गुरुकुल बंद झालं (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

"क्रिकेटचे द्रोणाचार्य' अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थानं एक "गुरुकुल' बंद झाल्याची भावना मनात आली. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीपासून अनेक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे आचरेकर सर यांनी छोट्या छोट्या गोष्टींतून मोलाची शिकवण दिली. त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याबद्दल जागवलेल्या आठवणी.

"सर आज दगडाबरोबर धोंडा पण आलाय...'' विनोद कांबळी म्हणाला आणि रमाकांत आचरेकर खुदकन्‌ हसले. आचरेकर सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र भेटायला गेले असता विनोद कांबळीनं त्याच्या खास शैलीत डायलॉग मारला. या घटनेला जेमतेम दोन महिने झाले असतील तोपर्यंत आचरेकर सरांचं निधन झाल्याची बातमी कानावर आली. मनात विचार आला ः ""सर गेले म्हणजे गुरुकुल बंद झालं.''

कॉलेजमधले शिक्षक भेटले, तर आपल्याला आदर वाटतो आणि आपण थांबून आदबीनं त्यांच्याशी बोलतो. मात्र, जर लहान शाळेत शिकतानाचे गुरुजी दिसले, तर आपण काही कळायच्या आत पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो. लहान शाळेतल्या गुरुजींबद्दल आपल्याला आदराबरोबर आपुलकी का वाटते माहीत नाही. कदाचित कॉलेजमधले शिक्षक "शिकवतात' आणि लहान शाळेतले गुरूजी विद्यार्थ्यांना "घडवतात' असा तो फरक असेल.

प्रशिक्षक आणि गुरू
सचिन तेंडुलकरला मी "प्रशिक्षक' आणि "गुरू' यांच्यात फरक आहे का, असं विचारलं होतं. ""असतो ना... सांगतो तुला समजावून...'' सचिन सांगू लागला. ""जॉन राईट आणि गॅरी कर्स्टन या दोन उत्तम प्रशिक्षकांबरोबर मी काम केलं. दादा होतं दोघे. खेळाचे बारकावे कोळून प्यायलेले होते. खेळाडूला चूक समजावून देताना त्यातून मार्ग कसा काढायचा हेसुद्धा जॉन आणि गॅरीला बरोबर कळायचं. खेळाडूंची मानसिकता कशी सांभाळायची याचं ज्ञान होतं दोघांना. म्हणून मला जॉन राईट आणि गॅरी कर्स्टनबद्दल खूप आदर आहे. मात्र, "गुरू' हा वेगळाच असतो.''

""गुरू म्हणजे वेगळं काय असतं याचं उदाहरण देतो. मी लहान होतो तेव्हा एकदा झाडावरून कैऱ्या काढताना पडलो होतो. माझ्या भावाला- अजितला- समजलं, की माझी शक्ती वाया जात आहे. रग जिरवायची असेल, तर क्रिकेट प्रशिक्षणाला पाठवणं अजितला गरजेचं वाटलं. अगदी खरं सांगायचं, तर अगदी लहान असताना मला रोज मैदानावर जाऊन प्रशिक्षण घेणं आवडायचं नाही- कारण सोसायटीतल्या मित्रांसोबत खेळायला दंगा करायला जास्त मजा यायची. मग व्हायचं काय, की सर दुपारी नेट प्रॅक्‍टिस चालू करायचे. मी दिसलो नाही, की माझ्याबद्दल विचारायचे. तेव्हा फोन वगैरे काही नव्हतं. सर सराव सुरू करून देऊन हळूच तिथून निघायचे. स्कूटरला किक मारून थेट साहित्य सहवासला यायचे. मी मित्रांसोबत खेळत असायचो. सर मला उचलून घरी न्यायचे. मी रडायचो. सर मग मला समजवायचे, की रोज क्रिकेट प्रशिक्षणाला जाणं किती महत्त्वाचं आहे. मी लहान होतो. मला त्यांच्या बोलण्यातली खोली समजायची नाही. सर बोलताबोलता माझे कपडे बदलायचे आणि स्कूटरवर मागं बसवून मला सरावाला घेऊन यायचे. सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीनं नंतर मला खेळाची अशी काही गोडी लागली, की मैदानच माझं जणू घर बनलं. सांग मला कोण करेल हे? ...फक्त गुरूच हे करू शकतो! शिष्याकरता काहीपण करायची आच गुरूलाच असते. मागं वळून बघताना जाणवतं, की आचरेकर सरांनी आम्हा खेळाडूंकरता काय काय केलं. त्यांच्या ऋणातून कधीच उतराई होता येणार नाही आणि मला व्हायचं पण नाही,'' सचिन तेंडुलकर आचरेकर सरांबद्दल बोलताना म्हणाला होता.

सगळ्यांना सांभाळून
वृद्धापकाळात सरांनी मैदानावर येणं कमी केल्यावर आचरेकर सरांचं नेट त्यांचा शिष्य नरेश चुरीनं खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं. नरेश स्वत: रेल्वे संघाकडून बरीच वर्षं रणजी खेळला. आचरेकर सरांचा अजून एक मोलाचा गुण सांगताना नरेश चुरी म्हणाला ः ""शिवाजी पार्कचं मैदान किती मोठं आहे, हे आपण सगळे जाणतो. एका वेळी त्या मैदानावर किती नेट्‌स लावली जातात आणि किती क्‍लब्जचा सराव चालू असतो, हे मोजणंही कठीण जातं. प्रत्येक नेटकरता विकेट तयार करणं मैदानावरच्या कर्मचाऱ्यांकरता म्हणजे माळीबुवांकरता जिकीरीचं काम होत असे. ते करत असलेले कष्ट सर जाणून होते. सर अचानक एखाद्या दिवशी मोठं पातेलं भरून खिमा आणि पावाच्या लाद्या घेऊन यायचे. पिशवीत पत्रावळी असायच्या. सर फक्त आमच्या नेटकरता विकेट तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर सगळ्या कर्मचाऱ्यांना गोळा करून प्रेमानं खिमा-पाव जेवायला घालायचे. आम्हा मुलांना त्यांना वाढायला लावायचे. आम्हालाही त्यांच्या कामाची महती समजावी, हा त्यामागचा उद्देश. त्याचा परिणाम असा व्हायचा, की सगळे कर्मचारी सरांवर जाम खूश असायचे. आमच्या नेटस्‌करता ते जीव लावून विकेट तयार करायचे. बऱ्याच वेळा नेट्‌स उचलायला किंवा रोलिंग करायला सर माळ्यांबरोबर आम्हाला मदतीला जायला सांगायचे. काम करत असताना आम्हाला समजायचं, की किती कष्ट माळीबुवा आमच्याकरता करतात. सगळ्या माळीबुवांशी आदरानं बोलायचं हे सरांच्या वागणुकीवरून आम्हाला न सांगता समजायचं. खेळ प्रशिक्षणाबरोबर सरांनी केलेले हे संस्कार लाखमोलाचे होते.''

शिकवण्याची वेगळी पद्धत
आचरेकर सरांची प्रशिक्षणाची वेगळी पद्धत होती. त्यांचा भर सरावाइतकाच सामन्यांवर असायचा. आपल्या शिष्यांनी भरपूर सामने खेळावेत याकरता ते धडपड करायचे. सचिन तेंडुलकरनं एका दिवसात तीन सराव सामन्यांत फलंदाजी केली आहे. त्याबद्दलची आठवण सांगताना सचिन म्हणाला ः ""एकदा सरांनी असाच माझ्याकरता सराव सामना आयोजित केला होता. नेमका त्याच दिवशी आमच्या वरिष्ठ संघाचा ब्रेबॉर्न स्टेडियमवर अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेचा अंतिम सामना होता. मला वाटलं, आपण आपल्या संघाला प्रोत्साहन द्यायला जायलाच पाहिजे. मी शाळेतून मी थेट ब्रेबॉर्न स्टेडियमवर गेलो आणि भरपूर टाळ्या वाजवून आरडाओरडी करून संघाला प्रोत्साहन दिलं. सामना संपल्यावर मला सर दिसले. सर दिसूनही त्यांना वंदन केलं नाही तर चूक होईल, या विचारांनी मी सरांना भेटून वंदन केलं. मला ब्रेबॉर्नवर बघून त्यांना आश्‍चर्य वाटलं होतं. मी सराव सामना खेळलो नाहीये हे माहीत असूनही सरांनी मला प्रश्न विचारला, की काय झालं सामन्यात? मग माझा चेहरा कसनुसा झाला. सरांनी मला एकच धपाटा घातला. माझ्या हातातला डबा वगैरे इकडंतिकडं पडले. मग राग शांत झाल्यावर सरांनी जवळ घेऊन मला समजावलं, की "काही करायचं असेल, तर टाळ्या वाजवून नको करूस तर सीमारेषेच्या आत जाऊन असं काही तरी कमाल करून दाखव, की जग तुझ्याकरता टाळ्या वाजवेल.' सरांचे ते शब्द आयुष्यभर मी माझ्या कानात साठवून ठेवले. नंतर मी एकदाही सराव किंवा सराव सामना चुकवला नाही. सरांनी एकच धपाटा योग्य वेळी घातला त्याचा खूप चांगला परिणाम झाला.''

उगाच कौतुक नाही
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला वीस वर्षं पूर्ण केल्यावर सचिन तेंहुलकरची मुलाखत घेताना मी प्रश्न विचारला होता, की कोणत्या कौतुकाचं तुला समाधान आहे? सचिन म्हणाला होता ः ""सर डोनल्ड ब्रॅडमन यांनी माझी फलंदाजीची शैली त्यांच्या शैलीशी मिळते आहे असं सांगितल्याचं आणि त्यांनी निवडलेल्या जागतिक संघात मला स्थान दिलं होतं या दोन गोष्टींनी मला खूप समाधान लाभलं होतं; पण खरं सांगू? एका कौतुकाची मी वाट बघत आहे ती म्हणजे माझे गुरू रमाकांत आचरेकर मला एकदा "वेल प्लेड' कधी म्हणतील!'' सचिनच्या शेवटच्या वाक्‍यानं मी दचकलो. ""सर कधीच तुला "वेल प्लेड' नाही म्हणाले? ""नाही ना! एकदाही नाही. मी वाट बघतो आहे त्याची,'' सचिन डोळे मिचकावत म्हणाला होता.

त्यानंतर मी सरांना भेटून विचारलं होतं ः "सर, खरंच तुम्ही सचिनला अजून एकदाही "वेल प्लेड' नाही म्हणालात?' सर म्हणाले होते ः ""काय केलंय त्यानं...ठीक आहे...अजून खूप पल्ला गाठायचा आहे सचिनला!''
सरांचे बरेच विद्यार्थी सांगतात, की सर कधीही कोणा फलंदाजाला किती धावा केल्या विचारायचे नाहीत... सामन्याचं काय झालं आणि बाद कसा झालास हे विचारायचे. ""एका दिवसात डबल सेंच्युरी करून दिवसअखेरीला आडवा फटका मारून बाद झालो म्हणून सरांनी मला थप्पड मारली होती,'' चंदू पंडित सांगत होता. हेच कारण होतं, की कोणीही फलंदाजानं कितीही धावा केल्या तरी सर जास्त काही बोलायचे नाहीत. सरांच्या वेगळ्या शैलीबद्दल बोलताना सचिन म्हणाला होता ः ""सर कोणाचं कधी कौतुक करायचे नाहीत... पण मोक्‍याच्या सामन्यात चांगली खेळी केली, की ते खूश असायचे; पण चेहऱ्यावर आनंद दाखवायचे नाहीत...मग कधी वडापाव खायला मला, विनोदला पैसे द्यायचे. फारच आनंदात असले, तर आम्हाला स्वत: आणून एनर्जी दुधाची बाटली द्यायचे. सरांची आनंद व्यक्त करायची पद्धत वेगळी होती.''
हे सगळं ऐकल्यावर वाटतं कसे हे गुरू आणि शिष्य!... काय त्यांचं नातं!...सगळंच कमाल.

आचरेकर सरांच्या शेवटच्या वाढदिवसाला सगळे खेळाडू जमले, तेव्हा प्रत्येक जण आपल्याला कोणत्या कारणानं सरांनी धपाटा घातला याची कथा सांगत होते. रमाकांत आचरेकर यांनी प्रशिक्षक म्हणून केलेल्या संस्कारांमध्ये "क्रिकेट खेळताना सतत संघाचा विचार करा,' हे सांगितलं होतं. तसंच "धावा करणं हे कर्तव्य आणि खराब फटका मारून किंवा स्वार्थी विचारांनी फलंदाजी करणं हे पाप,' हे मनावर पक्कं ठसवलं होतं. सरांच्या देखरेखीखाली क्रिकेट शिकलेल्या प्रत्येक खेळाडूनं शेवटपर्यंत सरांचा गुरू-मंत्र पाळला. सरांच्या शिकवणीनं अनेक चांगले संस्कारी क्रिकेटपटू घडले. त्यामुळंच गुरुवर्य आचरेकर सर देवाघरी गेल्याचं समजल्यावर एक गुरुकुल बंद पडल्याची भावना मनात घर करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com