कॅल्क्युलेटरच्या पलीकडचे आकडे !

या लेखाचं शीर्षक तुम्हाला पटत नसेल किंवा कळत नसेल तर फक्त एकदा कागदावर किंवा कॅल्क्युलेटरवर ४८,३९० आणि त्याच्यावर सात शून्य लिहून बघा.
IPL T-20 Cricket Competition
IPL T-20 Cricket CompetitionSakal
Summary

या लेखाचं शीर्षक तुम्हाला पटत नसेल किंवा कळत नसेल तर फक्त एकदा कागदावर किंवा कॅल्क्युलेटरवर ४८,३९० आणि त्याच्यावर सात शून्य लिहून बघा.

या लेखाचं शीर्षक तुम्हाला पटत नसेल किंवा कळत नसेल तर फक्त एकदा कागदावर किंवा कॅल्क्युलेटरवर ४८,३९० आणि त्याच्यावर सात शून्य लिहून बघा. हे आकडे माझ्या मनातील नाहीयेत. हे आकडे आहेत पुढील पाच वर्षांकरिता इंडियन प्रीमियर लीगच्या प्रक्षेपण हक्कांकरिता बोली लावली गेल्याचे. १८ वर्षांत भारतीय क्रिकेटच्या प्रक्षेपण हक्कांबाबत किती बदल झाला याकडे नजर टाकली, तर हे आकडे बघून डोकं गरगरायला लागतं. तीन टप्पे सांगतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल थोडा. १९९३ मध्ये आपल्या देशात भरवल्या जाणाऱ्या एका मोठ्या स्पर्धेकरिता दूरदर्शनने एक कोटी रुपये प्रक्षेपण हक्कांकरिता द्यायची तयारी दाखवली होती. त्यानंतर २००० ते २००४ च्या कालावधीकरिता भारतातील क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क चोवीसशे कोटी रुपयांना विकले गेले आणि आता भारतीय क्रिकेटचे नाही, तर दोन महिन्यांच्या कालावधीच्या आयपीएल स्पर्धेचे हक्क सगळे मिळून ४८ हजार ३९० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. कसं घडलं हे सगळं... काय आहे इतिहास आणि अर्थशास्त्र... समजावण्याचा प्रयत्न करतो.

दूरदर्शनचा जमाना

१९९३ या वर्षाच्या आधी देशात टीव्हीवर काहीही दाखवायचं झालं तर एकमेव पर्याय होता दूरदर्शनचा; आणि त्याकरिताही दूरदर्शनला फी म्हणून पैसे भरावे लागायचे. झालं असं की, १९९३ मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने संघटनेची डायमंड ज्युबिली साजरी करायला पाच देशांच्या संघांदरम्यान स्पर्धा भरवण्याचा घाट घातला. संघटनेचे अध्यक्ष जगमोहन दालमिया अत्यंत चाणाक्ष संघटक होते. भारतात झालेल्या १९८७ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर दालमियांना भारतातील क्रिकेटचं महत्त्व आणि त्याचं बाजारमूल्य काय असायला हवं याचा अंदाजही होता. त्यांनी प्रथमच पत्र लिहून दूरदर्शनला गुगली टाकला की, पाच देशांच्या खास स्पर्धेचं भारतात प्रक्षेपण करायला दूरदर्शन काय बोली लावू शकतं? इतके दिवस फी ‘घेण्या’ची सवय असलेल्या दूरदर्शनला हा गुगली त्रासदायक होता.

भारतातील क्रिकेटच्या खेळाची वाढती लोकप्रियता जाणून त्यांनी १९९३ मध्ये चक्क एक कोटी रुपये प्रक्षेपण हक्कांकरिता देण्याची तयारी दाखवली. चतुर दालमियांनी हे हक्क फक्त आणि फक्त भारतातील प्रक्षेपणाकरिता असतील हे नमूद करून त्याच स्पर्धेचं भारत सोडून इतर क्रिकेटजगतात दाखवायचे हक्क ट्रान्स वर्ल्ड इंटरनॅशनलला विकायचं पक्कं केलं. भारतीय क्रिकेटकरिता जगमोहन दालमियांचा हा निर्णय मैलाचा दगड ठरला.

१९९१ च्या सुमारास भारतात परदेशी टीव्ही चॅनेल केबलद्वारे दिसायला सुरुवात झाली. इमारतींवरून केबल खिडक्यांमधून घरात जाताना दिसू लागल्या. इतके दिवस दूरदर्शनचं सामान्य दर्जाचं प्रक्षेपण बघायची सवय असलेल्या भारतीय डोळ्यांना नवं प्रक्षेपण म्हणजे ब्लॅक अँड व्हाइटच्या दृश्यातून सरळ सप्तरंगी इंद्रधनुष्यं दिसू लागल्याच्या फरकाचं होतं. बघता बघता भारतात केबलचा प्रसार झपाट्याने व्हायला लागला आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने योग्य वेळी उचल खाल्ली. आर्थिक वाटाघाटीत खमक्या स्वभावाच्या ललित मोदींनी २००० ते २००४ भारतीय क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क चोवीसशे कोटी रुपयांना निंबस कंपनीला विकले. २०१२ मध्ये ६ वर्षांकरिता हेच हक्क स्टार स्पो‍र्टसने ३८५१ कोटी रुपयांना हसत हसत विकत घेतले.

२००७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने पहिली ‘वर्ल्ड टी-२०’ स्पर्धा धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली आणि त्याच टी-२० क्रिकेटच्या भरधाव वेगाने धावणाऱ्‍या अश्वावर आरूढ होत बीसीसीआयने २००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीग चालू केली आणि सोनी नेटवर्कला १० वर्षांच्या प्रक्षेपण हक्क कराराकरिता १३१५ कोटी रुपये मोजावे लागले. २०१८ ते २०२२ या फक्त ५ वर्षांच्या कालखंडाकरिता स्टार स्पोर्टसने आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क ३४२२ कोटींना विकत घेतले.

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अजित रानडे यासंदर्भात म्हणाले, ‘‘एकाच वेळी मोठ्या संख्येत लोक टीव्हीवर काहीतरी मनापासून लाइव्ह बघत आहेत असे सोहळे कमी आहेत. खूप उत्सुकतेचे निवडणुकांचे निकाल, ऑस्कर पुरस्काराचा सोहळा आणि आयपीएल सामना ही उदाहरणं लक्षात घेतली तर मग समजतं की, जास्तीत जास्त दर्शक एका जागी असण्याची शक्यता अशाच सोहळ्यांत दिसते. एक प्रकारची उत्कंठा असे सोहळे थेट प्रक्षेपणाच्या वेळी बघण्याची मजा असते. हे सोहळे विरळा असतात म्हणून त्यांचं बाजारमूल्य वाढतं. मग जाहिरातदार अशा सोहळ्यात आपापल्या उत्पादनाची जाहिरात करतात. जेव्हा इतक्या मोठ्या रकमेची बोली लावून हक्क विकत घेतले जातात, तेव्हा त्याचा परतावा कसा मिळेल याचा खोल विचार केला जातो,’’ सोप्या भाषेत अजित रानडेंनी समजावून दिलं.

भारतीय क्रिकेटला आयपीएल स्पर्धा चालू झाल्यापासून खेळाबरोबरीने अर्थकारणातही झळाळी आली. प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्‍या दर्जेदार भारतीय खेळाडूंना जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळता येऊ लागलं. सोबतीला बीसीसीआयची तिजोरी भरून वाहायला लागली, इतका पैसा जमा व्हायला लागला. जमा होणारा हा पैसा आठ वर्षांच्या कालखंडात परत क्रिकेटमध्येच खर्च करावा लागण्याचं आयकर नियमांचं बंधन असल्याने राज्य संघटनांना भरघोस आर्थिक मदत करून भारतभर आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट स्टेडियम उभारली गेली. सबल अर्थकारणामुळे सर्वांत चांगला परिणाम करणारा निर्णय झाला तो माजी खेळाडूंना निवृत्तिवेतन देण्याचा. यात नुसतंच आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच नव्हे, तर प्रथम श्रेणीचं क्रिकेट खेळलेल्या माजी खेळाडूंनाही निवृत्तिवेतन मिळू लागलं. त्याचबरोबर स्थानिक खेळाडूंच्या सामना वेतनामध्ये आणि सामना खेळायला गेल्यावरच्या रोजच्या भत्त्यात लक्षणीय वाढ झाली. महिलांच्या क्रिकेटलाही बीसीसीआयने आपल्या घरात घेऊन सबल करायचा प्रयत्न चालू केला.

आयपीएल स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकरिता सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरली आहे. २०२३ ते २०२७ चे संपूर्ण हक्क ४८ हजार ३९० कोटी रुपयांना विकले गेल्यावर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सर्व राज्य क्रिकेट संस्थांना पत्र लिहिलं आहे. बीसीसीआयने प्रथम लगेच माजी खेळाडूंच्या निवृत्तिवेतनात वाढ केली आहे. सर्वांत कमी पेन्शन असलेल्या पहिल्या दोन स्तरांचं वेतन दुप्पट करायचा चांगला निर्णय तातडीने जाहीर केला गेला. हाती येणाऱ्‍या पैशांतून बीसीसीआय आणि राज्य संघटनांनी मिळून वयोगटातील क्रिकेटमध्ये आमूलाग्र सुधारणा करायची इच्छा बोलून दाखवली आहे. भारतीय क्रिकेट मजबूत करून वरिष्ठ संघाची कामगिरी सातत्याने चांगली होण्याची गरज बीसीसीआय जाणून आहे असं पत्रातून समजतं. मुख्य संघाची कामगिरी चांगली होत राहिली, तरच जागतिक क्रिकेटमध्ये भारताला मानाचं स्थान मिळणार आहे, हे जय शहा आणि सौरव गांगुली मनोमन जाणून आहेत.

दरवर्षी भारतीय क्रिकेटच्या तिजोरीत १० हजार कोटींपेक्षा जास्त रुपये जमा होणार म्हटल्यावर बऱ्‍याच लोकांना त्रास व्हायला लागला आहे. यात प्रत्येक चांगल्या गोष्टीला नाक मुरडणारे लोक आढळतात, तसंच इतर खेळांचा उमाळा आणून क्रिकेटवर राग करतात. मला इतकंच सांगायचं आहे की, बीसीसीआयची भरलेली तिजोरी बघून चिडून काहीही होणार नाही. बाकी खेळांच्या संयोजकांनी राग बाजूला करून आपापल्या खेळाचा प्रचार, प्रसार कसा करावा हे बीसीसीआयकडून शिकावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com