क्रिकेटप्रेमींचा सण...

खूप तबलावादक अगदी अफलातून वाजवतात, तरीही झाकिर हुसेन यांचं तबलावादन ऐकणं हा वेगळाच अनुभव असतो. त्यांना मिळणारा आदर आणि प्रेम वेगळंच असतं.
sachin tendulkar
sachin tendulkarsakal
Summary

खूप तबलावादक अगदी अफलातून वाजवतात, तरीही झाकिर हुसेन यांचं तबलावादन ऐकणं हा वेगळाच अनुभव असतो. त्यांना मिळणारा आदर आणि प्रेम वेगळंच असतं.

खूप तबलावादक अगदी अफलातून वाजवतात, तरीही झाकिर हुसेन यांचं तबलावादन ऐकणं हा वेगळाच अनुभव असतो. त्यांना मिळणारा आदर आणि प्रेम वेगळंच असतं. अगदी तसंच, भरपूर लोक क्रिकेट चांगलं खेळतात, खूप धावा करतात, खूप विकेट्स काढतात; पण सचिन तेंडुलकरने मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह बघताना तोंडातून दाद कधी निघून जाते समजतही नाही. तसंच सचिनला मिळणारा आदर व प्रेम वेगळंच असतं, यातही शंका नाही.

भारतरत्नसारखा सर्वोच्च नागरी सन्मान मिळूनही आपण सचिनला अहो म्हणत नाही, याचा अर्थ त्याच्याबद्दल आदर नसतो अशातला भाग नाहीये, उलटपक्षी सचिन बहुतांशी भारतीय लोकांना आपल्या कुटुंबाचाच भाग वाटतो. हेच कारण वाटतं की, सचिनचा वाढदिवस क्रिकेटप्रेमींसाठी सणासारखा भासतो, त्यातून सचिनच्या आयुष्यात ५० आणि १०० आकड्यांचं असलेलं महत्त्व लक्षात घेता, त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाची धूम खास असणार आहे.

१९७३ मध्ये २४ एप्रिलला जन्म झालेल्या सचिन तेंडुलकरच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट जरा जास्तच वेगाने झाली. अवघ्या १४ व्या वर्षी मुंबई निवड समितीने त्याला रणजी संघात सामावून घेतलं. रणजी पदार्पणात शतक करणाऱ्‍या सचिनने नंतर इराणी करंडक सामन्यात बलाढ्य दिल्ली संघासमोरही शतक केलं. त्यावेळचे निवड समिती अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांनी सचिनला भारतीय संघात घेताना वेळ घालवला नाही. अवघी १६ वर्ष आणि २०५ दिवसांच्या सचिनने पाकिस्तान दौऱ्‍यावर गेलेल्या भारतीय संघाकडून खेळताना कसोटी पदार्पण केलं. पहिल्या काही सामन्यांत नाकावर चेंडू आदळूनही सचिनने विकेटवर खंबीरपणे उभं राहण्याची हिंमत दाखवली तिथंच क्रिकेटजगताला त्याच्यातील पाणी दिसून आलं.

वयाची विशीही गाठली नसताना सचिन प्रथमदर्शनीच अंजली मेहताच्या प्रेमात पडला. ४-५ वर्षं प्रेम रुजल्यावर २२व्या वर्षी २४ मे १९९५ रोजी सचिनने अंजलीशी लग्न केलं. २४व्या वर्षी तो बाप बनला, जेव्हा साराचा जन्म झाला. नंतर तब्बल २३ वर्षांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकर २०० कसोटी सामने आणि ४६३ एक दिवसीय सामने खेळला. एकूण मिळून १०० आंतरराष्ट्रीय शतकं त्याने काढली. ४०व्या वर्षी सचिन निवृत्त झाला आणि तेव्हाच त्याला भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आलं. या सर्व मुद्द्यांवर नजर टाकल्यावर सचिनच्या सर्व गोष्टी फास्ट फॉरवर्ड कशा झाल्या आहेत याचा अंदाज तुम्हाला आला असेल.

सगळं शक्य कसं झालं ? सचिनने अशक्य ते शक्य करून दाखवताना तमाम भारतीयांना एक आशेचा किरण दाखवला. गुणवत्तेला सातत्यपूर्ण कष्टाची जोड मिळाली, तर काय चमत्कार केला जाऊ शकतो, याचं सचिन हे जिवंत उदाहरण बनला. ज्या वेळी हे सगळं कसं शक्य झालं, हा प्रश्न मी सचिनला विचारला, तेव्हा त्याने मांडलेले मुद्दे अभ्यासण्यासारखे आहेत.

सचिन म्हणतो, ‘आचरेकर सरांनी आम्हा सगळ्या शिष्यांना सरावाबरोबर भरपूर सामने खेळायला लावलं. याचा परिणाम मॅच टेंपरामेंट घडण्यात झाला. कितीही सराव केला तरी सामन्यात खेळताना तारांबळ उडता कामा नये, याकडे सरांचं लक्ष असायचं. सतत संघाचा विचार करूनच प्रत्येकाने खेळलं पाहिजे, हा आचरेकर सरांचा कटाक्ष असायचा. त्यात दिरंगाई करणाऱ्‍या खेळाडूला थप्पड मारतानाही सर मागे-पुढे बघायचे नाहीत.

दुसरा मुद्दा असा आहे की, माझे गुरू आचरेकर सर आणि माझा भाऊ, सखा आणि मार्गदर्शक अजित या दोघांनी माझ्या कारकिर्दीत मला एकदाही वेल प्लेड म्हटलं नाही. ते दोघे हाती आलेल्या यशाचा अत्यंत माफक आनंद साजरा करून लगेच पुढच्या सामन्याच्या तयारीला मला न्यायचे. या प्रकाराने मला यशाने हुरळून जाणं तर लांब राहिलं, यश- अपयशात अडकून पडायलाही झालं नाही. आचरेकर सर आणि अजितच्या प्रयत्नांमुळेच मला सराव करून सतत सुधारणा करायचा ध्यास लागला.

तिसरा मुद्दा म्हणजे, माझ्या कुटुंबाने माझ्याभोवतीचं वातावरण प्रयत्नपूर्वक सकारात्मक ठेवलं, ज्याने मला खेळावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणं शक्य झालं. याचं मोठं श्रेय माझ्या पत्नीला, अंजलीला जातं. चौथा मुद्दा म्हणजे, माझ्याबरोबर भारतीय संघात खेळलेले खेळाडू जिद्दीने भारलेले होते. आमच्यात संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची सकारात्मक चढाओढ होती. त्याचा चांगला परिणाम असा झाला की, तुम्ही नजर टाकली तर लक्षात येईल की, आम्ही सगळ्यांनीच एकत्र भरपूर मेहनत करून क्षमतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

पाचवा मुद्दा असा की, यशाने माजायचं नाही आणि अपयशाने खचायचं नाही, हा मंत्र आई-वडिलांनी दिला होता. खेळातील यश-अपयश हा वेगळा भाग आहे, मुळात माणूस म्हणून चांगला स्वभाव ठेवणं, याला नेहमी महत्त्व दिलं गेलं. कारण क्रिकेटरपेक्षा माणूस म्हणून जगण्याचा काळ जास्त आहे, हा विचार बिंबवला गेला. घरच्यांच्या त्याच संस्कारांचा पाठपुरावा करायचा मी प्रयत्न केला. अजितने मला नेहमी स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं. बघा ना, विश्वचषक जिंकायचं स्वप्न मनात बाळगलेलं होतं, जे २१ वर्षांनी सत्यात उतरलं.

हेच काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्याने मला जे साध्य करता आलं, ते कसं शक्य झालं, ते तुम्हाला थोडक्यात समजेल, असं सचिनने छान आढावा घेताना सांगितलं.

कोणाही मराठी माणसाला ज्या दोन भारतरत्न व्यक्तींचा जरा जास्त अभिमान आहे, त्या व्यक्ती म्हणजे लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर. या दोघाही महान व्यक्तींनी मराठी माणसाच्या मनावर गारुड केलं. देवाघरी गेल्या तरी लतादीदींचे सूर अजरामर आहेत, तसंच निवृत्त झाला तरी सचिन तेंडुलकरच्या खेळी अजरामर आहेत. लक्षणीय बाब अशी की, याच दोन भारतरत्नांमधलं नातं खूप तरल आणि भावनिक होतं. याच नात्याबद्दल पंडित हृदयनाथ आणि आदिनाथ या मंगेशकर पिता-पुत्रांशी गप्पा मारायला मिळाल्या.

क्रिकेटप्रेमाबद्दल बोलताना हृदयनाथजी सांगू लागले, आमच्या संपूर्ण मंगेशकर कुटुंबाला फार पूर्वीपासून क्रिकेटचं वेड होतं. आमच्या घरी जुन्या काळातील विनू मंकड, पॉली उम्रीगरपासून ते सुनील गावसकर, अजित वाडेकरांपर्यंत सगळे नेहमी यायचे. क्रिकेटच्या गप्पा आणि आमच्या घरचं जेवण याची मस्त भट्टी जमायची. सचिन तेंडुलकरच्या खेळाबद्दल तो लहान असल्यापासून वाचायला मिळायचं; पण त्या अगोदर खूप वर्षं रमेश तेंडुलकरांबरोबर संगीताच्या माध्यमामुळे नातेसंबंध जमले होते. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर कुंदनलाल सेहगल साहेबांच्या गाण्यांचे चाहते होते, तसंच आम्हीसुद्धा होतो. माझी सेहगल साहेबांच्या गाण्यांची आवड आणि अभ्यास बघून रमेश तेंडुलकरांनी माझा फक्त सेहगल साहेबांवर रचलेला कार्यक्रम केला होता, तेव्हापासून रमेश तेंडुलकरांशी दोस्ती झाली होती. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा खूप उमदा माणूस होता तो, असं आठवणी जागवताना हृदयनाथ म्हणाले.

तुम्हाला सांगतो, भारतीय संघाचा सचिन खेळत असतानाचा महत्त्वाचा सामना असला की, लतादीदी बाकीची कामं संपवून, लवकर तयार होऊन, पूजा करून सामना बघायला बसायच्या. सामन्यात सचिन फलंदाजी करत असताना अजिबात जागच्या हलायच्या नाहीत. सचिन चांगला खेळला आणि भारताने सामना जिंकला, तर घरात उत्सवाचं वातावरण असायचं. पण जर समजा, सचिन लवकर बाद झाला आणि भारतीय संघाने महत्त्वाचा सामना गमावला, तर मग वातावरण तंग असायचं. दीदी कधीकधी दोन-दोन दिवस कोणाशी संवाद साधायच्या नाहीत. अगदी त्यांना आलेल्या महत्त्वाच्या फोन कॉल्सनाही उत्तर द्यायच्या नाहीत. त्यांची निराशा जायला चांगलाच वेळ लागायचा, इतकं त्या मनापासून सचिनला फलंदाजी करताना आणि भारतीय संघाला खेळताना बघायच्या. काय सांगू तुम्हाला, तुमचा पटकन विश्वास बसणार नाही; पण सचिनने लतादीदींसमोर त्याचं लाडकं गाणं, ‘ओ सजना बरखा बहार आयी’ चक्क म्हणून दाखवायची हिंमत केली आहे, इतकं त्यांचं नातं खुलं आणि गोड होतं. सचिन लतादीदींना नेहमी आई म्हणूनच संबोधायचा, ज्याचं त्यांना फार कौतुक आणि समाधान होतं... हसत हसत हृदयनाथजी आठवण सांगून गेले.

पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे शब्द ऐकून मनात विचार आला की, खरंच लतादीदींनी आनंदघन या नावाने संगीत देऊन सुंदर गाण्यांनी आपल्याला आनंदी केलं, तर दुसऱ्‍या सचिन तेंडुलकरने गुणवत्तेला कष्टाची जोड देऊन क्रिकेटविश्वात वेगळीच उंची गाठून दाखवली. दोघेही त्या अर्थाने आपल्यासारख्या क्रिकेट आणि संगीत रसिकांसाठी आनंदघन बनले. सचिन आयुष्याचं अर्धशतक दिमाखात पूर्ण करतोय, म्हणजेच सचिनचा ५०वा वाढदिवस साजरा करताना २४ एप्रिल रोजी क्रिकेट रसिकांच्या घराघरांत गोड पदार्थ बनले गेले तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. कारण सचिन तेंडुलकर नुसता भारतरत्न नाहीये तर आपल्या कुटुंबाचा भाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com