वेगळ्या आव्हानांची स्पर्धा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC Mens T20 Worldcup Cricket Competition

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २००७ पासून आयोजित केलेल्या सर्व ‘टी-२०’ विश्‍वकरंडक स्पर्धांचं वार्तांकन करायची संधी मला मिळाली आहे.

वेगळ्या आव्हानांची स्पर्धा...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २००७ पासून आयोजित केलेल्या सर्व ‘टी-२०’ विश्‍वकरंडक स्पर्धांचं वार्तांकन करायची संधी मला मिळाली आहे. का कोणास ठाऊक; पण ५० षटकांच्या स्पर्धेपेक्षा मला दरवेळी वेगळा विजेता संघ देणारी ‘टी-२०’ स्पर्धा जास्त मजेदार वाटते. ‘टी-२०’ हा क्रिकेटचा असा प्रकार आहे, जिथे प्रत्येक सामन्यात आश्चर्यकारक निकाल लागायची शक्यता कसोटी किंवा एकदिवसीय क्रिकेटपेक्षा खूप जास्त असते. गंमत बघा, वेस्ट इंडीजचा सन्माननीय अपवाद वगळता कोणत्याही संघाने ‘टी-२०’ विश्‍वकरंडक दोनदा जिंकलेला नाही. २०२२ ‘टी-२०’ विश्‍वकरंडक स्पर्धा प्रारंभ होणार असताना यजमान ऑस्ट्रेलियन संघाला वेस्ट इंडीज संघाची बरोबरी करायची नामी संधी असल्याचं जाणवत आहे.

मैदानांचे मोठे आकार

लवकरच सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सर्व संघांना खेळताना एका गोष्टीची आठवण कायम मनात ठेवावी लागणार आहे, ती म्हणजे, ऑस्ट्रेलियातील मैदानांचे मोठे आकार. खास करून भारतीय संघाला विचार करावा लागणार की, मेलबर्न क्रिकेट मैदान आणि पर्थच्या नव्या स्टेडियमच्या सीमारेषा चांगल्याच मोठ्या आहेत. सिडनी आणि अ‍ॅडलेडच्या समोरच्या बाउंडरीज खूप मोठ्या आणि खेळपट्टीला समांतर एकदम जवळ असा प्रकार आहे.

मैदानाच्या मोठ्या आकाराचा फायदा गोलंदाजांना होईल. फलंदाजांना हे लक्षात ठेवावं लागणार आहे की, चुकीच्या फटक्याला छोट्या आकाराच्या मैदानावर षटकारही उगाच मिळून जातो, ऑस्ट्रेलियात तसं होणार नाही. कर्णधाराच्या डोक्याला मोठ्या मैदानावर क्षेत्ररक्षक नक्की कुठे उभा करायचा, याचा अंदाज लावणं हा मोठा ताप असेल, कारण मेलबर्नसारख्या मैदानावर मोठ्या जागा मोकळ्या दिसतात. तंदुरुस्तीच्या बाबतीत जे फलंदाज चांगली तयारी करून येतील, त्यांना पळून धावा जमा करायचं तंत्र अवलंबताना अडचण येणार नाही. लक्षात घ्या की, ऑस्ट्रेलियात ‘टी-२०’ सामन्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त धावा पळूनच जमा कराव्या लागतात, असे आकडे तज्ज्ञ सांगतात.

गोलंदाजांना मोठ्या मैदानाचा फायदा होणार आहे. फलंदाजाला सीमा पार करायला कोणती बाजू जवळ आहे आणि कोणती बाजू खूप लांब आहे याचं चित्र स्पष्ट असल्याने त्याप्रमाणे गोलंदाजीत बदल करून धावा रोखणं शक्य होणार आहे. स्थानिक पत्रकारांशी बोलताना लेग स्पीन गोलंदाज ऑस्ट्रेलियात प्रभाव पाडतात असं समजलं.

बाकी देशांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर चेंडूला वेग आणि उसळी नक्कीच थोडी जास्त मिळते. हा प्रकार दुधारी तलवारीसारखा आहे. वेगवान गोलंदाजांनी टप्पा आणि दिशा योग्य न राखली तर तोच वेग आणि चेंडूला मिळणारी उसळी फलंदाज त्यांच्या भल्याकरिता वापरतात, हे विसरून चालणार नाही. उलटपक्षी योग्य टप्पा, दिशा राखली, तर फलंदाजाला अपेक्षित ठिकाणी बॅटवर चेंडू लागत नाही आणि फटक्याचा अंदाज चुकतो.

ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर दर्जेदार फिरकी गोलंदाज योग्य परिणाम साधतो असं वारंवार दिसून आलं आहे. साहजिकच भाग घेणाऱ्या प्रत्येक संघात फिरकी गोलंदाजांचा भरणा दिसतो आहे. अगदी खरं सांगायचं तर, या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलियन संघच मोठा दावेदार वाटतो आहे. बाकीचे संघ एकमेकांच्या जवळ जातील अशा क्षमतेचे दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन संघात दर्जेदार अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असल्याने कर्णधाराच्या हाती बरेच पर्याय तयार होतात, जे त्यांच्या संघाचं बलस्थान आहे. खूप खोलवर असलेली फलंदाजी ऑस्ट्रेलियन संघाची ताकद वाढवते. अगदी थोडी कमजोरी वेगवान गोलंदाजीत आहे, कारण ‘टी-२०’ स्पेशालिस्ट गोलंदाज कमी आहेत. स्थानिक वातावरणाचा मोठा अनुभव ऑस्ट्रेलियन संघाच्या पथ्यावर पडला तर आश्चर्य वाटायला नको. त्याचबरोबर ‘आयसीसी’ स्पर्धेतील मोठ्या निर्णायक सामन्यात खेळाचा स्तर उंचवायची हातोटी ऑसी संघात आहे, असंही वारंवार दिसून आलं आहे.

भारतीय संघाकडून अपेक्षा कमी

जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा या दोन प्रमुख गोलंदाजांना नको त्या वेळी झालेली दुखापत भारतीय संघाची समस्या बनली आहे. विराट कोहलीचा फॉर्म परतला आहे; पण नजीकच्या भूतकाळात तीन प्रमुख फलंदाज रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि विराट कोहली एकत्रित चांगली कामगिरी करण्यात कमी पडले आहेत. कसोटी आणि एक दिवसीय सामन्यात कमाल फलंदाजी करणाऱ्‍या रिषभ पंतला ‘टी-२०’ क्रिकेटमध्ये अपेक्षित चमक दाखवता आलेली नाही. म्हणजेच सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीला आलेला बहर ही भारतीय संघाच्या फलंदाजीची जमेची बाजू आहे. अर्थातच हार्दिक पंड्याची सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरी आश्वासक आहे, यात दुमत असायचं कारण नाही.

भारतीय संघाच्या फलंदाजांना वरचढ कामगिरी करायची तयारी ठेवावी लागेल, तरच गोलंदाजीतील अडचणींवर मात करता येईल. त्यासाठी कोणत्याच फलंदाजाला १४० पेक्षा कमी स्ट्राइक रेटने खेळून चालणार नाही. त्याचबरोबर दोन विकेटकीपर्सना संघात घेण्यापेक्षा दीपक हुडाला संधी देणं फायद्याचं ठरेल असं वाटतं. जमेची बाजू अशी की, भारतीय संघाकडून कोणालाच खूप मोठ्या अपेक्षा नाहीत. तेच ओझं कमी झाल्याने खेळाडू मनमोकळा खेळ करतील असं स्वप्न बघायला काहीच हरकत नाही. एक गंमत अशी आहे की, जर कर्मधर्म संयोगाने भारतीय संघाने २३ ऑक्टोबरचा पाकिस्तानविरुद्धचा पहिलाच सामना जिंकला, तर अपेक्षांना परत एकदा उधाण येईल.

बाकी संघांबाबत बोलायचं झालं तर इंग्लंड आणि श्रीलंकेचे संघ शांतपणे चांगली संघबांधणी करून स्पर्धेत उतरत आहेत. इंग्लंडकडे बेन स्टोक्स आणि मोईन अलीसारखे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत, जे चांगल्या लयीत आहेत. श्रीलंकन संघाच्या पंखांत आशिया करंडक जिंकल्याने चांगलंच बळ आलं आहे. बऱ्‍याच लोकांना अफगाणिस्तानचा संघ आकर्षक वाटतो. त्यांच्या गोलंदाजीत चांगलीच धमक असली तरी फलंदाजी कमजोर आहे असं बऱ्‍याच वेळा दिसून आलं आहे. मला वाटतं, दर्जेदार वेगवान गोलंदाजीला फलंदाजांनी साथ दिली तर दक्षिण आफ्रिकेचा संघही आश्चर्यकारक कामगिरी करू शकतो. पाकिस्तान संघाचा गेल्या वर्षभरातील खेळ सातत्यपूर्ण आहे हे नाकारून चालणार नाही. नको त्या वेळी कचखाऊ कामगिरी केली नाही तर पाकिस्तान संघाला हरवणं सोपं असणार नाहीये; आणि सरते शेवटी उल्लेख वेस्ट इंडीजचा करावाच लागेल, कारण दोन वेळा ‘टी-२०’ विश्‍वकरंडक जिंकलेला तो एकमेव संघ आहे. ‘टी-२०’ क्रिकेट वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या शैलीला एकदम साजेसं आहे.

१६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर पात्रता सामने झाल्यावर २२ तारखेपासून मुख्य वर्ल्ड कपला सुरुवात होईल. दिवाळी सुटीच्या दिवसांत सगळी स्पर्धा होणार असल्याने भारतातील क्रिकेटप्रेमी दूरचित्रवाणी संचासमोरून हलणार नाहीत अशी परिस्थिती आहे.