चक्रव्यूह भेदावाच लागेल!

भारतीय संघाचा गेल्या २० वर्षांपासून पाठलाग करत जगभर क्रिकेट सामन्यांचं वार्तांकन करताना एकच गोष्ट समजली आहे की, खेळणं आणि दडपणाखाली खेळणं यांत फार फरक असतो.
Cricket India and Pakistan
Cricket India and PakistanSakal
Summary

भारतीय संघाचा गेल्या २० वर्षांपासून पाठलाग करत जगभर क्रिकेट सामन्यांचं वार्तांकन करताना एकच गोष्ट समजली आहे की, खेळणं आणि दडपणाखाली खेळणं यांत फार फरक असतो.

भारतीय संघाचा गेल्या २० वर्षांपासून पाठलाग करत जगभर क्रिकेट सामन्यांचं वार्तांकन करताना एकच गोष्ट समजली आहे की, खेळणं आणि दडपणाखाली खेळणं यांत फार फरक असतो. महत्त्वाच्या निर्णायक सामन्यात मोक्याच्या क्षणी कामगिरी करता आली, तरच योग्य निकाल लागतो. त्याचबरोबर दोन देशांतील सामने खेळणं आणि विश्‍वकरंडक किंवा आशिया कपसारखी स्पर्धा खेळणं यांतही मोठा फरक असतो. एकाच संघासमोर खेळताना बलस्थानांबरोबर कमजोर बाजूही समजू शकते. विविध देश जेव्हा एकाच स्पर्धेत खेळतात, तेव्हा समोरच्या संघाचा अंदाज लावणं कठीण होतं. एकदम मला या सर्व गोष्टींची आठवण यासाठी झाली, कारण बाकी वेळेला चांगला खेळणारा संघ नेमका आशिया कप किंवा विश्‍वकरंडकसारख्या स्पर्धांमध्ये ऐनवेळी का अपेक्षित खेळ करत नाही समजत नाही.

भारतीय संघ झिम्बाब्वे येथे २००१ मध्ये दौऱ्यावर गेला होता आणि कसोटी - एकदिवसीय मालिकेसह पूर्ण दौऱ्यावर जायची माझी पहिली वेळ होती. बुलावायोला झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने मिळवलेली विजयी आघाडी पुढच्या हरारे कसोटी सामन्यात पुसली गेली. नंतर भारत, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे दरम्यान तिरंगी एकदिवसीय स्पर्धा झाली.

या स्पर्धेतील साखळी फेरीत भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीजला प्रत्येकी दोन वेळा पराभूत केलं. अंतिम सामन्यात कुरे कोलिमोर नावाच्या वेस्ट इंडियन गोलंदाजाने चार फलंदाजांना बाद केलं आणि फक्त एकाच आणि तेही नेमक्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून ते थेट नुकत्याच झालेल्या आशिया कपमधील सामान्यांपर्यंत असं दिसून आलं आहे की, चांगला खेळ करून स्पर्धेत बाद फेरी गाठणं भारतीय संघाला जमलं आहे. फक्त निर्णायक टप्प्यावर योग्य खेळ करताना त्रेधा उडाली आहे.

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या २००३ च्या कालखंडात अडखळती सुरुवात बाजूला सारून भारतीय संघाने नंतर जबरदस्त खेळ केला. अंतिम सामन्यात पोहोचले असताना भारतीय खेळाडूंना काय करू आणि काय नको असं झालं होतं, कारण सगळे खेळाडू पहिल्यांदाच विश्‍वकरंडकाचा अंतिम सामना खेळत होते. त्या अतिरिक्त उत्साहाचा दुष्परिणाम झाला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धाक दाखवायला गेलेल्या भारतीय गोलंदाजांना एकट्या रिकी पॉटिंगने धु धु धुतलं. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी घाई केली आणि गणित चुकलं. तेव्हापासून २००७ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ खूप ठेचकाळत खेळत होता.

चित्र बदललं

२००७ मध्ये भारतीय संघाची दैना झाली आणि विश्‍वकरंडक स्पर्धेत साखळी फेरीतून गारद व्हावं लागलं. नंतर लगेच भारतीय संघाला लागलेलं ग्रेग चॅपलचं ग्रहण सुटलं आणि परिस्थिती बदलली. २००७ मध्येच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आणि यशाचे दरवाजे उघडले. भारताने नॉटिंगहॅमचा कसोटी सामना जिंकून मालिकाही जिंकली. पाठोपाठ २००७ च्या पहिल्या जागतिक टी-२० स्पर्धेत घवघवीत यश मिळवलं. त्या यशानंतर भारतीय संघाने यशाची वाट बरोबर पकडून ठेवली होती.

याच कालखंडात भारतीय संघाने पहिल्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. नंतर कसोटी मानांकनात अव्वल स्थानी झेप घेतली. २०११ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही विजेते झाले. खूपच संस्मरणीय असा हा काळ ठरला भारतीय क्रिकेटसाठी.

कारणं काय होती...?

२००७ सप्टेंबर ते २०१३ ऑगस्टपर्यंतच्या यशाची कारणं लक्षात घेणं गरजेचं आहे. एकतर महेंद्रसिंह धोनीसारखा अत्यंत हुशार कर्णधार संघाचं नेतृत्व करत होता. दुसरी बाब म्हणजे, संघात सचिन तेंडुलकरसारखा खूप ज्येष्ठ खेळाडू होता, ज्याचा वचक बाकी खेळाडूंना होता, त्यामुळे कोणीही खेळाडू मैदानावर किंवा मैदानाबाहेर बेशिस्त वर्तणूक करायची हिम्मत करायचा नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, संघात भरपूर क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंचं योग्य मिश्रण होतं जसं - वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि झहीर खान. त्यांच्या सोबतीला विराट कोहली, श्रीसंत आणि रोहित शर्मासारखे तरुण खेळाडू होते. ह्याचा परिणाम असा झाला की, अनुभवाला सळसळत्या रक्ताची जोड मिळाली.

आता कुठं चूक होतेय...?

तसं म्हणायला गेलं तर आता खेळत असलेल्या भारतीय संघात क्रिकेटजगतावर राज्य करायची ताकद आणि हिम्मत आहे; पण नको त्या वेळी, नको त्या सामन्यात कुचकामी खेळाची माशी शिंकताना दिसत आहे. संघात विराट कोहलीसारखा कर्तृत्ववान खेळाडू आहे; पण त्याचं संघातील स्थान सचिनसारखं नाहीये. संघातील ज्येष्ठ खेळाडूंची कामगिरी सातत्यपूर्ण होत नाहीये आणि तरुण खेळाडू मधूनच चमकत आहेत. एक नक्की आहे, आताचा संघ मेहनतीत कणभरही कमी पडत नाहीये.

संघ व्यवस्थापन म्हणतं की, सगळं चांगलं आहे, आम्ही करतोय ते बरोबर आहे, तर मग अपेक्षित यश का मिळत नाहीये, हा खरा प्रश्न आहे. उत्तर साधं आहे की, मेहनतीला आणि कागदावर आखलेल्या योजनांना मैदानावरच्या कामगिरीची भक्कम जोड निर्णायक सामन्यात मिळत नाहीये. तेव्हा आता आमचं काहीच चुकत नाहीये, असं म्हणून चालणार नाहीये. होणाऱ्या चुका मनोमन मान्य करून, निर्णायक सामन्यात भन्नाट कामगिरी करून चक्रव्यूह एका वर्षाच्या कालावधीत दोनदा भेदून दाखवावा लागेल. जसं लक्ष्य सेन, नीरज चोप्रा आणि पी. व्ही. सिंधूकडून आता चाहत्यांना सुवर्णपदकाची अपेक्षा असते, तसंच भारतीय क्रिकेट संघाची ताकद बघता फक्त विजेतेपदाची अपेक्षा असणार आहे. अर्थातच, अपेक्षांचं ओझं पेलत खेळणं आणि सर्वोच्च यश मिळवणं यालाच आंतरराष्ट्रीय खेळाची सत्त्वपरीक्षा म्हटलं जातं ते उगाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com