कोटीच्या कोटी उड्डाणे...! (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 10 सप्टेंबर 2017

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढच्या पाच वर्षांच्या दूरचित्रवाणी आणि डिजिटल प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडिया कंपनीनं तब्बल १६ हजार ३४७ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. यामुळं आयपीएलचे संघमालक, खेळाडू यांना फायदा होणार आहेच; पण एकूणच या क्षेत्राशी संबंधित सगळंच अर्थकारण बदलून जाणार आहे. या सगळ्या चक्रावून टाकणाऱ्या अर्थकारणावर एक नजर.

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढच्या पाच वर्षांच्या दूरचित्रवाणी आणि डिजिटल प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडिया कंपनीनं तब्बल १६ हजार ३४७ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. यामुळं आयपीएलचे संघमालक, खेळाडू यांना फायदा होणार आहेच; पण एकूणच या क्षेत्राशी संबंधित सगळंच अर्थकारण बदलून जाणार आहे. या सगळ्या चक्रावून टाकणाऱ्या अर्थकारणावर एक नजर.

हा आकडा वाचा. १६ हजार ३४७ कोटी ५० लाख रुपये. बापरे! हा आकडा लिहितानाही मला थकायला झालं. अहो, पण हा आकडा कोणत्याही मोठ्या कंपनीच्या ताळेबंदाचा किंवा कोणत्या सरकारी अर्थसंकल्पाचा नसून खेळाच्या प्रक्षेपणाच्या हक्कांचा आहे. होय! इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढच्या पाच वर्षांच्या प्रक्षेपणाचे सर्व प्रकारचे हक्क विकत घ्यायला स्टार इंडिया कंपनीनं ही बोली लावली आहे. इतकंच नाही, तर चांगल्या प्रकारे नियोजन केल्यास हा खर्च सोसून या कंपनीला नफाही कमावता येईल, अशी सकारात्मक भाषा जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ लोक बोलत आहेत. हे ऐकल्यावर भारतात मंदीचं वातावरण आहे, असं कोण म्हणेल सांगा बरं!

आकडे कसे बदलले?
गंमत म्हणून गेल्या २५ वर्षांत चित्र कसं बदललं हे थोडक्‍यात सांगतो. बरोबर २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांचं दूरचित्रवाणीवरून थेट प्रक्षेपण करायला दूरदर्शननं बीसीसीआयकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. एक वर्षाचा कालावधीही मध्ये गेला नसेल आणि टीडब्ल्यूआय या आंतरराष्ट्रीय कंपनीनं भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंडबरोबरचे सामने दाखवायचे हक्क सहा लाख डॉलर देऊन विकत घेतले. टीडब्ल्यूआय कंपनीचा होरा बरोबर ठरला. त्यांनी हमी रक्कम देऊनही मजबूत नफा कमावला. दूरदर्शननं त्यातून बोध घेतला आणि २०००मध्ये दूरदर्शननं पुढच्या चार वर्षांचे प्रक्षेपणाचे हक्क २४० कोटी रुपये बीसीसीआयला देऊन विकत घेतले.

दूरदर्शनला मागं टाकत २००६मध्ये निंबस कंपनीनं पन्नास कोटी डॉलरना पुढच्या चार वर्षांचे हक्क घेतले. २००८मध्ये आयपीएल चालू होत असताना ललित मोदी यांनी स्टारला हक्क विकत घेण्याची विनवणी केली. स्टार इंडियाला तेव्हा इतकी मोठी रक्कम गुंतवण्यात धोका वाटला. सोनी चॅनेलनं तोच धोका पत्करला आणि ९१.८ कोटी डॉलर मोजून आयपीएलचे पुढच्या दहा वर्षांचे हक्कं विकत घेतले. आयपीएलचे बिगूल इतक्‍या जोरात वाजले, की सोनीनं पत्करलेला धोका त्यांच्याकरता मोठी संधी देऊन गेला. दहा वर्ष सोनी कंपनीनं जाहिराती जमा करत मोठा नफा कमावला आणि आता सोनीनं दहा वर्षांच्या प्रक्षेपण हक्कांकरता दिलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम स्टार इंडियानं देऊ करून निम्म्या म्हणजे पाच वर्षांच्या कालावधीकरता प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले आहेत. अगदी थोडक्‍यात सांगायचं, तर स्टार इंडिया कंपनी आयपीएलच्या प्रत्येक सामन्याकरता ५४ कोटी ४९ लाख रुपये बीसीसीआय तिजोरीत जमा करणार आहे.

फायदा सगळ्यांना  
स्टार इंडिया कंपनीनं देऊ केलेल्या मोठ्या रकमेचा फायदा फक्त बीसीसीआयलाच नव्हे, तर सगळ्यांना होणार आहे. आयपीएलच्या नियमानुसार, प्रक्षेपण हक्कांकरता मिळणाऱ्या रकमेतला चाळीस टक्के वाटा संघचालकांना देण्यात येतो. म्हणजेच प्रत्येक संघचालकांना पुढच्या पाच वर्षांत बसल्या जागी अंदाजे आठशे कोटी रुपये मिळणार आहेत. परिणामी प्रत्येक आयपीएल संघाचं बाजारमूल्य अव्वाच्या सव्वा वाढणार आहे. प्रत्येक आयपीएल संघ अंदाजे एक हजार कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन मिरवणार आहे. कोणाला आयपीएल संघ नव्यानं विकत घ्यायचा असेल किंवा एखाद्या संघातल्या मालकी हक्काचा काही हिस्सा विकत घ्यायचा असेल, तर प्रचंड मोठी रक्कम गुंतवायची तयारी ठेवायला लागेल.

बीसीसीआयला आणि संघचालकांना मोठी रक्कम मिळणार, मग त्यातला चांगला वाटा खेळाडूंना न मिळाला तर नवल मानावं लागेल. येत्या आयपीएलचा मोठा स्टार विराट कोहली असणार, याबाबत कोणाच्या मनात दुमत नसेल. मग बाकी आकडे मोठे असताना विराट कोहलीला आयपीएलच्या एका मोसमाचे फक्त १५ कोटी रुपये मिळाले तर कसं चालेल? येत्या आयपीएल मोसमात अमेरिकेतल्या बास्केटबॉल किंवा फुटबॉल खेळाडूंना किंवा ब्रिटनमधल्या फुटबॉल खेळाडूंना मिळतात तसं भलंमोठं मानधन आयपीएलच्या मोठ्या स्टार खेळाडूंना मिळेल, अशी खात्री वाटते.
सर्वांत शेवटचा परंतु मोठा परिणाम करणारा फायदा हा भारतातल्या तमाम राज्य क्रिकेट संघटनांना होणार आहे. कारण बीसीसीआयला होणारा फायदा साठवून ठेवता येत नाही, त्यामुळं तो राज्य संघटनांना वाटून देण्यात येतो. आताच्या घडीला बीसीसीआयकडून प्रत्येक राज्य संघटनेला दरवर्षी अंदाजे ३५ ते ४० कोटी रुपयांचा निधी मिळतो. त्यात घसघशीत वाढ होण्याची दाट शक्‍यता आहे.

परताव्याचे मार्ग काय?
एक दूरचित्रवाणी वाहिनी पाच वर्षांच्या कालावधीसाठी दूरचित्रवाणीवरच्या प्रक्षेपणाचे हक्क १६ हजार कोटी रुपयांना विकत घेऊच कशी शकते, ही रास्त शंका आपल्या सगळ्यांच्या मनात येत असणार. इतकी मोठी गुंतवणूक करून त्याची रिकव्हरी किंवा परतावा कसा मिळणार हा विचार मनात येणं स्वाभाविक आहे.

स्टार इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय शंकर यांनी अत्यंत विचारपूर्वक या गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. केलेल्या गुंतवणुकीची भरपाई करायचे मार्ग असे आहेत ः २००८मध्ये आयपीएल चालू झाली तेव्हा जाहिरातदारांनी सोनी चॅनेलवर जवळपास ३९० कोटी रुपयांच्या जाहिराती विकत घेतल्या. २०१७च्या आयपीएल स्पर्धेतून सोनी चॅनलला तब्बल तेराशे कोटी रुपयांच्या जाहिराती मिळाल्या, हे लक्षात घ्या. म्हणजे जाहिरातदारांनी आयपीएल स्पर्धेवर टाकलेल्या विश्‍वासाचं हे प्रतीक मानता येईल. उदय शंकर यांच्या अंदाजानुसार, हा आकडा चाळीस टक्‍क्‍यांनी वाढेल. म्हणजे दर आयपीएल मोसमात स्टार इंडिया कंपनीला अठराशे ते दोन हजार कोटी रुपयांच्या जाहिरातीचं उत्पन्न मिळेल. फक्त एवढंच नव्हे, तर आयपीएलच्या परदेशांतल्या लोकप्रियतेचा फायदा घेत ते हक्क ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि खासकरून अमेरिकेतल्या स्थानिक टीव्ही चॅनेलना विकून स्टार इंडिया मोठी रक्कम जमा करेल.
मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग साइट्‌सवरून आयपीएल सामने किंवा त्यांची बित्तंबातमी मोठ्या चवीनं बघितली जाते. दरवर्षी त्याचे ग्राहक वेगानं वाढत आहेत. स्टार इंडियाला सोशल नेटवर्किंग साईट्‌स आणि मोबाईलच्या हक्कांचा सर्वात मोठा फायदा होण्याची शक्‍यता आहे. फेसबुकनं नुसते डिजिटल हक्क विकत घ्यायला पाच वर्षांकरता तीनशे कोटी रुपयांची बोली लावली होती, यावरून त्या हक्कांच्या क्षमतेचा अंदाज तुम्हाला लावता येईल. त्यामुळंच जाणकार डिजिटल हक्कांचा घोडा सर्वांत जोरात धावेल, असं बोलत आहेत.

फायदा आणि तोटा
एकीकडं डोंगर उभा राहतो, तेव्हा दुसरीकडं आपोआप खड्‌डा निर्माण होतो, असं बोललं जातं. भारतीय जाहिरात बाजारपेठेला नवं वळण या सर्व घडामोडींमधून लागणार आहे. जाहिरातदार आपल्या वार्षिक अर्थसंकल्पातला किती मोठा हिस्सा एप्रिल-मे महिन्यातल्या आयपीएल मोसमाकरता राखून ठेवतात, हे बघणं अभ्यासाचा विषय ठरणार आहे. बारापैकी दोन महिन्यांकरता जाहिरातदार किती गुंतवणूक करतात यालाही काही मर्यादा येणार. तुम्हाला वाचून आश्‍चर्य वाटेल; पण आयपीएल सामन्यांदरम्यान दहा सेकंदाच्या जाहिरातीकरता कंपन्यांना पाच ते साडेसहा लाख रुपये मोजावे लागतात. नव्यानं विकत घेतलेल्या हक्कांच्या मोठ्या आकड्यांमुळं हेच दर आठ ते दहा लाख रुपयापर्यंत पोचतील, असा अंदाज आहे. कंपन्यांना हे दर परवडतील का, हा खरा प्रश्‍न आहे. नोटबंदीनंतर भारतीय बाजारपेठेला बसलेला फटका लक्षात घेता कंपन्या किती उत्साहानं आयपीएल स्पर्धेदरम्यान नव्यानं वाढलेल्या दरांनी जाहिराती विकत घेतील, ही शंका काही माध्यमतज्ज्ञ बोलत आहेत. तसंच एकच वाहिनी इतक्‍या मोठ्या प्रमाणात जाहिरातीच्या रकमेचा हिस्सा आपल्याकडं ओढू लागली, तर बाकीच्या वाहिन्यांच्या अर्थकारणावर त्याचा काय परिणाम होतो, हेसुद्धा बघावं लागणार आहे.

‘स्टार इंडियाकडं आत्ताच्या घडीला भारतीय संघाच्या मायदेशातल्या क्रिकेटच्या प्रक्षेपणाचेही हक्क आहेत. सोनी कंपनीकडं त्यातल्या त्यात चांगले म्हणजे फक्त दक्षिण आफिकेतल्या क्रिकेटचे हक्क आहेत. बाजारपेठेतलं अस्तित्व टिकवून ठेवायला सोनी चॅनेलला पुढच्या वर्षी भारतीय संघाच्या मायदेशातल्या क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क विकत घ्यायला मोठी मोर्चेबांधणी करावी लागेल. अशा प्रकारे दोन वाहिन्यांच्या चढाओढीत फायदा बीसीसीआयचा आहे हे नक्की.

उत्साहाच्या घडामोडी
तसं बघायला गेलं, तर गेल्या आठवड्यात क्रिकेटपेक्षा दोन मोठ्या सकारात्मक चांगल्या घडामोडी घडल्या. एक म्हणजे राजवर्धन राठोड यांची नेमणूक क्रीडामंत्री म्हणून करण्यात आली. एक उच्चकोटीचा खेळाडू निवृत्त झाल्यावर राजकारणातले धडे गिरवून मग क्रीडामंत्री म्हणून कारभार हाती घेतो, ही गोष्ट भारतीय क्रीडा क्षेत्राकरता सर्वांत उत्साहाची आणि अभिमानाची आहे. मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर राजवर्धन राठोड यांनी, ‘सर्व नियोजनातल्या केंद्रस्थानी खेळाडूंचं हित असेल; तसंच खेळाडूच सर्वांत मोठे सेलिब्रिटी राहतील,’ असं सांगून विकासाची दिशा स्पष्ट करून टाकली.

दुसरी सकारात्मक आनंदाची गोष्ट म्हणजे साईना नेहवालनं आपल्या सरावाचं केंद्र बदलून परत एकदा गोपीचंद अकादमीत प्रवेश करायचा निर्णय घेतला. गंभीर दुखापतीतून सावरून ‘फुलराणी’नं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक कमावून कमाल केली. पुलेला गोपीचंदसारख्या गुरूबरोबर परत सराव करायचा निर्णय घेऊन साईना नेहवालनं मोठा निर्णय घेतला आहे.

आयपीएलची कोटीच्या कोटी उड्डाणं असोत, राजवर्धन राठोड यांच्या मंत्रिपद नेमणुकीची सुवार्ता असो, किंवा साईना नेहवाल आणि गोपीचंद परत एकदा एकत्र काम करणार ही बातमी असो, या सगळ्याच घडामोडी क्रीडाप्रेमींकरता उत्साहाची भरती आणणाऱ्या आहेत, हे मात्र नक्की.

Web Title: sunandan lele write cricket article in saptarang