ऑल इज नॉट वेल (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे!

भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगरच्या विचारांचं मंथन परत एकदा झालं."कॅरेक्‍टर ओव्हर कव्हर ड्राईव्ह' हे त्याच्या विचारांचं मुख्य सार आहे. म्हणजेच क्रिकेटरच्या खेळाच्या कौशल्यापेक्षा जस्टीन हा चांगल्या सज्जन व्यक्तिमत्त्वाला जास्त प्राधान्य देत होते. कदाचित हेच कारण असेल की क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बॉल कुरतडण्याच्या लज्जास्पद "सॅंड गेट' प्रकरणानंतर डेरेन लिहमन पायउतार झाल्यावर जस्टिन यांना प्रशिक्षक म्हणून नेमलं.

स्टीव्ह वॉच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघातला जस्टिन हा भरवशाचा सलामीचा फलंदाज होता. जस्टिन-मॅथ्यू हेडन जोडी समोरच्या संघाला धडकी भरवणारी असे. निवृत्तीनंतर जस्टीन यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. बाकी, ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये स्लेजिंग पासून ते उर्मटपणापर्यंतच्या सर्व गोष्टी राजरोसपणे चालू असताना जस्टीन यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघात वेगळे विचार रुजवले. "गोष्टी सरळ साध्या ठेवा... व्यसनाआधी आपली जबाबदारी ओळखा...आणि सामान्य ज्ञानाचा वापर करा या तीन गोष्टींवर भर देताना जस्टिन यांनी संघातल्या खेळाडूंना शिस्त लावायचा ध्यास घेतला.

सॅंड गेट प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन संघाची झालेली नाचक्की मोठी होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये "काहीही' करून जिंकायचं ही वृत्ती बोकाळली होती. दहा वर्ष खेळाडूंचं वागणे दिवसेंदिवस उर्मट होत गेले. समोरच्या संघाला तिळमात्र आदर न देणं ऑस्ट्रेलियन खेळाडू भूषणावह मानत होते. जिंकायची धुंदी इतकी मोठी असायची की ते साध्य करायला वर्तणूक खराब झाली तरी त्याला "आक्रमक क्रिकेट'चं नाव देताना त्यात कुणाला काही चुकीचं वाटत नव्हतं. टप्प्याटप्प्यानं परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सॅंड गेट प्रकरण घडलं आणि जगानं क्रिकेट संघाला नव्हे तर संपूर्ण ऑस्ट्रेलियायावर "फसवे'पणाचा शिक्का मारला तेव्हा प्रथम ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी कठोर पवित्रा घेतला. मग "क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ला खडबडून जाग आली. जनक्षोभाचा दणका असा होता की प्रमुख खेळाडूंपासून ते प्रशिक्षकांपर्यंतच नव्हे तर संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना पदभार सोडावा लागला. या पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू होत असलेल्या मालिकेबद्दल मोठं कुतूहल स्थानिक लोकांना अजिबात वाटत नाहीये. ऑस्ट्रेलियन संघ कागदावर कमजोर असल्याची भावना ऑसी क्रिकेट रसिकांमध्ये पहिल्यांदा जाणवत आहे. सन 2001 पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सर्व मालिकांचं वार्तांकन मी केलं आहे. प्रत्येक वेळी मालिका सुरू होण्याअगोदर उत्सुकता ताणली गेलेली असायची. अगदी खरं सांगायचं तर आत्ता मालिका सुरू होण्याअगोदर तसं काही जाणवत नाहीए. म्हणून म्हणतो क्रिकेटजगतात "ऑल इज नॉट वेल'!

वेस्ट इंडीजची दैना
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येण्याअगोदर भारतीय संघ मायदेशी वेस्ट इंडीजविरुद्ध क्रिकेट खेळून आला. दोन कसोटी सामन्यांत मोठे पराभव स्वीकारल्यावर वेस्ट इंडीज संघ मर्यादित षटकांच्या सामन्यात लढत देईल, असा विश्वास वाटत होता. एक सामना बरोबरीत सोडवून आणि एक सामना जिंकून कॅरेबियन संघानं आशा वाढवल्या होत्या. मात्र, हा "भ्रमाचा भोपळा' पुढच्या काही सामन्यांत फुटला.
वेस्ट इंडीज क्रिकेटची झळाळी कधीच अस्ताला गेली आहे. एकेकाळी क्रिकेटजगतावर राज्य करणाऱ्या विंडीज क्रिकेटला अगदी घरघर लागली आहे. विंडीज बोर्डातला अनागोंदी कारभार गेली कित्येक वर्षं सुधारताना दिसलेला नाही. ब्रायन लारा खेळत असेपर्यंत विंडीज संघ जरा तरी दमदार क्रिकेट खेळत होता. लारानं निवृत्ती घेतल्यावर उरलीसुरली जानही निघून गेल्याची भावना आहे. मधूनच गतवैभवाची आठवण करून देणारा एखादा विजय विंडीज संघ मिळवतो. अपेक्षांची कारंजी उडू लागतात. लगेच पराभव पत्करून तोच विंडीज संघ मूळ पदावर येतो तेव्हा खूप वाईट वाटतं.

माझं कॅरेबियन बेटांवर जरा जास्तच प्रेम आहे, हे पहिल्यांदाच मान्य करतो आणि सांगतो की 21 कॅरेबियन बेटांवरचे निवडक क्रिकेटपटू एकत्र येऊन विंडीज संघ घडत असतो. बाकी संघांच्या तुलनेत विंडीज संघ खूप वेगळा, आकर्षक रंग क्रिकेटजगताला देतो. व्हिव्हियन रिचर्डस किंवा ब्रायन लाराची फलंदाजी आठवा, त्यांच्या खेळण्याची, बोलण्याची मैदानात वावरण्याची एक खास लकब असते. ही लकब आकर्षून घेणारी असते. विंडीज संघ भक्कम असल्याशिवाय क्रिकेटविश्व सुदृढ, बळकट वाटत नाही.

झिंम्बाब्वे संघाची अवस्था विंडीजपेक्षा वेगळी नाहीए. एकेकाळी चांगला दमदार असलेला झिंम्बाब्वेचा संघ बऱ्याच वेळा खराब खेळ करताना दिसतो आहे. सन 2003 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेलं केनियन क्रिकेट सध्या पार रसातळाला गेलं आहे. या सर्व घडामोडी गेल्या दहा वर्षांतल्या आहेत. वर नमूद केलेल्या तीन संघांच्या क्रिकेटला उतरती कळा लागलेली असून आयसीसी त्याकरता काहीही ठोस उपाय योजना करू शकलेला नाही म्हणून परत सांगतो "ऑल इज नॉट वेल'.

लाचखोरीची कीड
क्रिकेटमधून लाचखोरी कायमची निघून जावी म्हणून आयसीसी कठोर योजना आखत असली तरी वारंवार लाचखोरीच्या जुन्या किंवा नवीन प्रकरणांना वाचा फुटत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेचे खेळाडू मधूनच या जाळ्यात ओढले गेल्याच्या बातम्या वाचायला मिळताना तेव्हा मन खिन्न होतं. नियम आणि निर्बंध कडक असूनही सट्टेबाज वेगवेगळ्या प्रकारे खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी होत आले आहेत.

सनथ जयसूर्यासारख्या महान माजी खेळाडूचं नाव आयसीसीनं सामनानिश्‍चिती आरोपांकरता घेतलं, तेव्हा धक्का बसला होता. आरोपांचं खंडन करण्याकरता जयसूर्या आयसीसीच्या शोधपथकाला भेटलाच नाही. जयसूर्यानं शोधप्रक्रियेत बाधा आणली आणि सहकार्य केलं नाही म्हणून आयसीसी चांगलंच वैतागलं. तिकडं पाकिस्तानचा गुणवान, सलामीचा फलंदाज नासीर जमशेद लाचखोरीच्या आरोपात दोषी ठरला. 10 वर्षांची बंदी नासीर जमशेदवर घालण्यात आली, याचाच अर्थ त्याच्यावरचा दोष सिद्ध झाला.

भारतीय उपखंडात खेळातल्या लाचखोरीचा गुन्हा "क्रिमिनल ऑफेन्स' म्हणून नोंदवला जावा म्हणून कायदा करावा, यासाठी आयसीसी प्रयत्नात आहे. धोक्‍याची घंटा वाजायची थांबत नाहीए म्हणून सांगावंसं वाटतं की "ऑल इज नॉट वेल.'

स्थानिक क्रिकेटची रया जात आहे का?
मुख्य भारतीय क्रिकेट संघाला उत्तम खेळाडूंचा पुरवठा सातत्यानं सुरू राहावा यासाठी बीसीसीआय प्रयत्नात असते. गुणवान खेळाडूंना तयार करण्यासाठी बीसीसीआय "अ' संघाचे दौरे आखत असते. मुख्य भारतीय संघाचे दरवाजे ठोठावण्याकरता" अ' संघाचा राजमार्ग खेळाडूंकरता असतो. ही प्रक्रिया खरंच वाखाणण्याजोगी आहे. हे मनापासून मान्य केलं तरी स्थानिक क्रिकेटचा मोसम म्हणजेच रणजी स्पर्धा सुरू असताना "अ' संघाचे दौरे ठेवले गेल्यानं रणजी स्पर्धेची मजा कमी झाली असल्याची चर्चा खेळाडू करत आहेत.

सन 2018-19 चा रणजी मोसम जोमानं सुरू झाला. बरेच खेळाडू पहिला रणजी सामना आपापल्या रणजी संघांकडून खेळले. तुल्यबळ संघात लढत झाल्यानं क्रिकेटला धार आली. हा आनंद अल्पजीवी ठरला. मुख्य भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीला लागला आणि दुसऱ्या बाजूला "अ' संघात निवड झालेले खेळाडू न्यूझीलंड दौऱ्याकरता बॅगा भरू लागले. परिणाम असा झाला, की भारतातले तसं बघायला गेले तर 30 सर्वोत्तम खेळाडू परदेशात गेल्यानं रणजी सामन्यांमधली धार किंवा स्पर्धा बोथट झाली.

संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर यांच्यासारखे खेळाडू रणजी संघात खेळत असताना सचिन तेंडुलकर मुंबई संघात दाखल झाला होता. अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली नवख्या खेळाडूंना खेळायला मिळाल्यावर होणारे संस्कार कायमस्वरूपी परिणाम करून गेले. गेल्या आठ-दहा वर्षांत ही परंपरा खंडित झाली आहे. अगोदरच भारतीय क्रिकेट संघ संपूर्ण वर्षभर इतका पाठोपाठ सामने खेळतो की विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी स्थानिक क्रिकेट खेळायला उपलब्ध नसतात. जेव्हा थोडा वेळ मिळतो तेव्हा हे प्रमुख खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या थकव्यातून बाहेर येण्यासाठी विश्रांती घेत असतात. याचा गंभीर परिणाम स्थानिक क्रिकेटवरती होतो, हे बीसीसीआय जाणत नाही का? कोहली किंवा रोहित शर्मा आणि धोनी त्यांच्या राज्य संघातल्या तरुण खेळाडूंसोबत खेळले नाहीत तर थेट मैदानावरच्या क्रिकेटचे संस्कार भावी खेळाडूंवर करणार तरी कोण?

यात दुसरा मुद्दा असाही आहे, की जर मुख्य 30 खेळाडूंविना रणजी स्पर्धेचे सामने होत असले तर त्यात केलेल्या धावांना किंवा काढलेल्या विकेट्‌सना मान्यता कोण देणार? कठोर मुकाबल्याविना होणाऱ्या सामन्यातल्या कामगिरीची निवडसमिती गंभीर दखल घेणार का?

परत नमूद करतो, की क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com