भ्रमाचा भोपळा फुटला... (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 21 जानेवारी 2018

मायदेशातल्या विजयी मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ परदेशांतही चमकदार कामगिरी करेल, अशी रास्त अपेक्षा होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरियन मैदानावर भ्रमाचा भोपळा फुटला. अव्याहत सामन्यांपासून फलंदाजीतल्या समस्यांपर्यंत अनेक गोष्टींमुळं भारतीय संघाची ‘कसोटी’ लागली आहे. या सगळ्या गोष्टींचं विश्‍लेषण...  

मायदेशातल्या विजयी मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ परदेशांतही चमकदार कामगिरी करेल, अशी रास्त अपेक्षा होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरियन मैदानावर भ्रमाचा भोपळा फुटला. अव्याहत सामन्यांपासून फलंदाजीतल्या समस्यांपर्यंत अनेक गोष्टींमुळं भारतीय संघाची ‘कसोटी’ लागली आहे. या सगळ्या गोष्टींचं विश्‍लेषण...  

मायदेशातील विजयी मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ मोठ्या उत्साहानं २०१८च्या तयारीला लागला. वर्षाच्या सुरवातीला दक्षिण आफ्रिका, मध्याला इंग्लंड आणि २०१८च्या अखेरीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान चांगली कामगिरी करायची मनीषा भारतीय संघ मनात बाळगून होता. संघाचा सध्याचा फॉर्म, संघ व्यवस्थापनाची खेळाडूंना हाताळण्याची पद्धत आणि कर्णधार विराट कोहलीची सतत आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळण्याची आवड याचा विचार करता खरंच आपला संघ परदेशांतही चमकदार कामगिरी करेल, अशी रास्त अपेक्षा मनात रुंजी घालत होती. त्याच उत्साहानं मी दक्षिण आफिकेला जायच्या विमानात बसलो. पंधरा दिवसांत अपेक्षांच्या भ्रमाचा भोपळा फुटताना मला सेंच्युरियन मैदानावर बघावा लागला.

पहिला दोष बीसीसीआयचा
इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ः ‘इफ यू फेल टू प्रिपेअर... देन यू बेटर बी प्रिपेअर्ड टू फेल.’ योग्य तयारी केली नाही, तर अपयशाचा मार्ग शोधावा लागत नाही. बीसीसीआयनं अत्यंत विचारपूर्वक भारतीय संघाच्या दक्षिण आफिका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेतल्या अपयशाचा पाया ‘रचून ठेवला’ अशी तिरकस टिप्पणी करावीशी वाटते. कारण सांगतो तुम्हाला. संपूर्ण २०१७ या वर्षात भारतीय संघ अव्याहत क्रिकेट खेळत होता. एकामागोमाग एक संघ भारतात येऊन कसोटी मालिका खेळत होते. भारतीय खेळपट्ट्यांवर फॉर्मात असलेल्या भारतीय संघासमोर कोणाचाच टिकाव लागत नव्हता. विजयानं उत्साह वाढत राहिला- ज्यामुळं सततच्या प्रवासाचा आणि खेळाचा थकवा खेळाडूंना जाणवला नाही. श्रीमंती आहे म्हणून एखाद्या माणसानं घरातल्या हॉलमध्ये एकच्या ऐवजी तीन सोफासेट ठेवले तर काय अवस्था होईल ती बीसीसीआयनं भारतीय क्रिकेटची करून ठेवली होती. कॅलेंडरमध्ये मोकळी जागा दिसली, की भर सामने असा प्रकार बीसीसीआय करत होते. दोन मालिकांमध्ये योग्य विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआयच्या स्पर्धा आयोजन समितीच्या मनातही येत नव्हता. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये श्रीलंकेचा दौरा करून आल्यावर परत त्याच सुमार संघाला भारतात दोन महिन्यांनंतर बीसीसीआयनं बोलावलं, ही ढिसाळ संयोजनाची हद्द होती. टीव्ही चॅनेलबरोबर केलेल्या कोट्यवधी डॉलरच्या करारामुळे मान्य केलेले सामने भरवण्यावाचून बीसीसीआयला पर्याय उरत नाही.

श्रीलंकेचा भारतातला दौरा संपल्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ दक्षिण आफिकेला जायच्या विमानात बसलेला होता. जेमतेम एक सराव सामना पहिल्या कसोटी अगोदर कार्यक्रमात धरला गेला होता. तो भारतीय संघ व्यवस्थापनानं रद्द केला आणि पाच दिवस कसून सराव करायचा मार्ग पसंत केला. सरावादरम्यान गांभीर्य होतं; पण कितीही सराव केला तरी प्रत्यक्ष सामन्यातली परिस्थिती पूर्ण वेगळी असते, हे पहिल्याच सामन्यात कळून चुकलं.

संघनिवडीचा ‘बुद्धिबळ’
पहिल्या कसोटी सामन्याअगोदर संघनिवडीचा ‘बुद्धिबळ’ गाजला. एकीकडं रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये होता, तर दुसरीकडं अजिंक्‍य रहाणे धावा जमा करायला झगडत होता. करंट फॉर्मला महत्त्व देणाऱ्या संघ व्यवस्थापनानं साहजिकच अजिंक्‍य रहाणेला बाहेर बसवत रोहित शर्माला प्राधान्य दिलं. या निर्णयामागे रहाणेला खाली खेचायचा हेतू होता, असं मला अजिबात वाटत नाही. त्याचबरोबर पाच मुख्य फलंदाजाचा संघात घेण्याचा विचार कायम ठेवण्याची हिंमत विराट कोहलीनं केली आणि हार्दिक पंड्याला सहावं स्थान दिलं गेलं.

केपटाऊनच्या न्यूलॅंड्‌स मैदानाची विकेट तयार करताना माळ्यानं जाणीवपूर्वक विकेटवर थोडं हिरवं गवत राखलं होतं. कसोटी सामन्यात पावसानं एक दिवस वाया गेला. खेळ झालेल्या तीनही दिवसांत वेगवान गोलंदाजांनी खेळावर राज्य केलं. दोनही डावांत भारतीय वेगवान गोलंदाजांनी समोरच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. तो आनंद क्षणभंगुर ठरला. चौथ्या डावात फिलॅंडरनं स्विंग गोलंदाजीच्या तालावर फलंदाजांना नाचवलं. पहिल्या सामन्यानंतर परदेश दौऱ्यात पहिल्या कसोटीला सामोरं जाण्याअगोदर सराव सामने खेळणं किती गरजेचं असतं हे सगळ्यांना कळून चुकलं; पण तो विचार म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ या प्रकारातला होता.                

कधी संधी सोडली, कधी लाथाडली
खरं तर दोन्ही कसोटींत वर्चस्व गाजवायची संधी भारतीय संघाला होती. पहिल्या कसोटीत ती पकडता आली नाही, तर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघानं संधी गमावली नव्हे, तर ‘लाथाडली’ असंच म्हणावं लागेल. त्यामुळंच पहिल्या कसोटीतल्या पराभवानंतर चुटपुट लागून राहिली आणि दुसऱ्या कसोटीतल्या पराभवानंतर लाज वाटली. दुसऱ्या कसोटीत चेतेश्‍वर पुजारासारखा महत्त्वाचा फलंदाज दोन्ही डावांत स्वत:च्या चुकीनं रनआऊट झाला. दोन्ही वेळेला पुजाराचा धाव घेण्याचा अंदाज चुकला ते स्वत:ला ‘उसेन बोल्ट’ समजल्यानं. हार्दिक पंड्यानं क्रिकेटला गृहीत धरायची चूक केली. सेंच्युरियन कसोटीत हार्दिक पंड्या पहिल्या डावात धावबाद झाला, तेव्हा आत्मविश्‍वास आणि फाजील आत्मविश्‍वास या दोन शब्दांचा खरा अर्थ समजला.

सेंच्युरियन कसोटी सामन्याअगोदर वृद्धिमान सहाच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली आणि पार्थिव पटेलला कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. पहिल्या डावात बऱ्यापैकी विकेट कीपिंग आणि बऱ्यापैकी फलंदाजी केलेल्या पार्थिवनं दुसऱ्या डावात अक्षम्य चूक केली. डिन एल्गरचा उडालेला झेल पकडायचा प्रयत्न पार्थिवनं केला नाहीच, वर त्यानं तो झेल पकडायचा प्रयत्न पहिल्या स्लीपमधे उभ्या असलेल्या चेतेश्‍वर पुजारानं करायला हवा होता, असे लगेच क्षणार्धात आविर्भाव केले- जी गोष्ट अत्यंत खराब दिसली. स्वाभिमानी क्रिकेट खेळणं पसंत करणाऱ्या विराट कोहलीला पार्थिवची चूक किती बोचली असणार याचा विचार केलेला बरा. पार्थिवला त्याची फार मोठी भरपाई द्यावी लागेल, असा माझा अंदाज आहे. कमीत कमी दोनशेच्या वर कसोटी सामन्यांचं वार्तांकन करायची संधी लाभली. विजय बघितले, तसे जीवघेणे पराभवही पचवले; पण खरं सांगतो सेंच्युरियनसारखा कसोटी पराभव मी नाही अनुभवला.

सगळे संघ खराब प्रवासी     
क्रिकेट जगतातले सगळेच संघ खराब प्रवासी झाले आहेत, ही गोष्ट खेळाच्या सुदृढतेच्या दृष्टीनं चांगली मानता येणार नाही. भारतीय संघ परदेश दौऱ्यात चांगली कामगिरी करत नाहीये, हे मान्य करावं लागेल आणि त्याचं कोणतंही स्पष्टीकरण देणं बरोबर नाही. तरीही बाकीही संघ परदेश दौऱ्यांमध्ये खूप खराब कामगिरी का करत आहेत, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. इंग्लंड संघानं ॲशेस मालिकेत ज्या प्रकारे खराब कामगिरी केली ती लज्जास्पदच होती. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफिका आणि न्यूझिलंडसारख्या कागदावर चांगल्या दिसणाऱ्या संघांची कामगिरी सुमार होती. घरच्या मैदानावर सगळेच संघ ‘शेर’ असतात आणि परदेश दौऱ्यावर त्यांची एकदम ‘शेळी’ का होते, हे तपासणं गरजेचं आहे. भारतीय संघाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करायची इच्छा असेल, तर भरभक्कम तयारीचा एकच उपाय दिसतो. भारतीय संघाची कामगिरी दौऱ्यावर गेल्यावर चांगली व्हावी अशी प्रामाणिक इच्छा असेल, तर बीसीसीआयनं त्याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे.     

‘जीटीयू’ रोगाचे रुग्ण
भारतीय क्रिकेट जगतात ‘जीटीयू’ म्हणजे काय, हे सगळ्यांना माहीत आहे. जीटीयू म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर!’ भारतीय क्रिकेट सध्या या रोगानं पछाडलेलं आहे. ‘भारतीय क्रिकेट’ असा उल्लेख केला, कारण कोणतीही राज्य क्रिकेट संघटना घ्या, ते कितीही चुका करत असले आणि स्थानिक संघ कितीही सुमार कामगिरी करत असला, तरी संघटक पडत नाहीत. ‘आम्ही करतो ते एकदम बरोबर’ याच भ्रमात सगळे कॉलर ताठ करून वावरताना दिसतात. तेव्हा हसावं का रडावं समजत नाही. विराट कोहली आणि रवी शास्त्री सकारात्मक विचारांचे लोक आहेत, यात काडीमात्र शंका नाही; पण संघानं खराब खेळ केला, तर चूक मान्य करायचा मोठेपणा कर्णधार म्हणून कोहली आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री दाखवतील का, हा खरा प्रश्‍न आहे. प्रत्येक पराभवानंतर ‘देअर आर लॉट्‌स ऑफ पॉझिटीव्हज टू बी टेकन फॉम धिस गेम’ हे परवलीचं वाक्‍य ऐकून माझे तर कान पकले आहेत.

गंभीर समस्या
बीसीसीआय किंवा संघ व्यवस्थापन कितीही सकारत्मकतेचा आव आणूदेत- सत्य हेच आहे, की खासकरून दौऱ्यावर गेल्यावर फलंदाजीतल्या समस्या गंभीर रूप धारण करतात. नुसतंच कसोटी सामन्यात नाही, तर एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघाची मधली फळी भरभक्कम भासत नाही. संजय मांजरेकरच्या म्हणण्यानुसार, १९९०च्या दशकात सचिन तेंडुलकरवर भारतीय फलंदाजीचा मुख्य भार असायचा. २०००च्या दशकात सचिनला राहुल द्रविड, सेहवाग, लक्ष्मण आणि गांगुलीची साथ लाभली आणि परिस्थिती बदलली. आत्ताच्या घडीला विराट कोहलीवर भारतीय संघाची भिस्त असते. चेतेश्‍वर पुजारा चांगली साथ देतो. तो अपयशी ठरला, तर मग कोहली एकटा पडतो हेच दिसून आलं आहे. रोहित शर्मा किंवा सध्याच्या फॉर्ममधला अजिंक्‍य रहाणे हे २०००च्या दशकातल्या भारतीय फलंदाजांप्रमाणं भरवसा देत नाहीत. परदेशात रवीचंद्रन अश्‍विन अपेक्षित परिणाम गोलंदाजी करताना साधू शकत नाहीये, हेसुद्धा खराब कामगिरीचं किंवा चिंतेचं कारण आहे. दीड वर्षांवर वर्ल्डकप आला असताना एकदिवसीय क्रिकेटमधल्या भारतीय फलंदाजीची मधली फळी शंभर टक्के स्थिर नाही, हे चांगलं लक्षण समजता येणार नाही.

Web Title: sunandan lele write article in saptarang