आनंदघनाची बरसात थांबणार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

roger federer

रॉजर फेडरर निवृत्त झाला आणि तरीही क्रीडा वार्ताहर म्हणून मी काही लिहिलं नाही याचं कारण असं होतं की, त्या धक्क्यातून सावरायला एक आठवडा लागला.

आनंदघनाची बरसात थांबणार...

रॉजर फेडरर निवृत्त झाला आणि तरीही क्रीडा वार्ताहर म्हणून मी काही लिहिलं नाही याचं कारण असं होतं की, त्या धक्क्यातून सावरायला एक आठवडा लागला. रॉजर फेडररने, त्याच्या नजाकतभऱ्या टेनिसने जगाला मोहात पाडलं. गेली जवळपास दोन दशकं त्याच्या खेळाचा आनंद आपण घेतला. बाकी खेळाडू जास्तीत जास्त वयाच्या पस्तिशीला टेनिसपासून दूर जातात, फेडररने जबरदस्त तंदुरुस्ती ठेवून चाळिशीपर्यंत सर्वोच्च टेनिस खेळणं कायम ठेवलं होतं. आपल्याला वाटलं की, फेडरर कधीच निवृत्त होणार नाही. आपल्याला माहीत असतं की, कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते. चांगली असो वा वाईट प्रत्येकाला शेवट हा असतोच. लेकिन दिल है के मानता नहीं. फेडरर निवृत्त होणं मेंदूला समजत असलं तरी मनाला झेपत नव्हतं.

रॉजर फेडररने वयाच्या आठव्या वर्षी टेनिस खेळणं सुरू केलं. १७ वर्षांचा असताना त्याने विम्बल्डन ज्युनियरचं विजेतेपद पटकावलं तेव्हाही कोणाला वाटलं नव्हतं की, हा खेळाडू अशी उंची गाठेल, २० ग्रँड स्लॅम विजेतेपदांवर आपलं नाव कोरेल. गेल्या २० वर्षांत आपण पुरुष टेनिस प्रांतात कमाल होताना बघितलं. फेडरर + नदाल आणि जोकोविचला एकमेकांविरुद्ध खेळताना बघितलं. तिघांनी मिळून ६३ ग्रँड स्लॅम विजेतीपदं पटकावली त्याचे आपण साक्षीदार झालो. त्या माळेतील अग्रणी फेडरर आता मोठ्या स्पर्धांत खेळताना दिसणार नाहीये याचं मनोमन दुःख करावं, की त्याने दिलेल्या आनंदाची साठवण मनात करून समाधानी व्हावं या संभ्रमात मी होतो.

सांगून विश्वास बसणार नाही; पण रॉजर फेडररसुद्धा भडकू स्वभावाचा होता. खेळताना चूक झाली किंवा पंचांचा निर्णय पटला नाही की, तो थोडा धिंगाणा घालायचा. नंतर फेडररने आपल्या विचारांत आमूलाग्र बदल केला, त्याने प्रयत्नपूर्वक मनावर ताबा मिळवला. खेळ त्याचा अफलातून होताच, त्याला शांत विचारांची साथ मिळाली आणि बदल दिसू लागले. २००३ मध्ये त्याच बदलाचं फळ त्याला मिळालं, जेव्हा विम्बल्डनच्या हिरवळीवर त्याने पहिलं जेतेपद पटकावलं. लोकांना त्याच्या शैलीची भुरळ पडली. सर्व्हिस करतानाची त्याची लकब असो की फोरहँडचा फटका, किंवा बॅकहॅन्ड डाउन द लाइनचा शॉट असो; फेडररच्या खेळात प्रेक्षकांना काव्य दिसू लागलं. जगात फेडरर कुठेही खेळणार असं समजलं की, टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क चढ्या भावाने विकले जाऊ लागले, तसंच प्रत्येक सामन्याची तिकिटं हातोहात संपू लागली. खेळाबरोबर त्याच्या शांत सुस्वभावी वर्तणुकीचा मोठा परिणाम समाजावर पडू लागला आणि लोक फेडररवर फक्त खेळाडू म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून प्रेम करू लागले.

सकारात्मक खुन्नस

खेळ म्हटलं की खुन्नस आलीच. टेनिसच्या खेळात अशीच मरणाची खुन्नस किंवा खरंतर स्पर्धा फेडरर + नदाल + जोकोविचमध्ये बघायला मिळू लागली. मात्र, इथे एक फरक होता की, बाकी खेळांतील दिसणाऱ्या खुन्नसमध्ये नकारात्मकता होती, ती या तीन महान खेळाडूंच्या स्पर्धेत कधीच दिसली नाही. टेनिसच्या कोर्टवर उतरल्यावर तिघेही एकमेकांना हैराण करून सोडायला शक्य ते काय, अशक्य तेपण करून दाखवू लागले. फक्त यश मिळाल्यावर धुंदी बघायला मिळाली नाही की पराभव झाल्यावर अनावश्यक नैराश्य आढळलं नाही. सगळ्या हालचालींत एक प्रकारची सभ्यता होती.

फेडरर नदाल आणि जोकोविचच्या खेळाची शैली वेगळी होती. सामना खेळताना फेडररच्या हालचालींत सहजता होती. नादालच्या खेळात शारीरिक कष्ट जास्त दिसायचे आणि जोकोविच ह्या दोन्ही शैलींचा संगम होता. एक नक्की होतं की सर्वोच्च स्तरावर मोठं यश मिळवायला लागणारं तंत्र, एकाग्रता आणि कमालीचा फिटनेस तिघांकडेही होता. फेडरर सर्व्ह आणि व्हॉलीचा कलाकार होता, तर नदाल आणि जोकोविच कोर्टच्या मागे उभं राहून आपलं कसब दाखवायचे. ‘‘फेडरर जेव्हा बॅक हॅन्ड स्लाइस मारायचा, तेव्हा मला एखादा तरबेज व्हायोलनिस्ट बोइंग करतोय असा भास व्हायचा, कारण शॉट मारताना आवाज व्हायचा नाही. अशा वेळी मनातल्या मनात मी ‘क्या बात है’ म्हणायचो आणि वाटायचं की काम सोडून खेळाचा आनंद घ्यावा.’’ १२ वर्षं विम्बल्डनला लाइन अम्पायर म्हणून काम केलेला आणि फेडररचे अनेक सामने कोर्टवरून अनुभवलेला प्रशांत लेले सांगून गेला.

फेडरर आणि नदाल मैदानावर एकमेकांचे टोकाचे प्रतिस्पर्धी होते; पण त्यांच्यात घट्ट मैत्री होती. एकदा नदालने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात फेडररला पराभूत केलं आणि एकाच वर्षात चारही स्लॅम जिंकण्याचं फेडररचं स्वप्न भंग पावलं. फेडररला अश्रू अनावर झाले, कारण तो पराक्रम करणारे रॉड लेव्हर सामना बघत होते. नदालने जाऊन फेडररला शांत केलं आणि त्या दोघांची मैत्री बघून प्रेक्षकांचे डोळे कौतुकाने पाणावले.

फेडररने मान्य केलं होतं की, नदाल आणि जोकोविचमुळे माझ्या खेळात बदल करणं भाग पडलं आणि सुधारणा झाली. ८० ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी ६३ स्पर्धा या तिघांनी जिंकल्या, यावरून समजून येतं की, टेनिसजगतावर राज्य गाजवताना फेडरर, नदाल आणि जोकोविचने लोकांना खुर्चीला खिळवून ठेवलं. नदालने त्याच्या गावी टेनिस अकादमी सुरू केली, त्याच्या उद्‍घाटनाला रॉजर फेडररला बोलावलं होतं, हे लक्षात घेतलं पहिजे.

भरपूर सामाजिक कार्य

फेडररने दक्षिण आफ्रिकेत जाऊन तिथल्या अत्यंत गरीब देशातील लहान मुलांना शालेय शिक्षण मिळावं म्हणून त्याच्या फाउंडेशनतर्फे भरपूर काम केलं आहे. जवळपास ६८ दशलक्ष स्वीस फ्रँक्स फेडरर फाउंडेशनने खर्च करून २० लाख गरीब मुलांच्या शिक्षणाची पूर्ण सोय केली आहे.

दोन अधिक दोन जुळ्या मुलांचा फेडरर बाप आहे. चांगल्या स्तरावरचं टेनिस खेळलेली त्याची पत्नी मिरका त्याला खेळात आणि सामाजिक कार्यात समर्थ साथ देत आली आहे. कालपासून सुरू झालेल्या लेव्हर कप स्पर्धेत फेडरर आपल्याला शेवटच्या वेळेला मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. नदाल, फेडरर आणि जोकोविच एकत्र एका संघात खेळताना बघायची ही शेवटची वेळ आहे. आपण क्रीडाप्रेमी त्याचा आनंद घेऊयात. फेडररकडून खेळाबरोबर चांगली वर्तणूक राखण्याचा आदर्श घेऊयात आणि टेनिस जगतावर २० वर्षं अधिराज्य गाजवणाऱ्या ह्या महान खेळाडूला उभं राहून टाळ्या वाजवत मानवंदना देऊयात.