रिलॅक्‍स वुई कॅन ओव्हरकम... ( SUNDAY स्पेशल)

डॉ. विद्याधर बापट
रविवार, 5 मे 2019

सोशल मीडियात गुंतणं, त्यात अडकणं, तेच जग खरं माननं, त्यालाच वास्तव जग माननं, अशा वृत्तीमागे अनेक कारणं आहेत; त्यानं स्वतःचं आणि कुटुंबाचं स्वास्थ्य हरपतंय. दुरावा वाढतोय. अविश्‍वासाचं जाळजळमट वाढतंय. वाढत्या ताणतणावानं त्यात अडकत गेल्यानं नवेच प्रश्‍न जन्माला येताहेत. त्यावर निश्‍चितच मात करू शकतो. त्याविषयी.

डिजिटल क्रांतीमध्ये, सोशल मीडिया हातात येणं यात खूप चांगल्या, उपयुक्त गोष्टी घडल्यात. पण त्याचबरोबर काही अतिशय हानिकारक गोष्टीही. अगदी संसार मोडण्यासाठी कारणीभूत ठरतील इतक्‍या हानिकारक. दुर्दैवानं कॉर्पोरेट तसंच इतर क्षेत्रात घटस्फोटापर्यंत गोष्टी पोचण्यासाठी अहंकार, जगण्याविषयीचा चुकीचा दृष्टिकोन आदी कारणांबरोबर सोशल मीडियाचा अयोग्य वापर कारणीभूत ठरतोय. ‘हाऊ आर यू’पासून सुरवात होऊन... ‘am not happy in married life...me too`, पर्यंत संवादाची प्रगती सहज होऊ लागलीय. मग नको तितकी जवळीक. ओळखी, अनोळखी व्यक्तीबरोबर डिजिटल जवळकीतून आनंद मिळवण्याची सवय तरुणाईत अनेक जणांना लागलीय. आभासी विश्‍वात व्हिडिओ गेम्समध्ये जिंकण्याच्या आभासी आनंदासारखंच हे आहे. मग यात फोटोजपासून फिल्म्सपर्यंत सगळंच आलं. सोशल मीडियाच्या गैरवापराचे महत्त्वाचे दुष्परिणाम - संशयग्रास्तता, विश्वासार्ह नसलेल्या व्यक्तींशी निर्माण होणारं भावनिक नातं, वेळेचा अपव्यय, जोडीदाराशी संवाद संपुष्टात येणं, व्यसनाधीनता इत्यादी.   

बऱ्याचदा याचं कारण तरुणाईवरील प्रचंड ताण आणि त्यावर औषध म्हणून सोशल मीडियात स्वत:ला गुंगवून घेणं, हे असू शकतं. ताणामुळे ॲड्रेनॅलीन आणि कॉर्टिसोल हे शरीरात अतिरिक्त प्रमाणात स्त्रवतात. अंतर्गत आणि बाह्य असे दोन्ही ताण निर्माण करणारे stressors सध्या नोकरी करणाऱ्या तरुण जोडप्यांवर असतात. त्यांना यशस्वीपणे तोंड देता आलं नाही, कोपिंग स्किल्स शिकून घेतली नाहीत आणि नेमकं मला आयुष्यात कशानं समाधान, सुख मिळणारेय, हे कळलं नाही की सहजीवनात गंभीर स्थिती निर्माण होते. तुटेपर्यंत ताणलं जाऊ शकतं.        

नेमकं काय आणि का घडतंय या सर्वांच्या बाबतीत? तर -
    कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती ॲचिव्हमेंट ओरिएंटेड असतात. टार्गेटस्‌, परदेशातील व्यक्तींशी वेळी-अवेळी संपर्क, घरी आल्यावरसुद्धा ऑफिस डोक्‍यात ठेवणं यामुळं त्यांना कुटुंबीयांसाठी आणि सोशल लाइफसाठी पुरेसा वेळच नसतो. अतिव्यग्रतेनं स्वत:ला रिलॅक्‍स करणं, मनोरंजन यासाठी वेळच नसतो. प्रचंड स्पर्धा आणि नोकरीसंदर्भातील असुरक्षिततेमुळे सततचा ताण, जेवण आणि झोपेच्या वेळा न पाळल्यामुळे शरीरातील जैविक घड्याळ बिघडतं. शरीर आणि मनावर विपरीत परिणाम होतो. त्याचा स्वतःसह कुटुंबीयांवर परिणाम होतो. नातं दुरावतं. हळूहळू अस्वस्थतेचा आणि नैराश्‍याचा आजार पाय पसरतो. संपन्नता असूनही स्वास्थ्य हरपतं. व्यसनं वाढतात. पती, पत्नी एकमेकाला क्वालिटी वेळ देऊ शकत नाही. रोमान्स, सेक्‍स यासाठी आवश्‍यक मानसिक स्वास्थ्य हरपतं. मग सोशल मीडिया हाच ताणतणावातून सुटण्याचा उपाय मानला जातो. या सगळ्यावर उपाय निश्‍चितच आहेत. प्रथम एक गोष्ट मान्य करूया. या क्षेत्रातील बाह्य परिस्थिती अशीच राहणार किंवा दिवसेंदिवस अधिक बिकट होत जाणार. त्याला तोंड देण्यासाठी आपण आतून शांत, कणखर, स्वस्थ व्हायला हवं. कसं?

1. ‘बाह्य’ वातावरण कसंही असो, आपण ‘आतलं’ वातावरण बदलावं. त्यासाठी काही गोष्टी शिकायच्या. थोडक्‍यात मेंदूचं (मनाचं) रिप्रोग्रॅमिंग करायचं.   
2. सोशल मीडियापेक्षा माझा जोडीदार, त्याच्याबरोबर वेळ व्यतीत करण्यात खरा आनंद आहे, हे लक्षात घ्यावं.
3. व्हिडिओ गेम्समध्ये जिंकणं आभासी, त्यापेक्षा वास्तव आयुष्यातील समस्यांवर मात करण्यात खरं कर्तृत्व आहे. 
4. कामवासना उत्तेजक अशा सर्वच गोष्टी उदा. संवाद, फोटोज, फिल्म्स हे फक्त व्यसन; त्यातून फक्त अतृप्ती, ताण आणि निराशाच उत्पन्न होते. तसेच, निखळ मैत्रीचा अपवाद सोडून निर्माण झालेले डिजिटल, खोटे नातेसंबंध शेवटी फक्त आयुष्य उद्‌ध्वस्त करतात.       
5. तणाव नियोजनाच्या पद्धती शिकून घ्याव्यात. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व, अानुवंशिक गुण, स्वभाव, मेंटल मेकअप वेगळा असतो. त्यामुळे तणाव नियोजनाच्या पद्धतीही वेगळ्या असू शकतात.

    आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. आयुष्यात नेमकं काय हवंय? पुरेसा पैसा हवाच, वैभवही हवं; पण फक्त पैसा की पैशाबरोबरच स्वास्थ्य, मन:शांती? एका मर्यादेनंतर भोग, लालसा, चंगळवाद फक्त दुख: निर्माण करतात, हे लक्षात ठेवावं. सोशल मीडियातून खरंच स्वास्थ्य मिळतंय का? की ती फसवी गोष्ट आहे, हे समजून घ्यावं. 

    ताण समजून घेणं, त्यांची नोंद करणं महत्त्वाचं - आपल्यावर सध्या कुठले ताण आहेत? कशाची काळजी वाटते? कसली भीती वाटते? कशामुळे राग येतो? तो ताब्यात राहतो का? कशामुळे वाईट वाटतं? कुठला अपराधगंड वाटतो का? शारीरिक, मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे, अशा अनेक गोष्टींची नोंद करावी. थोडक्‍यात हे एक प्रकारचे भावनांचे ऑडिट असेल. तज्ज्ञांच्या साहाय्याने त्यावरचे उपाय शोधावेत. तज्ज्ञांशी बोलल्यामुळे ताणाचा निचरा व्हायला मदत होईल.

    स्वयंसूचना आणि क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनची तंत्रे शिकून घ्यावीत. तज्ज्ञांकडून ‘स्विच ऑन, स्विच ऑफ’ची तंत्रे शिकून घ्यावीत. ज्या योगे ऑफिस आणि वैयक्तिक आयुष्य यात सीमारेषा राहतील. ऑफिसचे ताण वैयक्तिक आयुष्यापासून दूर ठेवता येतील. योग्य मार्गदर्शन आणि प्रयत्नांनी हे साध्य होऊ शकतं.   

    आपल्या आयुष्यातली इतर माणसं, मित्र आणि विशेषतः जोडीदार, त्यांच्या बरोबरची नाती महत्त्वाची आहेत, हे समजून घ्या. जोडीदार नोकरी करत असेल तर त्याच्या मन:स्थितीचा विचार करावा. त्याची काळजी करावी. त्याचे ताण समजून घ्यावेत. रात्री कितीही उशीर झाला तरी मायेचा स्पर्श आणि जिव्हाळ्याचं बोलणं, मन मोकळं करणं हे नियमित हवं. त्यातूनच दोघांनाही ताकद मिळेल.

    व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान आणि वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे महत्त्वाची आहेत. रोज चल पद्धतीचा (Aerobics) व्यायाम म्हणजे ज्यायोगे नाडीची गती ठराविक मर्यादेपर्यंत वाढेल (तज्ज्ञ त्याचा फॉर्म्युला सांगतील) म्हणजे वेगात चालणे, धावणे, पोहणे इत्यादी. यामुळे शरीरात सेरोटोनिन, एन्डॉर्फिन्स तसेच इतर नैसर्गिक ॲन्टिडिप्रेसन्ट स्त्रवतील. तसेच प्राणायाम, ध्यानाच्या काही पद्धती, श्वासावर आधारित ध्यान, क्षणसाक्षीत्वाची (mindfulness ), वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे शिकून घ्यावीत.

    संगीत, कविता, छंद आणि मैत्र-संगीत हे उत्तम औषध आहे. मन:स्थिती सुधारण्यासाठी रोज संगीताची साधना, आवडते संगीत रोज ऐकणे, कविता वाचणे, ऐकणे, आवडता छंद जोपासणे याची खूप मदत होते. तसेच ज्याच्यापाशी मोकळे होऊ शकू, असे जिव्हाळ्याचे, परंतु निर्व्यसनी मित्र जोडणे याचा छान उपयोग होतो.

    आपल्याला स्वत:शी असलेलं नातं सुदृढ करायचं आहे. त्यामुळे रोज इतर व्यायामाबरोबरच ध्यान करणं. सुटीच्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात जाणं. तिथली शांतता अनुभवणं, आत भरून घेणं यानंही मन स्वस्थ व्हायला मदत होते. 

आणि मग सोशल मीडियासारख्या स्वागतार्ह गोष्टीचा, चांगल्या कारणांसाठी प्रॉडक्‍टिव्ह उपयोग होऊ शकतो. कर्तृत्वाची शिखरं पादाक्रांत करताना ‘आतला’ मी आनंदी, स्वस्थ, कणखर राहणं खूप महत्त्वाचं आणि प्रयत्नांनी ते शक्‍य आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SUNDAY Special Dr. Vidyadhar Bapat writes article social media