आता लक्ष ‘ओव्हल’कडे

टाटा आयपीएल स्पर्धा जवळपास दोन महिन्यांनंतर दिमाखात संपली. तीन दिवस एक टी-२० सामना चालू शकतो याचीच गंमत वाटली.
mahendra singh dhoni and revindra jadeja
mahendra singh dhoni and revindra jadejasakal

टाटा आयपीएल स्पर्धा जवळपास दोन महिन्यांनंतर दिमाखात संपली. तीन दिवस एक टी-२० सामना चालू शकतो याचीच गंमत वाटली. २८ मे रोजी पावसाने घोळ घातला म्हणून अंतिम सामना दुसऱ्या दिवसावर गेला. सोमवारी गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान सायंकाळी साडेसातनंतर सुरू झालेला अंतिम सामना मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक वाजून चाळीस मिनिटांनी संपला.

‘आयपीएल’च्या निर्णायक सामन्यात योग्य वेळी योग्य खेळ कसा करायचा, याचा मोठा अनुभव असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरलं. परिणामी अगोदरच क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला महेंद्रसिंह धोनी आता दंतकथा बनला नाही तर नवल.

अंतिम सामना सुरू होत असताना कागदावर गुजरातचा संघ मजबूत वाटत होता. गुजरात संघाचे महंमद शमी, राशीद खान आणि मोहत शर्मा भरपूर बळी घेणाऱ्‍या गोलंदाजांच्या यादीत वरच्या क्रमांकावर होते. शुबमन गिल फारच भन्नाट फॉर्ममध्ये होता; आणि २१४ धावांचा डोंगर उभारूनही हार्दिक पंड्याच्या संघाला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजयापासून रोखता आलं नाही. बऱ्‍याच अडचणी असूनही धोनीने आपल्या विश्वासू प्रशिक्षकांसह संघबांधणी केली, हेच यशाचं मुख्य कारण आहे.

रवींद्र जडेजा आणि दीपक चहरचा अपवाद वगळता चेन्नईचे इतर गोलंदाज आयपीएलच्या अनुभवात कमी होते. धोनीने तुषार देशपांडे, थिक्षना आणि मलिंगासारखी वेगळी गोलंदाजीची शैली असलेल्या पथिरानाला भरपूर मानसिक पाठबळ देत पुढे आणलं. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेला संघात नुसती जागा दिली नाही, तर त्याला तिसऱ्‍या क्रमांकावर फलंदाजी करायची संधी दिली. या सगळ्याच गोष्टींना खास धोनी टच होता.

जडेजाला मनवलं

खरी मेख रवींद्र जडेजाची होती. २०२२ मध्ये चेन्नई संघाने मोठा विचार करून जडेजाला कर्णधार बनवलं. रवींद्र जडेजाने कधीच अगोदर नेतृत्व केलं नसल्याने त्याला तो भार झेपला नाही. चेन्नई संघाची कामगिरी तर खराब झालीच, वर जडेजाच्या कामगिरीला धक्का लागला. माझ्या माहितीप्रमाणे चेन्नई संघ व्यवस्थापनातील एका उर्मट अधिकाऱ्‍याने जडेजाला त्यावरून चुकीच्या शब्दांत टोकलं. जडेजा चांगलाच नाराज झाला.

इतका की, शेवटचे काही सामने मनःस्थिती बरोबर नसल्याने तो खेळला नव्हता. गेल्यावर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्‍यावर एकमेव कसोटी सामना, काही टी-२० आणि एक दिवसीय सामने खेळायला गेला असताना कधी नव्हे ते जडेजा मला निवांत गप्पा मारायला भेटला. त्याच गप्पांदरम्यान मनातून खूप नाराज झालेला जडेजा म्हणाला होता की, मी चेन्नई संघाकडून २०२३ ची आयपीएल स्पर्धा नाही खेळणार, माझं मन उडालं आहे.

ही बाब मित्र या नात्याने मी धोनीच्या कानावर घातली होती. त्यानंतर धोनी आणि श्रीनिवासन यांनी काय जादू केली देव जाणे; पण त्यांनी जडेजाला चेन्नई संघात कायम ठेवलं. अंतिम सामन्यात अत्यंत दडपणाखाली जडेजाने १० धावा दोन चेंडूंत जमा करायचं दाखवलेलं कसब सगळ्यांना वेड लावून गेलं. सामना जिंकल्यावर धोनीने जडेजाला मिठी मारून ज्या प्रेमाने हवेत उचललं, तो क्षण बरंच काही बोलून गेला.

उत्तराधिकारी शोधावाच लागेल

संघाने कामगिरीत दाखवलेलं कमालीचं सातत्य बघता श्रीनिवासन धोनीला चेन्नई संघाला सोडू देणार नाहीत; पण अखेर प्रत्येक चांगल्या गोष्टीचाही एक शेवट असतो. २०२३ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धोनीच्या डाव्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली. मनाची कणखरता दाखवत धोनीने संपूर्ण स्पर्धा पार पाडली. वयाची चाळिशी पार केल्यावर अशाच दुखापती होतात आणि त्यातली दुखापत गंभीर झाली, तर अचानक कोणा खेळाडूला संघाची धुरा सोपवणं कठीण जाईल याचा विचार करून, चेन्नई संघाला धोनीचा उत्तराधिकारी शोधण्यावाचून पर्याय नाहीये.

शस्त्रक्रिया या गोष्टीला धोनी टाळत आला आहे. २०२३ आयपीएल स्पर्धेत झालेली दुखापत नुसत्या उपचारांनी बरी होणारी नाहीये, म्हणजेच धोनीला गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यावाचून पर्याय नाही. भल्याभल्या आव्हानांना हसत ‍सामोरं जाणाऱ्‍या धोनीकरिता शस्त्रक्रियेला सामोरं जाणं ही मोठी सत्त्वपरीक्षा असणार आहे. या सगळ्याचा विचार करता धोनी आपला शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळला आहे असं मलाही वाटतं आहे.

२०२३ टाटा आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना बऱ्‍याच कारणांनी संस्मरणीय ठरला. दोनही संघांनी आपापलं सर्व कौशल्य पणाला लावलेलं दिसलं. पावसाने व्यत्यय आणूनही प्रेक्षकांनी सामन्याचा पिच्छा सोडला नाही. दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करायची धमक कोणात दिसते आणि खेळ शेवटच्या क्षणापर्यंत कसा यश-अपयशाच्या झोपाळ्यावर झुलत असतो हे बघायला मिळालं. सर्वांत भावलेली गोष्ट अशीही आहे की, सामना संपल्यावर विजेतेपद मिळवलेला धोनी आणि अखेरच्या क्षणी अपयश आलेला हार्दिक पंड्या दोघांचीही वर्तणूक अत्यंत प्रगल्भ, सभ्य होती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मानाच्या कसोटी सामन्यासाठी तीन ग्रुपमध्ये भारतीय कसोटी संघातील खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. कौंटी संघाकडून खेळताना पोत्याने धावा करणारा चेतेश्वर पुजारा लंडनला होताच. जसजसं आयपीएलचं सत्र शेवटच्या टप्प्यात आलं, तसं सहभागी न होणारे खेळाडू प्रशिक्षकांच्या ताफ्यासह इंग्लंडला रवाना झाले. आयपीएल अंतिम सामना खेळून शुबमन गिल, महंमद शमी, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा मंगळवारी रात्री लंडनला गेले आहेत.

इंग्लिश वातावरण आणि खेळपट्टीचा विचार करता भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाला एकमेव कसोटी सामन्यात वर्चस्व गाजवायची संधी असल्याचं सर्व क्रिकेट पंडित बोलू लागले आहेत. मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड आणि कप्तान पॅट कमिन्सचं त्रिकूट भारतीय फलंदाजांना प्रश्न विचारायला उत्सुक आहे. भरपूर टी-२० क्रिकेट खेळलेले भारतीय फलंदाज आणि वेगवान गोलंदाज इंग्लिश वातावरणाच्या आणि मोठ्या कसोटी सामन्याच्या गरजा ओळखून आपल्या खेळात बदल कसा करतात, यावर बरंच काही अवलंबून असेल.

नेहमी असे महत्त्वाचे सामने फक्त लॉर्डस् मैदानावरच खेळवले गेले आहेत. पहिल्यांदा ओव्हल मैदानाला हा मान मिळाला आहे. भरपूर सामने ओव्हल मैदानावर कव्हर केलेले असल्याने बाकी इंग्लंडच्या मैदानांपेक्षा ओव्हलची खेळपट्टी भारतीय खेळाला जास्त पोषक असल्याचा माझा अंदाज आहे. गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात न्यूझिलंड समोर खेळताना भारतीय संघाला सूरच गवसला नव्हता. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळायला राहुल द्रविड प्रशिक्षक नात्याने काय योजना आखतो आणि त्याला रोहित शर्मा कप्तान म्हणून कसं मैदानात राबवतो, हे बघायला मी इंग्लंडला येऊन पोहोचलो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com