प्रतिभा कशी फुलते? (संदीप वासलेकर)

sundeep waslekar write article in saptarang
sundeep waslekar write article in saptarang

भारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा राजकारणाबाहेरील घटकांचा राजकारणासाठी लाभ उठवू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांना बाजूला सारावं लागेल.

संगणक, फोन व इतर वस्तूंची निर्मिती करणाऱ्या "ऍपल' या कंपनीचे दोन संस्थापक होते. दोघांचंही पहिलं नाव स्टीफन अर्थात स्टीव्ह. त्यापैकी स्टीव्ह जॉब्ज भारतात खूप प्रसिद्ध होते. दुसरे स्टीव्ह वॉझनियाक काही महिन्यांपूर्वी भारतात येऊन गेले म्हणून आपल्याला परिचित झाले. वास्तविक, "ऍपल'च्या तंत्रज्ञानाचा शोध वॉझनियाक यांनी लावला. जॉब्ज्‌ यांनी काही शोध लावला नाही; परंतु ते अप्रतिम दर्जाचे उद्योजक होते. त्यांनी आपलं कौशल्य वापरून "ऍपल'चा कारभार जगभरात नेला.

वॉझनियाक यांनी भारतभेटीत एक विधान केलं ः ""भारतात मेहनत करणारे युवक आहेत. ते कठीण परिस्थितीतही शिक्षण घेतात. परिश्रम करून उद्योगसमूहांत अधिकारी बनतात. श्रीमंत होतात. मोठी गाडी विकत घेतात. यशस्वी होतात. मात्र, भारतात प्रतिभेचा अभाव आहे. परिणामी, जगात कुणी विचार केला नसेल अशा सिद्धान्तांचा अथवा तंत्रज्ञानाचा शोध भारतात कुणी लावत नाही.''
हे विधान वाचून अनेक भारतीय भाष्यकारांना संताप आला. समाजमाध्यमांतूनही स्टीव्ह वॉझनियाक यांच्यावर टीकेची झोड उठली.
काही जण वॉझनियाक यांना उद्देशून म्हणाले ः ""स्टीव्ह वॉझनियाक, मायक्रोसॉफ्ट व गुगल या कंपन्यांचे प्रमुख अधिकारी आमच्या भारताचे सत्या नडेला व सुंदर पिचाई आहेत, हे तुम्हाला माहीत नाही का?''
वास्तविक नडेला व पिचाई हे भारतातल्या "रिलायन्स', "महिंद्रा', "टाटा', "थापर', "बिर्ला' अशा कोणत्याही उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा बनले असते का, हा प्रश्‍न आपण स्वतःला विचारत नाही; परंतु एखाद्या उद्योगसमूहाचं प्रमुख व्यवस्थापक बनणं म्हणजे काही विश्‍वातला नवीन शोध लावणं नव्हे. वास्तविक, वॉझनियाक यांनी तर परिश्रम करून वरिष्ठ हुद्दा मिळवणाऱ्या भारतीय लोकांचं कौतुक केलं होतं. मात्र, प्रतिभासंपन्न समाजात जे आमूलाग्र संशोधन होतं त्यासंबंधीचा त्यांचा प्रश्‍न होता.
काहींना वाटतं की सॉफ्टवेअर व मोटारगाड्यांच्या क्षेत्रात आपण खूप नावीन्यपूर्ण काम करतो म्हणजे झालो प्रतिभाशाली! काहींना वाटतं की परदेशात लागलेल्या शोधांमध्ये प्रक्रियेतले बदल करून कमी खर्चात भारतातलं पहिलं यंत्र तयार केलं म्हणजे झालो आपण सर्जनशील! मात्र, त्या यंत्रातले महत्त्वाचे भाग दुसऱ्या देशांतून आयात केलेले असतात, हे आपण सोईस्कररीत्या विसरतो आणि जरी भारतीय बनावटीचे भाग वापरले तरी त्या कल्पनेचा शोध आधी दुसऱ्या कुण्या व्यक्तीनं अथवा संस्थेनं लावलेला असल्यानं, या कल्पनेला भारतानं जन्म दिलेला नाही, हे आपण लक्षातच घेत नाही.

काही विचारवंतांना वाटतं की भारत हा सगळ्यात प्रतिभाशाली देश आहे. त्यांच्या मते, अनेक हजार वर्षांपूर्वी भारतात राहणाऱ्या ज्ञानी व्यक्तींनी अनेक शोध लावले होते व नवीन सिद्धान्तही मांडले होते. वेदांचे, प्राचीन ग्रंथांचे दाखले त्यासाठी दिले जातात. हे अनेक हजार वर्षांपूर्वी झालं. मात्र, आजही भारत हा देश प्रतिभासंपन्नच आहे...वर्तमानकाळातही आपण एक वैज्ञानिक सर्जनशीलता फुलणारा देश निर्माण केला आहे...अशा विचारवंतांना भूतकाळ व वर्तमानकाळ, इतिहास व सद्यःस्थिती यातली रेषा अस्पष्ट करणं ही राष्ट्रभक्ती वाटते!

प्राचीन काळात भारतातल्या विद्वानांनी शून्य ही संकल्पना, बीजगणित, अंकगणितातले महत्त्वाचे सिद्धान्त, काही प्रकारचं पोलाद, योगाभ्यास, शेतीचा नांगर आणि इतर काही महत्त्वाचे शोध लावले. हे तेव्हा म्हणजे इसवीसनपूर्व 500 ते इसवीसन 500 या काळात झालं. आपल्या या वारशाचा आपल्याला अभिमान असणं साहजिक आहे; पण नंतर काय? जगाला संपूर्ण नवीन विचार देणाऱ्या आपल्या समाजानं पूर्वीच्या काळात भारतात लागलेले हे शोध पुढं नेऊन प्रगती का केली नाही? जर प्रतिभेचा ओघ अव्याहत सुरू राहिला असता तर सध्या भारताच्या पुढाकारानं आपल्या सूर्यमालिकेत व सूर्यमालिकेबाहेरील अवकाशात सृष्टी निर्माण केली असती; परंतु गेल्या 1500 वर्षांत आपण जगाच्या मागं पडलो. हे असं का झालं याचं प्रामाणिक विश्‍लेषण करण्याचं धाडस आपल्यात नाही; म्हणून आपण त्यापूर्वीच्या काळातल्या कामगिरीच्या बढाया मारून स्वतःचं समाधान करून घेतो.
वास्तविक, आधुनिक काळातही भारतात प्रतिभा फुलली होती. सुमारे 75 ते 125 पूर्वीच्या काळात डॉ. जगदीशचंद्र बोस, डॉ. सत्येंद्रनाथ बोस, सी. व्ही. रामन, रामानुजन, शांतीस्वरूप भटनागर, डॉ. होमी भाभा व इतर काही शास्त्रज्ञांनी जगाला नवीन विचारांची देणगी दिली. त्या वेळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य होते. ब्रिटिशांची राजवट भारतीय समाजाचं शोषण करणारी होती. तरीही अतिशय प्रतिकूल राजकीय व्यवस्थेत भारतात अभूतपूर्व संशोधन झालं.

जे 100-125 वर्षांपूर्वी झालं ते आज व उद्याही शक्‍य आहे; परंतु त्यासाठी प्राचीन भारतातल्या शास्त्रज्ञांचं यश अथवा परदेशस्थ भारतीय वंशाच्या व्यक्तींनी अमेरिकेतल्या अथवा युरोपातल्या संस्थांमध्ये मिळवलेलं यश म्हणजे आजचं आपलं यश असं समजण्याचा ढोंगीपणा प्रथम थांबवला पाहिजे व प्रतिभा कशी फुलते याचं वस्तुनिष्ठ विश्‍लेषण केलं पाहिजे.

सुमारे 2500 वर्षांपूर्वी भारत, ग्रीस व चीन या तीन देशांत एकाच वेळी विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, राज्यव्यवस्थापन, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये शोध लागले. त्या काळी म्हणजे इसवीसनपूर्व 300 ते 600 या काळात वाहतूक व दळणवळण प्रगत झालेलं नव्हतं. तरीही एकाच वेळी भारत, ग्रीस व चीनमध्ये विज्ञानाचं व वाङ्‌मयाचं सुवर्णयुग कसं आलं? त्या वेळी अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सध्याचं इंग्लंड असलेला विभाग आदी ठिकाणी वैचारिक व विज्ञानविषयक मागासलेपणा का होता?
त्यानंतर सुमारे 1500 वर्षांपूर्वी म्हणजे इसवीसन 400 ते 600 च्या दरम्यान भारत-चीन व रोमचं साम्राज्य इथं प्रतिभा फुलली. हे तिथंच त्या काळात का शक्‍य झालं?
सुमारे 1000-1200 वर्षांपूर्वी म्हणजे इसवीसन 900 ते 1100 या काळात अरब प्रदेशात, तर इसवीसन 1200 ते 1500 या काळात तुर्कस्तान व चीन इथं विज्ञानविषयक अनेक शोध लागले. तेव्हा भारत, युरोप, अमेरिका खंडात विज्ञान, कला, वाङ्‌मय या क्षेत्रांत अभूतपूर्व व जगात मान्यता मिळवू शकेल असं काही विशेष कार्य झालं नाही. इसवीसन 1500 पासून आत्तापर्यंत युरोप व नंतर अमेरिकेचं सर्जनशील कार्यात प्रभुत्व राहिलं. गेल्या 20-30 वर्षांत चीन व जपानमध्ये जगातले सगळ्यात गतिमान संगणक, तसंच पृथ्वीपासून अवकाशापर्यंत पोचणारी शिडी करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञान वापरून केलेले भाग, समुद्राखाली शहर निर्माण करण्याची योजना असे अनेक महत्त्वाचे शोध लागले.

संपूर्ण जगात एका युगात एक-दोन प्रदेश एकाच वेळी विज्ञानविषयक आणि साहित्यविषयक अशा मूलभूत कल्पनांना जन्म देतात अथवा अद्भुत वाटणारं तंत्रज्ञान विकसित करतात. हा गेल्या 2500-3000 वर्षांचा अनुभव आहे.
ही प्रतिभा विकसित होण्याच्या प्रक्रियेत सरकारचं फारसं महत्त्व नसतं. त्यामुळं कोणत्याही सरकारला देशातल्या विज्ञानविषयक वा वाङ्‌मयविषयक संशोधनासाठी विशेष श्रेय अथवा दोष देणं चुकीचं होईल. जेव्हा भारत, ग्रीस आणि चीनमधले विद्वान विश्वाचं आकलन करणाऱ्या व निसर्गावर मात करणाऱ्या नवीन संकल्पनांना जन्म देत होते तेव्हा "सरकार' ही संस्था खूपच कमकुवत होती. ज्या वेळी अरबी शास्त्रज्ञ विश्वाचं स्वरूप बदलणारं संशोधन करत होते, तेव्हा अरबी राजे लढाया करण्यात मग्न होते. युरोप व अमेरिकेत गेल्या 600 वर्षांत जे शोध लागले, त्यांत राजाश्रयाचा भाग कमी होता. चंद्रगुप्त मौर्याकडून आर्यभट्टांना मिळालेलं सहकार्य, अब्बासिद राजांनी बगदादमध्ये स्थापन केलेली केंद्रं, इसाबेला राणीनं कोलंबसाच्या सफारीसाठी दिलेली आर्थिक मदत हे जगाच्या इतिहासाकडं व्यापक दृष्टीनं पाहिलं तर अपवादात्मक अनुभव होते.

विज्ञानाची व साहित्याची वाढ समाजातल्या श्रीमंत घटकांनी दूरदृष्टी ठेवून केल्यामुळं झाली, हा जगाचा गेल्या 3000 वर्षांचा इतिहास सांगतो. भारतात स्वामी विवेकानंदांना राष्ट्रीय विज्ञानसंशोधन संस्था स्थापन करण्यासाठी म्हैसूरचे वडियार राजे व जमशेटजी टाटा यांनी निधी दिला. इतकंच नव्हे तर प्राचीन काळात तक्षशीला विद्यापीठाचा कारभार खासगी मार्गानं आलेल्या द्रव्यामुळं शक्‍य झाला. अमेरिकेत सध्याच्या काळात प्रसिद्ध झालेल्या गुगल, मायक्रोसॉफ्ट, स्पेस एक्‍स अशा संशोधनावर आधारित उभ्या राहिलेल्या उद्योगांना पूर्णतः खासगी क्षेत्रातलं भांडवल व इतर सामग्री मिळाली. जे कार्य 500 वर्षांपूर्वी व्हेनिसच्या व फ्लॉरेन्सच्या धनवान कुटुंबांनी युरोपात प्रतिभा फुलवण्यासाठी केलं तेच काम सध्या अमेरिकेतले उद्यम-भांडवलदार करतात.

प्रतिभा फुलवण्यासाठी सर्जनशीलतेवर आधारित असणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गरज आहे. ऑक्‍सफर्ड व केंब्रिज विद्यापीठात अव्याहत संशोधन सुरू असतं. चीन, जपान, अमेरिका, युरोप इथल्या विद्यापीठांत घोकंपट्टी करणं, प्राध्यापकांचा "होयबा' होणं, "गुगल'वर वाचून कॉपी-पेस्ट करणं असले प्रकार अजिबात चालत नाहीत. प्राध्यापकांना वैचारिक आव्हान देणं, तसंच नवीन संशोधनात सहकार्य करणं हे विद्यार्थ्यांचं कर्तव्य समजलं जातं.

जिथं प्रतिभा फुलते, तिथं समाज हाराजकारणाला फारसं महत्त्व देत नाही. तिथले राजकीय नेते स्पर्धा, लढाया, डावपेच करतात; पण ते विद्वान व वैज्ञानिक यांना आपल्या राजकारणातली प्यादी समजून खेळवत नाहीत. सर्वसामान्य लोक विज्ञानविषयक नवीन कामगिरीला निवडणुकीतल्या यशापेक्षा जास्त महत्त्व देतात.
भारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा राजकारणाबाहेरील घटकांचा राजकारणासाठी लाभ उठवू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांना बाजूला सारावं लागेल. उद्यम-भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात पुढं यावं लागेल व शैक्षणिक पद्धतीची सर्जनशीलतेवर आधारित संरचना करावी लागेल. असं झालं तरच 21 व्या शतकात भारत महत्त्वाचं स्थान प्राप्त करू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com