पाणी कधी उकळतं? (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 16 डिसेंबर 2018

आपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. जटिल वास्तव आपल्यापुढं मांडून समस्यांबाबत विवेचन करणाऱ्या तज्ज्ञांपेक्षा आपल्याला एक स्लोगन देऊन एक साधीसुधी कल्पना देणारे आणि आभासात आपल्या आशांना गुरफटणारे नेते खूप खूप आवडतात. मात्र, आभासाच्या मोहात न पडता कितीही जटिल आणि कठीण वाटलं, तरी सत्य परिस्थिती समजून घेणं आणि कोणत्याही मुद्‌द्‌यावर सारासार माहितीपूर्ण विचार करून भूमिका घेणं ही जबाबदारी नागरिकांची आहे.

आपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. जटिल वास्तव आपल्यापुढं मांडून समस्यांबाबत विवेचन करणाऱ्या तज्ज्ञांपेक्षा आपल्याला एक स्लोगन देऊन एक साधीसुधी कल्पना देणारे आणि आभासात आपल्या आशांना गुरफटणारे नेते खूप खूप आवडतात. मात्र, आभासाच्या मोहात न पडता कितीही जटिल आणि कठीण वाटलं, तरी सत्य परिस्थिती समजून घेणं आणि कोणत्याही मुद्‌द्‌यावर सारासार माहितीपूर्ण विचार करून भूमिका घेणं ही जबाबदारी नागरिकांची आहे.

पाणी किती अंश सेल्सिअसला उकळतं? तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी नसाल, तर "100 अंश सेल्सिअस' असं पटकन उत्तर द्याल. एव्हरेस्ट या पर्वतशिखरावर किती अंश सेल्सिअसला पाणी उकळतं? पुन्हा उत्तर ः 100 अंश!... माझाही अनेक वर्षं असाच समज होता. पण एव्हरेस्ट शिखरमाथ्यावर पाणी 70 अंश सेल्सिअसला उकळतं अथवा आल्प्स या पर्वताच्या माथ्यावर ते 85 अंश सेल्सिअसला उकळतं, हे मला पुस्तकात वाचून कळलं. हे काही मी विज्ञानाच्या पुस्तकातून शिकलो नाही, तर प्राध्यापक याशका मुंक यांच्या लोकशाहीवर गाजलेल्या एका ग्रंथात वाचून शिकलो.
पाणी केवळ समुद्रकिनारी 100 अंश सेल्सिअला उकळतं. नंतर उंची, हवेचा दबाव आदी बाबींचं एक सूत्र आहे. त्या सूत्रानुसार पाणी वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या तपमानास उकळतं. परंतु, सूत्र म्हणजे जटिलता. असं प्रत्येक सूत्र शिकण्यात आपल्याला रस नसतो. म्हणून आपण एखादा साधासुधा समज हेच सत्य मानतो. इतकंच नव्हे, तर अनेकदा हा आपला साधा समज हे सत्य नाहीच, तर एक आभास असं कोणी सिद्ध करून दाखवलं, तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो आणि जे तज्ज्ञ जटिल वास्तव हे आभासी सत्यापेक्षा कसं वेगळं आहे, हे स्पष्ट करून सांगतात त्यांना आपण जास्त शिष्ट समजतो. अनेकदा त्यांचा तिटकाराही करतो. जटिल वास्तव आपल्यापुढं मांडून समस्यांबाबत विवेचन करणाऱ्या तज्ज्ञांपेक्षा आपल्याला एक स्लोगन देऊन एक साधीसुधी कल्पना देणारे आणि आभासात आपल्या आशांना गुरफटणारे नेते खूप खूप आवडतात.

आपण आर्थिक विवंचनेत सापडलो, तर सामाजिक आत्मपरीक्षण करण्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या देशास अथवा समुदायास दोष देणं खूप सोपं असतं. आपण खूपच कर्तबगार आहोत; परंतु आपल्यावर बाहेरून कोणीतरी अतिक्रमण करत आहे, म्हणून आपली आर्थिक प्रगती होत नाही, असा साधा आभास निर्माण करणं सोपं असतं. असे आभास निर्माण करणारे नेते आपल्याला प्रिय होतात.

गेल्या शतकात हिटलरनं साधासुधा आभास निर्माण करण्याच्या तंत्राचा भरपूर उपयोग केला. वास्तविक, पहिल्या महायुद्धात युद्धखोरी केली म्हणून विजयी राष्ट्रांनी जर्मनीवर अनेक कडक निर्बंध घातले होते. हिटलरनं त्याची कारणमीमांसा करण्याऐवजी जर्मन लोकांच्या आर्थिक अडचणींसाठी ज्यू लोकांना जबाबदार ठरवलं आणि ज्यू (यहुदी) लोकांवर अत्याचार केले. शेवटी जर्मनी हा देश दुसऱ्या महायुद्धात उद्‌ध्वस्त झाला. हिटलरला आत्महत्या करावी लागली.

सन 1980 च्या दशकात अमेरिकेची आर्थिक प्रगती खुंटण्याची चिन्हं दिसत होती. त्यावेळी अनेक अमेरिकी नेत्यांनी जपानला दोषी ठरवलं. त्या काळात मला एक बगीच्यात काम करणारा माळी भेटला होता. तो म्हणाला ः ""आम्ही लोक मोठीमोठी शस्त्रं तयार करतो आणि सामर्थ्याच्या शर्यतीत जिंकतो. जपानी लोक जीवनाला उपयोगी वस्तू स्वस्तात बनवून निर्यात करतात. ते आर्थिक शर्यतीत जिंकतात.'' तो माळी अपवादात्मक होता. बहुसंख्य अमेरिकी लोकांना सर्वांगीण विचार करण्याऐवजी जपानी लोकांना दुष्ट समजण्यात जो साधेपणा होता, तो हवासा होता.

अमेरिकेतल्या नेतृत्वानं सध्या तर साधेपणाचा आभास निर्माण करण्याच्या तंत्राचा "न भूतो न भविष्यती' एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा चंग बांधला आहे. निवडणुकीच्या प्रचारात डोनाल्ड ट्रंप यांनी सध्याच्या मानवी संस्कृतीला अरबी देशांचा कसा धोका आहे, याचा डंका वाजवला आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यावर सर्वांत प्रथम सौदी राजपुत्राला आलिंगन दिलं. त्याच्याबरोबर शस्त्रास्त्र विकण्याचा प्रचंड मोठा सौदा केला. परंतु, अमेरिकेच्या ग्रामीण भागातल्या लोकांना ट्रंप यांचं दहशतवादाविरोधी बोलणं आणि प्रत्यक्षात अरबी युद्धखोरांवर प्रेम करणं यांचं विश्‍लेषण करणं म्हणजे चूक आहे असं वाटतं. जटिल वास्तव समोर मांडणाऱ्या विश्‍लेषक विद्वानांचा आणि पत्रकारांचा त्यांना राग येतो आणि त्यांना "देशाचे शत्रू' म्हणून हिणवण्यात येतं.
अर्थात जटिल वास्तवता दूर हटवून साधासुधा आभास निर्माण करण्याचा प्रकार आज अनेक देशांत होतो. चीन, रशिया, जपान, पोलंड, हंगेरी, ब्रिटन, ब्राझिल इथं त्याचं प्रमाण खूप मोठं आहे. या तंत्राचा सर्वांत धोकादायक वापर मध्यपूर्व आणि दक्षिण आशियातल्या दहशतवादी संघटनांचे म्होरके करतात. "आपला धर्म संकटात आहे,' असा सोपा संदेश इंटरनेटद्वारा पसरवून इतर कारणांमुळं हताश झालेल्या युवकांना आत्महत्या करण्यास मोहित करायचं आणि स्वतः मात्र सत्तेचं राजकारण करायचं, हा दहशतवाद्यांचा धंदा झाला आहे. बऱ्याच दहशतवादी संघटनांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न प्रत्येकी एक ते सात हजार कोटी रुपये एवढं मोठं असतं; पण त्या संघटनांचे अनुयायी त्याचं विश्‍लेषण करत नाहीत आणि एका साध्या आभासी स्लोगनवर विश्‍वास ठेवून स्वखुषीनं माणुसकीचे शत्रू बनतात. प्रत्येक देशातली आर्थिक प्रगती वेगवेगळ्या टप्प्यांवर लोकांना अपेक्षित जसे फळ देते, त्यासाठी आपली जमीन, नैसर्गिक स्वभाव, हवामान, भौगोलिक आणि ऐतिहासिक परिस्थिती हे सर्व विचारात घेऊन शेती, उद्योग आणि तंत्रज्ञान व या सर्वांना जोडीचं शिक्षण याचं गुंतागुंतीचं धोरण बनवणं आवश्‍यक असतं आणि अशा धोरणाची अंमलबजावणी होते की नाही ह्यावर देखरेख करणे नागरिकांच्या हिताचे असते. प्रत्यक्षात आपण निवडणुकीच्या वेळेस धोरणं आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आखलेल्या उपाययोजना यांचं विवेचन जाहीरनाम्यात केलं आहे का नाही, याचा अभ्यास करत नाही. त्याऐवजी आपण वक्तृत्व म्हणजे नेतृत्व समजतो. घोषणा म्हणजे परिवर्तन मानतो आणि आभास हेच वास्तव समजतो... आणि पाणी नक्की कधी व कुठं उकळतं ते समजून न घेतल्यानं आपले हात अथवा कधीकधी आपलं शरीर भाजून घेतो.

युद्धामध्ये शत्रूला फसवण्यासाठी आभास तयार करणं साहजिक आहे. महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णानं अनेकदा आभास निर्माण करून पांडवांना कौरवांवर विजय मिळवण्यासाठी मदत केली होती. दुसऱ्या महायुद्धात इंग्रज सैन्यातल्या जास्पर मास्केलीन या जादूगारानं अनेकदा आभासनिर्मिती करून जर्मन सैन्याचा पराभव केला होता. सन 1967 आणि 1973 च्या अरब-इस्रायली युद्धातही आभासी प्रयोगांचा वापर शत्रूची दिशाभूल करण्यासाठी केला होता.

परंतु, स्वतःच्या देशात स्वतःच्या जनतेलाच आभास निर्माण करून फसवणं ही अनैतिक राजनीती झाली. अर्थात सर्वच राजकीय नेते काही नैतिक मूल्यांसाठी खरी वस्तुस्थिती दाखवून स्वतःचं राजकीय नुकसान करून घेणार नाहीत. म्हणून आभासाच्या मोहात न पडता कितीही जटिल आणि कठीण वाटलं, तरी सत्य परिस्थिती समजून घेणं आणि कोणत्याही मुद्‌द्‌यावर सारासार माहितीपूर्ण विचार करून भूमिका घेणं ही जबाबदारी नागरिकांची आहे. ज्या देशात अशा सावधतेनं नागरिकत्वाची जबाबदारी पाळणारे लोक आहेत, अशा देशास अंतर्गत अथवा बाह्य धोका उत्पन्न होऊ शकत नाही.

Web Title: sundeep waslekar write article in saptarang