कृतकृत्याचा आनंद

कृतकृत्याचा आनंद

बाग फुलवणे सृजनाचा आविष्कार. सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरीत्या फुलवता येते. त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो, सांगताहेत काही अनुभवसंपन्न व्यक्ती...

आकर्षक साहित्याने सजवा तुमची बाग !
नवीन घर घेतलं की, अनेकजण बाग सजविण्याला प्राधान्य देतात. सध्या सोशल मीडियावर अनेकजण आपल्या सजवलेल्या बागेचे फोटो कौतुकाने टाकतात. यामध्ये कळून येतं की, काहीजण किती कष्टाने आणि प्रेमाने आपली बाग सजवितात. बागेसाठी लागणारे सर्व साहित्य, रोपं, आकर्षक कुंड्या, मातीचे लॅम्प, वेल, हॅंडमेड फ्लॉवरपॉट अशा गोष्टी आणतात. आपली बाग सर्वोत्कृष्ट कशी दिसेल, यावर भर देतात. कमी जागेतही अनेक पर्याय वापरून बागेला आकर्षक पद्धतीने फुलविता येतं. यासाठी शहरात खास ‘गार्डनिंग’साठी साहित्य मिळणाऱ्या नर्सरी आहेत. पूर्वी नर्सरी म्हटलं की, फक्त रोपं आणि कुंड्या मिळायच्या; पण आता या नर्सरीची व्याख्या बदलली आहे. घेऊ तितकं आकर्षक साहित्य आता नर्सरीत मिळतं. दरवेळी काहीतरी नवीन फॅशन आलेली असते, त्याप्रमाणे बाग सजविण्याची पद्धतही बदलत जाते. 


गार्डनिंगसाठी आकर्षक  साहित्य मिळणारी ठिकाणे...
बाणेर नर्सरी - मातीचे लॅम्प, विंड शोपीस, रंगीबेरंगी फ्लॉवरपॉट
निधी नर्सरी, विमाननगर : रंगीबेरंगी कुंड्या, वॉलपीस
राईज अँड शाईन बोटॅनिकल बुटीक, 
कोरेगाव पार्क - मनी प्लांट, रंगीबेरंगी कुंड्या
एम्प्रेस गार्डन नर्सरी, रेसकोर्स, हडपसर - विविध फुलझाडं
गार्डन नर्सरी, कोथरूड - हॅंगिंग कुंड्या, वेल
टेलिप्लांट्‌स, खराडी - विविध फुलझाडं
निसर्ग नर्सरी, शिवाजीनगर - रंगीबेरंगी कुंड्या
गार्डन इझी नर्सरी, वानवडी - रंगीबेरंगी कुंड्या, वॉलपीस

पुणे - ‘सकाळ’मुळे प्रोत्साहन
वयाच्या ऐंशीव्या वर्षीही एरंडवणे (पुणे) येथील डॉ. कमला संखे आपल्या परसबागेत रमल्या आहेत. ‘सकाळ’ने भाजीपाला, औषधी वनस्पती आणि अनेक तऱ्हेची फुलझाडे लावण्यास सामाजिक उपक्रमाद्वारे प्रोत्साहन दिल्यामुळे मला ‘बंगला-बगीचा’ आणि ‘किचन गार्डनची’ गोडी लागली, असे त्या सांगतात. बागकामाच्या आवडीतून गार्डनिंगचा डिप्लोमा केल्यामुळे शास्त्रशुद्ध दृष्टिकोन मिळाला. कमी वेळात सेंद्रिय खत घालून बाग रेखीव ठेवता येते. गच्चीवरील भरपूर उन्हाचा फायदा घेऊन कमी जागेत आवश्‍यक तेवढा भाजीपाला, हळद, आले, लसूण, पुदिना, कोथिंबीर, रताळी, बटाटा, तोंडली, दूधी, गवती चहा घेते. बंगल्याच्या पाठीमागे ऊन अडल्यामुळे केळी, नारळ, सुपारी, शेवगा, कढीपत्ता, तमालपत्र, जायफळ, मघईपान असे ‘कोकण’ उभे केले आहे. तीस वर्षांपूर्वी घराच्या सभोवताली लावलेल्या सर्व प्रकारच्या फुले देणाऱ्या वेली घराच्या सौंदर्यात भर घालत असतात. या फुलझाडांमुळे वारा, धूळ, आवाज यांच्या प्रदूषणांपासून घराचे संरक्षण होते. 

कोल्हापूर - सोळा रंगांची जास्वंद
चाफ्याच्या पांढऱ्या रंगाच्या फूलझाडावर पाच रंगांची फुले फुलवण्याची किमया कोल्हापूरच्या ताराबाई पार्कमधील प्रमिला बत्तासेंनी आपल्या टेरेस गार्डनमध्ये साधली आहे. चाफ्यासोबत ॲडेनियम आणि जास्वंद यांची कलमे करून एकाच झाडावर विविधरंगी फुलेही फुलवली आहेत. त्यांच्या बागेमध्ये १६ रंगांची जास्वंद फुलली आहे. 

बत्तासे ताराबाई पार्कमधील अपार्टमेंटमध्ये राहतात. सहाव्या मजल्यावर त्यांचे टेरेस गार्डन आहे. कुंड्यांमध्ये फुलझाडे, शोभेची झाडे लावलीत. टेरेसवर थोड्याशा जागेत केलेले लॉन, झोपाळा आणि झाडांची आकर्षक मांडणी यामुळे बाग आणखी सुंदर, मनोहारी झाली आहे. दोन रंगांच्या जास्वंदीचे परागीभवन करून त्यापासून वेगळ्या रंगाचे जास्वंद फुलवण्याची किमयाही त्यांनी साधली आहे. बागेत बोन्सायचे कलेक्‍शन आहे. वड, पिंपळ, चिंच, उंबर, बोधीवृक्ष आणि बोगनवेल यांचे बोन्साय केले आहे. विशेष म्हणजे नारळाच्या करवंट्यांमध्ये छोटी छोटी रोपे लावली आहेत. टेरेसवर एका बाजूला त्यांनी किचन गार्डनही केले आहे.

मुंबई  - पोलिसाने फुलवली बाग!  
मुंबईतील पोलिस उपनिरीक्षक उल्हास परब. कांदिवली पश्‍चिम येथील सुंदरनगरमध्ये त्यांनी आपल्या अवघ्या ३०० चौरस फुटांच्या एकमजली घराच्या गच्चीवर आगळी-वेगळी बाग बनवली आहे. गच्चीवरील बाग फुलवण्याचे तंत्र, कौशल्य, कला ज्ञान पर्यावरणप्रेमींपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडियाद्वारे सुमारे १३०० सदस्यांना जोडले आहे. दिंडोशी पोलिस ठाण्यात ते उपनिरीक्षक आहेत. आवड, छंद आणि वनस्पतींवरील नितांत प्रेमामुळे छोट्याशा गच्चीवर सहाशेवर झाडांची जोपासना केली आहे. रूपारेल महाविद्यालयातल्या ५८ व्या फळे, फुले, भाज्या प्रदर्शनामध्ये ‘फ्रेंडस ऑफ द ट्री’ या वृक्षमित्र संस्थेने फेब्रुवारी २०१९ मध्ये स्पर्धा घेतल्या. त्यात टेरेस गार्डन प्रकारात उल्हास यांचा द्वितीय पारितोषिकाने सन्मान करण्यात आला. १९९१ मध्ये एका मित्राने वडाच्या अगदी लहान पारंब्यांचे बोन्साय भेट म्हणून दिले. त्या भेटवृक्षाने उल्हास यांना टेरेस गार्डनिंगची प्रेरणा मिळली. त्यांच्या गच्चीवरील बागेमध्ये शंभरवर बोन्साय वृक्ष आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com