सुखद वारं बदलाचं (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 7 जानेवारी 2018

क्रीडाक्षेत्रासाठी सरत्या वर्षात तीन महत्त्वाचे बदल झाले. विदर्भ संघानं रणजी करंडकावर नाव कोरून घडवलेला इतिहास, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशी आणि ‘खेलो इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमानं घेतलेली गती या घटना सकारात्मक आहेत. ही सुखद झुळूक नव्या वर्षातल्या वाटचालीला नवा जोम देईल.

क्रीडाक्षेत्रासाठी सरत्या वर्षात तीन महत्त्वाचे बदल झाले. विदर्भ संघानं रणजी करंडकावर नाव कोरून घडवलेला इतिहास, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशी आणि ‘खेलो इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमानं घेतलेली गती या घटना सकारात्मक आहेत. ही सुखद झुळूक नव्या वर्षातल्या वाटचालीला नवा जोम देईल.

क्रीडाविश्‍वाकरता २०१७ या वर्षाचा शेवट सुखद झाला. तीन असे बदल बघायला मिळाले, ज्यांच्यामुळं मनात उत्साहाची पालवी फुटली. विदर्भ रणजी संघानं रणजी करंडकावर नाव कोरून इतिहास घडवला. मुंबई, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू, बंगाल आदी संघांना मागं पाडत विदर्भ रणजी संघानं अशक्‍य वाटणारी कामगिरी करून क्रिकेटविश्‍वाला सुखद धक्का दिला. दुसरीकडं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं लोढा समितीचे बदल मान्य करून पुढचं पाऊल टाकलं. तिसरी सुखद घटना म्हणजे भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाने गती घेतली असून, खेळाडूंची गुणवत्ता हेरण्याचे निकष कायम करून प्रगतीची रूपरेषा आखण्यात आली.

विदर्भ रणजी संघाची कमाल
रणजी मोसम चालू होताना विदर्भ रणजी संघ अंतिम सामन्यात धडक मारून रणजी करंडकावर नाव कोरेल, अशी कोणी कल्पना केली असेल? विदर्भ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांनी चंद्रकांत पंडितला प्रशिक्षक म्हणून विदर्भला यायला पटवलं, तेव्हा संघाच्या यशाची बीजं गेल्या वर्षी पेरली गेली. चंद्रकांत पंडितची कथा काहीशी ‘आईनं ढकलून दिलं आणि मावशीनं कडेवर घेतलं,’ अशी झाली होती. प्रशिक्षक म्हणून उत्तम काम करूनही मुंबई क्रिकेट संघटनेनं चंदू पंडितला बाजूला सारलं. प्रशांत वैद्य यांनी तोच क्षण हेरून पंडितला विदर्भ रणजी संघाची जबाबदारी घ्यायचं आवाहन केलं. एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या वैद्य - पंडित जोडीनं मग एकत्र येऊन विदर्भ रणजी संघाच्या तयारीचा मार्ग आखला. प्रशांत वैद्यसह विदर्भ क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीनं कामकाजात चंदू पंडितला मोकळा हात दिला.
विदर्भ क्रिकेटमध्ये गुणवान खेळाडूंची कमतरता नव्हती. प्रश्‍न होता आत्मविश्‍वासाचा. पंडितनं चांगले तरुण खेळाडू हेरून त्यांना मोठ्या सामन्यातल्या कठीण परिस्थितीला सामोरं कसं जायचं, याचे सल्ले दिले. तयारी करताना जाळ्यातल्या सरावापेक्षा सामन्यात काय होतं तसं वातावरण निर्माण करून स्पष्ट ध्येय देऊन खेळायला लावलं. विदर्भ संघात कर्णधार फैज फजलसोबत गणेश सतीश आणि वसीम जाफर हे तीन अनुभवी खेळाडू होते. पंडितनं योजना आखताना याच तिघांना तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करायची जबाबदारी दिली. वसीम जाफरच्या अनुभवाचा फायदा नुसता फलंदाजांना नव्हे, तर गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यात पंडितनं करून घेतला.  विदर्भ रणजी संघाची जडणघडण करताना वाडकर, सरवटे, ललित यादवसारख्या तरुण खेळाडूंना प्राधान्य दिलं. सर्वांत मोठा बदल रजनीश गुरबानी या वेगवान गोलंदाजात झाला. उमेश यादवला घडवणाऱ्या सुब्रतो बॅनर्जीनं रजनीश गुरबानीला वेगवान गोलंदाजीचा मार्ग दाखवत भरपूर मेहनत करून घेतली. रजनीश गुरबानीनं विदर्भ संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलताना उपांत्य आणि अंतिम सामन्यात फारच अचूक मारा केला. साखळी स्पर्धेत विदर्भ संघानं तगड्या बंगाल संघाला दहा विकेट्‌सनी हरवलं, तेव्हापासून संघाचा आत्मविश्‍वास दुणावला होता.

शेवटचे दोन रोमहर्षक सामने
२०१७-१८ मोसमातल्या रणजी स्पर्धेतला सर्वांत रंगतदार सामना विदर्भ आणि कर्नाटक संघ यांच्यादरम्यान झाला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विनयकुमार आणि अभिमन्यू मिथुनच्या तिखट माऱ्यासमोर विदर्भचा पहिला डाव १८५ धावांत गुंडाळला गेला होता. संपूर्ण मोसमात कर्नाटकच्या फलंदाजांनी मोठ्या खेळ्या उभारण्याची जणू चढाओढ लावली होती. अनुभवी उमेश यादव आणि रजनीश गुरबानीनं अचाट मेहनत करून ९ फलंदाजांना बाद करत कर्नाटकचा डाव ३०१ धावांवर रोखला. दुसऱ्या डावातही विदर्भला ३१३ धावाच उभारता आल्या. विजयाकरता १९७ धावा कर्नाटकचं फॉर्मातले फलंदाज सहजी पार करणार असं वाटत असताना रजनीश गुरबानीनं सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी केली. सलग सात फलंदाजांना बाद करून गुरबानीनं विदर्भ संघाला ५ धावांचा चित्तथरारक विजय मिळवून दिला.
अंतिम सामन्यात रजनीश गुरबानीनं पहिल्या डावात ६ दिल्लीकर फलंदाजांना बाद करून डाव २९५ धावांवर संपवला, तिथंच विजयाचा मार्ग विदर्भ संघासाठी मोकळा व्हायला लागला. विदर्भ संघाची फलंदाजी सुरू झाल्यावर अनुभवी फलंदाजांसह निम्मा संघ तंबूत परतला असताना २६० च्या आसपास धावा फलकावर दिसत होत्या. जास्त मोठी आघाडी विदर्भ संघाला मिळणार नाही, यासाठी दिल्लीचे गोलंदाज काम करू लागले. चंदू पंडितनं केलेल्या प्रशिक्षणाचा नेमका फरक तेव्हाच दिसून आला. वाडकर या गुणवान विकेटकीपर - फलंदाजानं प्रथम सरवटे आणि नंतर नेरळसोबत शतकी भागीदारी रचून कमाल केली. वाडकरनं १३३ धावांची अमूल्य खेळी उभारून विदर्भ संघाला विजयाच्या मार्गावर नेलं. दुसऱ्या डावात दिल्लीच्या फलंदाजांनी केलेले माफक प्रयत्न विदर्भ संघाच्या गोलंदाजांनी मोडून काढले. ९ विकेट्‌सनी अंतिम सामना जिंकून विदर्भ संघानं रणजी करंडकावर नांव कोरलं.

बक्षिसाच्या रकमेचं काय?
विजयोत्सव संपल्यावर चंदू पंडितनं म्हणे प्रशांत वैद्यना हळूच विचारलं, की ‘रणजी करंडक जिंकल्यावर मिळणाऱ्या रोख रकमेच्या बक्षिसाचं काय?’ हे विचारण्यामागं इतिहास असल्याचं समजलं. कारण विदर्भ रणजी संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारतानाच चंदू पंडितनं हा प्रश्‍न प्रशांत वैद्य यांना विचारला होता. म्हणजेच विदर्भ संघ कमाल कामगिरी करू शकतो, या दुर्दम्य आत्मविश्‍वासानंच पंडितनं काम केलं होतं. भल्याभल्या संघांना जे जमलं नाही ते विदर्भ संघानं करून दाखवलं, ज्याचं मनमोकळे कौतुक व्हायलाच पाहिजे.

अखेर शहाणपणा सुचला                  
न्यायालयानं नेमलेल्या लोढा समितीनं अहवाल सादर करून काळ लोटला, तरी महाराष्ट्र क्रिकेट संघटना त्याची अंमलबजावणी करायला राजी नव्हती. विरोध करायला हरकत नाही; पण तो संघटनेला परवडतो का नाही याचा विचार एमसीए कार्यकारिणी करत तरी नव्हती किंवा कळून न कळल्यासारखं दाखवत होती.  लोढा समितीच्या अटी मान्य करणं एमसीए कार्यकारिणीला कठीण जाणार होतं- कारण मान्यता देणं म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होतं. अटी मान्य केल्या, तर समितीने नेमून दिलेल्या नियमांनुसार कार्यकारिणीतल्या बऱ्याच सदस्यांना जागा आपणहून रिकामी करावी लागणार होती. कार्यकारिणीत राहून कोण खरं किती योगदान महाराष्ट्र क्रिकेटच्या भल्याकरता देतं हा चर्चेचा मुद्दा ठरत असला, तरी ‘मानाची’ जागा सोडण्याचा मनाचा मोठेपणा कोणी कसा दाखवेल?
खरी अडचण वेगळीच होती. लोढा समितीचे आदेश मान्य केले नाहीत, तर बीसीसीआयकडून येणारा निधी रोखण्यात येतो. आधीच कर्जाच्या डोंगरात घर केलेल्या एमसीएला मिळकतीचा बाकी कोणताच मार्ग नसल्यानं आणि निधी जमा करायला प्रायोजकता मिळवण्याचा एमसीएनं कधीच प्रामाणिक प्रयत्न न केल्यानं संस्थेच्या तिजोरीत खडखडाट आहे. बीसीसीआय अनुदानाचा निधी आला नाही, तर एमसीए किती काळ तग धरणार हा प्रश्‍न होता. एकीकडं शापुरजी पालनजी कंपनीकडून पैशाचा तगादा चालू आहे, तर दुसरीकडं बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने समस्या गंभीर रूप धारण करत आहे.

या सगळ्याचा सारासार विचार करून एमसीएचे विद्यमान अध्यक्ष अभय आपटे यांनी कार्यकारिणीला पटवून दिलं, की आता न्यायालयीन आदेशाचं पालन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. २०१७ च्या शेवटाला झालेल्या एमसीएच्या विशेष सभेत अखेर लोढा समितीचे बदल स्वीकारण्याचा प्रस्ताव मान्य केला गेला. बीसीसीआयनं एमसीएच्या निर्णयाचं स्वागत करून थोपवून धरलेला निधी द्यायला पावलं उचलली. एमसीएनं घेतलेल्या निर्णयामुळं तिच्या ढासळत्या अर्थकारणाला आधार लाभला आहे. लढाई इथं संपत नाही, तर सुरू होते. कारण लोढा समितीनं सुचवलेले बदल प्रत्यक्ष राबवताना एमसीए कार्यकारिणीची खुर्ची गेली कित्येक वर्षं घट्ट धरून बसलेल्या सदस्यांना पद सोडावं लागणार आहे. येत्या मार्च महिन्यात एमसीएच्या निवडणुका व्हायची जी शक्‍यता आहे, तिला वेगळीच धार चढणार आहे.

‘खेलो इंडिया’ योजनेचं रणशिंग
केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ योजनेचं रणशिंग फुंकलं जायच्या तयारीत आहे. क्रीडा मंत्रालयानं खूप अभ्यासपूर्वक ‘खेलो इंडिया’ योजनेची आखणी केली असून, त्यातला सर्वांत महत्त्वाचा भाग गुणवान खेळाडूंना योग्य वयात हेरण्याचा आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत किमान वीस पदकं कमावण्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवण्यात येणार असल्याचं समजलं. त्यासाठी दर वर्षी एक हजार निवडक खेळाडूंना क्रीडा मंत्रालय आपल्या छत्राखाली घेऊन त्यांच्या खेळातल्या प्रगतीची काटेकोर आखणी करणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना होणार आहे. महान माजी खेळाडू, जाणकार, प्रशिक्षक यांचा समावेश या समितीत केला जाणार आहे. भारतात जी निवडक स्पोर्टस स्कूल आणि कॉलेजेस आहेत, त्यांना सरकार खेळाच्या विकासाकरता निधी उपलब्ध करून देणार आहे. भारतात चांगली मुळं रुजलेल्या आर्चरी, शूटिंग, हॉकी, बॅडमिंटन, बॉक्‍सिंग आणि कुस्ती या सहा खेळांच्या विकासावर सरकार जास्त गांभीर्यानं लक्ष देणार आहे. दिव्यांग खेळाडूंच्या प्रगतीसाठी वेगळी यंत्रणा राबवण्यात येईल. तसंच खेळाचा सुयोग्य वापर देशात शांतता आणि प्रगतीकरता कसा करता येईल याचा विचार केला जाईल. वर नमूद केलेल्या तीनही सकारात्मक घटना २०१७ च्या वर्षाअखेरीला घडल्यानं २०१८ ला नव्या उत्साहानं सामोरं जायचे विचार मनात यायला लागले आहेत. आहेत की नाही हे सुखद बदलाचे वारे?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunandan lele write article in saptarang