‘मैं भी एप्रिल फूल’ (संडे स्पेशल)

April-Full
April-Full

श्वास घेताना आणि सोडताना त्याची लागलेली तंद्री पाठीत जाणवलेल्या तीव्र वेदनेमुळे भंगली. आपल्या पाठीला मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली आहे, हे त्याच्या हळूहळू लक्षात आलं...

आपला प्रकट दिन जवळ येऊ लागला, की एक एप्रिलला अस्वस्थ वाटू लागायचं. त्याचा जीव घाबराघुबरा होऊ लागायचा. आपल्याला बाऊट करून सेल्फी काढता येत नाही, आपला एकही ब्रेकअप झाला नाही, आपल्याला कुणीच ट्रोल करत नाही, आपला अजून एकही फ्लेक्‍स लागलेला नाही, आपलं एकही रूट कॅनल झालेलं नाही, आपण दीक्षित, दिवेकर यापैकी कोणताच डाएट करत नाही, आपण कोणताच डिओ वापरत नाही... म्हणून आपल्याला अस्वस्थ वाटू लागत असेल, असा विचार त्याच्या मनात डोकावला.

‘डॉक्‍टरांकडे जाऊन शंका निरसन करून घेतलेलं बरं’, असं म्हणत तो डॉक्‍टरांकडे गेला. प्रथा आणि परंपरेप्रमाणे त्याला अनेक चाचण्या करून घेण्यास सांगितलं गेलं. रक्तदाब, साखर, ईसीजी, एक्‍स-रे अशा चाचण्या का घेता, असा प्रश्न त्याने उत्सुकतेपोटी विचारल्यावर डॉक्‍टर त्याच्याकडे भयचकीत नजरेनं पाहू लागले. समोरचा माणूस, ‘इतक्‍या चाचण्या का,’ असा प्रश्न विचारण्याचं धाडस करतो आहे, याचा डॉक्‍टरांना जबरदस्त मानसिक धक्का बसला असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. हल्ली पेशंटच डॉक्‍टरांच्या एवढ्या चाचण्या करून घेण्यासाठी मागे लागतात.

नुसत्या गोळ्या, औषधं दिली तर त्या डॉक्‍टरला काहीच समजत नाही, असं समजलं जातं अशी ‘उद्‌बोधक’ माहिती त्याला कळाली. आपल्याला एवढंही सामान्य ज्ञान नसावं, याचं एक एप्रिलला मनोमन दु:ख झालं. 

आपण जगाच्या एवढे मागे का पडलो, यासाठी बुद्धीची चाचणी करून घ्यायची, असा निश्‍चय करून तो पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेला. डझनावारी चाचण्या करून झाल्या. अगदी पायाच्या- हाताच्या नखांचाही ‘एमआरआय’ करून झाला; पण त्यातून काहीच निदान न झाल्याने डॉक्‍टरांनी उपचार थांबवले. आता कोणाकडून ‘सेकंड ओपिनियन’ घ्यावं असा विचार करत तो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाहेर आला. विचारांच्या तंद्रीत चालत असताना त्याला आपल्या सद्‌गुरूंची आठवण झाली. सद्‌गुरूंनी दिलेला उपदेश आठवत पदपथाच्या बाजूला उभं राहात त्याने दीर्घ श्वास घेतला.

श्वास घेताना आणि सोडताना त्याची लागलेली तंद्री पाठीत जाणवलेल्या तीव्र वेदनेमुळे भंगली. आपल्या पाठीला मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली आहे, हे त्याच्या हळूहळू लक्षात आलं. तेवढ्यात त्या दुचाकीस्वाराने ‘आंधळा आहेस का’ अशी प्रेमळ शब्दांत केलेली विचारणा त्याच्या कानावर आली. आपण पुण्यात आहोत हे लक्षात आल्याने त्याने ‘पदपथावर तू कसा’, असा प्रश्न विचारण्याचं धाडस केलं नाही. पाठीच्या वेदना विसरत तो निरुद्देश भटकू लागला. भटकताना त्याला बरंच काही दिसू लागलं, बरंच ऐकू येऊ लागलं. ‘३६ तासांत गोरेपणा आणणारी क्रीम, दरवर्षी गरिबांच्या खात्यात ७२ हजार रुपये, तीन आठवड्यांत झीरो फिगर, ४८ तासांत सिक्‍स पॅक ॲब्ज, साक्षात लक्ष्मी देवीला घरी पाणी भरायला लावणारं यंत्र, साडेचौपन्न तासांत पत्नीला मुठीत आणण्यासाठीचा वशीकरण मंत्र, फक्त १०० रुपयांत सुखी माणसाचा सदरा, टूथपेस्टवर कार मोफत, ओडोमोसवर १०० डास फ्री अशा अनंत जाहिराती त्याने पाहिल्या. 

स्वबळाची दिंडी अचानक गुंडाळत ‘तूच कर्ता आणि करविता’ असं म्हणत नरेंद्राची उपासना करणारी उद्धवसेना, कालपर्यंत ज्याचा गळा मफलरने आवळावासा वाटत होता, त्याच्याच गळ्यात गळा घालणारे राज दादरकरही त्याने पाहिले. हे सर्व पाहिल्यावर एक एप्रिलला साक्षात्कार झाल्याप्रमाणे विलक्षण जाणीव झाली. आपण सोडून वर्षातले ३६४ दिवस माणसाला २४ x ७ ‘एप्रिल फूल’ केलं जात आहे. असं असताना एप्रिलफूल नामक सिंहासनावर आपण एकट्याने बसणं योग्य नाही, हे लक्षात आल्याने त्याने लगोलग हे सिंहासन सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आपल्याप्रमाणे उर्वरित ३६४ दिवसांनी ‘मैं भी एप्रिल फूल’ अशी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करावी, असं ट्विटही त्याने केलं. ज्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार आपल्या भावंडांनाही होता, असं असताना आपण एकट्यानेच हे सिंहासन भूषविलं, या जाणिवेनंच आपल्याला प्रकट दिन जवळ आला, की अस्वस्थ व्हायला होतं, हे सत्य उमगल्याने एक एप्रिलला आपल्या मनावरचं मणभर ओझं उतरल्यासारखं वाटलं... 

एप्रिल महिन्याचा पहिला दिवस हा गंमत करण्याचा, फिरकी घेण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. फिरकी घेण्याचे प्रकार या दिवशी सर्रास केले जातात. यातून स्वतःची आणि इतरांचीही करमणूक होते. अशाच काही घटना खास तुमच्यासाठी, वेगळ्या ढंगात, वेगळ्या शब्दांत, पोट धरून हसण्यासाठी... एवढेच! सर्वांचा आदर आणि मान राखूनच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com