वेगळा संघ आणि प्रशिक्षकही!

क्रिकेटजगतात हलचल व्हायला लागली आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून टी-२० क्रिकेटला प्राधान्य द्यायला लागले आहेत.
ben stokes and jos buttler
ben stokes and jos buttlersakal
Summary

क्रिकेटजगतात हलचल व्हायला लागली आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून टी-२० क्रिकेटला प्राधान्य द्यायला लागले आहेत.

क्रिकेटजगतात हलचल व्हायला लागली आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून टी-२० क्रिकेटला प्राधान्य द्यायला लागले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सोडून बऱ्याच मंडळांना घरघर लागली आहे की, कसोटी संघाच्या बांधणीला लागलेल्या आणि भविष्यात लागणाऱ्या धक्क्यातून सावरायला काय पावलं उचलायची? ह्या धगधगत्या प्रश्नांसोबत अजून एक मुद्दा चांगलंच डोकं वर काढू लागलेला आहे. तो आहे, जसं प्रत्येक क्रिकेट प्रकारासाठी वेगळे खेळाडू आणि प्रसंगी वेगळे संघ निवडण्याची वेळ जवळ यायला लागली आहे, तसंच वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारासाठी वेगळे प्रशिक्षक नेमले गेले पाहिजेत का? काय वाटतं तुम्हाला?

टी-२० क्रिकेट भारतासाठी आयात केलेला खेळप्रकार आहे. इंग्लंडमध्ये प्रेक्षक कौंटी सामन्यासाठी गर्दी करण्यास नकार देऊ लागले म्हणून बोर्डाने २० षटकांच्या सामन्याचा घाट घातला. प्रेक्षकांना हा झटपट क्रिकेट प्रकार पसंत पडला आणि लोकांनी याला कुटुंबाची क्रिकेट सहल म्हणून स्वीकारलं.

बीसीसीआयने सुरुवातीला टी-२० क्रिकेटकडे बघून नाकं मुरडली, कारण भारतात क्रिकेट सामन्याला गर्दी होणं हे आव्हान कधीच नव्हतं. केवळ जगात बाकी संघ टी-२० क्रिकेट मान्य करू लागले म्हणून भारताने ते स्वीकारलं. इतकंच काय, पहिल्या जागतिक टी-२० स्पर्धेला केवळ आयसीसीची स्पर्धा आहे म्हणून भारताने एकदम तरुण खेळाडूंचा संघ पाठवला. पहिल्याच स्पर्धेत भारतीय संघ सरळ विजेता झाला आणि भारतात टी-२० क्रिकेटने मान्यता मिळवली. प्रेक्षक टी-२० क्रिकेटवर प्रेम करू लागले.

२००७ च्या जागतिक टी-२०च्या अभूतपूर्व यशानंतर लगेच ‘आयपीएल’चा घाट घातला गेला आणि सगळंच चित्र बदललं. टी-२० क्रिकेट खेळण्यात आमूलाग्र सुधारणा प्रत्येक वर्षी व्हायला लागली. आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक संघचालक नामांकित माजी खेळाडूला प्रशिक्षक म्हणून आपल्या चमूत दाखल करून घ्यायला लागला. टी-२० खेळाचं तंत्र कसं असावं यावरून खलबतं व्हायला लागली. १० वर्षांच्या आयपीएल नंतर कसोटी किंवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये यश मिळवणारे खेळाडूच फक्त टी-२० प्रकारात यशस्वी होतात असं नाही, हे कळून चुकलं. परिणामी टी-२० क्रिकेट खेळणारे खेळाडू वेगळे दिसू लागले. उदाहणार्थ पोलार्ड, सुनील नरीनपासून ते वयाची चाळिशी पार केलेल्या प्रवीण तांबेपर्यंत खेळाडू फक्त ‘आयपीएल’ गाजवताना दिसू लागले आणि त्यांना टी-२० स्पेशालिस्ट म्हटलं जाऊ लागलं.

टी-२०चे जनक इंग्लंड खेळाचा विचार करून बदल करू लागले. तुम्हाला माहीत असेल नसेल तर सांगतो, आता इंग्लंडच्या कसोटी संघाला मार्गदर्शन करायला वेगळा आणि एकदिवसीय - टी-२० संघाला प्रशिक्षण द्यायला वेगळा प्रशिक्षक नेमला गेला आहे. कसोटी संघात कमालीचा बदल दाखवणारा ब्रॅन्डन मॅक्क्युलम मर्यादित षटकांच्या संघात खेळणाऱ्या खेळाडूंपासून लांब राहतो. केवळ काळाची पावलं ओळखून ईसीबीने हा बदल अंगीकारला आहे. ईसीबीने विचारपूर्वक कसोटी संघाचा कप्तान म्हणून बेन स्टोक्सला आणि एकदिवसीय टी-२० संघाच्या कप्तानपदी जोस बटलरला जबाबदारी विभागून दिली आहे.

अगोदरही इयॉन मॉर्गन कसोटी संघाच्या जवळपास दिसायचा नाही; पण तो मर्यादित शतकांसाठी इंग्लंड संघाचा कप्तान होता. या योजनेला यशही मिळालं, कारण अखेर २०१९ मध्ये इंग्लंडने विश्वचषक जिंकला. चालू जमान्यात ज्या संख्येचं क्रिकेट खेळलं जात आहे, त्याचा विचार करता जसं खेळाडूंना क्रिकेटचे तीनही प्रकार खेळात राहणं अशक्य होणार आहे, तसंच सततच्या कामाचा, प्रवासाचा आणि दौऱ्यामुळे घरापासून लांब राहण्याचा काळ पाहता एका प्रशिक्षकाला तीनही क्रिकेट संघांचं प्रशिक्षण करणं कठीण होणार आहे.

बदल अपरिहार्य आहे

भारतीय संघ विविध कसोटी सामने त्यानंतर एकदिवसीय सामने आणि अंदाजे टी-२० असे तिन्ही प्रकारचे सामने मोठ्या प्रमाणात खेळतो. हे सोडून आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेत भाग घेतो, हे लक्षात घेता कोणाही एका प्रशिक्षकाला हा सगळा कारभार एकट्याने सांभाळणे अवघड होणार आहे. भावी काळात जसा खेळाडूंवरचा भार कमी करायला वेगवेगळे संघ निवडले जाण्याची शक्यता आहे, तसंच खास करून टी-२० संघाचा प्रशिक्षक वेगळा नेमण्याची गरज निर्माण होणार आहे.

एक मुद्दा असाही चर्चेला येतो आहे की, फार कमी प्रशिक्षक टी-२० क्रिकेट सातत्याने खेळले आहेत. टी-२० क्रिकेटच्या गरजा कसोटी क्रिकेटपेक्षा संपूर्णपणे भिन्न असल्याने वेगळ्या प्रशिक्षकाची गरज निर्माण होते. आत्ताच्या घडीला राहुल द्रविड भारतीय संघाला तीनही प्रकारांत प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. भविष्यात असा पदभार कोण्या एकाच प्रशिक्षकाला मिळणं कठीण वाटतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com