उंच उडी, लांब उडी (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच रणजी संघात केलेल्या सुमार कामगिरीमुळं मन विषण्णही झालं.

गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच रणजी संघात केलेल्या सुमार कामगिरीमुळं मन विषण्णही झालं.

गेल्या आठवड्यातल्या क्रिकेटमधल्या घटनांनी मला सुख-दु:खाचे हेलकावे बसले. जेसन होल्डरच्या वेस्ट इंडीज संघानं पहिल्या दोन कसोटीत इंग्लंडला पराभूत करून कमाल केली. दुसरीकडं विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. तिसरीकडं मुंबई आणि महाराष्ट्र रणजी संघानं इतकी सुमार कामगिरी केली, की मन अगदी विषण्ण झालं.

सन 1975 ते जवळजवळ 1987 चा एक जमाना होता, की वेस्ट इंडीजचा दौरा म्हटलं, की जगातल्या तमाम पाहुण्या संघांच्या खेळाडूंच्या मनात धडकी भरायची. दौऱ्यावर जाण्याअगोदर स्वप्नात वेस्ट इंडीजचे वेगवान गोलंदाज यायचे आणि झोप उडायची. क्‍लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली विंडीज संघानं क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी सन 1975 आणि 1979 चे विश्‍वकरंडक नुसते झोकात जिंकले नाहीत, तर कसोटी क्रिकेटमध्ये अशक्‍य सातत्यपूर्ण कामगिरी करून जणू काही दहशत माजवली. सन 1987 नंतर वेस्ट इंडीज क्रिकेटला उतरती कळा लागली. एक एक महान खेळाडू टप्प्याटप्प्यानं निवृत्त झाले आणि विंडीज क्रिकेटची रया गेली. कामगिरीतली घसरण इतकी भयानक होती, की गेल्या काही वर्षांत "कोणीही यावे आणि टिचकी मारूनी जावे' अशी अवस्था विंडीज क्रिकेटची झाली. मधल्या काळात दोन टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धांमधलं विजेतेपद हीच जखमेवरची मलमपट्टी ठरली.

इंग्लंडच्या खेळाडूंना तर सोडाच, सर्वसामान्य जनतेलाही कॅरेबियन दौऱ्यावर जायची मोठी हौस असते. जास्त लाटा न उसळणारे समुद्रकिनारे आणि त्याच्या सोबतीला क्रिकेट हे समीकरण इंग्लिश माणसाला मनापासून आवडतं. इंग्लंड संघ ज्या ज्या वेळी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जातो, त्या प्रत्येक वेळी पाठीराख्यांची क्रिकेट शौकिनांची मोठी फौज कॅरेबियन बेटांवर दाखल होते. गेल्या काही दौऱ्यांत इंग्लंडच्या संघाला कसोटी मालिका जिंकताना जास्त घाम गाळावा लागला नव्हता. तसं बघायला गेलं, तर क्रिकेटबरोबर कॅरेबियन सुटीचा आनंद इतक्‍या सहजी इंग्लंड संघ वेस्ट इंडीज संघाला पराभूत करत होता. 2019च्या दौऱ्यात चित्र बदललं. जेसन होल्डरनं कर्णधाराला साजेसा अष्टपैलू खेळ करून पहिल्या दोन कसोटी सामन्यात विंडीज संघाला विजय मिळवून दिले. मालिका हातातून गेल्यावर इंग्लंड संघ खडबडून जागा झाला आणि तिसऱ्या कसोटीत त्यांनी मोठा विजय संपादला. तरीही वेस्ट इंडीज संघानं कसोटी मालिका जिंकल्याचा आनंद स्थानिक प्रेक्षकांनी बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर गर्दी करून साजरा केला.

मला वेस्ट इंडीजबद्दल जास्त प्रेम आहे. म्हणून कसोटी मालिका जिंकल्याचा आनंद तर झालाच; पण क्रिकेटमधला रंग परतला अशी भावना मनात आली. वेस्ट इंडीज संघानं कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी मला उंच उडी वाटते.

विदर्भ रणजी संघाचं सातत्य
विदर्भ संघानं सन 2017-18च्या क्रिकेट मोसमात रणजी करंडक जिंकला तेव्हा भुवया उंचावल्या गेल्या होत्या. माजी वेगवान गोलंदाज प्रशांत वैद्यनं चंद्रकांत पंडितला विदर्भ रणजी संघाला मार्गदर्शन करायला बोलावण्याचा घाट घातला. पंडितची प्रशिक्षणाची पद्धत जरा कठोर असते. त्याचा विचार करून चंद्रकांत पंडितच्या हाती प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवताना मोकळा हात दिला गेला. असं समजलं, की पंडितनं तीस प्रमुख खेळाडूंना बोलावून सरळ प्रश्‍न विचारला ः ""रणजी करंडक जिंकण्याची जिद्द कोणात आहे?... त्याकरता अपार कष्ट करण्याची आणि फक्त संघाचा विचार मनात ठेवून खेळायची तयारी कोणाची आहे?'' विदर्भनं वसिम जाफर आणि गणेश सतीशला व्यावसायिक खेळाडू म्हणून पाचारण केलं. संघातल्या तरुण फलंदाजांना प्रदीर्घ खेळी करायचं तंत्र वसिम-गणेशनं बोलून नव्हे, तर प्रत्यक्ष खेळून दाखवलं.
चंद्रकांत पंडितनं जबाबदारी स्वीकारण्याअगोदर विदर्भातल्या क्रिकेटपटूंचा दृष्टिकोन "करू...बघू'चा होता. मनातली मरगळ झटकून टाकताना चंद्रकांत पंडितनं रोखठोक उपाय योजले. मेहनत करायला चालढकल करणाऱ्या काही नाठाळ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवताना त्यानं दयामाया दाखवली नाही. "विचार बदला, आयुष्य बदलेल,' असं म्हटलं जातं. त्याचा उपयोग पंडितनं विदर्भ क्रिकेटपटूंची मानसिकता बदलण्याकरता केला. अचाट मेहनत करून संघभावनेनं खेळणाऱ्या खेळाडूंना संघात मान मिळू लागला.

रजनीश गुरबानी या चेंडू स्विंग करणाऱ्या मध्यमगतीच्या गोलंदाजानं 2017-18च्या मोसमात धमाल कामगिरी केली. सन 2018-19च्या मोसमात आदित्य सरवटे, अक्षय वाडकर आणि अक्षय कर्नेवार या तिघांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली. नुकत्याच झालेल्या रणजी अंतिम सामन्यात सगळ्यांचं लक्ष वसिम जाफर, फैज फजल, गणेश सतीश आणि उमेश यादववर केंद्रित झाले असताना आदित्य सरवटेनं अष्टपैलू कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला ज्यात अक्षय वाखारेनं त्याला मोलाची साथ दिली.

विदर्भ संघानं लागोपाठ दोन वेळा रणजी करंडक जिंकून भारतातल्या क्रिकेट जगताला विचार करायला भाग पाडलं. कुशल संयोजकांनी कठोर प्रशिक्षकाला ढवळाढवळ न करता काम करायला मोकळा हात दिला तर काय परिणाम होतो याचं विदर्भ रणजी संघ उत्तम उदाहरण बनला. रणजी करंडकाच्या विजयाचं श्रेय संपूर्ण विदर्भ संघाला जातं; तसंच क्रिकेट सुधारणा समितीचं काम करणाऱ्या प्रशांत वैद्य आणि त्याच्या सहकाऱ्यांना जातं आणि अर्थातच खेळाडूंच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवणाऱ्या चंद्रकांत पंडितला जातं.
म्हणूनच विदर्भ रणजी संघानं सलग दोन वर्षं रणजी करंडकावर नाव कोरण्याची कामगिरी मला लांब उडी वाटते.

मातीत मारलेला सूर
भूगोल लक्षात घेतला, तर महाराष्ट्र राज्यात मुंबई महाराष्ट्र आणि विदर्भ असे तीन रणजी संघ आहेत. अर्थात मुंबई आणि महाराष्ट्र पश्‍चिम विभागात तर विदर्भ मध्य विभागात गणले जातात. दोन वर्षं रणजी करंडक जिंकला म्हणून नुसते विदर्भ रणजी संघाचं कौतुक करून चालणार नाही तर त्यांच्या वयोगटातल्या संघांच्या कामगिरीतही सातत्य दिसू लागलं आहे. त्याचबरोबर विदर्भ क्रिकेट संघटना संयोजनात आणि पारदर्शी कारभारात भारतात वाखाणली जाते.

बरोबर त्याच्या उलट परिस्थिती मुंबई आणि महाराष्ट्र संघटनेची आणि त्यांच्या क्रिकेटची आहे. मुंबई रणजी संघाकरता सन 2018-19चा मोसम निराशाजनक ठरला. एकेकाळी रणजी करंडकावर जणू मालकी सांगणाऱ्या मुंबई रणजी संघाला नुकत्याच संपलेल्या मोसमात कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि विदर्भ संघांसमोर पराभव पत्करावा लागला. बाद फेरी गाठण्यात मुंबई संघाला अपयश आलं, यातच खराब कामगिरीचं सगळं वर्णन आलं.

महाराष्ट्र रणजी संघाची कामगिरी त्याहीपेक्षा सुमार झाली. विदर्भ संघाला पराभूत करून महाराष्ट्र संघानं चांगली सुरवात केली होती. चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण त्यानंतर बडोदा आणि कर्नाटक संघासमोरचे सामने गमावल्यानं वर जाऊ बघणारा पतंग काटेरी झाडात अडकला. महाराष्ट्र संघानं मुंबई संघाला पराभूत करून गेलेला तोल सावरला असं वाटलं. कसलं काय आणि कसलं काय! त्यानंतर सौराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि रेल्वे यांच्यासमोरचे सामने गमावून महाराष्ट्र रणजी संघ पायरी उतरून खालच्या गटात ढकलला गेला आहे- ज्याला "रिलीगेशन' म्हणतात.

महाराष्ट्र रणजी संघाच्या सुमार कामगिरीचा मुख्य दोष खराब फलंदाजीला द्यावा लागेल. सरासरी काढली, तर महाराष्ट्र रणजी संघानं झाल्या मोसमात सरासरी 70 षटकंही फलंदाजी केलेली नाही. चार दिवसांच्या सामन्याला साजेशी प्रदीर्घ खेळी करायची मानसिकता लयाला गेली असल्याचं दु:खद चित्र समोर आलं आहे. सुरेंद्र भावेसारखा निष्णात फलंदाज प्रशिक्षक म्हणून काम करत असताना हे विदारक चित्र दिसत आहे, याचं जास्त वाईट वाटतं. याचाच अर्थ निवड समिती, खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात ताळमेळ नाही असंच म्हणावं लागेल.

मुंबई क्रिकेट संघटनेवर कोर्टानं ऍडमिनीस्ट्रेटर म्हणजे प्रशासक नेमले आहेत आणि लवकरच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवरही नेमले जाण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यात जमा आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे धुरिण सदस्य खास सभा बोलावून सगळा राग निवड समितीवर काढतील. प्रत्यक्षात मुंबई क्रिकेटची झालेली घसरण अचानक झालेली नाही. कामगिरीत सातत्याचा अभाव ही समस्या किंवा रोगाची लक्षणं गेली काही वर्षं दिसत असून मुंबई क्रिकेट संघटनेनं ठोस पावलं उचलली नाहीत, त्याचे हे गंभीर परिणाम आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची अवस्था अजून बिकट आहे. रणजी संघाची कामगिरी सुधारायची असेल, तर स्थानिक पातळीवर दोन किंवा तीन दिवसांचे सामने भरवण्याची नितांत गरज आहे. खेळाडूंना फक्त टी-20क्रिकेटची लागलेली चटक दूर करायची झाली, तर तुल्यबळ संघात दोन-तीन दिवसांचे सामने भरवणं हाच एकमेव उपाय आहे. दुर्दैवानं असे सामने भरवायची मानसिकता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत दिसत नाही. दुसरी भयावह गोष्ट अशी, की विचार न करता काढलेली कर्जं आणि त्यावर कडेलोट म्हणजे लोढा समितीनं सुचवलेले बदल सातत्यानं नाकारल्यानं महाराष्ट्र क्रिकेट संघटना अत्यंत भयानक आर्थिक संकटात आहे. छोटी स्पर्धा भरवायलाही महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडं पैसे नाहीत, तर चांगल्या संघात दोन-तीन दिवसांचे सामने खेळवायला आर्थिक पाठबळ येणार कुठून?
एके काळी चंद्रकांत पंडित मुंबई रणजी संघाचा प्रशिक्षक होता. संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी पंडितला दूर करताना राजकारण खेळलं. नंतर चंद्रकांत पंडित महाराष्ट्र रणजी संघाला मार्गदर्शन करू लागला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्याच्या कामात ढवळाढवळ करून मग त्याला काढून टाकलं. तीच संधी साधून प्रशांत वैद्यनं चंद्रकांत पंडितला पटवून विदर्भ रणजी संघाचं प्रशिक्षण सोपवलं. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंडितला काम करायला संघ घडवायला मोकळा हात दिला आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला स्पष्ट दिसत आहेत.

गंमत किंवा दैवदुर्विलास काय आहे बघा. चंद्रकांत पंडित मूळचा मुंबईचा खेळाडू जिथं त्याला काढून टाकलं गेलं. म्हणजे आईनं ढकललं आणि तो महाराष्ट्रात दाखल झाला म्हणजे तो मावशीकडं गेला. मावशीनंही पाठीत धपाटा घालून काढून टाकल्यावर पंडित लांबच्या आत्याकडे म्हणजे विदर्भात गेला- जिथं त्याला मनासारखं काम करता आलं.

मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी चुका कबूल करणार नाहीत आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आपण कधी चुका करतच नाहीत असं मनोमन मानतात. त्यामुळं क्रिकेटचं झालेलं अपरिमित नुकसान कोण भरून काढणार याचं शल्य मनात घर करून आहे.

Web Title: sunandan lele write cricket article in saptarang