या क्षणी (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 15 जुलै 2018

जेव्हा आपण "हा' क्षण विसरून "त्या' क्षणाच्या मागं धावतो तेव्हा काही बाबी अनपेक्षितरीत्या घडत असतात. हे असं राजकारणात, उद्योगधंद्यात, कलाक्षेत्रात जसं घडतं, तसंच ते आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही घडतं.

माझं घर समुद्रकिनारी आहे. मी या क्षणी खिडकीतून समुद्राचं निरीक्षण करत आहे. पावसाळी वातावरण असल्यानं आभाळात काळेकुट्ट ढग आहेत. सूर्याची किरणं काही ठिकाणी ढगांमधल्या एखाद्या अरुंद पट्टीतून प्रवेश करत आहेत; त्यामुळं पूर्ण काळोखी अशी नाही.

जेव्हा आपण "हा' क्षण विसरून "त्या' क्षणाच्या मागं धावतो तेव्हा काही बाबी अनपेक्षितरीत्या घडत असतात. हे असं राजकारणात, उद्योगधंद्यात, कलाक्षेत्रात जसं घडतं, तसंच ते आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही घडतं.

माझं घर समुद्रकिनारी आहे. मी या क्षणी खिडकीतून समुद्राचं निरीक्षण करत आहे. पावसाळी वातावरण असल्यानं आभाळात काळेकुट्ट ढग आहेत. सूर्याची किरणं काही ठिकाणी ढगांमधल्या एखाद्या अरुंद पट्टीतून प्रवेश करत आहेत; त्यामुळं पूर्ण काळोखी अशी नाही.

मी लांबून येणारी प्रत्येक लाट लक्षपूर्वक पाहतोय. लांब असताना लाट खूप प्रचंड वाटते. जसजशी ती किनाऱ्याजवळ येते तसतशी ती हळूहळू लुप्त होत जाते. मी दुसऱ्या लाटेवर लक्ष केंद्रित करतो. मग तिसऱ्या, चौथ्या...

मी या क्षणात हरवून गेलो आहे. आता तरी मला समाधान वाटत आहे. मी त्या समाधानाचा शोध घेण्याबरोबरच, आपल्यासमवेत अजून कुणी या क्षणात सहभागी आहे काय हे पाहतो. बाजूला दोन्ही मुलं आहेत, हे पाहून बरं वाटतं; परंतु काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी दोघंही शिक्षणानिमित्त व व्यवसायानिमित्त घर सोडतील. मग त्या वेळी असाच एक क्षण, तशाच लाटा व तशीच सूर्यकिरणं असली तर मला समाधानी वाटेल का? की त्या वेळी तो क्षण मला रिक्त वाटेल? भविष्यात येऊ शकणाऱ्या त्या क्षणाचा विचार केल्यावर मला आत्ताच्या या क्षणाचं महत्त्व कळतं.
***

आपल्या आयुष्यात रोज असे अनेक मौल्यवान क्षण येतात; पण आपण त्यांच्याकडं लक्ष देत नाही. आपलं लक्ष एकतर भविष्यकाळावर तरी असतं अथवा भूतकाळात तरी. कधीतरी आपण खासदार, नामदार, साहेब वगैरे झाल्यावर खूश कसे होऊ, अशा भविष्यातल्या "त्या' क्षणांत गुंतून जाऊन आपण वर्तमानातल्या "या' क्षणाला विसरतो, तर कधी पूर्वी स्वतः वा दुसऱ्यानं केलेल्या चुकांमुळं "त्या' क्षणी कसं नुकसान झालं होतं, यात गुरफटून "या' विद्यमान क्षणातल्या आनंदाला मुकतो वा आव्हानाकडं दुर्लक्ष करतो.

"माणसानं भूतकाळ-भविष्यकाळापेक्षा वर्तमानकाळात राहिलं पाहिजे,' असं अनेक धर्मग्रंथांत, लहानपणी शिकलेल्या शाळेच्या धड्यात किंवा कुणाच्या तरी व्याख्यानांद्वारे आपण अनेकदा ऐकलेलं-वाचलेलं असतं. कबीराचे दोहे आपल्याला पटत असतात; पण तरीही आपण हा क्षण विसरतो व त्या - गेलेल्या किंवा येणाऱ्या - क्षणांचा पाठलाग करतो.

मी स्वतःला एक सवय लावून घेतली आहे. या सवयीची सुरवात कधी व कशी झाली ते आठवत नाही; पण अनेक वर्षांपासून मला ही सवय आहे. मी अनेकदा अंतर्मुख होऊन क्षणांचं निरीक्षण करतो. अनुभूती घेतो. जे क्षण मौल्यवान वाटतात त्यांची वर्षातून एक-दोनदा नोंद करतो. अशी आता माझ्याकडं मौल्यवान व प्रसन्न क्षणांची यादी तयार आहे. गेल्या 21 वर्षांत मी असे 125 क्षण टिपून ठेवलेले आहेत. अशा क्षणांची ही यादी उगाचच लांबलचकही होऊ नये यावरही माझा कटाक्ष असतो. निवडलेल्या 125 क्षणांपैकी प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी कायमस्वरूपी मौल्यवान आहे, याची मला खात्री आहे. या 125 क्षणांपैकी फक्त एका क्षणाचा अपवाद सोडला तर उरलेल्या 124 क्षणांचा संबंध माझं कार्य, माझा कधी झालेला गौरव, भेटणारे जागतिक नेते, देशोदेशींच्या पंतप्रधानांशी केलेल्या चर्चा यातल्या कशाशीही नाही, तसंच माझं लेखन, वाचकांचा प्रतिसाद, वाढलेला जनसंपर्क यांपैकीसुद्धा कशाशीही या क्षणांचा संबंध नाही. हे क्षण केवळ माझेच आहेत.
***

प्रत्येकाच्या आयुष्यात मौल्यवान क्षण येतात. काही आनंददायक असतात, काही क्‍लेषदायकही असतात; पण ते मौल्यवान असतात. केवळ महत्त्वाकांक्षेच्या हव्यासापायी अशा क्षणांचा जेव्हा कुणाला विसर पडतो, तेव्हा मला खूप आश्‍चर्य वाटतं.
लहानपणी भावंडं एकमेकांबरोबर प्रेमाचे क्षण अनुभवतात; परंतु मोठे झाल्यावर केवळ महत्त्वाकांक्षेमुळं ते असे क्षण विसरतात व एकमेकांचे वैरी बनतात. भारतातल्या अनेक औद्योगिक घराण्यांत हा प्रकार घडला आहे, तसंच अनेक राजकीय कुटुंबांनीही हा अनुभव घेतला आहे. हा अनुभव भारताबाहेरही अनेक औद्योगिक, राजकीय व कलाक्षेत्रातल्या कुटुंबांनी घेतला आहे
दुसरा एक जगभरचा अनुभव म्हणजे एखादा राजकीय कार्यकर्ता एका राजकीय नेत्याच्या सहवासात व मार्गदर्शनात मोठा नेता बनतो, त्याच्याबरोबर संघर्षाचे अनेक क्षण एकत्र घालवतो; परंतु स्वतः नेता झाल्यावर मात्र त्या मार्गदर्शकनेत्याचा उपमर्द करतो.

जर्मनीच्या पंतप्रधान अंजेला मर्केल या खूप कर्तबगार आहेत, याबद्दल प्रश्‍न नाही. त्या मूळच्या रशियाच्या आधिपत्याखालील पूर्व जर्मनीच्या नागरिक होत्या. जर पश्‍चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी यांचं विलीनीकरण झालं नसतं तर मर्केल यांचं नावही कधी ऐकण्यात आलं नसतं. जर्मनीचे नेते हेल्मुट कोल यांनी मर्केल यांना लोकशाहीचं पक्षीय राजकारण शिकवलं. हेल्मुट यांच्या शिकवणुकीतून अंजेला यांनी अनेक अनमोल अनुभव घेतले असतील; पण संधी मिळाल्यावर अंजेल यांनी हेल्मुट यांना ठोकरलं.
दक्षिण आफ्रिकेच्या वंशवादाच्या लढ्यात थाबो एम्बेकी यांनी नेल्सन मंडेलांसमवेत अनेक क्षण अनुभवले; परंतु राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी नेल्सन यांचा फोनदेखील कधी घेतला नाही.
मलेशियात महाथीर मोहंमद यांनी नजीब रझाक यांना पुढं आणलं. संरक्षणमंत्री बनवलं; परंतु पंतप्रधान झाल्यावर नजीब यांनी महाथीर यांना वनवासात पाठवलं. मी एकदा मलेशियात एका कार्यशाळेचं सूत्रसंचालन करत असताना महाथीर व नजीब हे दोघंही उपस्थित राहणार होते. तेव्हा ते दोघं एकमेकांसमोर येणार नाहीत याची काळजी घेण्याविषयीच्या कडक सूचना मला देण्यात आल्या होत्या. अलीकडं नजीब पदच्युत झाले व महाथीर वयाच्या त्राण्णवाव्या वर्षी पुन्हा पंतप्रधान झाले.
***

जेव्हा आपण "हा' क्षण विसरून "त्या' क्षणाच्या मागं धावतो तेव्हा काही बाबी अनपेक्षितरीत्या घडत असतात. हे असं राजकारणात, उद्योगधंद्यात, कलाक्षेत्रात जसं घडतं, तसंच ते आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही घडतं.
जर देशाला, समाजाला, स्वतःला चांगली दिशा मिळावी अशी आपली इच्छा असेल तर देशाला, समाजाला व आपल्याला सर्वसमावेशक दृष्टीमुळं, एकत्र आल्यामुळं, सलोख्यानं राहिल्यामुळं जे अमूल्य क्षण मिळतात त्या क्षणांची जपणूक करूनच पुढची वाटचाल करावी लागेल.

माझं लक्ष अजूनही समुद्राच्या लाटांवर आहे. आता सूर्य अस्ताला पोचल्यामुळं लाटा हळूहळू दिसेनाशा होतील. रात्रीच्या अंधारात काय दडलेलं असेल, याची मला कल्पना नाही. उद्या पुन्हा सूर्योदय झाल्यावर मी अजून एक मौल्यवान क्षण आणि नवीन दिशा शोधत राहीन; परंतु हा क्षण मात्र मी कृतज्ञतापूर्वक जपून ठेवेन.

Web Title: sundeep waslekar write article in saptarang