'दुसऱ्या इनिंगचा विचार गरजेचा' (सुनंदन लेले)
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या इनिंगइतकीच त्याची समाजकार्याची दुसरी इनिंग लक्षणीय आहे. या खेळाडूशी केलेली बातचित.
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या इनिंगइतकीच त्याची समाजकार्याची दुसरी इनिंग लक्षणीय आहे. या खेळाडूशी केलेली बातचित.
प्रसंग होता भारतीय संघानं सन 2011 मध्ये विश्वकरंडक जिंकल्यानंतरच्या दिवसाचा. मुंबईच्या कुलाबा भागातल्या ताज हॉटेलात वीरेंद्र सेहवागला भेटायला मी गेलो होतो. अपेक्षा होती सेहवाग मस्त हसत असेल. बघितलं, तर सेहवाग विचारमग्न अवस्थेत होता. जणू काही खूप मोठी चिंता त्याला भेडसावत आहे. ""काय झालं वीरू'' असं विचारल्यावर, ""सगळं सुरळीत सुरू असलं, सुखाचे झरे वाहू लागले, की माझ्या मनात धडकी भरते. खराब काळ सुरू असतो तेव्हा आशा असते, की आता लवकरच चांगले दिवस येतील...पण सगळंच चांगलं व्हायला लागलं, की मनात येतं ः आता पुढं काय वाईट वाढून ठेवलं आहे...'' सेहवाग म्हणाला होता.
अगदी तसंच काहीसं महान ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅग्राथच्या बाबतीत घडलं. पहिल्या कसोटी सामन्यापासून मी ग्लेन मॅग्राथला विनंती करत होतो मुलाखत द्यायची. अखेर तो योग जमून आला. ""न्यू साउथ वेल्स भागातल्या डुब्बो नावाच्या एकदम छोट्या गावात माझा जन्म झाला. मी लहानाचा मोठा नोरोमाईन नावाच्या गावी झालो. तिथं मी पहिल्यांदा क्रिकेट खेळलो. मी तेरा-चौदा वर्षांचा असताना महान माजी खेळाडू डग वॉल्टर्सनं माझ्यातली क्रिकेटची चमक हेरली. सन 1992 मध्ये मी पहिल्यांदा प्रथम श्रेणीचं क्रिकेट वयाच्या बाविसाव्या वर्षी खेळलो. काही जास्त कळायच्या आत मी मुख्य ऑस्ट्रेलियन संघात दाखल झालो. सगळंच स्वप्नवत होतं,'' पर्थ कसोटीदरम्यान ग्लेन मॅग्राथ भेटल्यावर घडाघडा सांगू लागला.
सन 1994 ची गोष्ट. ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. संघाचा मुख्य अस्त्र होता मॅकडरमॉट. अचानक मॅकडरमॉटच्या घोट्याला दुखापत झाली. सगळ्यांना वाटलं, की ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची धार बोथट झाली. त्यावेळी काटकुळा दिसणाऱ्या ग्लेन मॅग्राथला संधी मिळाली. मुख्य गोलंदाज म्हणून त्याने गोलंदाजीचा स्तर उंचावला आणि कर्णधाराच्या अपेक्षा पूर्ण केल्या. बघताबघता ग्लेन मॅग्राथ मुख्य गोलंदाज बनला. पुढची तब्बल 14 वर्षं मॅग्राथनं संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली.
गुलाबी प्रेमाची चाहूल
ग्लेन मॅग्राथला त्याची सखी कशी भेटली, नंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं झालं, असं विचारता ग्लेन म्हणाला ः ""सन 1995 मध्ये हॉंगकॉंगच्या एका हॉटेलात मी जेनला पहिल्यांदा भेटलो. आमच्या तारा लगेच जुळल्या. प्रेम ऐन रंगात आलं असताना अचानक धक्का बसला- कारण जेनला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान समोर आलं. आम्ही हादरलो; पण जेननं प्रसंगाला धीरानं तोंड देण्याची जिद्द दाखवली. जेनवर एक वर्ष खूप उपचार करण्यात आले आणि देवाच्या कृपेनं कॅन्सर नाहीसा झाल्याची गोड बातमी समजली. लगेच आनंदात आमचं लग्न सन 1997 मध्ये पार पडलं. पुढची पाच वर्षं स्वप्नवत गेली. सन 2002 मध्येच जेन आणि मी मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली.''
""एकीकडं 2003 मध्ये आम्ही विश्वकरंडक जिंकण्याचं स्वप्न साकारलं, तसंच माझ्याकरता 2005 मधली ऍशेस मालिकाही मस्त गेली. आम्हाला जेम्स आणि होलीसारखी दोन गोड मुलं झाली. सन 2006 मध्ये मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायची तयारी करत असताना जेनला परत त्रास व्हायला लागला. नाहीशा झालेल्या कॅन्सरनं डोकं वर काढल्याची बातमी कानावर आदळली. आमचं सुंदर जीवन ढवळून निघालं,'' ग्लेन कटू आठवणी सांगत होता.
सन 2006 ते 2008 चा काळ ग्लेन मॅग्राथच्या जीवनात सुख-दु:खाच्या लहरी आणणारा ठरला. सन 2006-07च्या ऍशेस मालिकेला ग्लेन मॅग्राथच्या दृष्टीनं खूप महत्त्व होतं- कारण तो शेवटची ऍशेस मालिका खेळत होता. ऑस्ट्रेलियन संघानं अफलातून कामगिरी करताना इंग्लंडला 5-0 पराभवाचा दणका दिला. पाठोपाठ मॅग्राथ खेळत असलेल्या शेवटच्या विश्वकरंडकामध्येही ऑस्ट्रेलियन संघानं दिमाखदार खेळ करून विजेतेपद राखलं. ऍशेस मालिकेतल्या देदीप्यमान यशानंतर ग्लेन मॅग्राथनं कसोटी क्रिकेटचा निरोप घेतला. सन 2007 चा विश्वकरंडक जिंकल्यावर एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकला.
क्रिकेटच्या मैदानावरची यशस्वी कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना सोडणाऱ्या ग्लेन मॅग्राथला पुढच्याच वर्षी आयुष्यातला सर्वांत मोठा आघात सहन करावा लागला. सन 2008 च्या जून महिन्यात जेन मॅग्राथची कॅन्सरशी चाललेली झुंज संपली. असंख्य सुखद आठवणी आणि दोन गोजिरवाण्या मुलांना मागं ठेवून जेन देवाघरी गेली.
आघातातून सावरताना
"कसा सावरलास मग त्या आघातातून,'' मी ग्लेनला विचारलं. ""मुलं लहान होती. क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि आयुष्य आ वासून उभं होतं जेन गेली तेव्हा...'' ग्लेन सांगत होता. ""मुलांकडं बघून मला सावरावं लागलं. जेनच्या मनात ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीच्या कामाचं स्वप्न होतं. फाउंडेशन त्याचकरता सुरू केलं होतं. तेच माझ्या जीवनाचं ध्येय बनलं. मी फाउंडेशनच्या कामात स्वत:ला झोकून दिलं. विशेषकरून गेल्या दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने आम्ही फाउंडेशनची व्याप्ती वाढवत नेली,'' ग्लेन मॅग्राथ त्याच नेहमीच्या शैलीत मान हलवत म्हणाला.
बहुतांश महान खेळाडू निवृत्त होताना म्हणतात, की "खेळानं मला खूप काही दिलं. चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. आता ज्या खेळानं आणि समाजानं मला इतकं काही दिलं त्याची परतफेड करायची वेळ आली आहे.' होय! बोलतात बरेच; पण प्रत्यक्ष कृती फार थोडे खेळाडू करतात. ग्लेन मॅग्राथ त्याच मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. त्यानं मोठं समाजकार्य करून समाजाचं आणि खेळाचं ऋण फेडलं आहे.
""यशाच्या शिखरावर असताना जेनचा कॅन्सर परत उफाळून वर आला. एकाच वेळी सुख-दु:ख माझ्या जीवनात नांदत होतं. कळतच नव्हतं- खरं काय आणि खोटं काय! जेनच्या जाण्यानं मी खलास झालो. आमची मुलं जेम्स आणि होली लहान होती आणि जेनला प्रिय असणारं फाउंडेशनचं काम साद घालत होतं म्हणून मी भरकटलो नाही,'' ग्लेनची टिप्पणी.
""नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या बहुतांश लोकांच्या कारकिर्दीला वयाच्या पस्तिशीनंतर धुमारे फुटतात. खेळाडूंचं काय होतं, की आमची कारकीर्द बऱ्याच वेळेला वयाच्या पस्तिशीला संपते. मग उरलेलं आयुष्य आ वासून उभं राहतं समोर. आम्ही खेळाडू सर्वोच्च स्तरावर खेळत असतो, तेव्हा दुसरा कोणता विचार मनात येतच नाही. आपल्या खेळात अजून धार कशी येईल याकरता प्रयत्न करत राहतो. व्यवस्थापन आमची काळजी घेत असतं आणि लागणाऱ्या सगळ्या गोष्टी हात जोडून उभ्या असतात. सर्वोत्तम कामगिरी कशी करायची त्याचाच ध्यास असतो. माझ्या बाबतीत जरा थोडं वेगळं झालं. एकीकडं ऍशेस मालिकेतलं घवघवीत यश मला मिळालं आणि दुसरीकडं एकदिवसीय क्रिकेटची सांगता विश्वकरंडक जिंकून झाली. भरल्या मनानं निवृत्ती घेतल्यावर सर्वांत प्रेमाचं माणूस सोडून जाण्याचं दु:ख मला भोगावं लागलं. सगळंच विचित्र होतं. सहन करण्यापलीकडचं होतं. म्हणून मला वाटतं, की प्रत्येक खेळाडूनं जाणीवपूर्वक दुसऱ्या इनिंगचा विचार करायला हवा,'' अत्यंत मोलाचा मुद्दा ग्लेन मॅग्राथनं मांडला.
""समाजकार्य करताना मला जो प्रतिसाद मिळाला, त्यानं मी भारावून गेलो. सरकारपासून ते माजी खेळाडूंपर्यंत आणि आजी खेळाडूंपासून ते विविध क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी मला खुल्या दिलानं पाठिंबा दिला. आज फाउंडेशनतर्फे 127 ब्रेस्ट केअर नर्सेस 67 हजार कुटुंबांना मदत करत आहेत. कॅन्सर चाचणीचं काम मोठं आहे. कॅन्सर झालेल्या रुग्णांना आमच्या नर्सेस सर्वतोपरी मदत करत असतात. गेली काही वर्षं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नवीन वर्षातला पहिला कसोटी सामना "पिंक टेस्ट' म्हणून खेळवला आहे. कमाल वातावरण असतं सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवल्या जाणाऱ्या नवीन वर्षाच्या "पिंक टेस्ट'च्या वेळी. दोन्ही संघाचे खेळाडू गुलाबी अक्षरांत लोगो परिधान करून मैदानात उतरतात. हा घे तुझ्याकरता पिंक शर्ट...हाच घालून ये हं सिडनी कसोटी सामन्याला,'' असं म्हणून ग्लेन मॅग्राथ हसून निघून गेला.
ग्लेननं प्रेमानं दिलेल्या गुलाबी टीशर्टकडं मी बघत होतो. विचार करत होतो, की ग्लेन मॅग्राथनं 563 विकेट्स काढल्यावर जेवढा आनंद त्याच्या सहकाऱ्यांना झाला तेवढाच त्यानं एकमेव अर्धशतक झळकावल्यावर झाला. आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना ग्लेन मॅग्राथला "पिजन' हे टोपणनाव पडलं- कारण त्याचे पाय कबुतरासारखे काटकुळे दिसायचे. "पिजन' नावानं संघात लोकप्रिय असलेल्या ग्लेन मॅग्राथ नावाच्या कबुतरानं मारलेली भरारी अजब आहे. मॅग्राथची मैदानावरची पहिली इनिंग जितकी प्रेक्षणीय होती, तेवढीच त्याची समाजकार्याची दुसरी इनिंग लक्षणीय ठरते आहे.