अणुयुद्ध कसं असतं? (संदीप वासलेकर)

अणुयुद्ध कसं असतं? (संदीप वासलेकर)

यदाकदाचित कोणत्याही दोन देशांत अणुयुद्ध झालं तर ते कल्पनाही करता येणार नाही, इतकं भयानक असेल. त्याचे दुष्परिणाम प्रदीर्घ काळ होत राहतील. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ, नोबेल समिती व जगातल्या अनेक ज्ञानी लोकांना ‘अणुयुद्ध कसं असतं’ याची नेमकी कल्पना आहे, म्हणूनच हे सर्व जण अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या नेत्यांचा तीव्र धिक्कार करतात. या नेत्यांना तात्त्विक विरोध करणाऱ्या संघटनेला यंदाचं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं असून, या घडामोडीला विशेष महत्त्व आहे.

अण्वस्त्रबंदीसाठी प्रयत्न करणाऱ्या एका संघटनेला या वर्षीचं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. ते पुढच्या महिन्यात ऑस्लो इथं एका समारंभात दिलं जाईल. ‘जगाला अणुयुद्धाचा धोका आहे,’ हा संकेत हे पारितोषिक जाहीर करून नोबेल समितीनं दिला आहे.

या वर्षीच्या सुरवातीला विज्ञानात नोबेल पारितोषिकं मिळालेल्या शास्त्रज्ञांनी शिकागो इथल्या जगाचा विनाश होण्याची शक्‍यता मोजणाऱ्या घड्याळाचे म्हणजेच ‘डूम्स डे क्‍लॉक’चे काटे मध्यरात्रीपूर्वी अडीच मिनिटांवर आणून ठेवले आहेत. याचा अर्थ जगातल्या प्रमुख शास्त्रज्ञांच्या मते, जागतिक राजकारणाचा प्रवास पृथ्वीला संपूर्ण विनाशक्षणाच्या जवळ नेण्याच्या दिशेनं सुरू आहे.

अणुयुद्धाबद्दल अनेक मतं असतात; परंतु प्रत्यक्षात दोन देशांच्या लढाईत एका देशाकडून अण्वस्त्र वापरलं गेलं तर काय होईल, याची शास्त्रीय माहिती बहुतेकांना नसते; त्यामुळं अज्ञानात राहून आपल्या वैचारिक बैठकीनुसार लोक अण्वस्त्रांबद्दल आपलं मत बनवत असतात.

खरोखर कुठला देश अण्वस्त्राचा वापर करेल, असं मला वाटत नाही; पण अनपेक्षितपणे असं कुणी केलंच तर तो देश अमेरिका, रशिया, चीन या तीन महासत्तांपैकी कुठला देश असेल त्यावर अथवा इतर देशांपैकी कुठला देश असेल, त्यावर हा परिणाम ठरेल. या इतर देशांत भारत, पाकिस्तान, इस्राईल, उत्तर कोरिया व कदाचित इराण यांचा समावेश होतो.

जर तीन महासत्ता सोडून इतर देशांपैकी कुणी शत्रूवर अण्वस्त्र टाकलं, तर त्याचा परिणाम त्या अण्वस्त्राची क्षमता, जमिनीवरून किती उंचीवरून ते टाकलं गेलं व त्या वेळी वाऱ्याचा वेग आणि दिशा यावर अवलंबून असेल. अमेरिकेनं हिरोशिमावर टाकलेलं अण्वस्त्र १५ किलोटन क्षमतेचं होतं; त्यामुळं एक शहर संपूर्ण खाक झालं.
सध्याच्या काळात कुणी शत्रूला डिवचण्यासाठी म्हणून १५-२० किलोटन क्षमतेचं अण्वस्त्र वापरणार नाही. कारण, शत्रू लगेच ५००-१००० किलोटनांचं अण्वस्त्र वापरून प्रतिहल्ला करेल; त्यामुळं यापुढच्या युद्धात जर तीन महासत्तांमध्ये युद्ध झालं तर ५०००-१०, ००० टन क्षमतेची व इतर अण्वस्त्रधारी देशांत युद्ध झालं तर ५००-१००० किलोटन क्षमतेची अण्वस्त्रं वापरली जातील.

अमेरिकेनं हिरोशिमावर व नागासाकीवर विमानातून अणुबॉम्ब टाकले होते. विमानातून अण्वस्त्रहल्ला केल्यास शत्रूचं नुकसान मर्यादित होतं. कारण, अणुस्फोट हवेत होतो. यापुढच्या युद्धात क्षेपणास्त्रानं अण्वस्त्रहल्ला करून जमिनीवर स्फोट घडवून आणला जाण्याची शक्‍यता जास्त आहे...तर अणुयुद्ध जर तीन महासत्ता सोडून इतर देशांत झालं तर ते क्षेपणास्त्रानं ५०० ते १००० किलोटन क्षमतेच्या अण्वस्त्राचा प्रहार करून होईल, असं गृहीत धरायला हरकत नाही.

समजा, ५००-१००० किलोटन अण्वस्त्र एका देशानं शत्रुराष्ट्रातल्या एका शहरावर टाकलं तर सुमारे तीन चौरस किलोमीटर आकाराचं अग्निकुंड निर्माण होईल व सुमारे दोन-तीन सेकंदांत त्या विभागांतल्या सर्व इमारती, रस्ते, पूल, जनावरं, माणसं, झाडं भस्मसात होतील. म्हणजे, हे वाक्‍य वाचायला तुम्हाला जेवढा वेळ लागला, तेवढ्या वेळात तीन-साडेतीन चौरस किलोमीटर क्षेत्रातल्या हजारो लोकांचं व भोवतालच्या सृष्टीचं भस्म झालेलं असेल. पुढच्या दोन-तीन मिनिटांत किंवा हा परिच्छेद वाचायला जो वेळ लागेल, तेवढ्या वेळात सुमारे १५० चौरस किलोमीटर क्षेत्रातले सर्व मनुष्यप्राणी मृत्युमुखी पडतील. सर्वच्या सर्व इमारती पडतील. झाडं उन्मळून पडतील व एखाद्या मोठ्या शहरातले १०-१२ लाख लोक संपूर्णतः नष्ट होतील.

पुढच्या काही मिनिटांत आगीचा डोंब वाऱ्याबरोबर पसरत जाईल व सुमारे ७०० चौरस किलोमीटर क्षेत्रात सुमारे अर्ध्या तासांत अनेक इमारती पडतील. काही लोक जखमी होतील, तर काही मृत्युमुखी पडतील. थोडक्‍यात, अल्पावधीतच ७०० चौरस किलोमीटर क्षेत्रातल्या मनुष्यवस्तीचं स्मशानात रूपांतर झालेलं असेल.
पुढच्या काही तासांत आगीचे लोळ व किरण यांद्वारे सुमारे ३००० चौरस किलोमीटरच्या क्षेत्राला मोठं नुकसान पोचलेलं असेल. काही इमारती अर्धवट पडतील. विशेषतः वरचे मजले कोसळतील. अनेक व्यक्ती जखमी होतील. शेती, बागा, रस्ते असं सगळीकडं उद्‌ध्वस्ततेचं चित्र असेल. वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित होईल. टेलिफोन व मोबाईल चालणार नाही. किरणोत्सर्जनामुळं जखमींना मदत करणं अशक्‍य होईल. अणुबॉम्ब जिथं पडेल त्या भोवतालच्या पहिल्या ५०० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रातले सर्व लोक काही मिनिटांत नष्ट होतील. ५०० चौरस किलोमीटरच्या पलीकडच्या; परंतु ३००० चौरस किलोमीटरच्या अलीकडच्या वस्तीतले सर्व लोक थोडक्‍या मिनिटांमध्ये नष्ट होणार नाहीत, तर ते पुढच्या तीन-चार दिवसांत शरीराची लाही लाही होऊन, अंधत्व येऊन, पाण्याशिवाय व वैद्यकीय मदतीशिवाय तळमळत मृत्युमुखी पडतील. अशा तऱ्हेनं काही कोटी लोकांचं जीवन उद्‌ध्वस्त होऊन जाईल.

समजा, एखाद्या देशाला असं वाटलं की तीन-चार दिवसांत शत्रुराष्ट्रातल्या अनेक कोटी लोकांचा संपूर्ण विनाश करून कायमची ब्याद घालवता येईल, तर अण्वस्त्र टाकणाऱ्या देशाचं काय होईल, हेदेखील ध्यानात घेतलं पाहिजे.
अण्वस्त्राचा परिणाम वाऱ्याची दिशा व गती त्या वेळी कशी असेल, यावर अवलंबून असतो. जर एका देशानं शेजारच्या देशावर अण्वस्त्र टाकलं; पण वाऱ्याची दिशा फिरली तर वर ७०० ते ३००० चौरस किलोमीटर क्षेत्रात होणारे परिणाम स्वतःच्याच देशावर होण्याची शक्‍यता आहे.

जरी शत्रुपक्ष हे लक्ष्य असलं तरी अण्वस्त्र वापरणारा देश स्वतःच बेभान वाऱ्याला व आगीच्या लोळांना बळी पडू शकतो. शिवाय, अण्वस्त्र कुठंही टाकलं तरी आजूबाजूच्या सर्व प्रदेशातली हवा व पाणी किरणोत्सर्जनामुळं दूषित होऊन तिथं १००-१५० वर्षं मानवी वास्तव्य करणं कठीण होईल.

शिवाय, जर शत्रुपक्षाचा अण्वस्त्रांचा साठा हल्ल्यात नाहीसा झाला; पण त्यांच्याकडं आणखी एखादं अण्वस्त्र जर दुसऱ्या स्थळी लपवून ठेवलेलं असेल व क्षेपणास्त्राच्या साह्यानं त्यानं त्याचा आघात केला तर स्वतःच्या देशातही तेच भोग भोगावे लागतील. याहीपेक्षा मोठा परिणाम राजकीय स्वरूपाचा असेल. कोणत्याही एका देशादेखील अण्वस्त्राचा वापर केला, तर काही तासांत युनोच्या सुरक्षा मंडळाची बैठक भरेल व आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार दोन्ही देशांचं सार्वभौमत्व व स्वातंत्र्य बरखास्त केलं जाऊन ते देश युनोच्या आधिपत्याखाली येतील. परिणामी, अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स या देशांच्या प्रतिनिधि-मंडळाच्या हाती युद्धसंबंधित दोन्ही देशांची सूत्रं जातील व या दोन देशांच्या राज्यकर्त्यांना अटक केली जाऊन मानवतेविरुद्ध शत्रुत्व पुकारण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. दोन्ही देशांचं सैन्य बरखास्त करण्यात येईल. तिथं युनोची शांतिसेना अधिकार ग्रहण करेल. दोन्ही देशांतल्या उर्वरित नागरिकांवर कडक आर्थिक निर्बंध लादण्यात येतील. त्यांना परदेशी प्रवास करायला मुभा मिळणार नाही. जीवनावश्‍यक वस्तू सोडून सर्व आयात-निर्यात बंद करण्यात येईल.

खाणं, पिणं, पोशाख घालणं या बाबीही वर उल्लेखिलेल्या पाच महासत्तांचं प्रतिनिधी-मंडळ ज्यानुसार ठरवेल त्यानुसार करायला भाग पाडलं जाईल. दोन्ही देशांचं रूपांतर तुरुंगात होईल.
जर केवळ एक-दोन अण्वस्त्रांवर हे युद्ध थांबलं नाही आणि दोन्ही देशांनी अर्धा तास अण्वस्त्रांचा हल्ला-प्रतिहल्ला केला तर त्याचे परिणाम त्या देशांच्या पलीकडंही होतील. ओझोनच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होईल. अल्ट्राव्हॉयोलेट किरणं पृथ्वीतलावर पसरतील. पर्यावरण बिघडेल. पुढच्या काही वर्षांत जगभर अन्न-धान्योत्पादन होण्यास अडचणी येतील.

आंतरराष्ट्रीय समुदाय त्या दोन देशांना शिक्षा म्हणून अनेक शतकं गुलामीत ठेवेल व पृथ्वीच्या इतिहासात त्या देशांची नोंद ‘माणुसकीवरचे कलंक’ अशी होईल.
जर महासत्ता सोडून इतर अण्वस्त्रधारी देशांनी अण्वस्त्रांचा वापर केला तर त्यांच्यावर हे वरीलप्रमाणे परिणाम होतील; पण तीन महासत्तांमध्ये अणुयुद्ध झालं तर अर्ध्या-एक तासात समग्र सृष्टी पूर्णपणे नष्ट होईल. पुढची हजारो वर्षं तरी पृथ्वीवर जीवन निर्माण होणार नाही. जर मानवी संस्कृती पुन्हा कधी उदयाला आली आणि तिला अणुयुद्धाचा इतिहास अनपेक्षितरीत्या कळला तर सध्याचं जगातलं राजकीय नेतृत्व व मनुष्यसमाज हा ‘विश्‍वासाच्या इतिहासावरचा एक कलंक’ म्हणून कायमस्वरूपी नोंदला जाईल. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ, नोबेल समिती व जगातल्या अनेक ज्ञानी लोकांना ‘अणुयुद्ध कसं असतं’ याची कल्पना आहे, म्हणूनच हे सर्व जण डोनाल्ड ट्रम्प व कीम जाँग अन्‌ अशा नेत्यांचा धिक्कार करतात. ...म्हणूनच पुढच्या महिन्यात अणुयुद्धखोर नेत्यांना तात्त्विक विरोध करणाऱ्या संघटनेला ऑस्लो विद्यापीठाच्या सभागृहात सन्मानित करण्यास येईल.

(ता. क. ः अण्वस्त्र वापरण्याचे अधिकार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काढून घेण्यासाठीची प्रक्रिया अमेरिकेच्या सिनेटनं सुरू केली आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com