विराटची ‘सत्त्वपरीक्षा' (क्रीडा)

सुनंदन लेले
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

आतापर्यंतच्या ‘चाचणी’ परीक्षेत दर्जेदार गुणांनी पास झालेल्या भारतीय क्रिकेट संघाची खरी ‘सत्त्वपरीक्षा’ येत्या गुरुवारपासून (ता. २३) पुण्यात चालू होत आहे. आक्रमक ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चार कसोटी सामने भारतीय संघाला खेळावे लागणार आहेत. भारतीय संघाला त्यांच्या मायभूमीत पराभूत करण्याच्या ध्येयानं पछाडलेला हा संघ आहे. या सामन्यांतले डावपेच, नव्या खेळपट्टीचे फायदे-तोटे, दोन्ही संघांची तयारी या गोष्टींवर एक नजर.

आतापर्यंतच्या ‘चाचणी’ परीक्षेत दर्जेदार गुणांनी पास झालेल्या भारतीय क्रिकेट संघाची खरी ‘सत्त्वपरीक्षा’ येत्या गुरुवारपासून (ता. २३) पुण्यात चालू होत आहे. आक्रमक ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चार कसोटी सामने भारतीय संघाला खेळावे लागणार आहेत. भारतीय संघाला त्यांच्या मायभूमीत पराभूत करण्याच्या ध्येयानं पछाडलेला हा संघ आहे. या सामन्यांतले डावपेच, नव्या खेळपट्टीचे फायदे-तोटे, दोन्ही संघांची तयारी या गोष्टींवर एक नजर.

आतापर्यंतच्या ‘चाचणी’ परीक्षेत दर्जेदार गुणांनी पास झालेल्या भारतीय क्रिकेट संघाची खरी सत्त्वपरीक्षा येत्या गुरुवारपासून (ता. २३) पुण्यात चालू होत आहे. पुण्यातील पहिल्या पेपरनंतर बंगळूरला दुसरा, रांचीला तिसरा आणि शेवटचा पेपर हिमालयाच्या कुशीत वसलेल्या धरमशाला गावाला असा प्रवास करत एकूण चार पेपर्स त्यांना एकूण सोडवायला लागणार आहेत. आधीचे पेपर सोपे होते अशातली बाब नाहीय. फक्त आता जे चार पेपर्स आहेत ते वेगळे आणि आक्रमक आहेत. थोडक्‍यात सांगायचं, तर विराट कोहलीच्या सहकाऱ्यांना भारतीय संघाला त्यांच्या मायभूमीत पराभूत करायच्या ध्येयानं पछाडलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाविरुद्ध चार कसोटी सामन्यांत दोन हात करायचे आहेत.
प्रतिस्पर्धी नेस्तनाबूत
गेल्या काही महिन्यांत विराट कोहलीच्या संघानं जणू काही बाजीप्रभू देशपांडे यांच्या वीरत्वाची प्रतिमा मनात साठवली होती. समोर आलेल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला कोहलीच्या सहकाऱ्यांनी झकास सर्वांगीण क्रिकेट खेळून खल्लास केलं. गेल्या वर्षी दक्षिण आफिका, मग न्यूझीलंड, त्यानंतर इंग्लंड आणि त्या मानानं कमकुवत बांगलादेश संघाला भारतीय संघानं सपशेल पराभूत केलं. सर्वच्या सर्व कसोटी सामन्यांतल्या विजयात भारतीय संघाचा संपूर्ण वरचष्मा राहिला होता. फलंदाजीबाबत शंका कधीच नव्हती; पण गोलंदाजीतली सुधारणा लक्षणीय होती. खासकरून भारतीय वेगवान गोलंदाजांनी दर वेळी अपेक्षेपलीकडे चांगली कामगिरी करून दाखवली. रवींद्र जडेजा आणि आर. अश्‍विन, तर संताजी-धनाजीसारखे समोरच्या संघातल्या फलंदाजांच्या स्वप्नात दिसू लागलं होतं. दोन दादा फिरकी गोलंदाजांनी जेव्हा गरज आहे तेव्हा संघाकरता धारदार मारा केला. अश्‍विनच्या सातत्यपूर्ण फिरकी माऱ्यानं समोरचे फलंदाज दहशतीखाली खेळताना दिसले. भल्या-भल्या फलंदाजांना अश्‍विनच्या वैविध्यपूर्ण माऱ्याचं कोडं सोडवता आलं नाही.
फलंदाजांनी जबाबदारी पार पाडली
विराट कोहली जात्याच आक्रमक विचारांचा असल्यानं त्यानं कसोटी सामन्यात पाच गोलंदाज खेळवायचं धोरण अवलंबलं. पाच गोलंदाज घेऊन खेळलं, तरच योग्य वेळात समोरच्या संघाचे १०+१० फलंदाज बाद करता येतात, हे कोहलीनं जाणलं होतं. बोलणं सोपं आणि करणं कठीण असा हा प्रकार होता. कारण फक्त पाच मुख्य फलंदाजांना घेऊन सामन्यात उतरणं दिसतं तितकं सोपं नाही. नव्या चेंडूवर तीन फलंदाज झटपट बाद झाले, तर मोठी गडबड होऊ शकते, हा धोका कोहली आणि अनिल कुंबळे जाणून होते. यशाला गवसणी घालायची असेल, तर धोका पत्करायची तयारी कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या जोडीनं ठेवली होती. कोहली नुसता बोलला नाही, तर त्यानं बॅट हाती घेऊन धावांचा पाऊस पाडला. संघाला गरज आहे त्या धावा पाच मुख्य फलंदाजांनी उभारल्या. मुख्य फलंदाजांना विकेटकीपर आणि गोलंदाजांनी समर्थ साथही दिली. कधी वृद्धिमान साहा, कधी जयंत यादव, कधी जडेजा-अश्‍विन, तर कधी अचानक संधी मिळालेल्या पार्थिव पटेलनं मुख्य फलंदाजांना साथ देत मोठी धावसंख्या उभारायला मदत केली. मुख्य फलंदाजांपैकी ज्याला चांगली फलंदाजी जमत असेल, त्यानं शतक करून समाधान मानलं नाही तर संघाच्या गरजेची मोठी धावसंख्या उभारायला एकाग्रता कायम ठेवली. मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणे यांच्या एकत्रित प्रयत्नानं भारतीय संघाच्या नावासमोर पहिल्या डावात नेहमी मोठी धावसंख्या जमा झालेली दिसली. काही वेळा पहिली फलंदाजी करून समोरच्या संघानं दडपण वाढवायचा प्रयत्नही केला, ज्याचा फारसा परिणाम झाला नाही. सलग चार मालिकेत विराट कोहलीनं चार द्विशतकं ठोकून सातत्याची कमाल केली. इंग्लंडसारख्या शिस्तपूर्ण संघाला भारतीय संघानं ४-० पराभूत केलं, तेव्हा क्रिकेट जगतानं आश्‍चर्य व्यक्त केलं. 
पहिलेपणाचा फायदा-तोटा     
पूर्वीच्या काळी मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई, बंगळूर आणि कानपूरलाच कसोटी सामने आयोजित करायचा मान मिळायचा. नंतरच्या काळात मोहली, अहमदाबादला कसोटी सामने भरवायचा मान मिळू लागला. गेल्या दहा वर्षांत आयपीएल स्पर्धेच्या यशानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या तिजोरीत भरपूर पैसा जमा झाला. मंडळानं त्याचा योग्य वापर करताना प्रत्येक राज्य संघटनेला स्वत:च्या मालकीचं स्टेडियम उभारायला प्रोत्साहन देताना पन्नास ते साठ कोटी रुपयांची घसघशीत मदतही केली. त्याचा परिणाम इतका सकारात्मक झाला, की भारतातील बऱ्याच राज्य संघटनांनी मनातून सकारात्मक उचल खाऊन नवं स्टेडियम उभाराची हिंमत केली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतल्या चारपैकी तीन कसोटी सामने तीन नव्या मैदानांवर होत आहेत. पुणे, रांची आणि धरमशालाला पहिल्यांदा कसोटी सामन्याचं आयोजन केलं जाणार आहे. याचा मोठा फायदा असा आहे, की त्या-त्या शहरात पहिल्या कसोटी सामन्याच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण पसरणार आहे. त्या शहरातल्या लोकांना कसोटी सामन्याचा थरार प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. चांगल्या स्थानिक खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघाचा सराव जवळून बघता येणार आहे, तर काही गोलंदाजांना कोहलीला गोलंदाजीही करता येणार आहे.
धोका नाही; पण चिंता एकच असते, ती म्हणजे पहिल्यांदाच कसोटी सामन्याचं आयोजन करत असल्यानं त्या त्या संघटनेला भारतीय संघाला किंचित फायदा होईल अशी खेळपट्टी बनवताना अनुभव पणाला लावावा लागणार आहे. होतं काय, की जेव्हा कोणतीही संघटना पहिल्यांदा सामना आयोजित करते, तेव्हा अतिकाळजीपोटी खेळपट्टी जास्त तयार करायची चूक होऊ शकते. ज्यामुळं गोलंदाजांना अपेक्षित मदत मिळतेच असं नाही. तो एक संभाव्य धोका स्थानिक प्रशासकांनी टाळला, तर पुणे, रांची आणि धरमशालाला कसोटी सामना बघताना वेगळीच मजा येणार आहे.
तगडा प्रतिस्पर्धी दक्षिण आफिकेविरुद्ध गमावलेली कसोटी मालिका सोडली, तर ऑस्ट्रेलियन संघानं चढत्या क्रमानं कसोटी सामन्यात वरचढ खेळ केला आहे. दक्षिण आफिकेसमोरच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल केले गेले. इतके बदल केल्यावर संघातला समतोल कसा साधला जाणार आणि अनुभवाची कमतरता संघाच्या कामगिरीला धक्का देणार की काय, असं सगळ्यांना वाटलं होतं. प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियन संघात नव्यानं दाखल झालेल्या खेळाडूंनी चांगला खेळ करून संघात नवचैतन्य आणल्याचं दिसतं आहे. मॅथ्यू रेनशॉ आणि पीटर हॅड्‌सकोंब या दोन तरुण फलंदाजांनी सहकाऱ्यांचा आदर मोठ्या खेळी उभारून मिळवला आहे. डेव्हिड वॉर्नर, कप्तान स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा हे तीन फलंदाज अत्यंत जबरदस्त फॉर्मात आहेत. कोहलीप्रमाणंच वॉर्नर आणि स्मिथ फारच उच्च फलंदाज करत सातत्यानं मोठ्या खेळी उभारत आहेत. 
ऑस्ट्रेलियन संघाला आधार त्यांचे गोलंदाज देतात. जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कसोबत नॅथन लियॉन हे तिघं अनुभवी आणि तगडे गोलंदाज आहेत. स्टीफन ओकिफ आणि मिचेल स्वीप्सन जोडीला आहेत. मुख्य खेळाडूंच्या कामगिरीत गडबड झाली, तर शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्‍सवेलसारखे भारतात खेळायचा भरपूर अनुभव असलेले खेळाडू ऑस्ट्रेलियन संघाच्या पोतडीत आहेत. 
आक्रमकता
इतर संघ आणि ऑस्ट्रेलिया संघातला फरक समजावून सांगताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘‘बाकी संघाच्या खेळण्यात आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळण्यात एक मूलभूत फरक असा आहे, की ‘ऑसी’ संघ जात्याच आक्रमक आहे. समोरच्या संघावर तुटून पडायला ते वेळ घालवत नाहीत. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रावरच कब्जा मिळवायचा ते घाट घालतात. प्रथम फलंदाजी आली, तर वॉर्नर आक्रमण करून लंचअगोदर शंभर धावा फलकावर लावायचा प्रयत्न करेल आणि गोलंदाजी आली, तर स्टार्क-हेझलवूड कमीत कमी दोन-तीन फलंदाजांना तंबूत पाठवायला आग ओकतील. साम-दाम-दंड-भेद सर्व प्रकारांचा सरळसोट अवलंब करत ते प्रतिस्पर्ध्याला खच्ची करून टाकायचा जोरदार प्रयत्न करतात. भारतीय संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक या सर्व योजनांना ओळखून आहेत. ऑस्ट्रेलियन संघाला नेस्तनाबूत करायचे असेल, तर प्रत्येक सत्रात त्यांना पराभूत करावे लागते. नाक वर करायची संधीच द्यायची नाही, असा तगडा खेळ सातत्यानं करावा लागतो. कारण संधी दिली, तर ती साधण्यात ‘ऑसी’ संघ पटाईत आहे, हे विसरून चालणार नाही. सध्या आपला संघ ज्या फॉर्मात आहे, तो कायम राहिला, तर ‘ऑसी’ संघाची खैर नाही.’’
पहिला कसोटी सामना २३ फेब्रुवारीला पुण्यात होणार आहे. त्याच्या तयारीकरिता १८-१९ तारखेलाच भारतीय संघ पुण्यात दाखल होणार आहे. आयपीएल संघात बहुतांशी खेळाडू गुण्यागोविंदानं एकत्र खेळतात, ज्यामुळं पूर्वीची खुन्नस कमी झाली आहे. तरीही भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत ठिणग्या कमी पडतील, अशी अजिबात शक्‍यता नाही. कोहली आणि स्मिथ पूर्ण ताकदीनिशी एकमेकांवर तुटून पडतील. बाचाबाचीचं प्रमाण किंवा टोकाचं ‘स्लेजिंग’ होणार नाही; पण मैदानावर कोणी एकमेकांना मैत्री दाखवणार नाही. 
एकदिवसीय सामना असो, वा ‘टी-२०’ सामना, पुणेकर सामन्याला जोरदार हजेरी लावतात. मर्यादित षटकांच्या सामन्याच्या तिकिटांची दोन दिवसात चटणी उडते. आता कसोटी सामन्याचा थरार अनुभवायची वेळ आली आहे. पुणेकर पाच दिवसांच्या क्रिकेटलाही उत्साही पाठिंबा देतील, अशी आशा आहे.

Web Title: sunandan lele writes about Now virat kohalis Exam Sports