दरोडेखोरांच्या गुहेतला प्रयोग

संदीप वासलेकर
रविवार, 8 एप्रिल 2018

प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वार्थ, स्वतःच्या गटाबद्दल प्रेम, इतर गटांबद्दल तिरस्कार, जिंकण्याची ईर्ष्या या भावना असतात, तसंच प्रत्येक व्यक्तीमध्ये ममता, सहकार्य, सामंजस्य या भावनाही असतात. या दोन्ही प्रकारच्या भावना अगदी लहानपणापासून आपल्या मनात घर करतात. मात्र, जेव्हा जिवाला धोका निर्माण होतो, तेव्हा "आपण एक माणूस आहोत' एवढीच आपली ओळख राहते.

प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वार्थ, स्वतःच्या गटाबद्दल प्रेम, इतर गटांबद्दल तिरस्कार, जिंकण्याची ईर्ष्या या भावना असतात, तसंच प्रत्येक व्यक्तीमध्ये ममता, सहकार्य, सामंजस्य या भावनाही असतात. या दोन्ही प्रकारच्या भावना अगदी लहानपणापासून आपल्या मनात घर करतात. मात्र, जेव्हा जिवाला धोका निर्माण होतो, तेव्हा "आपण एक माणूस आहोत' एवढीच आपली ओळख राहते.

अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या ओक्‍लाहामा या राज्यात एका मानसशास्त्रज्ञानं एक प्रयोग केला होता. त्यानं 12 वर्षांची 22 मुलं एकत्र जमवली. ती सगळी मुलं मध्यमवर्गीय, स्थिर कुटुंबातली होती. ते सगळे मुलगे होते, त्यात एकही मुलगी नव्हती. सर्व मुलगे सुस्वभावी म्हणून परिचित होते.

त्या मानसशास्त्रज्ञानं त्या मुलांना "दरोडेखोरांच्या गुहेचं उद्यान' या नावानं प्रसिद्ध असलेल्या स्काउट्‌स संघटनेच्या कॅम्पमध्ये नेलं. जाण्यापूर्वी त्यानं त्यांचे दोन वेगळे गट तयार केले. एका गटातल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गटाचं अस्तित्व माहीत नव्हतं.
मानसशास्त्रज्ञानं प्रत्येक गटातल्या मुलांना सहकार्यानं वर्तणूक करण्याचं प्रशिक्षण दिलं. एकत्रित येऊन एखाद्या समस्येवर मात कशी करायची, एखादी कथा अथवा कविता एकत्र कशी गुंफायची, एकमेकांचं कौतुक कसं करायचं या प्रशिक्षणावर आधारित मुलांसाठी क्रीडा व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले. त्या मुलांमध्ये एवढी जवळीक निर्माण झाली की त्यांना आपल्या कॅम्पमधले मित्र भावंडांपेक्षाही जवळचे वाटू लागले.

एके रात्री मानसशास्त्रज्ञानं दोन्ही गटांना एकमेकांच्या अस्तित्वाविषयीची कल्पना दिली व दुसऱ्या गटाबरोबर बेसबॉलचा सामना ठेवला. दोन्ही गटांतली मुलं तयारीला लागली. त्यांनी स्वतःहून आपापल्या गटांचं नामकरण केलं. एका गटाचं नाव होतं "धडधडाट', तर दुसऱ्या गटाचं नाव होतं "कडकडाट'. (मूळ नावं अर्थात इंग्लिशमध्ये होती.)

सामन्याच्या तीन-चार दिवस आधी मानसशास्त्रज्ञानं दोन्ही गटांना मैदानाच्या जवळ नेऊन तिथं नवीन कॅम्प तयार केले. ती 12 वर्षांची मुलं होती. अर्धा मैल अंतरावर दुसऱ्या कॅम्पमध्ये एक प्रतिस्पर्धी गट आहे व सामने जिंकल्यावर फक्त एकाच गटाला चषक मिळणार, एवढंच त्यांना माहीत होतं. त्या मुलांनी आपापल्या गटाच्या नावानं झेंडे तयार केले. टी शर्टवर आपापल्या गटाचं नाव लिहिलं. गटाची चिन्हं तयार केली. एके दिवशी "धडधडाट' गटाच्या मुलांनी बेसबॉल मैदानावर जाऊन एका काठीवर स्वतःचा झेंडा लावला. "कडकडाट' गटाच्या मुलांनी तो झेंडा फाडला. मग दोन्ही गटांत शिवीगाळ सुरू झाली. अखेरीस माती व दगडफेक सुरू झाली. मुलं आता हाणामारी करण्याची चिन्ह दिसू लागली. परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याचं दिसताच संयोजकांनी सामना रद्द केला.
मानसशास्त्रज्ञानं केलेल्या प्रयोगाचा अभ्यास करून आपलं अनुमान शास्त्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केलं. या प्रयोगाबाबत गेली 50-60 वर्षं चर्चा होत आहे.
12 वर्षांच्या मुलांची ही गोष्ट खरी आहे, यावर माझा विश्‍वास बसला नसता; परंतु मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. एकदा आमच्या वर्गातल्या दोन गटांत भांडण झालं.
वर्गात कुणी कुठं बसायचं, मैदानात कुणी, कधी खेळायचं असल्या बाबींवरून ही भांडणं झाली होती.
मग आम्ही आमच्या गटाला त्या वेळी जे सुचलं ते नाव दिलं आणि त्यानुसार तशी चित्र काढून ती पोस्टर्स वर्गात भिंतीवर लावली. त्या वेळी माझं वय आठ होतं. मी तिसरीत होतो. आमच्या गटाला असं नाव देण्यामागं आमची ठोस अशी कुठलीच भूमिका नव्हती. आमचं ते वय पाहता आणि आमची त्या वयातली एकूण समज पाहता तशी काही आमची भूमिका असणं शक्‍यही नव्हतं.

एके दिवशी मुख्याध्यापिका घुले बाई यांना वर्गातली ही "गटबाजी' कळली व त्यांनी सगळ्यांना तंबी दिली. त्यानंतर आम्ही गप्प झालो व सगळं काही विसरून गेलो. जर वयाच्या आठव्या वर्षी मुंबईची मुलं असं करत असतील, तर वयाच्या बाराव्या वर्षी ओक्‍लाहामाची मुलं त्यापुढं चार पावलं जाऊन काय करू शकतील, याची मी कल्पना करू शकतो.
"दरोडेखोरांच्या गुहेतला प्रयोग' जगप्रसिद्ध झाल्यावर मानसशास्त्रज्ञांनी "सामूहिक मनाची स्थिती' या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आणखी अनेक प्रयोग केले.
***

आणखी एका प्रयोगात मानसशास्त्रज्ञानं 18-20 वर्षांचं वय असलेल्या मुलांचा गट तयार केला. या गटातही सगळे मुलगेच होते. सगळे जण भिन्न आर्थिक-सामाजिक-धार्मिक पार्श्‍वभूमी असलेले होते. त्यांना कॅम्पमध्ये नेल्यावर पहिल्या दिवशी प्रत्येक मुलाला स्वतःची भाषा, जाती-जमाती, धर्म यावर भाषण करण्यास सांगण्यात आलं. नंतर दर दिवशी, आपलीच जात व धर्म कसा श्रेष्ठ आहे, यावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसंही जाहीर करण्यात आली. मुलं दिवसभर अभ्यास करून संध्याकाळी जेव्हा स्पर्धेत भाग घेत, तेव्हा एकमेकांविषयी कडाडून बोलत. नंतरच्या काळात प्रयोग पुढं नेऊन, केवळ आपल्या जाती-धर्माचं गुणगान गाऊन थांबायचं नाही, तर दुसऱ्या जाती व धर्म हे समाजाला कसे हानिकारक आहेत यावर भाषणं द्यायची, असं त्यांना सांगण्यात आलं. आता तर वादविवाद करताना मुलं दुसऱ्याकडं जाऊन गुद्दे मारण्याचा प्रयत्न करू लागली.

या प्रयोगातून निरीक्षकांच्या नजरेला दोन गोष्टी आल्या. ज्या मुलांकडं आधी वक्तृत्वाचं कौशल्य नव्हतं, ती मुलं नंतर फाडफाड भाषणं देऊ लागली. शिवाय, एकदम सुरवातीला सगळी मुलं स्पर्धा झाल्यावर रात्रीच्या जेवणाच्या वेळी एकमेकांमध्ये मिसळत व चेष्टा-मस्करी करत जेवणाचा आस्वाद घेत. मात्र, नंतर हळूहळू मुलं एकटीच अथवा दोन-तीन जणांच्या गटानं जेवू लागली. जी मुलं स्वतःला आपल्या जातीचे अथवा धार्मिक गटाचे नेते समजत, ती मुलं तर जेवणाचं ताट घेऊन आपल्या खोलीत जात व एकांतात जेवण घेत असत.

एके दिवशी संयोजकांनी सगळ्या मुलांना, "दुसऱ्या कॅम्पमध्ये जायचं आहे,' असं सांगितलं. संध्याकाळी बस निघाली. बसमध्ये सगळी मुलं एकमेकांकडं रागानं बघत बसली होती. रात्री दहाच्या दरम्यान जंगलातल्या रस्त्यावर बस बंद पडली. (प्रयोगानुसार, असं आधीच ठरवलं गेलं असल्यानं वाहनचालकानं बस बंद पाडली). एवढा लांबचा प्रवास असूनही संयोजकांनी खाद्यपदार्थ अथवा पेयं बरोबर घेतलेली नाहीत, असं सगळ्यांच्या अचानक लक्षात आलं. "जंगलात काही पशू आहेत व जंगल लवकर पार न केल्यास त्यांचा हल्ला कुठून, कधी होईल, हे काही सांगता येत नाही,' असं संयोजकांनी बस बंद पडल्यावर त्या मुलांना सांगितलं. यावर सगळी मुलं एकत्र आली व वाहनचालकानं सांगितल्यानुसार बस ढकलू लागली.

बस ढकलताना काहीजणांच्या नाकी नऊ आले. बस ढकलताना एखाद्या अशक्त मुलाला खूप त्रास झाल्यास सशक्त मुलं त्याला थोडा वेळ बसमध्ये आराम करायला सांगत व स्वतः जास्त मेहनत घेत.
सुमारे दीड तास बस ढकलत ढकलत नेल्यावर सगळी मुलं कॅम्पमध्ये पोचली. मुलं तिथं बाहेर जेवायला बसली तेव्हा जंगलातून काहीतरी आवाज आला व कुणीतरी प्राणी येत आहे, असं त्यांना वाटलं. त्यामुळं मुलं एकमेकांना बिलगली. हातातले खाद्यपदार्थ त्यांनी वाटून खाल्ले. रात्रभर त्यांनी स्वतःहूनच निरनिराळ्या तुकड्या केल्या. त्यातले काहीजण झोपले, तर काहीजण प्राण्यांपासून संरक्षणासाठी पहारा देऊ लागले. हे काम त्यांनी आळीपाळीनं केलं. जी मुलं एक-दोन दिवस आधी जाती-जमाती-धर्म यांबाबतच्या श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावरून एकमेकांशी अबोला धरून होती व एकमेकांना मारण्यापर्यंत ज्यांची मजल गेली होती तीच मुलं आता एकमेकांचं संरक्षण करू लागली होती.
***

मानसशास्त्राचे हे प्रयोग काय सिद्ध करतात? प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वार्थ, स्वतःच्या गटाबद्दल प्रेम, इतर गटांबद्दल तिरस्कार, जिंकण्याची ईर्ष्या या भावना असतात, तसंच प्रत्येक व्यक्तीमध्ये ममता, सहकार्य, सामंजस्य या भावनाही असतात. या दोन्ही प्रकारच्या भावना अगदी लहानपणापासून आपल्या मनात घर करतात. मात्र, जेव्हा जिवाला धोका निर्माण होतो, तेव्हा "आपण एक माणूस आहोत' एवढीच आपली ओळख राहते. सगळ्याच देशांतल्या राजकीय नेत्यांना, पक्षांना, प्रवाहांना हे मानसशास्त्र चांगलंच माहीत असतं. त्यापैकी काही महाभाग, आपण एखाद्या कळपाचे सभासद कसे आहोत, आपला कळप कसा धोक्‍यात आहे व आपण आपल्या कळपाशी कसं एकनिष्ठ राहिलं पाहिजे व वेळ पडल्यास दुसऱ्या कळपाचं हत्याकांड का केलं पाहिजे, हे आपल्याला समजावून सांगत असतात. आपण ते मानतो. असे महाभाग नेते होतात. त्यांचे उद्योगपती-मित्र आलिशान प्रासादात राहतात आणि विरोधी कळपाच्या नेत्यांबरोबर गुपचूप धंदे करतात. आपण कळपप्रेमापायी आपली संपत्ती त्यांना बहाल करतो, आपल्या मुलांना कोणत्या तरी तत्त्वाच्या नावाखाली हिंसा शिकवतो. नेत्यांची मुलं नेते अथवा उद्योगपती होतात. आपण आपल्या मुलाला भिंतीवरच्या छायाचित्रात श्रद्धांजली अर्पण करतो व अश्रू ढाळतो!

Web Title: sundeep waslekar write article in saptarang