गमन, आगमन आणि पुनरागमन (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 3 जून 2018

क्रिकेटरसिकांचा लाडका क्रिकेटपटू एबी डी व्हिलिअर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती...म्हणजे "गमन'...चेन्नई सुपर किंग्जचं "पुनरागमन' आणि अफगाणिस्तान संघाचं कसोटी संघ म्हणून क्रिकेटविश्वात लवकरच "आगमन'...असा एक वेगळाच योग क्रिकेटविश्वात पाहायला मिळत आहे.

क्रिकेटरसिकांचा लाडका क्रिकेटपटू एबी डी व्हिलिअर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती...म्हणजे "गमन'...चेन्नई सुपर किंग्जचं "पुनरागमन' आणि अफगाणिस्तान संघाचं कसोटी संघ म्हणून क्रिकेटविश्वात लवकरच "आगमन'...असा एक वेगळाच योग क्रिकेटविश्वात पाहायला मिळत आहे.

एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू, असा अनुभव गेल्या पंधरवड्यात मिळाला!
दोन वर्षांच्या वनवासानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघानं जोरदार पुनरागमन करत 2018 च्या आयपीएल करंडकावर नाव कोरल्यावर कौतुक वाटलं. आनंददर्शक हसू आलं. दुसरीकडं क्रिकेटविश्वातला लाडका एबी डी व्हिलिअर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानं वाईट वाटलं. म्हणजेच एबी डी व्हिलिअर्सचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून "गमन' झालं आणि चेन्नई सुपर किंग्जचं "पुनरागमन' झालं. मग शीर्षकात म्हटल्यानुसार "आगमन' कुणाचं झालं...? अहो, असे काय करता...? अफगाणिस्तान संघाचे कसोटी संघ म्हणून क्रिकेटविश्वात लवकरच आगमन होत आहे ना!

एबी डी व्हिलिअर्सनं लावला चटका
भारतात सामना सुरू असल्यावर भारतीय फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली तर किंवा भारतीय गोलंदाजाला विकेट मिळाली तर प्रेक्षक गलका करतात. याउलट समोरच्या संघातल्या गोलंदाजानं भारतीय फलंदाजाला बाद केलं किंवा कुण्या फलंदाजानं भारतीय संघाविरुद्ध जबरदस्त खेळताना मोठा फटका मारला तर खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात एकदम शांतता पसरते. मात्र, या घटनेला एकमेव अपवाद असलेला खेळाडू म्हणजे एबी डी व्हिलिअर्स.

एबी डी व्हिलिअर्सवर भारतीय क्रिकेटरसिकांना अपरंपार प्रेम केलं आहे. त्याच्या 100 व्या कसोटीचा सोहळा तो आयपीएल संघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या बंगळूरच्या मैदानावर झाला होता. फलंदाजीला उतरल्यावर एबी डी व्हिलिअर्सला स्थानिक प्रेक्षकांनी दिलेला "आवाजी' पाठिंबा बघून मन कौतुकानं भरून गेलं होतं. ""भारतात आणि खासकरून बंगळूरला खेळताना मला परदेशात खेळत असल्याचं जाणवत नाही, इतकं प्रेम लोक मला देतात. मला नाही उतराई व्हायचं या प्रेमाच्या ऋणातून...'' एबी डी व्हिलिअर्स एकदा आनंदानं म्हणाला होता. त्याच्या खेळाच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडावं असाच आहे तो. अभ्यासात तो चांगला हुशार होता. सायन्स प्रोजेक्‍ट करता त्याला मानाचं "नेल्सन मंडेला पदक' मिळालं होतं. खेळाच्या क्षेत्रात तर काही विचारूच नका. एबी डी व्हिलिअर्स नुसता चांगला क्रिकेटपटूच नाही, तर तो रग्बी, हॉकी, टेनिस, पोहणं, बॅडमिंटन आणि गोल्फसुद्धा तितक्‍याच सुंदर प्रकारे खेळू शकतो. इतकंच नव्हे तर सुश्राव्य आवाजाची देणगीही त्याला लाभलेली आणि त्यानं बॅंडही काढला. त्यात तो स्वत: अगदी मनमोकळा गातो.

नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेत एबी डी व्हिलिअर्सनं काही कमाल खेळी सादर केल्या. खऱ्या अर्थानं तो "360 डिग्री फलंदाज' म्हणून नावाजला गेला, इतकी त्याच्या फलंदाजीत परिपूर्णता दिसली. मग चांगली फलंदाजी होत असताना आणि तंदुरुस्तीही चांगली असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो अचानक निवृत्त का झाला ? तेसुद्धा 2019 ची विश्‍वचषक स्पर्धा एका वर्षावर आलेली असताना? सगळेच संभ्रमात पडले...
एका जाणत्या खेळाडूनं हे रहस्य उलगडताना सांगितलं ः "दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आयसीसी स्पर्धांमधे सातत्यानं अपयश आलं आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमधे चॅंपियन्स करंडक स्पर्धेत एबी डी व्हिलिअर्स कर्णधार असताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठं अपयश आलं. अगदी खरं बोलायचं तर दक्षिण आफ्रिकेच्या सध्याच्या संघातही म्हणावा तसा दम दिसत नसताना परत विश्‍वचषक स्पर्धेत मोठं अपयश नको त्या टप्प्यावर आलं तर "चोकर्स'चा शिक्का कायमचा बसेल आणि मग तो "व्रण' घेऊन जगणं अवघड होईल, या भीतीनं एबी डी व्हिलिअर्सनं आपली निवृत्ती मनावर दगड ठेवून जाहीर केली असावी.'
खेळाडू म्हणून एबी डी व्हिलिअर्सला घवघवीत यश मिळालेलं आहे. मात्र, आयसीसी स्पर्धेत संघाला आपण मोठं यश मिळवून देऊ शकलेलो नाही, हे कटू सत्य त्याला सलत असणार, म्हणूनच त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला असावा. विश्वविजेतेपदाचा मानाचा तुरा एबी डी व्हिलिअर्सच्या शिरपेचात नसला तरी "सभ्य खेळाडू' म्हणून त्याच्याबद्दल असलेला आदर तसूभरही कमी होत नाही.

धोनीनं केली कमाल
सन 2018 ची आयपीएल स्पर्धा चालू होण्याअगोदर चेन्नई सुपर किंग्जला "भाऊसाहेब खेळाडूंचा संघ' म्हणून हिणवलं गेलं होतं. त्यामागचं कारण तसं साधं होतं. स्वत: महेंद्रसिंग धोनीसह इम्रान ताहीर, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, अंबाती रायडू, हरभजनसिंग आदी खेळाडू वयानं चांगले मोठे होते. "इतर संघ तरुण सळसळत्या रक्ताच्या खेळाडूंवर भरवसा ठेवत असताना धोनीनं संघनिवड करताना फक्त अनुभवाला प्राधान्य दिलं आहे,' अशी चौफेर टीका केली गेली. मात्र, आपण नक्की काय करत आहोत, याची नेमकी जाणीव धोनीला होती.

सन 2016 मध्ये धोनीनं रायजिग पुणे सुपरजायंट्‌स संघाचं नेतृत्व केलं होतं. संघमालक क्रिकेटप्रेमी असल्यानं 2017 मध्ये संघाच्या नियोजनाबाबत संघचालकांना बरीच उत्सुकता होती, तसंच त्यांचे काही ठोकताळेही होते. त्यासंदर्भात संघचालकांनी धोनीशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. मात्र, धोनी संवादासाठी त्यांना लगेचच भेटू शकला नाही. कारण, धोनी मोबाईल फोनचा अत्यल्प वापर करतो. संघचालकांना या बाबीचा खूप राग आला आणि त्यांनी धोनीला कर्णधारपदावरून काढून टाकायचा निर्णय घेतला. धोनीलाही त्यात काही चुकीचं वाटलं नाही. मात्र, "मी कर्णधारपद वैयक्तिक कारणासाठी सोडत असून, संघचालक नवा कर्णधार नेमत आहेत, असं आपण जाहीर करू या; जेणेकरून संघातल्या खेळाडूंना धक्का बसणार नाही आणि संघाचे प्रायोजकही हादरणार नाहीत,' एवढंच धोनीनं सुचवलं. मात्र, संघचालकांनी धोनीची ही सूचना मानली नाही आणि "आम्हीच धोनीला कर्णधारपदावरून काढत आहोत,' असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. झाल्याप्रकारानं धोनी दुखावला. एक सच्चा क्रिकेटपटू म्हणून त्यानं अपमान गिळून पुणे संघाकरता सर्वोत्तम कामगिरी करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. धोनीनं कुठंही काही वाच्यता केली नाही, तरी त्याची पत्नी साक्षी हिनं चेन्नई सुपर किंग्जची पिवळी जर्सी आणि हेल्मेट घालून संघमालकांना ट्विट करून उघड नाराजी व्यक्त केली होती.

दोन वर्षांच्या वनवासानंतर चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल स्पर्धेत पुन्हा दाखल झाला तेव्हा दणकेबाज कामगिरी करायचा निग्रह धोनीच्या चेहऱ्यावर दिसत होता. कुठंही वाच्यता न करता आणि एकदाही पत्रकार परिषदेला न येता धोनी फक्त, संघाची कामगिरी भन्नाट कशी होईल, याकडं लक्ष देत राहिला. त्याच्या फलंदाजीतली ताकद परतल्याचं त्यानं मारलेल्या घणाघाती फटक्‍यांवरून दिसून आलं.
ज्या अनुभवी खेळाडूंना "भाऊसाहेब खेळाडू' म्हणून हिणवलं गेलं, त्याच खेळाडूंनी कर्णधार धोनीचा विश्‍वास सार्थ करून केला. अंतिम सामना मोठ्या सहजतेनं जिंकून धोनीनं कमाल केली.

स्फोटातून निर्माण झालेला स्फोटक खेळाडू
सन 2018 च्या आयपीएल स्पर्धेचा चमकता तारा अफगाणिस्तानचा राशिद खान ठरला. ज्या शहरात सर्वाधिक बॉंबस्फोट झाले, त्या जलालाबाद शहरात राशिदचं कुटुंब वास्तव्याला होतं. मधल्या काळात अतिरेकी कारवायांनी हैराण झालेल्या त्याच्या कुटुंबीयांनी काही दिवसांसाठी आपला मुक्काम पाकिस्तानात हलवला. राशिदला नऊ भावंडं आहेत, असं कळतं. त्याला लहानपणापासूनच ॉ गोलंदाजी करायची हौस होती. मोकळ्या माळरानावर तो क्रिकेट खेळण्यात रमून जायचा आणि तासन्‌तास गोलंदाजी करायचा. अगदी लहान वयात राशिदमधली गुणवत्ता हेरून निवड समितीनं इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळायची संधी राशिदला दिली. पदार्पणाच्या सामन्यातच त्यानं सुंदर गोलंदाजीबरोबर उपयुक्त धावाही केल्या. राशिदच्या गोलंदाजीत असलेली जादू जाणकारांनी हेरली आणि सनरायजर्स संघानं राशिदला आयपीएल संघात दाखल करून घेतलं.
दोन वर्षांत राशिदनं आयपीएल स्पर्धा दणाणून सोडली आहे. राशिदच्या फिरकीची जणू दहशतच फलंदाजांना वाटायला लागली आहे. "सध्याच्या घडीचा टी20 क्रिकेटमधला सर्वोत्तम गोलंदाज' अशी पावती खुद्द सचिन तेंडुलकरनं राशिद याला दिली आहे.

आगमन नव्या संघाचं
राशिद खानच्या यशाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान संघाचं कसोटी पदार्पण रंगणार आहे. ता. 14 जूनपासून बंगळूरला भारतीय संघाविरुद्ध अफगाणिस्तानचा संघ कसोटीक्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. राशिदसोबत मुजीब रहमानसारखा आणखी एक चांगला फिरकी गोलंदाज असल्यानं भारतीय संघ कसोटी सामन्यासाठी फिरकीला पोषक खेळपट्टी देण्याचा धोका पत्करणार नाही.

आयर्लंड संघानंही नुकतेच कसोटीत पदार्पण केलं. ज्या पाकिस्तान संघानं इंग्लंड संघाला लॉर्डस मैदानावर अगदी सहज पराभूत केलं त्याच पाकिस्तानी संघाला आयर्लंड संघाविरुद्धचा कसोटी सामना जिंकताना चांगलाच घाम फुटला होता. फलंदाजांनी चांगली कामगिरी करायची हिंमत दाखवली तर अफगाणिस्तान संघाचं कसोटीपदार्पण चांगलंच रंगेल.
म्हणूनच म्हटलं ना, क्रिकेटविश्वात "गमन' "आगमन' आणि "पुनरागमना'चा योग एकाच वेळी जमून आलेला बघायला मिळत आहे!

Web Title: sunandan lele write cricket article in saptarang