प्रत्यक्ष वाचकांनाच प्रश्न (संदीप वासलेकर )

संदीप वासलेकर saptrang.saptrang@gmail.com
रविवार, 4 डिसेंबर 2016

आपल्या समाजाची वैचारिक दिशा कोणती असावी, हे युवकांनीच ठरवायचं आहे. युवकांनी सखोल विचार करून प्राथमिक प्रश्‍नांवर चिंतन करावं, असं माझं आवाहन असून, त्यातूनच त्यांना स्वतःला, समाजाला व राष्ट्राला बळकट करण्याचा मार्ग मिळेल. हे करणं युवकांना शक्‍य व्हावं, यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात अनेक लेखकांनी समाजरूपी संगणकाच्या पडद्यावरचं लक्ष काढून घेऊन ‘सीपीयू’मध्ये काय आहे, हे पाहावं! 

‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांना मी काही दिवसांपूर्वी फोन केला आणि ‘आता हे सदर या वर्षाच्या अखेरीस थांबवण्याची माझी इच्छा आहे,’ असं त्यांना कळवलं. या महिन्याच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०१६ मध्ये या सदराला साडेचार वर्षं पूर्ण होतील. कधी कधी काही मुद्दे मला महत्त्वाचे वाटल्यानं पुन्हा नमूद करण्याची इच्छा होते. आता नवीन लेखकानं नवीन दृष्टिकोन मांडला तर योग्य होईल, असं मला वाटलं. मात्र, संपादकांना माझं हे म्हणणं पटलं नाही, म्हणून मी हा प्रश्‍न प्रत्यक्ष वाचकांपुढंच मांडायचं ठरवलं. ‘हे सदर थांबवावं’ असं जर वाचकांनी सुचवलं तर मी पुढचा लेख (१८ डिसेंबर) अंतिम लेख म्हणून लिहीन. हा प्रश्‍न पूर्वी कुण्या लेखकानं विचारला की नाही, याची मला कल्पना नाही; परंतु ‘वाचकांच्या मनाचा कौल घ्यावा,’ असं मला माझी सद्‌सद्विवेकबुद्धी सांगते. 

मला वाचकांचा जो स्नेह मिळतो, जी सहमती मिळते व वेगवेगळ्या विषयांवर वाचक माझ्याशी जे बौद्धिक आदानप्रदान करतात, प्रसंगी विरोधही करतात, त्याबद्दल मी वाचकांचा खरोखरच आभारी आहे. ‘एका दिशेचा शोध’ या माझ्या पुस्तकालाही अलीकडंच सहा वर्षं पूर्ण झाली. १९ आवृत्त्या निघाल्या. विसावी आवृत्तीही लवकरच निघेल, असं या पुस्तकाचे प्रकाशक (राजहंस प्रकाशन) म्हणतात. याच पुस्तकाचं ‘बोलकं पुस्तक’ ऐकून अंध ‘वाचक’ही अनेकदा माझ्याशी संपर्क साधतात. ‘नए भारत का निर्माण’ ही हिंदी आवृत्ती उत्तर भारतात लोकप्रिय झाली आहे. 

आता आत्मपुराण बंद करून मुख्य प्रश्‍नाकडं वळतो. सध्याच्या भारतात मूलभूत प्रश्‍नांवर खूप कमी चर्चा होते. सुमारे ३० वर्षांपूर्वी ‘द इलस्ट्रेडेट विकली’ हे इंग्लिश साप्ताहिक खुशवंतसिंग संपादित करत असत व ‘इम्प्रिंट’ हे मासिक राज वसंत पंडित प्रकाशित करत असत. या नियतकालिकांमध्ये निबंध प्रसिद्ध व्हायचे. विविध क्षेत्रांचा अनुभव असलेले लोक सखोल-सर्वांगीण अभ्यास करून हे निबंध लिहीत असत. मी ऑक्‍सफर्डहून परत आल्यावर मला ‘इम्प्रिंट’नं ‘उजव्या विचारसरणीचा पराभव’ या विषयावर स्वतंत्र शोधनिबंध लिहायला सांगितलं होतं. पंडित यांचा जनसंघाशी जवळचा संबंध होता; परंतु मी निबंध लिहिताना माझ्यावर कोणतंही दडपण नव्हतं व उजवी विचारसरणी म्हणजे केवळ जनसंघ नव्हे. त्या वेळी स्वतंत्र पक्षदेखील उजव्या विचारसरणीचा पाठपुरावा करत असे, हे माझं म्हणणंही मी मांडलं. राजकारणातल्या कुणाला काय वाटेल, याचा विचार न करता राजकारणातल्या आर्थिक-सामाजिक-धार्मिक-वैश्‍विक बाबींचा ऊहापोह करून समाजाला कशी दिशा मिळेल, हाच विचार लेखनामागं असे. ‘इकॉनॉमिक अँड ‘पॉलिटिकल वीकली’ हा सध्या Economic and political weekly हा एकमेव अपवाद वगळता इंग्लिशमध्ये निबंध प्रकाशित करणारं एकही नियतकालिक नाही. मराठी व बंगाली भाषेत मूलभूत प्रश्‍नांवर चर्चा करणारी नियतकालिकं आहेत. मी ‘सप्तरंग’मध्ये प्रसिद्ध होणारे उत्तम कांबळे यांचे लेख (सदर ः फिरस्ती) नेहमी वाचतो. कारण, समाजातल्या दुर्लक्षित घटकाबद्दल ते लेख विचार करायला भाग पाडतात. 

 

‘अंगात येणं’ या विषयावर एकदा कांबळे यांनी लेख लिहिला होता. त्या वेळी माझी रविवारी रात्रीची पॅरिसची फ्लाइट होती. मी ‘सप्तरंग’चा अंक बॅगेत टाकला. दुसऱ्या दिवशी सेन नदीच्या काठी ‘व्होल्तेअर’ या प्रसिद्ध रेस्तराँमध्ये फ्रान्सच्या पंतप्रधानांच्या एका मित्राची वाट पाहत बसलो होतो. अठराव्या शतकात होऊन गेलेले व्होल्तेअर हे विख्यात साहित्यिक ज्या इमारतीत राहत असत, तिथंच हे रेस्तराँ आहे. ‘मी आफ्रिकेमध्ये काय मदत करू शकतो,’ हा  माझा फ्रान्स सरकारबरोबर चर्चेचा विषय होता. कांबळे यांचा लेख वाचला व मला आफ्रिकेतल्या काही प्रथांमागची सामाजिक व मानसिक कारणं समजण्यास मदत झाली. 

मात्र, वैचारिक लेखन वा विचारमंथन थोड्या प्रमाणात मराठी व बंगाली वगळता जवळजवळ होतच नाही. विद्यमान क्षणी काय चाललेलं आहे, यावरच सगळी माध्यमं प्रकाश टाकतात व सगळी जनता एका मिनिटात त्या विषयातली ‘तज्ज्ञ’ होते. मग सोशल मीडियावर चर्चा सुरू होते. सिनेसृष्टीतली काही मंडळी तर टेलिव्हिजनवर पोचतात व भारताचं पाकिस्तानबरोबरचं धोरण कसं असावं अथवा अर्थमंत्र्यांनी काय पावलं उचलावीत, या विषयावर उपदेश करतात. तेवढ्यातच जर अमेरिकेत निवडणूक झाली, तर सोशल मीडियावरची कोट्यवधी मंडळी एका सेकंदात अमेरिकेच्या राजकारणाची तज्ज्ञ होतात. असा हा ‘गाढवांचा गोंधळ व वैचारिक लाथांचा सुकाळ’ असताना महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा होत नाही. उदाहरणार्थ ः ‘राष्ट्र म्हणजे काय?’ ‘भौतिकशास्र व जैविकशास्र यांचा संबंध काय?’ ‘मानवाची व निसर्गाची गरज परस्परविरोधी आहे की परस्परपूरक आहे?’ ‘विज्ञानाचं भवितव्य काय?’ ‘डाव्या विचारसरणीचा जगभर पराभव होण्यामागची मीमांसा काय?’ ‘जागतिकीकरण केवळ आर्थिक प्रवाहाचं की राजकीय व सामाजिक प्रवाहांचं? ‘शेती ही शेतीच राहील का?’ ‘पाणी व देशाचे सार्वभौमत्व यांचा संबंध काय?’ ‘समाजाची रचना कशी असावी?’ ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा दैनंदिन सामाजिक प्रवाहांबरोबरचा संबंध काय?’ अशा स्वरूपाच्या अनेक प्रश्‍नांची खूप मोठी यादी होऊ शकते. 

 

युवकांनी सखोल विचार करून प्राथमिक प्रश्‍नांवर चिंतन करावं, असं माझं युवकांना आवाहन असून, त्यातूनच त्यांना स्वतःला, समाजाला व राष्ट्राला बळकट करण्याचा मार्ग मिळेल. हे करणं युवकांना शक्‍य व्हावं, यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात अनेक लेखकांनी समाजरूपी संगणकाच्या पडद्यावरचं लक्ष काढून घेऊन ‘सीपीयू’मध्ये काय आहे हे पाहावं. 

 

सर्व शाखांच्या; विशेषतः कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी, विज्ञानावरचं वाचन जरूर करावं असा माझा आग्रह आहे व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मराठी व इतर भाषांमधल्या साहित्याशी परिचय करून घेऊन तो वाढवावा, असं मला अवश्‍य सांगावंसं वाटतं. 

 

अमेरिकेत ऑगस्ट १८४५ पासून ‘सायंटिफिक अमेरिकन’ नावाचं मासिक प्रकाशित होतं. त्याच्या पहिल्या अंकात मुखपृष्ठावर रेल्वेगाडीचं चित्र होतं. तेव्हा ‘रेल्वे’ हा खूप मोठा शोध लागला होता. काही वर्षांनी त्यांनी सॅम्युएल मोर्स याच्या टेलिग्राफ यंत्रावर, तर १८९९ मध्ये सायकली व मोटारी या विषयावर मुखपृष्ठकथा लिहिल्या होत्या. सन १९५४ मध्ये त्यांनी संगणक या कल्पनेवर लेख प्रसिद्ध केला होता. आतापर्यंत १५८ नोबेल पारितोषिकविजेत्यांनी त्यात लेख लिहिलेले आहेत. 

असा हा विज्ञान व तंत्रज्ञानाचा वारसा चालवणाऱ्या मासिकानं अलीकडंच ‘फ्रेंच वाङ्‌मयाचं महत्त्व व गरज’ या विषयावर विशेष संपादकीय लिहिलं, तर सामाजिक व आर्थिक विषमतेचं सर्वांगीण विश्‍लेषण करणारा लेख नोबेल पारितोषिक विजेते अंगस डीटन यांना लिहायला सांगण्यात आला होता. त्याच वेळी मेंदूच्या आत पाहण्यासाठी होणाऱ्या शास्त्रीय प्रयोगांचं विश्‍लेषण करण्यात आलं होतं. 

सेनेगेल या आफ्रिकेतल्या गरीब देशात गणितावर मोठं संशोधन चालतं व गणित या विषयावर प्रबोधन करणारं खूप साहित्य आहे. 

सध्याच्या भारतात गणिताचा आधार घेऊन येत्या ३०-४० वर्षांत होणारे वैज्ञानिक बदल, ७० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून भारताच्या किनारपट्टीवर स्थायिक झालेला या भूभागातला प्रथम मानव, महाभारतातलं शांतिपर्व, जागतिक बॅंकेचं प्रशासनावरचं संशोधन-लेखन यांचा संबंध, तसंच तत्सम प्रश्‍नांवर चर्चा करणारी नियतकालिकं मी पाहिलेली नाहीत; विशेषतः इंग्लिशमध्ये तर नाहीच नाही.

म्हणून प्रत्यक्ष वाचकांनाच प्रश्‍न मी विचारतो. आपल्या समाजाची वैचारिक दिशा कोणती असावी, हे तुम्हीच, विशेषतः युवकांनी ठरवायचं आहे. यात माझं लेखन हा समुद्रातल्या पाण्याच्या थेंबापेक्षा कमी महत्त्वाचा प्रश्‍न आहे. मी हे सदर थांबवावं, असं मला वाटतं. तुम्हालाही तसं वाटत असेल, तर मला जरूर कळवा.

Web Title: sundeep waslekar articles