बाझबॉलचं गारूड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cricketer kevin pietersen

क्रिकेट आणि संगीत आपल्यातील बहुतांशी लोकांच्या जीवनाचा भाग आहे.

बाझबॉलचं गारूड

क्रिकेट आणि संगीत आपल्यातील बहुतांशी लोकांच्या जीवनाचा भाग आहे. उस्ताद झाकिर हुसेन यांचा तबला ऐकून आपण सहजी दाद देताना ‘काय कडक बॅटिंग केली त्यांनी’ अशी दाद देतो, तर एखाद्या फलंदाजाची लय बघून, ‘आज त्याचा चांगला सूर लागला होता’ अशी प्रतिक्रिया देतो. मला हे आठवण्याचं कारण असं की, सध्याच्या कसोटी क्रिकेटचा बाज बघून ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकातील गाण्याचे शब्द माझ्या मनात रेंगाळले. पंडितजींना दरबारातील गाण्यात पराभूत करून खाँ साहेब मानाच्या हवेलीत प्रवेश करतात आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करायला, या भवनातील गीत पुराने.... मवाळ हळवे सूर जाऊद्यात आज येथूनी दूर, असं गाणं द्रुत लयीत आक्रमकतेने सादर करतात. अगदी तसाच अनुभव मला इंग्लंडमधील कसोटीचं वार्तांकन करताना आला.

सेहवागची आठवण झाली

भारतीय क्रिकेट संघाचे अनेक कसोटी सामने मी पत्रकार म्हणून बघितले. त्यातील २००८ मधली चेन्नईतील कसोटी मी कधीच विसरू शकत नाही. एकतर ११ डिसेंबरला ती कसोटी झाली, ज्यावर मोठं प्रश्नचिन्ह होतं. २६ नोव्हेंबरला मुंबईत अतिरेक्यांनी हल्ला केला. भारतच काय, संपूर्ण जग त्या हल्ल्याने हादरून गेलं होतं. भारताच्या दौऱ्‍यावर आलेल्या इंग्लंड संघाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. इंग्लिश संघाने सहकार्य केलं, विश्वास दाखवल्याने चेन्नईचा कसोटी सामना पार पडला. त्याच कसोटीत पहिल्या डावात ७५ धावांची आघाडी घेतलेल्या इंग्लंड संघाने तिसऱ्‍या डावात ३११ धावांवर आपला डाव घोषित करून भारताला विजयाकरिता ३८० पेक्षा जास्त धावांचं आव्हान ठेवलं. कसोटीतील तो चौथा दिवस होता.

भारतीय संघाला जवळपास दोन तास खेळायला देताना इंग्लिश कप्तान केविन पीटरसनने विचार केला होता की, दडपणाखाली भारताच्या दोन-तीन विकेट्स काढून मग पाचव्या दिवशी सामना जिंकण्याकडे वाटचाल करायची. योजना अगदी चांगली होती, ज्याला सुरुंग लावला वीरेंद्र सेहवागने.

सेहवागने फलंदाजीला जाण्याकरिता पटकन पॅड्‌स बांधले आणि राहुल द्रविड - सचिन तेंडुलकरला समोर बसवलं आणि म्हणाला, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों.’ द्रविड - तेंडुलकरला सेहवाग काय करतोय समजेना. तेव्हा सेहवाग म्हणाला, ‘मला बचावात्मक खेळ करता येत नाही आणि कसोटी अनिर्णीत राखायचे विचार माझ्या मनात येत नाहीत. मी जाणार आणि गोलंदाजांवर हल्ला चढवणार. जर यशस्वी झालो तर सामना जिंकण्याकडे वाटचाल करता येईल, जर योजना फसली तर तुम्ही दोघांनी सामना वाचवायचा. आता माझी जबाबदारी संपली,’ असं म्हणून सेहवाग फलंदाजीला गेला.

सेहवागने पहिल्या ५ षटकांत भारताचं अर्धशतक फलकावर लावताना गोलंदाजांवर अभूतपूर्व हल्ला चढवला. ११ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ चेंडूत ८३ धावा करून सेहवाग बाद झाला. चौथ्याच दिवशी भारताच्या खात्यात १३१ धावा जमा झाल्या होत्या. पाचव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी उरलेल्या २५० धावा सचिन तेंडुलकरने शतक आणि युवराज सिंगने ८१ धावा करून कसोटी सामना जिंकून दिला. गेल्या चार कसोटी सामन्यांत इंग्लंड संघाने ज्या तडफेने आक्रमक खेळ करून सामने जिंकले, ते बघून चेन्नई कसोटीची आठवण झाली... सेहवागच्या धाडसी विचारांची आठवण झाली.

आदरणीय वामनराव पै म्हणायचे की, विचार बदला आयुष्य बदलेल. अगदी तसंच काहीसं न्यूझीलंडचा महान माजी खेळाडू ब्रँडन मॅक्कुलमने इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून होताना दिसत आहे. गुणवत्ता असूनही नेहमी साचेबद्ध क्रिकेट खेळणाऱ्‍या इंग्लंड संघाला मॅक्कुलमने कात टाकायला भाग पाडलं. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चौथ्या डावात २९६ धावांचं लक्ष्य विजयाकरिता दिलं गेलं असताना ब्रँडन मॅक्कुलमने चौथ्या डावाकरिता फलंदाज मैदानात उतरण्याअगोदर कानमंत्र दिला. तो म्हणाला होता की, ‘फक्त आणि फक्त विजयाचा विचार करा... स्वतःच्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास ठेवत आक्रमक फलंदाजी करा... निकाल काय लागेल याचा अजिबात विचार करू नका, फक्त गोलंदाजांवर तुटून पडा.’ नव्या विचारांनी पेटून उठलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी नेमकं तेच केलं. षटकामागे जवळपास ५ धावांची सरासरी राखत सामना सहजी जिंकून दाखवला. इंग्लंडचे पाठीराखे प्रेक्षक वेडे झाले. पुढच्या दोन सामन्यांत त्याच विचारांनी इंग्लंड संघ खेळला. फलंदाजीत कमालीची निडर वृत्ती त्यांनी दाखवली.

न्यूझीलंड समोरच्या तीन कसोटी सामन्यांत तीन दर्जेदार विजय मिळवून दाखवले गेले आणि इंग्लंडच्या नव्या विचारबदलाला माध्यमांनी ‘बाझबॉल’ नाव दिलं. ब्रँडन मॅक्कुलमचं टोपणनाव ‘बाझ’ आहे. त्याच्या विचारपद्धतीला ‘बाझबॉल’ संज्ञा लागू झाली. त्याचा जोरदार फटका भारतीय संघालाही बसला, जेव्हा नुकतीच संपलेली एजबास्टन कसोटी इंग्लंडने दिमाखात फलंदाजी करू जिंकली.

मर्यादित षटकांचं क्रिकेट झपाट्याने लोकांच्या मनात ठाव घेत असताना कसोटी क्रिकेटचं काय होणार, याची घरघर क्रिकेटपंडितांना लागली होती. मान्य करावं लागेल की, ‘बाझबॉल’ म्हणजेच आक्रमक बेधडक क्रिकेट खेळण्याच्या विचारांनी कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळाली आहे. प्रेक्षक आकर्षक निकाल लागण्याकरिता खेळले जाणारे कसोटी क्रिकेट बघायला मैदान भरून टाकत आहेत. एजबास्टन मैदानावर कसोटी सामना बघायला आलेले प्रेक्षक खेळातील थराराचा आनंद घेताना दिसले. इंग्लंडच्या संघातील हा वैचारिक बदल मोठं काम करून जात आहे आणि हाच बदल बाकीचे संघ अवलंबायची शक्यता वाढणार आहे.

टी-२० क्रिकेटची पाळंमुळं खोलवर रुजल्यावर आता १० षटकांचं क्रिकेट येऊ बघतं आहे. याचाच अर्थ असा की, आता प्रेक्षकांची संयम क्षमता कमी झाली असल्याने सगळ्यांना निकाल लागणारं झटपट क्रिकेट हवं आहे. लोकांना नुसतं क्रिकेट नको आहे... क्रिकेट करमणूक म्हणजेच ‘क्रिकेटेन्मेंट’ हवं आहे. इंग्लंड कसोटी संघाचा कप्तान बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रँडन मॅक्कुलमने सांगून टाकलं आहे की, आम्ही सामना खेळताना प्रेक्षकांची करमणूक करणारा खेळ सादर करायचा प्रयत्न करणार, कधीच बचावात्मक नकारात्मक क्रिकेट खेळणार नाही. काही सामने गमावले तरी बेहत्तर; पण निकाल लागणारं सकारात्मक क्रिकेटच खेळणार.

कसोटी क्रिकेटचं काय होणार, असं म्हणणं हे नुसते मगरीचे अश्रू ढाळले जात होते; पण कोणीच काही ठोस पावलं उचलत नव्हतं. कसोटी क्रिकेट आकर्षक करायला नियमांत बदल करायला कोणी तयार नव्हतं. ब्रँडन मॅक्कुलमच्या विचारांनी एक प्रकारचं उत्तर समोर आलं आहे. ज्या संघात क्षमता आहे, त्यांनी सतत सकारात्मक विचारांनी खेळ केला आणि प्रसंगी काही सामने गमावण्याची मानसिक तयारी ठेवली, तर काय कमाल परिणाम साधला जाऊ शकतो, हे विचारांनी बदललेल्या इंग्लंड संघाने करून दाखवलं आहे. म्हणूनच सध्या क्रिकेट जगतावर ‘बाझबॉलचं गारूड’ असल्याचं जाणवत आहे.

Web Title: Sunandan Lele Writes Cricket And Music

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketmusicSunandan Lele
go to top