मानवतावादी महापुरुष (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सध्याच्या काळात भारताला सुशासन देणारे राज्यकर्ते, रोजगार निर्माण करणारे उद्योजक व शेतकरी, विज्ञानक्षेत्रात देशाला पुढं नेणारे शास्त्रज्ञ यांची जशी गरज आहे, तशीच गरज बहुसंख्याक व अल्पसंख्याक, गरीब व श्रीमंत, उजवे व डावे अशा सगळ्यांना एकत्र आणून नवभारताची वैचारिक संकल्पना बाळगणाऱ्या सर्जनशील विचारवंतांचीसुद्धा आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १०० वर्षांपूर्वी देशप्रेम व वैश्विक विचार यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला होता. ‘देशभक्ती’ या संकल्पनेवर टागोर यांची निष्ठा होती; परंतु ‘राष्ट्रीयत्व’ या संकल्पनेवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता.

सध्याच्या काळात भारताला सुशासन देणारे राज्यकर्ते, रोजगार निर्माण करणारे उद्योजक व शेतकरी, विज्ञानक्षेत्रात देशाला पुढं नेणारे शास्त्रज्ञ यांची जशी गरज आहे, तशीच गरज बहुसंख्याक व अल्पसंख्याक, गरीब व श्रीमंत, उजवे व डावे अशा सगळ्यांना एकत्र आणून नवभारताची वैचारिक संकल्पना बाळगणाऱ्या सर्जनशील विचारवंतांचीसुद्धा आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १०० वर्षांपूर्वी देशप्रेम व वैश्विक विचार यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला होता. ‘देशभक्ती’ या संकल्पनेवर टागोर यांची निष्ठा होती; परंतु ‘राष्ट्रीयत्व’ या संकल्पनेवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. ते नेहमी मानवतावादी दृष्टिकोन मांडत असत व ‘राष्ट्रीयत्वापेक्षा मानवतावाद महत्त्वाचा आहे’, असं त्यांना वाटत असे.

गेल्या वर्षी, म्हणजे ऑगस्ट २०१६ मध्ये, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ७५ वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्तानं बरोबर एका वर्षापूर्वी माझे त्यांच्याबद्दलचे काही विचार या सदरात लिहिण्याचा विचार होता; परंतु ते काही ना काही कारणानं राहून गेलं.

अलीकडं मी हंगेरीचे प्रसिद्ध विद्वान आंद्राश झलोशी नेगी यांच्या निमंत्रणावरून बुडापेस्ट इथं गेलो होतो. तिथं त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा होती. मुख्य विषय ‘युरोपातल्या काही राष्ट्रांमधल्या आपापसातल्या बौद्धिक स्पर्धा’ हा होता. चर्चा संपताना ते अचानक म्हणाले ः ‘‘मला भारतातले कुणी अभ्यासक, संशोधक अथवा लेखक भेटले, तर रवींद्रनाथ टागोर यांच्यासंबंधीचे विचार मनात येतात. टागोर हे हंगेरीमध्ये खूप लोकप्रिय आहेत. सुमारे ९० वर्षांपूर्वी ते बालाटान सरोवराच्या किनारी प्रकृतिस्वास्थ्यासाठी अनेक दिवस राहिले होते. त्यांचं नावही एका रस्त्याला देण्यात आलेलं आहे.’’

हंगेरीमध्ये गुरुदेवांबद्दल जागतिक कीर्तीचे विद्वान एवढ्या आत्मीयतेनं बोलतात हे ऐकून मला आनंद तर झालाच; पण आश्‍चर्यही वाटलं. प्रसिद्ध आयरिश कवी यीट्‌स, विख्यात फ्रेंच साहित्यिक रोमाँ रोलाँ, तसंच इंग्लंड आणि फ्रान्समधल्या इतरही अनेक लेखकांना टागोर यांच्याबद्दल खूप आदर होता, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळवून देण्यासाठी यीट्‌स या जगप्रसिद्ध कविवर्यांनी प्रयत्न केले होते, हेही मला माहीत होतं; परंतु हंगेरी, झेक प्रजासत्ताक, स्लोवाकिया, बल्गेरिया अशा पूर्व युरोपातल्या देशांत असलेला टागोर यांचा महिमा मला माहीत नव्हता. हा महिमा असण्यामागं जे कारण होतं, त्याचा आजच्या जगातल्या वैचारिक वादळाशी जवळचा संबंध आहे. टागोर हे ‘राष्ट्रीयत्व’ व ‘देशभक्ती’ त्या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत, असं मानत असत. ते देशभक्त होते. त्यांना ब्रिटिशांनी ‘सर’ हा किताब दिला होता; परंतु जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर टागोर यांनी भारतातला पहिला ‘ॲवॉर्ड-वापसी’चा प्रयोग केला होता. इतकंच नव्हे तर, ऑक्‍सफर्ड विद्यापीठाकडून मानद डॉक्‍टरेट दिली जाण्यासाठी त्यांना जे संकेत मिळाले होते, त्यांच्याकडंही त्यांनी लक्ष दिलं नाही. ब्रिटिशांच्या अमानुष धोरणांवर टागोर यांनी प्रखर टीका केली. ‘जन गण मन’ या भावी भारतीय राष्ट्रगीतास, तसंच ‘आमार शोनार बांगला’ या भावी बांगलादेशी राष्ट्रगीतासही टागोर यांनी जन्म दिला.

‘देशभक्ती’ या संकल्पनेवर टागोर यांची निष्ठा होती; परंतु ‘राष्ट्रीयत्व’ या संकल्पनेवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. ते नेहमी मानवतावादी दृष्टिकोन मांडत असत व ‘राष्ट्रीयत्वापेक्षा मानवतावाद महत्त्वाचा आहे’, असं त्यांना वाटत असे.
जेव्हा टागोर यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं, तेव्हा ऑस्ट्रियातले कवी पीटर रोसेगेर यांचाही प्रामुख्यानं त्या पारितोषिकासाठी विचार झाला होता. रोसेगेर हे प्रखर राष्ट्रवादी होते. ‘देश हीच सगळ्यात मोठी संकल्पना आहे,’ अशा स्वरूपाचे त्यांचे विचार होते. तो १९११-१२ चा काळ होता. युरोपची वाटचाल पहिल्या महायुद्धाच्या दिशेनं सुरू होती. अशा वातावरणात रोसेगेर यांचा ‘प्रखर राष्ट्रीयत्व’ या संकल्पनेचा प्रचार अनेक लोकांना मोहित करत होता; परंतु ‘राष्ट्रीयत्व’ ही संकल्पना जर जास्त लोकप्रिय झाली तर युद्धाला लोकांचा पाठिंबा मिळेल व त्यात लाखो लोक मृत्युमुखी पडतील, असा युद्धाच्या सावटाची भीती वाटणाऱ्यांचा मतप्रवाह होता.

या परिस्थितीत त्यांना टागोर यांच्या मानवतावादी दृष्टिकोनाचा शोध लागला. रोसेगेर व टागोर यांची नोबेल पारितोषिकासाठी झालेली स्पर्धा म्हणजे ‘राष्ट्रीयत्व’ व ‘मानवतावाद’ या संकल्पनांचं वैचारिक द्वंद्व होतं. आपल्याला वाटतं तसं हे पारितोषिक काही केवळ ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहातल्या टागोर यांच्या प्रतिभेपुरतं मर्यादित नव्हतं, टागोर यांना ते त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळंही दिलं गेलं होतं. असं असलं तरी युद्ध काही थांबलं नाही. वैचारिक द्वंद्वात नोबेल पारितोषिकाविषयीच्या समितीत टागोर यांचा विजय झाला; परंतु रस्त्यावरच्या भावनांच्या लढाईत लोकांनी रोसेगेर यांच्या राष्ट्रप्रेमाला प्राधान्य दिलं. महायुद्ध झालं. कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडले अथवा लुळे-पांगळे आणि दरिद्री झाले. युद्ध संपल्यावर टागोर जेव्हा युरोपात गेले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी रेल्वेस्थानकांवर गर्दी होत असे. त्यांच्या भाषणांनाही प्रचंड गर्दी होत असे. अनेक शहरांत नगराध्यक्ष त्यांचा नागरी सत्कार करत असत. भारतात टागोर यांच्या प्रतिभेचं, काव्यरचनांचं, लेखनाचं कौतुक झालं; परंतु ‘राष्ट्रीयत्व’ विरुद्ध ‘मानवतावाद’ या विषयांवरचे त्यांचे विचार अनेकांना पटले नाहीत. भारताशिवाय टागोर जेव्हा चीन व जपान इथं गेले, तिथंही त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. ‘एक महान लेखक’ म्हणून त्यांचं कौतुक झालं; परंतु त्यांच्या मानवतावादी विचारांवर चीन व जपानमध्ये टीका झाली. तो काळ दुसऱ्या महायुद्धाच्या आधीचा होता.

जरी टागोर यांच्यावर प्रखर टीका झाली, तरी त्यांनी जगातल्या ३४ देशांत प्रवास करून ‘राष्ट्रीयत्व’ व ‘मानवतावाद’ या विषयांवर उच्च बौद्धिक पातळीवर विचारमंथन घडवून आणलं होतं, यात शंकाच नाही. आजच्या भारतातही ‘राष्ट्रीयत्व’ व ‘देशभक्ती’ या संकल्पनांवर द्वंद्व सुरू आहे. आज गुरुदेव असते तर त्यांनी ही चर्चा उच्च पातळीवर नेली असती व कदाचित सगळ्या भारतीयांना एकत्र आणणारी व आजच्या परिस्थितीस अनुरूप अशी एखादी नवीन कल्पनाही उदयास आणली असती. याच महिन्यात १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याची ७० वर्षं पूर्ण केली. सध्याच्या काळात भारताला सुशासन देणारे राज्यकर्ते, रोजगार निर्माण करणारे उद्योजक व शेतकरी, विज्ञानक्षेत्रात देशाला पुढं नेणारे शास्त्रज्ञ यांची जशी गरज आहे, तशीच गरज बहुसंख्याक व अल्पसंख्याक, गरीब व श्रीमंत, उजवे व डावे अशा सगळ्यांना एकत्र आणून नवभारताची वैचारिक संकल्पना बाळगणाऱ्या सर्जनशील विचारवंतांचीसुद्धा गरज आहे. टागोर यांनी १०० वर्षांपूर्वी देशप्रेम व वैश्विक विचार यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या युगातही टागोर यांच्यासारखे केवळ प्रतिभावन कवी अथवा लेखक नव्हे, तर तत्त्ववेत्ते असण्याची व त्यांनी भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातल्या लोकसमुदायांना विचारप्रवृत्त करण्याची गरज आहे.

ता. १४ जुलै १९३० रोजी जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी टागोर यांना आपल्या निवासस्थानी निमंत्रित केलं होतं. तेव्हा टागोर यांना आईनस्टाईन यांनी विश्व या संकल्पनेसंबंधी विचार मांडायला सांगितलं होतं. तेव्हा टागोर यांनी विश्वाची तुलना अणूशी केली होती. ते म्हणाले होते ः ‘जसे अणूमध्ये प्रोटॉन, इलेक्‍ट्रॉन असे घटक एका लयबद्ध पद्धतीनं नांदतात, त्याचप्रमाणे जगात विविध समाज व माणसं परस्परांवर अवलंबून असणारं नातं तयार करून राहातात.’ नंतर टागोर यांनी सौंदर्य, सत्य व मानव या विषयांवर अतिशय विस्तृत संवाद साधला. आईनस्टाईन यांचा शास्त्रीय दृष्टिकोन व टागोर यांचा आध्यात्मिक दृष्टिकोन यात खूप मतभेद झाले; परंतु आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, अतिशय खोलवर चर्चा झाल्यावर, आपले विचार किती समान आहेत, हे त्यांना कळलं. ‘...तर मग मी तुमच्यापेक्षा जास्त आध्यात्मिक आहे’ अशी संवादाची सांगता करून आईनस्टाईन यांनी टागोर यांचा निरोप घेतला.

विविधतेनं नटलेल्या भारत देशात वैचारिक विविधता असणं साहजिकच आहे; परंतु ‘विरोधासाठी विरोध’ करण्याचा दुराग्रह धरला नाही तर विविधतेतून एकता निर्माण करणं अशक्‍य नाही.


(गेल्या वेळच्या या सदरात उद्‌धृत करण्यात आलेली ‘प्रमाणामध्ये सर्व काही असावे’ ही रचना संत रामदास स्वामी यांची असल्याचं प्रसिद्ध झालं होतं. वस्तुतः ती रचना त्यांची नसून जुन्या काळातले विद्वान-व्यासंगी कवी कृष्णाजी नारायण आठल्ये यांची आहे. सावंतवाडी इथले वाचक मधुकर घारपुरे यांनी ही त्रुटी लक्षात आणून दिली.)


Web Title: sundeep waslekar write article in saptarang