणवत्ता एवढी सुस्पष्ट होती, की दिल्ली रणजी संघात त्याला वयाच्या १८ व्या वर्षीच स्थान देण्यात आलं होतं. पहिल्या रणजी सामन्यात विराटनं फलंदाजी कमी केली होती आणि टाळ्या जास्त वाजवल्या होत्या. शिखर धवन, रजत भाटिया आणि विजय दहिया या तिघांनी शतकं केली असताना विराट अवघ्या १० धावांवर बाद झाला होता.

ता. १८ ऑगस्ट २००८ रोजी विराटनं भारतीय संघाची टोपी पहिल्यांदा डोक्‍यावर चढवली. पदार्पणाच्या सामन्यात विराटला प्रथम श्रेणीचं क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांच्यातलाफरक समजला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना नाचवत अवघ्या १४६ धावांत भारताचा डाव गुंडाळला. गरजेच्या धावा दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार करून श्रीलंकेनं सामना जिंकला.

जेव्हा भारतीय संघ २०११ मध्ये वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला, तेव्हा - जवळपास अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर - विराटला कसोटी संघात खेळायची संधी मिळाली. पहिल्या कसोटीत विराटला अपयश आलं. दोन्ही डावांत फिडेल एडवर्डसनं विराटला बाद केलं. वर्षापेक्षा जास्त काळ अडखळत प्रवास करूनही भारतीय क्रिकेट संघानं विराटच्या क्षमतेवर विश्‍वास दाखवला, हे लक्षात घ्यायला हवं.

सन २००९ च्या शेवटच्या महिन्यात विराटला सूर गवसला आणि त्यानं ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. नंतर एकदिवसीय शतकांची मालिका सुरू झाली. कसोटी शतकासाठी २०१२ हे वर्ष उजाडावं लागलं. ॲडलेड कसोटी सामन्यात विराटनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतक केलं.

क्रिकेटप्रेम आणि कर्तव्य
इतरांना फारसे माहीत नाहीत असे अनेक कठीण प्रसंग विराटच्या आयुष्यात येऊन गेले आहेत. सन २००६ मध्ये कर्नाटक संघाविरुद्ध रणजी सामना सुरू होता. पहिल्या दिवशी कर्नाटकच्या फलंदाजांनी उत्तम कामगिरी केल्यानं मोठ्या धावा संघाच्या नावासमोर दिसू लागल्या. फलंदाजी सुरू झाल्यावर दिल्लीचा डाव कोसळला. प्रमुख फलंदाज पटापट बाद झाले. १८ वर्षांचा विराट पुनित बिश्‍तसोबत किल्ला लढवू लागला. त्याच संध्याकाळी विराटचे वडील प्रेम कोहली यांचं अकस्मात निधन झालं.
सगळ्यांना ही बातमी कळली. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होणार होता. मात्र, ‘अशा प्रसंगी विराटनं घरीच असणं योग्य होईल,’ असं सगळ्या सहकारी-खेळाडूंचं मत पडलं; परंतु दुःख आवरून विराट मैदानात उतरला आणि चार तास फलंदाजी करत त्यानं संघाला फॉलोऑनच्या नामुष्कीपासून वाचवलं. शतकापासून काही धावा दूर असताना त्याला पंचांच्या खराब निर्णयाचा फटका बसला. दिवसाचा खेळ संपल्यावर विराट घरी परतला आणि त्यानं वडिलांचे अंतिम विधी थोरल्या भावासह पार पाडले. संघातल्या अनुभवी खेळाडूंपासून ते थेट चेतन चौहान यांच्यापर्यंत सगळे विराटच्या क्रिकेटप्रेमानं आणि कर्तव्यभावनेनं थक्क झाले.

सचिनशी वेगळं नातं
विराट पदार्पण करत होता तेव्हा युवराजसिंग, हरभजनसिंग, इरफान पठाण आणि मुनाफ पटेलनं त्याच्यावर मोठी कडी केली होती. मुनाफने विराटला सांगितले की सचिन तेंडुलकरला संघात फार मोठा मान आहे आणि संघात नव्याने दाखल होणारा प्रत्येक खेळाडू भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर सचिनच्या पायावर डोके ठेवतो. ‘‘एक तर सचिनचा तो मान आहे...तू केलंस तर ठीक आहे; नाहीतर बघ बाबा, तुला किती क्रिकेट खेळायचे आहे’’ अत्यंत गंभीरपणे मुनाफनं सांगितलं. एरवी कधीच ‘भंकस’ न करणाऱ्या मुनाफने असं सांगितलं व त्याला उरलेल्या तिघांनी दुजोरा दिला; त्यामुळं विराटला ते खरं वाटलं. ड्रेसिंग रूमध्ये आल्यावर विराट सचिनकडं गेला आणि पाया पडू लागला तेव्हा सचिन अचंबित झाला ः ‘‘अरे, अरे... काय करतो आहेस?’’ सचिननं मागं सरकत विचारलं. मग जेव्हा विराटनं सगळी कहाणी सांगितली तेव्हा सचिन हसत सुटला. विराटची चेष्टा करणाऱ्या सहकारी-मित्रांचे सचिननं हसत हसत कौतुक केलं आणि ‘असं काही नाही रे, विराट’, असं म्हणत त्याला प्रेमानं जवळ घेतलं.

सन २०११ मध्ये भारतीय संघानं विश्‍वचषक जिंकण्याचं स्वप्न वानखेडे मैदानावर साकारलं, तेव्हा विराटने सचिनला खांद्यावर उचलून घेण्यात पुढाकार घेतला होता. मैदानाला फेरी मारल्यावर जेव्हा टीव्हीच्या समालोचकांनी ‘तू असं का केलंस?’ असं विराटला विचारलं तेव्हा तो म्हणाला ः ‘‘गेली २४ वर्षं ज्या माणसानं भारतीय क्रिकेटचा भार आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलला, त्या सचिनला काही क्षण खांद्यावर उचललं, तर त्यात विशेष काय आहे?’’
सचिन जेव्हा निवृत्त झाला तेव्हा मैदानातून परत आल्यावर त्याला भावना अनावर झाल्या होत्या. त्याच्या डोळ्यांतून आसवं ओघळत होती. डोक्‍यावर टॉवेल घेऊन तो आसवांना वाट करून देत होता.
सचिनला शांत करण्याचा धीर कुणालाच होत नव्हता. शेवटी, विराट सचिन जवळ गेला आणि त्यानं सचिनला शांत केलं. दुसऱ्या दिवशी सचिनला पत्रकारांनी विचारलं ः ‘तुझे विक्रम कोण मोडू शकेल?’ तेव्हा त्यानं पहिले नाव विराटच घेतलं होतं...आणि हा निव्वळ योगायोग नव्हता, हे विराटची झेप बघता आता समजत आहे. आजही मुंबईत असताना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा सचिनसोबत  विराट फलंदाजीचा सराव करून तंत्रातल्या छोट्या छोट्या चुका सुधारून घेत असतो.

बदल घडवून आणला  
जातिवंत पंजाबी माणसाला नान रोटी आणि बटर चिकन किती आवडतं, हे  काही वेगळं सांगायला नको. विराटही त्याला अपवाद नव्हता; परंतु शंकर बसू या फिजिकल ट्रेनरनं विराटला मार्गदर्शन करायला सुरुवात केली तेव्हा व्यायामाबरोबर विराटला आहाराची शिस्त पाळण्याविषयीची आग्रह त्यानं धरला. गेली जवळपास ४ वर्ष विराटनं एकदाही बटर चिकन किंवा नान रोटीला हात लावलेला नाही. सकाळी तो तीन एग व्हाईट आणि एक संपूर्ण अंड्याचं ऑम्लेट खातो. क्वचित तो शक्ती वाढवायला चीज खातो. दुपारी फक्त उकडलेलं किंवा ग्रील्ड्‌ चिकन उकडलेल्या भाज्यांसोबत खातो. तंदुरुस्तीकरता पालकाचं सूप आवडीनं पितो. रात्री अगदी कमी प्रमाणात उकडलेला किंवा भाजलेला मासा खातो.

 सामन्याचा कालावधी वगळता रोज तो किमान दोन तास व्यायाम करतो. विराटनं दाखवलेल्या ध्येयासक्तीचा परिणाम इतर खेळाडूंवर झाला आहे. आता भारतीय संघानं तंदुरुस्तीचा जणू ध्यासच घेतलेला आहे.  

‘जोडीदारा’चा सकारात्मक परिणाम
चारपेक्षा जास्त वर्षांपूर्वीपासून विराट आणि अनुष्का शर्मा यांचं प्रेम फुललं असल्याचं सगळ्यांना ठाऊक आहेच. प्रेम सुरू झालं तेव्हा विराटचं वय नाजूक होतं; पण राहुल द्रविडचं म्हणणं यासंदर्भात वेगळ होतं. द्रविड म्हणाला होता ः ‘‘ एखादं नातं गांभीर्यपूर्वक सुरू करण्याइतपत विराट वयानं मोठा नाही, हे मान्य आहे; पण मला वाटतं की अनुष्काशी त्याचं हे जे नातं जुळलं आहे, त्याचा मोठा फायदा भारतीय संघाला होईल. विराटसारख्या ‘हीरो-क्रिकेटपटूच्या मागं असंख्य मुली लागतील. मात्र, तो अनुष्काच्या प्रेमात पडलेला असल्यानं त्याचं इतरत्र लक्ष जाणारच नाही. विराटनं क्रिकेटवर शंभर टक्के लक्ष केंद्रित करण्यासंदर्भात हेच नातं मोठं उपयुक्त ठरेल.’’ अनुभवी राहुलचे हे तंतोतंत खरे ठरले आहेत ना?
स्वत: विराट म्हणतो  ः ‘जीवनातल्या यशापयशाकडं कसं पाहायचं, ते मला अनुष्कानं शिकवलं. ‘रिझल्ट’पेक्षा ‘प्रोसेस’वर लक्ष केंद्रित करण्याचा मंत्रही तिनंच मला दिला. चांगल्या नात्यानं माझ्या जीवनात स्थैर्य आलं. या सगळ्या कालावधीत मी झहीर खानचा सल्ला घेतला होता. त्यानं मला सुयोग्य मार्गदर्शन केलं. त्यामुळं माझ्यावर किंवा अनुष्कावर अनावश्‍यक दडपण कधीच आलं नाही.’

अबब पन्नास!      
एकदिवसीय सामन्यांत ३२ आणि कसोटी सामन्यांत १८ शतकं करून विराटनं एक अजब झेप घेतली आहे! सध्याच्या घडीला तो जगातला सर्वोत्तम फलंदाज मानला जात आहे. सचिनचा एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट नक्की पार करेल, असा विश्‍वास सगळ्यांना वाटू लागला आहे. मात्र, विराटचं लक्ष्य वेगळं आहे. भारतीय संघानं परदेशात कसोटी सामने जिंकायला हवेत, या ध्येयानं तो झपाटला गेला आहे. सन २०१७ मध्ये भारतीय संघानं मायदेशात भल्याभल्या संघांना पराभवाची धूळ चारली आहे. सन २०१८ मध्ये प्रथम दक्षिण आफ्रिका, मग इंग्लंड  आणि वर्षाच्या अखेरीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय संघ जाणार आहे. परदेशात जाऊन कसोटी-मालिका जिंकण्याचं स्वप्न अशक्‍य वाटत नाही, हे प्रगतीचं चिन्ह समजायला हवं.  

सध्याच्या घडीला विराट भारतातला सगळ्यात मोठा ब्रॅंड बनू बघतोय. आर्थिक यशाबरोबरच विराटनं ‘फाउंडेशन’ सुरू करून समाजकार्यालाही वेळ दिला आहे. त्यानं ‘इंडियन स्पोर्टस ऑनर्स’ हा पुरस्कार नुकताच सुरू करून विविध क्रीडाप्रकारांतल्या दिग्गज खेळाडूंचा सत्कार तर केलाच; शिवाय सात होतकरू खेळाडूंना तीन वर्षांची शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांना आर्थिक बळही दिलं आहे. सन २०१८ हे संपूर्ण वर्ष ते २०१९ च्या मध्याला होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धा या कालावधीत विराटच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघाची सत्त्वपरीक्षा असणार आहे. विराटच्या खंबीर नेतृत्वात भारतीय संघ वेगळी उंची गाठायला सज्ज झाला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com