एका देशाची व्यथा (संदीप वासलेकर)

sundeep waslekar write article in saptarang
sundeep waslekar write article in saptarang

त्या झगमगाटी देशाची आपल्याला केवळ उजळ बाजूच माहीत आहे. उर्वरित देशात, विशेषतः तिथल्या ग्रामीण भागातली, दिशाहीन नागरिकांची काय परिस्थिती आहे याबद्दल भारतातला "पश्‍चिमपूजक' मीडिया कधी काही लिहीत नाही.

एका देशाच्या पश्‍चिम विभागात एक राज्य आहे. तिथल्या ग्रामीण विभागात एक कुटुंब एका झोपडीत राहतं. त्यांच्याकडं पाणी नळानं येत नाही. विहिरीतून पंपानं काढावं लागतं. पूर्वी सहज मिळत असे. आता जास्त शक्तीचा पंप लावून खूप खोलवर जावं लागतं.

अलीकडं पाण्यातून खूप विचित्र रंगाचं मिश्रण येतं. असं पाणी प्यायलं गेलं तर जिवाला धोका होऊ शकतो. स्वच्छ पाण्याची कमतरता असल्यानं कुटुंबातले सभासद कशीबशी आंघोळ करतात. कपडे-भांडी धुतल्यानंतर वापरलेलं पाणी बाजूच्या झाडाला घातलं जातं. कधी कधी न्हाणीघर साफ करायलाही वापरलं जातं.
ही व्यथा काही एकाच कुटुंबाची नाही. त्या संपूर्ण प्रदेशात सगळ्यांचेच असे हाल आहेत व हे केवळ एका प्रदेशापुरतं मर्यादित नाही. त्या देशाच्या मध्यवर्ती भागात एका राज्यात खाणी आहेत. खाणकामगारांचे हाल ग्रामीण भागातल्या रहिवाशांहूनही अधिक आहेत. त्यांच्या परिसरातल्या पाण्याचे रंग पाहिल्यावर, हे पाणी आहे की दुसरं काही द्रव्य, असा प्रश्‍न पडावा.

या देशात उजवीकडं एक राज्य आहे. तिथं कमालीची गरिबी आहे. तिथल्या छोट्या व मोठ्या शहरांत पाणी मिळत नसल्यानं रस्त्यातून गटारं वाहतात. अनेक ठिकाणी दुर्गंधी येते.

अशा दारिद्य्रमय जीवनानं त्रस्त झालेल्या लोकांना भविष्याची आशा दिसत नाही. ते लोक जातीच्या अथवा पंथाच्या राजकारणात पडतात. अनेक युवक डाव्या विचारसरणीचे कडवे कार्यकर्ते बनतात. काही उग्र राष्ट्रवादाच्या दिशेनं जातात. सतत वर्तमानातल्या व भूतकाळातल्या व्यवस्थेला दोष देणारा व बहुसंख्याक नागरिकांची अस्मिता जागृत करणारा नेता शोधतात. त्याच्या निवडीनं आपली सगळी दुःखं नाहीशी होतील, अशी अपेक्षा बाळगतात.

समाजाचे तुकडे करणाऱ्या राजकारणातून उत्तरं शोधणाऱ्या युवकांना हे कळत नाही की राजकारणापलीकडंही काही बदल होत आहेत. ग्रामीण भागात रसायनं व धूर ओकणारे कारखाने व धनाढ्यांच्या मालकीची शेतं भूगर्भातलं पाणी शोषून घेतात म्हणून त्यांना स्वच्छ पाणी मिळत नाही... काही उद्योगसमूहांच्या हातात आर्थिक सत्ता एकवटल्यामुळं लघुउद्योग बंद पडतात...युवकांच्या पोटावर पाय दिले जातात...उद्योग स्वयंचलित तंत्रज्ञानावर अवलंबून राहतात व गरिबांच्या जागा व पाणी विकत घेऊन त्यांना देशोधडीला लावलं जातं...

भरकटलेले युवक उद्योगपतींविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत दाखवत नाहीत. ते जाती-पंथाचं राजकारण, कडवी डावी विचारसरणी अथवा उग्र राष्ट्रवाद या तीनपैकी एका "राजकीय पॅकेज'ला भुरळून जातात व दिशाहीन होऊन भरकटतात.
वर वर्णन केलेल्या देशाचं इंग्लिशमधलं नाव आहे "युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका' ! आपण त्या देशाला "अमेरिका' या नावानं ओळखतो. पश्‍चिमेकडच्या राज्याच्या उल्लेख वर आलेला आहे, त्या राज्याचं नाव आहे ऍरिझोना. मध्य विभागातल्या कोळशाच्या खाणी असलेलं राज्य म्हणजे केंटकी व पूर्वेकडं पाण्याअभावी गलिच्छपणाचं साम्राज्य पसरलेली राज्यं म्हणजे मिसिसिपी व अलाबामा. ग्रामीण भागातल्या भरकटलेल्या जनतेला प्रिय असलेला उग्र राष्ट्रीय अभिमान जोपासणारा नेता म्हणजे डोनाल्ड ट्रम्प.

ही अशी परिस्थिती असूनही अमेरिका हे बलाढ्य राष्ट्र बनण्याचं कारण म्हणजे, तिथं होणारं उत्कृष्ट दर्जाचं मूलभूत संशोधन. अलीकडच्या काळातले बहुतांश शोध अमेरिकेत लागलेले आहेत. तिथं संशोधन करणाऱ्या युवकांना प्रचंड वाव व मुबलक पैशांचं पाठबळ मिळतं. त्यांचा धर्म, वंश, रंग याचा कुणी विचार करत नाही. संशोधनक्षेत्रात मूलतः भारतीय, चिनी, तुर्कस्तानी, इराणी, यहुदी युवक आहेत. सर्वसमावेशक, सर्वोत्कृष्ट संशोधनधोरणामुळं अमेरिकेची प्रगती होत असते. या प्रक्रियेत अनेक भारतीय व्यावसायिक व तज्ज्ञ समाविष्ट झाल्यानं आपल्याला फक्त अमेरिकेचं एकच अंग माहीत आहे. उर्वरित देशात, विशेषतः ग्रामीण भागात, दिशाहीन अमेरिकी लोकांची काय परिस्थिती आहे याबद्दल भारतातला "पश्‍चिमपूजक' मीडिया कधी काही लिहीत नाही.

अमेरिकेची दुसरी एक जमेची बाजू म्हणजे, तिथली प्रसारमाध्यमं खऱ्या अर्थानं स्वतंत्र आहेत. भारतातली इंग्लिश वर्तमानपत्रं अमेरिकेतल्या ग्रामीण भागातल्या सत्य स्थितीवर प्रकाश टाकत नाहीत; पण तुम्ही नेहमी "न्यूयॉर्क टाइम्स' वाचला तर खरं काय ते कळेल. अमेरिकेतल्या वृत्तपत्रस्वातंत्र्यामुळं सत्य फार दिवस लपून राहत नाही व राज्यकर्त्यांवर वचक राहतो. त्यांना उशिरा का होईना; पण आपला चुकीचा मार्ग सोडायला लोक भाग पाडतात; परंतु जगात आज असे अनेक देश आहेत की जिथं अमेरिकेसारखं सर्वसमावेशक संशोधन होत नाही अथवा तिथं माध्यमं स्वतःलाच संपूर्ण स्वातंत्र्यापासून वंचित ठेवतात. मात्र, तिथल्या ग्रामीण भागात ऍरिझोनाप्रमाणे आर्थिक सत्ता केंद्रित होऊन सर्वसामान्य कुटुंबातले युवक दिशाहीन होतात व विभाजन करणाऱ्या राजकीय मनोवृत्तीला बळी पडतात. असे युवक द्वेषाच्या जाळ्यात सापडतात.
असे देश आफ्रिका व आशिया खंडात आहेतच; परंतु युरोपमध्येही आहेत. इंग्लंडचा "ब्रेक्‍झिट' निर्णय प्रामुख्यानं ग्रामीण रहिवाशांनी घेतला व सगळ्या इंग्लंडलाही त्याच मार्गावर पाठवलं. युरोपच्या मध्य व पूर्व भागात असलेल्या ऑस्ट्रिया, रुमानिया, युक्रेन या देशांत हीच व्यथा आहे.

संपूर्ण जगाची अर्थरचना "मूठभर लोक खातात तुपाशी व बाकीचे राहतात उपाशी' या तत्त्वावर होते तेव्हा अशा व्यवस्थेत फायदा होणारे धनाढ्य व बलाढ्य तर खूश होतातच; परंतु कंगाल होणारे लोकही खूश होतात. कारण, त्यांना अशा आर्थिक व्यवस्थेचा झगमगाट आवडतो. अनेकांना राजकीय नेते, धनाढ्य व धर्मप्रसारक पैसे देतात. त्या पैशावर दारूच्या पार्ट्या करून मारामाऱ्या करण्यात कंगाल लोकांना समाधान मिळतं. अखेरीस धर्माच्या मागं जाऊन स्वाभिमान व संपत्ती मिळण्याची आशा वाटते. जॉर्जटाऊन या सुप्रसिद्ध विद्यापीठातल्या संशोधकांच्या अनुमानानुसार, अमेरिकेतील धर्म नावाच्या उद्योगाची 1200 अब्ज डॉलर एवढी आर्थिक उलाढाल दरवर्षी होते. म्हणजे ही 80 लाख कोटी रुपये एवढी मोठी वार्षिक उलाढाल आहे. अमेरिकेत ही आकडेवारी उपलब्ध आहे. इतर देशांतले संशोधक अशा विषयावर संशोधन करण्याचं धाडस करत नाहीत.

संपूर्ण जगभरच विषमतेकडं पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून नवीन आर्थिक घडी बसवण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत जाती, पंथ, धर्म यांच्या चष्म्यातून जगाकडं पाहिलं तर आपल्यातला अहंकार कदाचित सुखावेलही; परंतु त्यातून साध्य काहीही होणार नाही.

मी या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या कुटुंबाचं आडनाव पॉप आहे. क्रेग पॉप हा कुटुंबप्रमुख आहे. या कुटुंबाची व्यथा ही केवळ त्या एकट्या कुटुंबाचीच नाही. जगभरातल्या अनेक कुटुंबांची ती आहे व ही परिस्थिती बदलायची असेल तर एका नवीन जगाच्या संकल्पनेबद्दल विचार करणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com