सत्कार्याची सुवर्णसंधी (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 16 एप्रिल 2017

अनेकदा सामाजिक कार्याला मदत करायची अनेकांची इच्छा असते; पण योग्य संधी मिळत नाही. एका वेगळ्या कामाला हातभार लावायची संधी आता चालून आली आहे. स्वतः दृष्टिहीन असलेल्या दिव्यांशू गणात्रानं गेल्या वर्षी सायकलपटू गगन ग्रोव्हरबरोबर टॅंडम सायकलवरून मनाली खारदुंगला हा ५५० किलोमीटरचा प्रवास केला. आता दिव्यांशू अशा आणखी दहा दिव्यांग मित्रांना बरोबर घेऊन जाण्याचं स्वप्न बघतो आहे. त्याच्या या मोहिमेसाठी ‘क्राउड फंडिंग’ची गरज आहे. या मोहिमेविषयी आणि त्यासाठी सर्वसामान्यांना करता येणाऱ्या आर्थिक मदतीच्या संधींविषयी...

अनेकदा सामाजिक कार्याला मदत करायची अनेकांची इच्छा असते; पण योग्य संधी मिळत नाही. एका वेगळ्या कामाला हातभार लावायची संधी आता चालून आली आहे. स्वतः दृष्टिहीन असलेल्या दिव्यांशू गणात्रानं गेल्या वर्षी सायकलपटू गगन ग्रोव्हरबरोबर टॅंडम सायकलवरून मनाली खारदुंगला हा ५५० किलोमीटरचा प्रवास केला. आता दिव्यांशू अशा आणखी दहा दिव्यांग मित्रांना बरोबर घेऊन जाण्याचं स्वप्न बघतो आहे. त्याच्या या मोहिमेसाठी ‘क्राउड फंडिंग’ची गरज आहे. या मोहिमेविषयी आणि त्यासाठी सर्वसामान्यांना करता येणाऱ्या आर्थिक मदतीच्या संधींविषयी...

चांगलं सामाजिक काम बघून खूप लोक भारावून जातात. ‘मलाही काहीतरी करायचं आहे...पण नक्की कुठून सुरवात करू समजत नाही,’ असे शब्द बऱ्याच वेळा कानावर पडतात. आपण करत असलेले दान सत्पात्री होत आहे की नाही, याची शंका बऱ्याच देणगीदारांना येते, तर काही इच्छुक (?) देणगीदार हे कारण सांगून देणगी द्यायलाच टाळाटाळ करतात. आजच्या लेखातून माझ्यासकट सर्वांनाच एक सत्कार्याची सुवर्णसंधी आहे, ती सांगायचा प्रयत्न करतो. बघा पटतं का...

अपंग किंवा दृष्टिहीन लोकांना भेटले, की बहुतांशी सुदृढ लोकांना त्यांची कणव येते. मदत करायची इच्छाही काही लोकांना होते. काही लोक पुढं जाऊन मदत करतातही. बरेच लोक नुसतीच करुणा दाखवत निघून जातात. अपंग किंवा दृष्टिहीन लोकांना संबोधण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दिव्यांग’ हा नवा शब्द वापरला, जो अत्यंत लक्षणीय बदल करणारा ठरला आहे. दिव्यांग असलेल्या व्यक्तीला दर वेळी समोरच्या सुदृढ माणसाकडून करुणा किंवा दया नको असते. त्यांना हवा असतो समानतेचा मान. दर वेळी त्यांना मदत नको असते, हवी असते सहभागाची चांगली संधी. ज्या वेळी अशी संधी मिळते त्या वेळी चित्र बदलतं.

एक उदाहरण देतो. पुण्यातील काही दृष्टिहीन मुलं सचिन तेंडुलकरची चाहती होती. त्यांनी मॉडर्न शाळेच्या शिक्षिकांना मदतीला घेऊन प्रथम सचिनवरच्या पुस्तकाचं ब्रेल लिपीत रूपांतर केलं आणि नंतर त्याचं अभिवाचन करून ऑडियो सीडी काढली. या संपूर्ण कार्यात कोणी पुस्तकाचं ब्रेल लिपीत रूपांतर करायला मदत केली, कोणी ऑडियो रेकॉर्डिंग करायला स्टुडिओ उपलब्ध करू दिला, तर कोणी त्या रेकॉर्डिंगला सीडीवर उतरवायला मदत केली. ‘एकमेका साह्य करू’ असाच हा प्रकार होता. याला म्हणतात सहकार्यानं चांगलं काम पूर्ण करणं- ज्यातून सहभागी होणाऱ्या सर्वांनाच अपार समाधान मिळालं. प्रोजेक्‍ट काय आहे समजल्यावर सचिन तेंडुलकरला त्याची कमाल वाटली. सचिननं सर्व सहभागी कलाकारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत नाश्‍ता करून या अनोख्या सीडीचं कौतुक केलं होतं.

ॲडव्हेंचर बियाँड बॅरिअर्स
पुण्यातला नामांकित सायकलपटू गगन ग्रोव्हरनं पुढची पायरी गाठली. त्यानं दिव्यांशू गणात्रा या आपल्या मित्राला सोबत घेऊन टॅंडम सायकलवरून मनाली खारदुंगला हा ५५० किलोमीटरचा प्रवास केला. दिव्यांशू गणात्रा हा एक अत्यंत तंदुरुस्त, साहसी, उत्साही दृष्टिहीन मुलगा आहे. साहस सहल पूर्ण केल्यावर दिव्यांशू भारावून गेला. आपण अनुभवलेला आनंद इतरही इच्छुक दिव्यांग मित्र-मैत्रिणींना द्यायचा, असा ठाम निश्‍चयच त्यानं मनाशी केला. दिव्यांशूनं मग ‘ॲडव्हेंचर बियाँड बॅरिअर्स’ नावाची संस्था चालू केली- ज्यात तो त्याच्यासारख्या साहसी दिव्यांग असलेल्या व्यक्तींना साहसी क्रीडा प्रकारांत भाग घ्यायची साद घालतो. येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यात दिव्यांशूची संस्था दहा दिव्यांग व्यक्तींना मनाली ते खारदुंगला सहलीला घेऊन जाणार आहे.

कोण आहे दिव्यांशू गणात्रा?
व्यवसायानं दिव्यांशू गणात्रा क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे. त्यानं स्वत:चे दोन व्यवसाय सुरू करून ते यशस्वी करून दाखवले आहेत. विशीच्या उंबरठ्यावर असताना दिव्यांशूची दृष्टी गेली; पण या पठ्ठ्यानं हार न मानता आपला साहसी खेळाचा छंद प्राणपणानं जोपासला आहे. तो भारताचा पहिला ‘सोलो पॅराग्लायडिंग पायलट’ आहे. ‘स्कुबा डायव्हिंग’ करणं दिव्यांशूला जाम आवडतं. याच दिव्यांशूनं गेल्या वर्षी गगन ग्रोव्हरबरोबर टॅंडम सायकलनं मनाली ते खारदुंगला ५५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. दिव्यांशूला ख्यातनाम ‘टेड टॉक’मध्ये दोन वेळा मानानं बोलावलं गेलं आहे. ‘‘माझी कथा आहे; पण आता मला माझ्यासारख्या दिव्यांग असलेल्या मित्र-मैत्रिणींना प्रोत्साहन देऊन त्यांची कथा तयार करायची आहे,’’ असं उत्साही आवाजात दिव्यांशू सांगत होता.

महत्त्वाकांक्षी मोहीम
नुसतं बोलेल तो दिव्यांशू कसला? त्यानं पुढाकार घेऊन मोहीम आखली आहे. मनाली ते खारदुंगला अशी दहा दृष्टिहीन मित्र आणि इतर डोळस मित्रांसोबत टॅंडम सायकलनं पूर्ण करायची महत्त्वाकांक्षी मोहीम दिव्यांशूनं स्थापन केलेल्या ‘ॲडव्हेंचर बियाँड बॅरिअर्स’ संस्थेनं हाती घेतली आहे. २९ जुलै ते १० ऑगस्ट या काळात पहिली बॅच ही मोहीम पूर्ण करेल आणि १२ ते २४ ऑगस्ट या काळात दुसरी बॅच मोहीम फत्ते करेल. दिव्यांग असलेल्या व्यक्तीला साहस करण्यापासून आणि स्वत:ची क्षमता खऱ्या अर्थानं आजमावून बघण्यापासून कोणी रोखू शकत नाही, हेच या मोहिमेचं मर्म आहे.
दोघांनी चालवायच्या दहा टॅंडम सायकली, सोबत दहा सोलो सायकलिस्ट आणि पाच सहायकांचा या मोहिमेत समावेश असेल. सहायक म्हणून एक डॉक्‍टर, एक फिजिओथेरपिस्ट, एक सहल संचालक, एक खानसामा सोबत जाणार आहे.
सहा हजार फूट उंचीवर मनाली गाव आहे. तिथून मोहीम चालू होईल आणि तेरा हजार फुटांवर असलेल्या रोहतांग पासवरून पुढं जाऊन जवळपास सोळा हजार फुटांवर असलेल्या नाकीला पासवरून पुढं जात १७ हजार फूट उंचीवर असलेल्या तांगलांग गावी पोचेल. परत ११ हजार फूट उंचीवरच्या लेह गावी पोचून मग शेवटची प्रचंड चढाई पार करत १८ हजारपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या खारदुंगला पासला मोहिमेची सांगता होईल.  

खर्चाचा बोजा
‘‘भारतात उच्च दर्जाच्या टॅंडम सायकली तयार होतच नाहीत. परदेशातून सायकल आयात करायची झाल्यास त्यावर चाळीस टक्के आयातकर भरावा लागतो. आता आम्ही मोहिमेची तयारी सराव करून करत आहोत; पण प्रत्यक्ष मोहिमेत जास्त दर्जेदार आणि दणकट सायकली असणं नितांत गरजेचं आहे. भारतातल्या दोन कंपन्यांशी आमची बोलणी चालू आहेत. बघू काय प्रतिसाद मिळतो? पण भयानक करांमुळं टॅंडम सायकलचा खर्च प्रत्येकी एक लाख रुपये असणार,’’ दिव्यांशू गणात्रानं सत्य परिस्थिती मांडली. म्हणजेच पाच टॅंडम सायकलकरता पाच लाखांचा खर्च आहे. मोहिमेत सहभागी होणाऱ्या १५ लोकांचा पुणे ते मनाली आणि परतीकरता लेह ते पुणे प्रवास खर्च तीन लाख रुपये आहे. मोहीम चालू झाल्यावरचा राहणं-खाणं इत्यादी खर्च जवळपास सहा लाख रुपयांचा असेल. सायकलींची देखभाल-दुरुस्ती, तसंच संपूर्ण मोहिमेचे फोटो, तसंच चित्रीकरणाचा खर्च लक्षात घेता एकूण मोहीम १७ लाख ७५ हजार रुपयांची असणार आहे. दिव्यांशू आणि त्याची संस्था ‘ॲडव्हेंचर बियाँड बॅरिअर्स’ स्वस्थ बसणाऱ्यांतले नाहीत. त्यांनी मोहिमेकरता निधी जमा करण्याचं काम सुरू केलं आहे आणि एक लाख रुपयांचा निधी जमा पण झाला आहे.

सत्कार्याची सुवर्णसंधी
उरलेल्या १६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी जमा करायला मी आपल्या सगळ्यांना साद घालतो आहे. परदेशात या प्रकाराला ‘क्राउड फंडिंग’ म्हणतात. म्हणजे काय, की मोठ्या प्रायोजकांना भेटून त्यांना पटवण्यापेक्षा चांगल्या कामाला पाठिंबा द्यायला जनता पुढं येते आणि आपापल्या परीनं मदत करते. दिव्यांग असलेल्या मित्रांना खरी आपुलकीनं मदत करायची असेल, तर ही सुवर्णसंधी आहे. आपण सगळ्यांनी मदत करून हा मेरू पर्वत उचलूयात, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. जास्त नाही- आपल्याला हे ध्येय साध्य करायला आता फक्त एक हजार रुपये देणारे सोळाशे देणगीदार हवे आहेत. दहा दिव्यांग मित्रांना त्यांच्या मनात असलेलं साहस पूर्ण करायची संधी आपण सगळे मिळून देणार आहोत. काही शीतपेय कंपन्या अशा मोहिमेला नक्की प्रायोजकत्व देतील. कारण, ‘डर के आगे जीत है’ किंवा ‘आज कुछ तुफानी करते है,’ अशा जाहिराती दाखवताना त्यात नाटक जास्त आणि साहस कमी असतं. दहा दिव्यांग मित्रांना मनाली ते खारदुंगला सायकल मोहीम करायला मदत करणं हे खरं समाधान आपल्यासमोर हात जोडून उभं आहे. आता चेंडू आपल्या कोर्टात आहे.

देणगीचे मार्ग
आपण या वेबसाइटला भेट दिलीत, तर गगन ग्रोव्हरनं दिव्यांशूला साथीला घेऊन गेल्या वर्षी मनाली ते खारदुंगला मोहीम कशी पूर्ण केली, याची चित्रफीत तुम्हाला बघायला मिळेल. तसेच ‘क्राउड फंडिंग’ प्रकारात सहभागी होण्याचा सहज-सोपा मार्ग दाखवला आहे. http://www.gocrowdera.com/in/ngo/M2K2017
ज्यांना आपल्या बॅंकेमार्फत देणगी पाठवायची पद्धत सोपी वाटेल त्यांनी ‘ॲडव्हेंचर्स बियाँड बॅरिअर्स’ या संस्थेला थेट देणगी पाठवायला हरकत नाही. त्याचे तपशील पुढीलप्रमाणं ः
खातेधारकाचं नाव ः  Adventures Beyond Barriers foundation
खाते क्रमांक ः 15000200011990
बॅंकेचं नाव ः Federal Bank
खात्याचा प्रकार ः Current
आयएफएससी कोड ः FDRL0001500
बॅंकेची शाखा ः Kothrud    

भारतात दिव्यांग व्यक्तींकरता आयोजित केलेल्या मोहिमेला क्राउड फंडिंगनं पाठिंबा दिल्याची उदाहरणं फार कमी आहेत. चला आपण हा चांगला पायंडा पाडूयात. वाचकहो, तुम्ही देणार ना साथ सत्कार्याला?

Web Title: sunandan lele's article in saptarang