मानसिकता बदलणार कधी?

‘गेली मॅच हातातून,’ लॉर्डस् कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या खेळावरून एका महाभागांनी विश्वासाने सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘तो रूट एकटा करेल गरजेच्या धावा...
Indian Cricket Team
Indian Cricket TeamSakal

‘गेली मॅच हातातून,’ लॉर्डस् कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या खेळावरून एका महाभागांनी विश्वासाने सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘तो रूट एकटा करेल गरजेच्या धावा... जरा सांगा तुमच्या लाडक्या विराटला शिक म्हणावं काहीतरी समोरच्या संघाच्या कर्णधाराकडून.’ मला प्रश्न पडला की अजून सामन्याचा शेवटचा दिवस बाकी आहे. सामना जिंकायची जितकी संधी इंग्लंडला आहे त्याच्यापेक्षा जास्त भारताला आहे कारण त्यांना खराब होत जाणार्‍या खेळपट्टीवर दडपणाखाली सामन्याच्या पाचव्या दिवशी गरजेच्या धावा करायच्या आहेत जेव्हा तसे बघायला गेले तर त्यांचा एकमेव फलंदाज चांगला खेळ करतोय. मग एकेकाळी क्रिकेट खेळलेल्या गृहस्थाला असे का वाटले की भारतीय संघाच्या हातातून सामना गेला?

पुढचे ऐका. एवढे काय कौतुक त्या सिंधूचे... कुठे जिंकले तिने सुवर्णपदक...हरलीच ना अंतिम सामन्याअगोदरच... कौतुक फक्त नीरज चोप्राचे करायला हवे, त्याने भारताची शान वाढवली, अजून काहींनी तर अकलेचे तारे तोडलेले माझ्या कानावर पडले होते. म्हणून मनात विचार आला की खेळाडूंच्या कामगिरीवरून आपण बहुतांशी सगळेजण किती सहज आपली मत मांडतो. मांडायला काहीच हरकत नाही तो आपला हक्क आहे. पण मतप्रदर्शन करत असताना काही लोक कमालीची नकारात्मकता दाखवतात तेव्हा त्यांना हे कळते का की विचार मांडण्यातून आपलीच मानसिकता प्रतिबिंबासारखी दिसत असते.

पु. ल. देशपांडेंनी खूप अगोदर लिहून ठेवले आहे की क्रिकेट हा मुख्यत: खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे. वारंवार हे वाक्य मला पटते कारण भारतातील जवळपास प्रत्येकालाच खात्री असते की, मला क्रिकेट कळते. लॉर्डस् कसोटी सामन्याचेच उदाहरण घेतले तर मला काही लोकांनी अगदी भेटून सांगितले की भारतीय संघाने पहिली फलंदाजी करतानाच ४५० धावा करायला हव्या होत्या. सलामीला शतकी भागीदारी केल्यावर त्या समाधान न मानता अजून १०० धावा वाढवायला हव्या होत्या. मोठ्या अपेक्षा ठेवण्यात काहीच चूक नाही. पण इंग्लंडमध्ये काहीशा ढगाळ वातावरणात स्वींग गोलंदाजी करण्यात तरबेज असलेल्या जिमी अँडरसन सारख्या गोलंदाजासमोर तग धरून संघाच्या गरजेच्या धावा उभारण्याला किती कौशल्य लागते याचा अंदाज आपल्याला खरच असतो का?

गंमतीची गोष्ट अशीही असते की लॉर्डस् कसोटी सामना मस्तपैकी जिंकल्यावर आदल्या दिवशी नकारात्मक टिप्पणी करणारे कोणीही महाभाग ‘माझा अंदाज चुकला हं...भारताने काय मस्त सामना जिंकला’, अशी प्रांजळ कबुली देत नाहीत.

प्रगती होते आहे...

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक मिळवले तर महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. मोठ्या कालखंडानंतर हॉकी खेळाकडे जनसामान्य ओढले गेले. भारतीय हॉकीपटू कौशल्य आणि दमसास दोनही बाबतीत जगातील इतर संघांना टक्कर द्यायला पुन्हा एकदा सज्ज झाल्याचे दिसून आले. माझ्यासारख्या क्रीडाप्रेमी माणसाकरता हे मोठे सकारात्मक पुढचे पाऊल आहे.

नेमबाजीच्या खेळात भारतीय खेळाडूंकडून खूप अपेक्षा होत्या कारण पूर्वतयारी जबरदस्त केली गेली होती. नेमबाजांना सरावाकरता बंदुका आणि अ‍ॅम्युनिशन सामुग्रीबरोबर सर्वोत्तम प्रशिक्षण दिले गेले होते. नेमबाजांनी प्रार्थमिक फेरीत चांगला निषाणा साधला होता. दुर्दैवाने बाद फेरीतील दडपण त्यांना सहन झाले नाही. तीच गोष्ट तिरंदाजीमध्ये झाली. अपेक्षित कामगिरी न झाल्यावर दीपिका कुमारीने ऑलिंपिक स्पर्धेचे दडपण सहन झाले नसल्याची कबुलीही दिली.

इतकेच ध्यानात ठेऊयात

कामगिरी करणे आणि दडपणाखाली कामगिरी करणे यात जमीन अस्मानाचा फरक असतो हेच परत दिसून आले. दडपणाचा दाह काय असतो याची अगदी सोपी परीक्षा आपण सगळे घेऊ शकतो. घरात कॅरम खेळताना बाकी सोंगट्या आपण सहजी घेतो पण क्वीन घेताना सोंगटीचा रंग केवळ लाल इतकाच बदल असताना आपला हात थोडा थरथरतो का ? हे आपण घरी तपासून बघू शकतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर निकराच्या लढतीत अपेक्षांचे टोकाचे दडपण सहन करून तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांवर मात करणे किती कठीण असते याचा पुसटसा अंदाज आपल्याला कॅरम खेळूनही येऊ शकतो.

मला मुद्दा इतकाच मांडायचा आहे की, खेळ मग तो कोणताही असो त्यातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवरून अगोदरच नकारात्मक टिप्पणी करण्याचे आपण टाळू शकतो. आपले खेळाडू कुचकामी आहेत असे त्यांची खेळी व्हायच्या आतच बोलणे टाळू शकतो. समोरच्या चांगल्या खेळाडूंचे कौतुक करताना जाताजाता उगाचच आपल्या खेळाडूंवर टिका करणे टाळू शकतो.

आत्ता कुठे भारतात खेळ संस्कृती रुजू लागल्याची चाहूल लागली आहे. वय काहीही असो व्यायाम करून तंदुरुस्त राहण्याची आपण सगळे प्रयत्न करू शकतो. तसेच घरातील मुलांना खेळाची आवड लागावी म्हणून मनापासून प्रयत्न करू शकतो. प्रक्रिया लांब आहे तरीही सकारात्मकता आणून भावी काळात ऑलिंपिक पदकांची संख्या वाढावी या करता आपण सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करूयात. खेळावरील टिप्पणीने आपलीच मानसिकता दिसून येत असते हे लक्षात ठेऊयात.

आपल्याला अंदाज आहे का ?

ऑलिंपिक सारख्या सर्वोच्च स्पर्धेत कोणतेही पद मिळवणारी कामगिरी करण्याकरता किती मेहनत , चांगल्या खेळाची लय आणि नशिबाची साथ लागते याचा विचार आपण करतो का?ज्यांनी पी व्ही सिंधूची उपांत्य फेरीची लढत बघितली त्यांना कळून चुकले होते की प्रतिस्पर्धी खेळाडू कौशल्याच्या बाबतीत किती तगडी होती. सिंधूने उपांत्य लढत हरूनही कांस्य पदक लढतीकरता जीव कसा एकवटला. लागोपाठ दोन ऑलिंपिक स्पर्धेत बॅडमिंटन एकेरीच्या लढतीत पदक मिळवणारी कामगिरी करणे किती कठीण असते. विचार करून बघा की टेनिस जगतावर राज्य करणाऱ्या नोवाक जोकोविचलासुद्धा कांस्य पदक पटकावता आले नाही. मग, ‘ सिंधू बरोबर मोक्याच्या लढतीत पचकते’, अशी शेलकी टिप्पणी करताना आपण काय विचार करतो ? सर्वोच्च स्तरावर दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करायला काय मेहनत, त्याग आणि अग्निदिव्यातून जायला लागते याचा आपल्याला अंदाज असतो का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com