कृतिशील सहकार्याची गरज...

महान खेळाडू म्हणून पूर्णविराम... की महान खेळाडू म्हणून जीवनाला सुरुवात... नक्की काय पाहिजे तुला तूच ठरव. लक्षात घे, असे काही खेळाडू आहेत ज्यांनी मैदान गाजवलं...
Kedar Rahul Ruturaj
Kedar Rahul RuturajSakal

महान खेळाडू म्हणून पूर्णविराम... की महान खेळाडू म्हणून जीवनाला सुरुवात... नक्की काय पाहिजे तुला तूच ठरव. लक्षात घे, असे काही खेळाडू आहेत ज्यांनी मैदान गाजवलं... पण नंतर त्यांना कोणी विचारलं नाही, कारण माणूस म्हणून त्यांची वाढ झालीच नाही... पण काही खेळाडू नक्कीच असे आहेत ज्यांनी खेळातून निवृत्ती घेतल्यावरही जग त्यांना चांगला माणूस म्हणून नुसतं ओळखत नाहीत, तर योग्य मान देतात. बघ मित्रा, निर्णय तुझा आहे... तुझं नाव काय म्हणून लोकांनी स्मरणात ठेवावे, महान खेळाडू म्हणून का चांगला माणूस म्हणून हे तूच ठरव, आताच्या जमान्यातील एका भन्नाट क्रिकेटरला गप्पा मारताना मित्रत्वाचा सल्ला मी दिला होता.

हे सत्य आहे, की आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे बरेचसे खेळाडू ध्येयानं पछाडलेले असतात. त्यांच्या ध्यानीमनी फक्त सर्वोत्तम कामगिरी होण्याकरिता काय करायला पाहिजे याचेच विचार घोळत असतात. मेहनत करताना त्यांचा बाह्य जगाबरोबरचा संपर्क जणू तुटलेला असतो. त्यांच्याकरिता बऱ्‍याच गोष्टी सहजी आयोजित होत असल्यानं सत्य परिस्थितीपासून ते लांब असतात. भारतीय क्रिकेट संघ राहत असलेल्या हॉटेलात भेटल्यावर काही खेळाडू अगदी भाबडेपणाने विचारतात, ‘आप यहीं हॉटेलमें रुके हो क्या’. मला असं विचारल्यावर हसावे का रडावे समजत नाही.

कारण बिचाऱ्‍यांना अजिबात कल्पना नसते, की परदेशात पंचतारांकित हॉटेलच्या खोलीचा एका दिवसाचा दर प्रचंड असतो आणि जर भारतीय संघ तिथं राहत असेल, तर तोच दर ३० टक्के वाढवला जातो. दौऱ्‍यावर वार्तांकनाकरिता गेल्यावर पत्रकाराचे राहण्याचे १० दिवसांचे बजेट असते ते भारतीय संघ उतरलेल्या हॉटेलच्या रूमचे एका दिवसाचे भाडे असते. पण सगळ्या गोष्टी दुसऱ्यानं म्हणजे बीसीसीआयनं आयोजित केलेल्या असल्याने त्यांना समजतच नाही की खर्च काय असतो. मग अशा खेळाडूंना बाह्य जगात काय चालू आहे याची खरी जाणीव येणार कुठून?

हास्यास्पद आधुनिक समस्या

खेळाडूंचं सोडा सध्याच्या जगात बऱ्‍याच सुखवस्तू लोकांना खऱ्‍या समस्या म्हणजे नक्की काय असते याची सुतराम कल्पना नसते. त्यांना त्यांच्या फालतू समस्या म्हणजे कमाल वाटत असतात. गंमतीदार उदाहरणे देतो म्हणजे तुम्हाला मी सांगतोय ते लक्षात येईल. हाय फ्लाइंग एक्झिक्युटिव्हची समस्या : माझे विमान ४५ मिनिटे उशिरानं उडालं आणि मला विमानतळावर बसून राहावे लागले.आयटी कंपन्यात नोकरी करणाऱ्‍या आणि आता घरून काम करणाऱ्‍यांची समस्या : माझा पिझ्झा अर्धा तास लेट आला आणि त्यात चीज खूप कमी होते.

ऐशआरामी आयुष्य जगणाऱ्‍या महिलांची समस्या : स्वयंपाक करणारी बाई बरे वाटत नाही म्हणून आली नाही आणि मला सगळी कामे बाजूला ठेवून ‘स्वीगी’वरून जेवण ऑर्डर करावे लागले.

विश्‍वास ठेवा हे सत्य आहे, की वर नमूद केलेल्या लोकांना त्यांना सामोरे जावे लागणारे प्रसंग म्हणजे मोठी संकटे वाटतात. मग अशा लोकांना कोरोना महामारीने जगातील गरीब लोक काय संकटांना रोजच्या रोज तोंड देत आहेत याची कल्पना येणार कुठून?

‘आयपीएल’ होते लक्ष्य

‘आयपीएल’ म्हणजे पैशाच्या फळांनी लगडलेले झाड आहे. कोणतीही समस्या आली की दगड मारायला सर्वांत सोपे झाड कोणते ते म्हणजे आयपीएल. हे शंभर टक्के सत्य आहे की सध्याची परिस्थिती गंभीर आहे. अशा वेळेला सगळे काही बंद पडलेले असताना ‘आयपीएल’ चालू राहणे हे सहजी खटकणारे होते. बीसीसीआयला फाजिल आत्मविश्‍वास होता, की आपण काहीही करू शकतो. गेल्या वर्षीदेखील महामारी चालू असताना बीसीसीआयने परदेशात आयपीएल यशस्वीरीत्या भरवली तेव्हा वाढलेला आत्मविश्‍वास भारतात आयपीएल भरवण्याच्या अट्टहासानं फाजिल आत्मविश्‍वास ठरला. तरबेज फलंदाजाचा बचाव भेदून चाणाक्ष गोलंदाजाने टाकलेला चेंडू जागा शोधून स्टंपवर जाऊन आदळतो तसा कोरोनाच्या विषाणूने बायो सिक्युरिटी बबलचा भेद करून आयपीएल संघातील खेळाडूंच्या शरीरात प्रवेश केला. मग धावाधाव झाली. कोरोनानं बीसीसीआयला अडचणीत आणले आणि शेवटी आयपीएल रद्द करण्यावाचून पर्याय उरला नाही. ‘गिरे तो भी टांग उपर’ या नेहमीच्या पवित्र्यानुसार बीसीसीआयने आयपीएल रद्द झाली नसून पुढे ढकलली गेली आहे, अशी पोकळ गर्जना केली.

२०२१ ची आयपीएल चालू झाल्यापासून बीसीसीआयनं समाजप्रबोधनाचे अत्यंत माफक प्रयत्न केले आहेत. जसे प्रत्येक मुख्य प्रायोजकासंदर्भातील घोषणा प्रत्येक सामन्यादरम्यान करारानुसार किमान इतक्या वेळा करायची सक्ती आहे, तसेच कोरोनापासून बचाव करण्यासंदर्भातील घोषणा काही वेळा करून टाकणे इतकेच प्रबोधन केले जात होते. माध्यमातून बोंबाबोंब झाल्यावर मग त्याचे प्रमाण वाढवण्यात आले आणि गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवरील मुख्य समालोचक काही ना काही प्रबोधन बोलण्यातून करताना दिसू लागले आहे. याचाच अर्थ असा, की बीसीसीआयची या प्रकारातील कृती ही क्रियेची नसून प्रतिक्रियेची आहे.

टीका टिप्पणी झाल्यावर मग बीसीसीआय प्रतिक्रिया म्हणून जबरदस्तीने काहीतरी समाजकार्य करत असल्याचा आंव आणते जे लज्जास्पद आहे. लोकप्रिय खेळाडू आणि कॉमेंटेटर्सना एकत्र करून आणि स्वत: काही ना काही आर्थिक तरतूद करून ठोस काम करायची मानसिकता बीसीसीआयची का दिसत नाही हे मला पडलेले कोडे आहे.

सहवेदनेची गरज

हे सत्य आहे की बऱ्‍याच महान आजी माजी क्रिकेटपटूंनी कोरोना समस्येवर मात करायला घसघशीत रक्कम प्रधानमंत्री निधीकरिता आणि आपापल्या राज्यातील मुख्यमंत्री निधीकरिता दिलेली आहे. पण आता घडीला तेवढीच कृती पुरेशी नाही हे खेळाडूंना कळणे गरजेचे आहे. एकीकडे वीरेंद्र सेहवाग गेले कित्येक महिने दिल्लीतील शेकडो गरजू कोरोना रुग्णांना घरगुती सात्त्विक जेवण पुरवत आहे. दुसऱ्‍या बाजूला हरभजनसिंगने पुण्यात कोरोना तपासणीकरिता मोबाईल व्हॅनकरिता निधी दिला आहे. सचिन तेंडुलकरने अतिरिक्त १ कोटी रुपये ऑक्सिजन आणण्याकरिता देऊ केले आणि त्याबरोबर भारतातील निवडक शंभर गरीब निवासी अनाथ मुला-मुलींच्या शाळांना रोजचे जेवण नीट मिळावे याकरिता धडपड चालू केली आहे.

गरज सगळ्यांच्या सहभागाची

कोरोना महामारीने बरेचसे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे फंड, म्हणजेच उद्योगांकडून सामाजिक दायित्वाकरिता सरकारला दिला जाणारा निधी, पीएम आणि सीएम केअरकरिता ओढले जात आहेत जे योग्यच आहे. पण त्याचा विपरीत परिणाम असा होतो आहे, की प्रामाणिकपणे सामाजिक काम करणाऱ्‍या संस्था निधीअभावी अडचणीत आल्या आहेत. बाकी गरजा तर सोडाच रोजच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. यात लहान मुलांचे अनाथाश्रम आहेत, वनवासी कल्याण आश्रम आहेत तसेच अनाथ वृद्धाश्रम आहेत. गेल्या दीड वर्षात एनजीओंना मिळणारा निधी झपाट्याने इतका घटला आहे, की चांगले काम करणाऱ्‍या संस्था मेटाकुटीला आल्या आहेत. याचा विचार करून केदार जाधव, ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी या आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्‍या तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंना साद घातली असता तिघेही मदत करायला लगेच तयार झाले. आता हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत किमान तीन सामाजिक संस्थांच्या खाण्यापिण्याचा प्रश्‍न निदान काही महिन्यांकरिता सोडवायचा प्रयत्न ‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमातून केला गेला आहे. सांगण्याचा मतलब इतकाच आहे, की तुम्हीसुद्धा सुजाण नागरिक म्हणून आपल्या जवळच्या समाजकार्य करणाऱ्‍या संस्थेत जा... त्यांच्या समस्या जाणून घ्या... पुढाकार घ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाइकांना साद घाला आणि त्या त्या संस्थांच्या काही दिवसांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला हात पुढे करा. लक्षात घ्या खऱ्‍या कृतिशील सहानुभूतीची गरज आता सर्वांत जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com