किवींना कसं हरवणार?

कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघांकरिता २०१९ मधला १ ऑगस्ट हा दिवस मोलाचा होता. त्याच दिवशी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस मालिका सुरू होत असताना ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ स्पर्धा सुरू झाली.
Virat Kohli
Virat KohliSakal

कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघांकरिता २०१९ मधला १ ऑगस्ट हा दिवस मोलाचा होता. त्याच दिवशी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस मालिका सुरू होत असताना ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ स्पर्धा सुरू झाली. दोन वर्षांच्या कालखंडात कोरोना महामारीनं जगाला छळलं तसंच क्रिकेटलाही गुगली टाकली. बरेच सामने रद्द करावे लागल्यानं अंतिम सामन्याकरिता कोणते दोन संघ पात्र ठरणार याचे निकष आयसीसीला काही वेळा बदलावे लागले. भारतीय संघाला त्या बदलांनी मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं. तावून सुलाखून निघालेल्या भारतीय संघानं सर्व आव्हानं पेलत ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाय ठेवला आणि तोसुद्धा अव्वल क्रमांकानं. एकीकडं सतत चर्चेत असलेला भारतीय संघ, तर दुसरीकडं कोणताही गाजावाजा न करता सातत्यपूर्ण कामगिरी करून अत्यंत शांततेत दाखल झालेल्या न्यूझिलंड संघांदरम्यान आता येत्या शुक्रवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. अंतिम सामना खेळताना नानाविध अडथळ्यांची शर्यत यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या भारतीय संघासमोर आणि विराट कोहलीला किवींचे पंख छाटण्याचं आव्हान खुणावत आहे.

विराट कोहली कमालीचा आक्रमक कर्णधार आहे, जो समोरच्या संघातील खेळाडूंशी दोस्ती करायला जात नाही. त्या कोहलीनंसुद्धा न्यूझिलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा अपवाद केला आहे. होय, कोहली आणि विल्यमसन दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे.

भारतीय संघ गेल्या वर्षी न्यूझिलंड दौर्‍यावर गेला असताना एका सामन्यात नेमकं विराट आणि विल्यमसन दोघंही खेळत नव्हते. तौरंगाला झालेल्या त्या सामन्यात कोहली आणि विल्यमसन दोघंच जवळपास एक तास सीमारेषेजवळच्या जाहिरात फलकाला पाठ टेकून मैदानावर मांडी घालून गप्पा मारताना मी बघितलं होतं. असं असलं तरी, दोघंही खेळाडू मैदानावर खेळत असताना दयामाया दाखवत नाहीत. उलटपक्षी कोहली - विल्यमसनला एकमेकांसमोर खेळताना सर्वोत्तम खेळी उभारायची खुमखुमी असते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोहली - विल्यमसनला आपापल्या संघाला प्रोत्साहन देत पुढं घेऊन जायचं आहे. साहजिकच दोघांपैकी जो बॅट हाती असताना ठणकावून कामगिरी करेल, त्याची सरशी होण्याचं प्रमाण जास्त असेल. कर्णधार म्हणून क्षेत्ररक्षण करताना दोघांच्याही भात्यात झकास खेळाडू असल्यानं नेमका निशाणा कोण साधतं, हे बघायला खूपच मजा येणार आहे.

२०१९ च्या जागतिक करंडक स्पर्धेत उपांत्य सामन्यात न्यूझिलंडनं भारतीय संघाला हरवलं तेव्हा मॅट हेन्री आणि ट्रेंट बोल्टनं भारतीय फलंदाजांना अफलातून वेगवान गोलंदाजी करून पराभवाचा धोबीपछाड टाकला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील यश-अपयशाचं पारडं वेगवान गोलंदाजांच्या हाती असेल, असं क्रिकेट जाणकार अगोदरपासून बोलू लागले आहेत. विल्यमसनच्या भात्यात ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, टीम साऊदी आणि अष्टपैलू कायली जेमीसन असतील आणि नील वॅगनरचा जबरदस्त आक्रमक पर्याय उपलब्ध असेल.

कोहलीच्या भात्यात सर्वांत भरवशाचा जसप्रीत बुमरा, प्रत्येक चेंडू चांगल्या वेगानं आणि अचूक शिवणीवर टाकणारा महंमद शमी आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यात चांगली छाप पाडणारा महंमद सिराज असतील आणि त्यांच्या सोबतीला आता अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जाऊ लागलेल्या शार्दुल ठाकूरचा पर्याय असणार आहे. थोडक्यात सांगायचं तर, दोनही बाजूला समर्थ पर्याय वेगवान गोलंदाजीत कर्णधारांच्या हाताशी असतील. नव्या आणि जुन्या चेंडूचा वापर कोणत्या संघाचे गोलंदाज खुबीनं करतात, त्यावर बरंच काही अवलंबून असेल.

इंग्लंडमधील काही मैदानं आणि खेळपट्ट्या स्विंग गोलंदाजीला साथ देतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. जे काही सामने मी साउदम्पटनच्या मैदानावर कव्हर केले, त्यांत असं दिसून आलं, की या मैदानावरची खेळपट्टी त्यामानानं मवाळ आहे. २०१४ आणि २०१८ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता, हे जसं विसरता येणार नाही; तसंच या मैदानावर वेगवान गोलंदाजांनी नव्हे, तर मोईन अलीच्या ऑफ स्पिन गोलंदाजीनं भारतीय फलंदाजांचा घात केला होता हेसुद्धा विसरता येणार नाही.

साउदम्पटन शहराला समुद्रकिनारा असल्यानं इथली हवा काहीशी गरम आणि दमट असते. त्यातून मैदान समुद्रापासून लांब असल्यानं तिथल्या वार्‍याचाही काहीही परिणाम मैदानावरील खेळात होत नाही. एकच धोका या मैदानावर असतो तो म्हणजे, पाऊस पडला तर सामना लगेच सुरू होत नाही, कारण पाऊस पडत राहण्याचं प्रमाण जास्त आहे आणि मैदान काहीसं खाली असल्यानं जमिनीतील पाण्याचा निचरा होत नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ जूनला, म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला होणार असल्यानं पावसाची भीती कायम राहणार आहे. मला वाटतं त्याचाच विचार करून आयसीसीनं सामना गरज पडल्यास सहाव्या दिवशी खेळवला जाण्याची सोय नियमानं करून ठेवली आहे.

आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, की न्यूझिलंड संघ इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळून मग पूर्ण तयारीनिशी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायला साउदम्पटनच्या मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघ सराव सामना खेळून नव्हे, तर फक्त सराव करून अंतिम सामना खेळणार आहे. त्याचा काही फरक पडणार नाही, असं विधान कोहलीनं केलं आहे, कारण भारतीय संघातील सगळेच खेळाडू साउदम्पटनच्या मैदानावर क्रिकेट सामना खेळलेले आहेत. उपकर्णधार अजिंक्य रहाणे २०१९ मध्ये याच मैदानावर हॅम्पशायर कौंटीकडून खेळत होता, तो अनुभव मदतीला येईल.

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांसारख्या फक्त कसोटी क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंकरिता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा वर्ल्डकप अंतिम सामन्याइतकाच महत्त्वाचा आहे. ‘दोन वर्षं चांगलं क्रिकेट खेळून आणि असंख्य अडथळे पार करून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायला लायक ठरला असल्यानं या सामन्याचं महत्त्व मोठं आहे’, असं प्रशिक्षक रवी शास्त्रीनं सांगितलं आहे. गेल्या काही आयसीसी स्पर्धांत भारतीय संघ चांगलं खेळून मजल मारतो आणि निर्णायक सामन्यात खराब खेळ करून पराभूत होतो, असं बघायला मिळालं आहे. कोहलीला याची पूर्ण जाणीव असल्यानं, तोच काळा डाग पुसून टाकायला तो आकाश पाताळ एक करेल यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com