लोणच्यातून मीठ काढणार कसं? (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

दोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं मुरतंय आदी गोष्टींविषयी विश्‍लेषण. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीच्या पहिल्या शिबिराच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं या विषयावर व्यक्त केलेली मतं आणि त्याला सभ्यतेचे संस्कार कुठून मिळाले त्याविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा.

दोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं मुरतंय आदी गोष्टींविषयी विश्‍लेषण. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीच्या पहिल्या शिबिराच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं या विषयावर व्यक्त केलेली मतं आणि त्याला सभ्यतेचे संस्कार कुठून मिळाले त्याविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा.

स्थळ होतं नवी मुंबई भागातलं डी. वाय. पाटील स्टेडियम. सकाळी नऊ वाजता चिल्ली पिल्ली मुलं क्रिकेटच्या कपड्यांत मैदानात बागडत होती. त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं कारण दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरकडून त्यांना क्रिकेटचे धडे गिरवायला मिळणार होते. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीचा भारतातला पहिला कॅंप डी. वाय. पाटील मैदानावर भरवला जात होता. कॅंपच्या आदल्या दिवशी सचिन तेंडुलकर आणि त्याचा बालमित्र विनोद कांबळी गुरू रमाकांत आचरेकर सरांचे आशीर्वाद घ्यायला त्यांच्या घरी गेले होते. ""या वेळी सर दगड आणि धोंडा एकत्र भेटायला आले आहोत,'' विनोद कांबळीनं खास त्याच्या शैलीत सरांच्या पाया पडताना सांगितलं आणि आचरेकर सरांना हसू फुटलं.

आचरेकर सरांनी नेमके काय संस्कार केले, ज्याचा जीवनात फायदा झाला असं विचारता सचिन तेंडुलकर म्हणाला ः ""कोणत्याही मोठ्या दौऱ्याअगोदर मी सरांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यायचो. तेंडुलकर मिडलसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीचा भारतातला पहिला कॅंप भरवला जात होता- म्हणून मला सरांच्या आशीर्वादाची नितांत गरज होती. सरांनी आम्हाला नुसती बॅटिंग आणि बॉलिंग करायला नाही शिकवली. त्यांनी क्रिकेटची संस्कृती समजावली. आमच्या बालमनावर संस्कार घडवले. सर म्हणायचे, की चांगले क्रिकेटर होण्याबरोबर चांगला माणूस होणं जास्त गरजेचं आहे. क्रिकेट एक असा खेळ आहे, जो तुम्हाला यश-अपयश पचवून प्रगतीचा मार्ग शोधायला भाग पाडतो. दुसऱ्याच्या यशात आनंद घ्यायला शिकवतो. तसंच धावा पळताना किंवा जीवापाड प्रयत्न करून कॅच पकडताना दुसऱ्यांकरता झटायला शिकवतो.
प्रतिस्पर्ध्याला योग्य मान द्यायला क्रिकेट शिकवतं. प्रत्येक सामन्यात फलंदाज नेहमी शून्यावरूनच सुरवात करतो. याचा अर्थ असा, की गतवैभवाला जास्त महत्त्व नसतं. मला वाटतं, या सगळ्या गोष्टी सरांनी सहजतेनं आम्हाला शिकवल्या. याच मूलभूत गोष्टी मला लहान मुला-मुलींना शिकवायच्या आहेत तेंडुलकर मिडलसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीचा कॅम्पमधून,'' सचिननं सांगितलं.

""चुकीच्या वागण्याची काय शिक्षा मिळायची,'' मी सचिनला विचारलं. ""सरांची अजब पद्धत होती. ते कधी रागवायचे नाहीत, की शिकवताना धाक दाखवायचे नाहीत; पण सरांच्या सभ्य वागण्याचा आणि संस्कारांचा आमच्या सगळ्यांच्या मनावर असा काही पगडा होता, की क्रिकेट संस्कृती जपण्याबाबत चूक करायची हिंमत व्हायची नाही. वेळप्रसंगी सरळ फटकावून काढायचे. कोणा खेळाडूनं समोरच्या संघातल्या खेळाडूशी गैरवर्तन केलं किंवा पंचांच्या निर्णयावरून जास्त नाराजी दाखवली, तर एक जोरदार फटका मारायचे. मोठ्या चुकींना तर क्षमा नव्हतीच सरांकडे; पण लहान चुकीनंतर जेव्हा फटका पडायचा तेव्हा कळायचं, की क्रिकेट खेळताना काय लक्षात ठेवायला पाहिजे. दोन प्रसंग सांगतो तुला. एकदा आमच्या वरिष्ठ संघातल्या फलंदाजानं शतक पूर्ण झाल्यावर दिवसअखेरीला खराब फटका मारून विकेट फेकली. त्याच्या शतकाचं कौतुक करण्याअगोदर सरांनी तो फलंदाज आत आल्यावर एक धपाटा घातला आणि म्हणाले होते ः "शतक पूर्ण झाल्यावर विकेट फेकणं स्वार्थीपणाचं लक्षण असतं. संघाचा विचार कोण करणार?' तो प्रसंग कायम लक्षात राहिला. दुसऱ्या प्रसंगात मला फटका पडला होता. वरिष्ठ संघाचा महत्त्वाचा सामना होता म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यायला मी सराव सामना सोडून ब्रेबॉर्न स्टेडियमवर गेलो. सामना संपल्यावर मी विचार केला, की सरांना भेटल्याशिवाय जाणं बरोबर नाही. मी सरांना भेटून वंदन केलं. सरांनी मला विचारलं, की "सराव सामन्यात किती धावा केल्यास?' मी गप्प बसलो. सरांना माहीत होतं, की मी सराव सामना सोडून हा सामना बघायला आलो आहे. त्यावेळी सरांनी मला एकच फटका मारला आणि म्हणाले ः "स्वत:चा सराव सोडून दुसऱ्यांच्या सामन्यात टाळ्या वाजवायला येणं बरोबर नाही. टाळ्या ऐकायच्या असतील, तर सीमारेषा पार करून जे करून दाखवायचं ते मैदानात करून दाखव.' तो प्रसंग आणि शिकवण मी कधीच विसरणार नाही. सरांच्या याच शिकवणीमुळं आम्ही सगळे घडलो. याच गोष्टी मुलांना शिकवून मला चांगले नागरिक बनवायचं आहे. क्रिकेट मोठ्या स्तरावर खेळता आलं तर उत्तमच; पण किमान चांगला माणूस बनणं हे जास्त मोलाचं आहे,'' आठवणीत रमताना सचिननं सांगितलं.

हे सगळं बोलताना मग सहज विषय क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर गेला. ""इतके दिवस ऑस्ट्रेलियन खेळाडू जिंकण्याकरता करत असलेल्या चुकांवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया पांघरूण घालत आलं म्हणून ही वेळ आली. बॉल टॅंम्परिंगची चोरी पकडली गेल्यावर निंदा नालस्ती झाली म्हणून कठोर कारवाई क्रिकेट ऑस्ट्रेलियाला करावी लागली. मात्र, कितीही उपाययोजना केल्या, तरी निर्णायक क्षणी हार-जितीची वेळ आल्यावर ऑसी खेळाडू क्रिकेटची सभ्यता पाळतील का नाही हे बघणं मोलाचं ठरेल,'' सचिन म्हणाला.
थोडक्‍यात सांगायचं, तर लोणच्यातून मीठ काढणं जितकं कठीण तितकंच ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कायमस्वरूपी सभ्यता पाळून क्रिकेट खेळणं कठीण जाणार आहे.

24 मार्च 2018चा दिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेटकरता भयावह ठरला. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका चालू होती. ऑसी गोलंदाज ज्या प्रकारे चेंडू रिव्हर्स स्विंग करत होते, ते बघून ए. बी. डिव्हिलियर्स म्हणाला ः ""30 षटकांच्या आतला चेंडू हे ऑसी गोलंदाज असा स्विंग करत आहेत, की मला वाटतं, की ते कौशल्याबरोबर नक्कीच काहीतरी जोड देत आहेत.''

माजी गोलंदाज फॅनी डिव्हिलीयर्सनं तीच गोष्ट न्याहाळली होती. त्यानं एका कॅमेरामनला बोलावून मैदानावरच्या घडामोडींवर बारीक नजर ठेवायला सांगितली. अंदाज बरोबर ठरला. कॅमरून बॅनक्रॉफ्ट खिशातून चक्क सॅंडपेपरचा तुकडा काढून तो दोन बोटांच्या बेचकीत धरून चेंडू घासताना पकडला गेला. टीव्हीमध्ये ऑसी खेळाडू करत असलेली चोरी दाखवली गेल्यावर प्रशिक्षक डेरेन लिहमननं निरोप पाठवला आणि गडबडून गेलेल्या बॅनक्रॉफ्टनं सॅंडपेपर लपवण्याचा ओशाळवाणा प्रयत्न केला.
टीव्हीवर चोरी पकडली गेली म्हणल्यावर अखेर कर्णधार स्टीव्ह स्मिथनं ही चोरी ठरवून करत असल्याची कबुली दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं काही बोलण्याअगोदर झाल्या प्रसंगावरून नुसतं खेळाडूंना नव्हे, तर ऑस्ट्रेलियन नागरिकच फसवे असल्याची टीका जगभर व्हायला लागल्यानं ऑस्ट्रेलियन पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त करून कठोर कारवाईची मागणी केली. पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केल्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पावलं उचलण्यावाचून पर्याय राहिला नाही. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एका वर्षाची बंदी घातली. झाल्या प्रकारानं ऑस्ट्रेलियन क्रिकेट नखशिखांत हादरलं. चौकशी समिती नेमली गेली. समितीनं अधिकारी आणि खेळाडू सगळ्यांशी बोलून अहवाल सादर केला. ज्यात "कसंही करून जिंकायचं,' हा विचार सर्वनाशाला कारण असल्याचं सांगताना ऑस्ट्रेलियन संघाबद्दल जग उर्मट आणि अनावश्‍यक अधिकार गाजवणारा संघ म्हणून बघितला जातो हे स्पष्ट केलं.
"बॉल टॅंपरिंग' हा प्रकार नुसता ऑस्ट्रेलियापुरता मर्यादित नाही. तो क्रिकेट जगतात सर्वत्र आहे,' असं ऑस्ट्रेलियाचे सध्याचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर म्हणतात. दुसऱ्या बाजूला माजी प्रशिक्षक डेरेन लिहमन स्मिथ- वॉर्नरवरची बंदी उठवायची मागणी करतात. अजूनही ऑस्ट्रेलियन माजी खेळाडूंमध्ये झाल्या प्रकाराचा खरा खेद आहे का नाही, हे समजत नाही. ही समस्या मुळात का उद्‌भवली, याचा विचार केला, तर ऑसी खेळाडूंच्या हातून झालेल्या चुकांवर सतत पांघरूण घालण्यात माजी खेळाडू आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला समाधान लाभलं. ग्रेग चॅपेलनं आपल्याच भावाला सामना जिंकण्याकरता चक्क अंडरआर्म चेंडू टाकायला लावला तेव्हापासून ते आत्तापर्यंत ऑसी खेळाडू चुका करत राहिले, ज्याची खरी शिक्षा त्यांना अभावानं ठोठावली गेली. कसंही करून जिंकायचं याच इर्षेनं ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळत राहिले. तिथंच गणित चुकलं.

तसं बघायला गेलं, तर ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड सख्खे शेजारी देश. किती फरक आहे दोघांच्या चालीरीती आणि विचारांत. न्यूझीलंडचे खेळाडू तडफेनं खेळ खेळतात; पण त्यांच्यात कसंही करून जिंकायची वृत्ती डोकावत नाही, किंवा ते कधी मैदानावरही अनावश्‍यक आक्रमक दिसत नाहीत. ऑसी खेळाडू समोरच्या संघातल्या खेळाडूंना वाट्टेल ते बोलून सतावायचे- ज्याला "स्लेजिंग' म्हटलं जातं. मैदानावर थोडी बोलाचाली व्हायलाच हव्यात. त्यात मजा आहे हे मान्य आहे. ऑसी खेळाडूंनी कित्येक वेळा बोलाचाली करताना लक्ष्मणरेषा ओलांडली, तेव्हा संघातल्या इतर खेळाडूंनी गैरवर्तणुकीनंतर कानउघडणी करण्याऐवजी कुजकं हसून जणू तशा वर्तणुकीला पाठिंबा दिला. उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल.

गेल्या वर्षी झालेल्या ऍशेस मालिकेत इंग्लंडचा मोईन अली फलंदाजी करत असताना डेव्हिड वॉर्नर जाता येताना तोंडावर हात ठेवून मोईन अलीला "ओबामा...ओबामा' म्हणत होता. बाकी ऑसी खेळाडूंना वॉर्नर ओबामा का म्हणतोय हे समजलं नाही. त्यांनी वॉर्नरला "तू ओबामा ओबामा का चिडवत आहेस मोईन अलीला,' असं विचारलं. वॉर्नर इतका माठ, की त्याला म्हणायचं होतं "ओसामा' आणि तो म्हणत होता "ओबामा.' संघातल्या बाकी खेळाडूंनी फरक समजावल्यावर वॉर्नर तशा पद्धतीनं चिडवू लागला- ज्याला बाकी खेळाडूंनी हसून साथ दिली. भिडस्त स्वभावाच्या मोईन अलीनं तक्रार केली होती. ऑसी संघ व्यवस्थापनानं वॉर्नरला खडसावलं नाही. मोईन अलीनं पुस्तकातून हा प्रसंग वॉर्नरचं नाव न घेता मांडला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चूक मान्य न करता परत एकदा चुकीवर पांघरूण घातलं.

सत्य बोलायचं झालं, तर सॅंडपेपरनं बॉल खराब करायची कल्पना वॉर्नरची होती. मोईन अलीला विशिष्ट हाक मारणंसुद्धा अत्यंत हीन दर्जाचं होतं. डेव्हिड वॉर्नरला सॅंडपेपरगेट प्रकरणात शिक्षा झाल्यावर बाकीचे खेळाडू त्याच्या वाह्यात वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करू लागलेत. बंदीनंतर स्टीव्ह स्मिथला संघात परत घ्या; पण वॉर्नर नको, असंही काही ऑसी खेळाडू बोलत आहेत.

दोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेला सुरवात होणार आहे. सध्या दडपणामुळे कितीही सभ्य वागत असले, तरी ऑसी खेळाडू निर्णायक क्षणी तीच सभ्यता पाळतील, याची खात्री सचिन तेंडुलकरला वाटत नाही. सॅंडपेपर गेटवरून मुख्य प्रशिक्षक, कर्णधार, उपकर्णधार यांच्याबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आता अध्यक्ष यांच्या विकेट्‌स गेल्या आहेत. आता तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि त्यांचे खेळाडू काही शहाणपण शिकणार का हाच खरा प्रश्न आहे. म्हणूनच म्हणतो लोणच्यातून मीठ काढणं कठीण आहे.

Web Title: sunandan lele write cricket article in saptarang