एक होता फ्लेचर... (संदीप वासलेकर)

एक होता फ्लेचर... (संदीप वासलेकर)

‘फ्लेचर’ व ‘फ्रांसवा’ या दोन मनोवृत्ती आहेत. त्या आपल्याला सर्वत्र दिसतात. फ्लेचर मूठभर लोकांना हाताशी धरून ‘प्रगती,’ परिवर्तन,’ ‘यश’ हा मंत्र जोरजोरात म्हणतो व स्वतःला  प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. फ्रांसवा काही बोलत नाही. तो कठीण आर्थिक व सामाजिक परिस्थितीतून आलेल्या, विविध विचारप्रणालींच्या लोकांना एकत्रित करून,  त्यांचा एकजिनसी व आनंदी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

समजा, आपण गाडीतून-बसमधून अथवा दुसऱ्या एखाद्या वाहनातून प्रवास करत आहोत...आपल्याला दुसऱ्या वाहनानं धडक दिली आहे आणि त्यात आपल्याला मुका मार बसला आहे...पण वरून तर काही जाणवलेलं नाही...‘रस्त्यात गर्दी आहे तेव्हा असं होऊ शकतं,’ असं मनाला समजावत आपण तो प्रसंग विसरून जातो. मात्र, वास्तविक मार आपल्या पाठीच्या कण्याला मानेजवळ बसलेला असतो. काही काळानं तिथं दुखू लागतं; पण त्या वेळी आपण अपघात विसरून गेलेलो असतो. आपण दैवाला दोष देतो व उपचार करून घेतो. नशीब बलवत्तर असेल तर थोडक्‍यात वाचतो. नाहीतर आयुष्यभरासाठी आपला कणा कमकुवत होतो. अशा प्रकारचं जे आपल्याला अंतर्गत जखमी करणारं दुखणं असतं, त्याला इंग्लिशमध्ये ‘व्हीपलॅश’ असं नाव आहे व आपल्याला ‘व्हीपलॅश’ देऊन दुबळे करणारे गुन्हेगार बहुसंख्य प्रसंगांमध्ये नामानिराळे राहिलेले असतात.
***

तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘व्हीपलॅश’ नावाचा सिनेमा  आला होता व तो अल्पकाळात जगभर लोकप्रिय झाला. अजूनही त्या सिनेमावर सर्वत्र चर्चा होत असते.
या सिनेमाचं कथानक एका नामवंत संगीतमहाविद्यालयात घडतं. तिथं टेरेन्स फ्लेचर नावाचा एक शिक्षक येतो. तो स्वतःला खूप महान समजत असतो. आपल्यापूर्वी कुणी चांगला संगीतशिक्षक झालाच नाही व यापुढंदेखील होणार नाही, अशा आविर्भावातलं त्याचं वागणं असतं.

ऐटबाज वागणं, त्याला परिश्रमांची जोड आणि त्यात परत वर दिखावा...यामुळं तो स्वतःचं वलय निर्माण करण्यात यशस्वी होतो. सर्वजण त्याला वचकून-दबकून असतात. त्याच्या प्रत्येक कृतीचं व शब्दाचं विश्‍लेषण करतात. खेळीमेळीचं वातावरण असलेल्या संगीतमहाविद्यालयात ‘प्रगती’ व ‘शिस्त’ हे मंत्र अमलात आणून फ्लेचर मोठा दरारा निर्माण करतो. फ्लेचरची स्वतःची अशी एक प्रगतीची व्याख्या असते; परंतु तो ती उघडपणे सांगत नाही. त्याच्या व्याख्येनुसार, जगात झळकण्याची ज्यांच्यात क्षमता आहे, अशाच थोड्या विद्यार्थ्यांवर तो लक्ष केंद्रित करतो व हे विद्यार्थी पुढं अमेरिकेतल्या प्रतिष्ठित अशा ‘लिंकन सेंटर’मध्ये पदार्पणासाठी पात्र व्हावेत म्हणून त्याचे प्रयत्न असतात. सर्वसामान्य विद्यार्थी त्याच्या खिजगणतीतही नसतात. मात्र, ‘प्रगती,’ ‘यश,’ ‘शिस्त’ हे मंतरलेले शब्द सतत उच्चारत राहून आपण स्वतः संगीतक्षेत्राचा उद्धार करण्यासाठीच जणू काही जन्माला आलेलो आहोत, असा आभास तो निर्माण करतो.

काही निवडक विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना यशस्वी करणं, त्या विद्यार्थ्यांचं हित साधणं हे त्याच्या मनात नसतं, तर त्या विद्यार्थ्यांच्या यशाद्वारे आपला उदो उदो केला गेला पाहिजे, ही त्याची सुप्त इच्छा त्यामागं असते. हे तथाकथित यश मिळवण्यासाठी तो निवडक विद्यार्थ्यांचंही कौतुक करत नाही. त्याचा प्रत्येक दिवस तंबी देण्यात व धमकी देण्यात जातो व ‘तुम्ही माझ्या पातळीवर नाही आहात’ असं तो इतरांना एकसारखं हिणवत असतो.

सिनेमाच्या अखेरीस तो एका विद्यार्थ्यांला त्याचं मनोगत सांगतो. तो म्हणतो ः ‘सतत भीती दाखवून व इतरांना कमी लेखून परिवर्तन घडवून आणण्याचा माझा उद्देश आहे व कडक वागल्यानंच विद्यार्थी आव्हान स्वीकारून परिश्रम करतील व स्वतःचा दर्जा वाढवतील.’ मात्र, फ्लेचर खोटारडा असतो. परिवर्तनाची भाषा तो फक्त त्याच्या धक्कातंत्राचं समर्थन करण्यासाठीच वापरत असतो. त्याच्या मनमानीमुळं एक उत्कृष्ट विद्यार्थी आत्महत्या करतो; पण ‘त्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे,’ असं फ्लेचर वर्गात विद्यार्थ्यांना खोटंच सांगतो. देखावा निर्माण करण्याच्या  त्याच्या कौशल्यामुळं लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवतात. त्याच्या मोहजालात अडकतात. इतर शिक्षक काही बोलत नाहीत.

मात्र, एक कृष्णवर्णीय तरुण महिला-वकील फ्लेचरचं पितळ अचानक उघडं पाडते. आपण एवढे महान, शक्तिशाली असताना एका अनपेक्षित दिशेनं असा हल्ला होईल, याची फ्लेचरला कल्पनाच नसते. त्याचा सगळ्यात आवडता विद्यार्थी त्याच्याविरुद्ध गोपनीयरीत्या साक्ष देतो. संगीतमहाविद्यालयाचं संचालक मंडळ फ्लेचरची उचलबांगडी करतं.
फ्लेचरचं खरं स्वरूप उघड झाल्यानं इतर कोणत्याही संस्थेत त्याला थारा मिळत नाही. तो रस्त्यावरच्या एका बॅंडमध्ये प्रवेश करतो. तिथं त्याला त्याच्याविरुद्ध साक्ष दिलेला विद्यार्थी भेटतो. त्याला तो तिथं अपमानित करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते सहन करून तो विद्यार्थी असामान्य कामगिरी करून दाखवतो. चलाख फ्लेचर मात्र त्याचं श्रेय घेतो.
अखेरीस फ्लेचरला रस्त्यावरच राहावं लागतं. दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचं श्रेय लाटून स्वतःचं समाधान करून घेत राहतो. मात्र, दरम्यानच्या सगळ्या काळात त्याचे अनेक विद्यार्थी त्याच्या मनमानी निर्णयांमुळं ‘व्हीपलॅश’चे रुग्ण झालेले असतात.
***

हा सिनेमा जेवढा लोकप्रिय झाला, तेवढाच आणखी एक सिनेमा अलीकडंच जगभर लोकप्रिय झाला आहे. शाळेच्या पार्श्‍वभूमीवरचं कथानक असलेला या फ्रेंच सिनेमा अलीकडं जगभर लोकप्रिय झाला ः त्याचं मूळ नाव ‘आँये लेम्पूर’ असं आहे. ‘एक शाळेतला वर्ग’ असं त्याचं भाषांतर करता येईल.पॅरिसमधले आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक ज्या भागात राहत असतात, त्या भागात ही शाळा असल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.  या शाळेत फ्रेंच विद्यार्थीही असतात; शिवाय आफ्रिका, आशिया, अरब देशातून निर्वासित म्हणून आलेल्या पालकांची मुलंही इथं शिक्षण घेत असतात. निरनिराळे धर्म, पंथ, आर्थिक घटक, वैचारिक प्रवाह असं संमिश्र वातावरण प्रत्येक वर्गात असतं. बहुसंख्य विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक पार्श्‍वभूमी बिकट असते. काही विद्यार्थी अभ्यासात खूप हुशार असतात. काही यथातथा असतात. काहींना अभ्यासाची गोडी नसते. त्या शाळेत नववीच्या वर्गाला शिकवण्यासाठी फ्रांसवा नावाचा शिक्षक असतो.

विद्यार्थी विचार करायला प्रवृत्त होतील, अशी त्याची शिकवण्याची पद्धत असते. त्यांना तो समान पातळीवरची वागणूक देतो. वर्षाच्या सुरवातीला तो सगळ्या विद्यार्थ्यांना आपलं नाव एका कागदावर लिहून आपापल्या टेबलावर ठेवण्यास सांगतो. एक विद्यार्थिनी नकार देते. ती म्हणते ः ‘‘आम्हीच का आमची नावं लिहावीत? तुम्हीसुद्धा तुमचं नाव फळ्यावर लिहा.’’ तो तिचं ऐकतो व स्वतःचं नाव फळ्यावर लिहितो. एकदा तो विद्यार्थ्यांना एक निबंध लिहायला सांगतो. एक विद्यार्थी म्हणतो ः ‘‘निबंध हा केवळ शब्दांनीच लिहायला हवा का? मी छायाचित्रांतून तो तयार करीन.’’ तो विद्यार्थी छायाचित्रांचं संकलन करून फ्रांसवापुढं सादर करतो. फ्रांसवा त्याचं कौतुक करतो.

‘प्रगती, ‘परिवर्तन’ असे शब्द फ्रांसवा कधी उच्चारत नाही. ‘यश’ हा शब्द तर त्याला परिचितच नसतो. सगळे विद्यार्थी एकमेकांना सहकार्य करून स्वतःची वैचारिक खोली कशी वाढवतील व जीवन जगण्यासाठी भावी काळात समर्थ कसे होतील, हे पाहणं फ्रांसवा याचं ध्येय असतं. फ्रांसवा इतर शिक्षकांमध्ये मिसळतो. कधी इतर कुणी शिक्षक मस्तीखोर विद्यार्थ्याला आटोक्‍यात आणू शकत नसेल, तर त्यांना तो मार्गदर्शन करतो.

फ्रांसवा याला स्वतःचं महत्त्व नसतं; तसंच वर्गातले चार हुशार विद्यार्थी त्याला विशेष प्रिय नसतात. सगळे विद्यार्थी त्याच्या दृष्टीनं एकसारखे, एकसमान असतात. ‘थोड्या हुशार मुला-मुलींना चमकवून शाळेची प्रगती करायची व आपण त्याचं श्रेय घ्यायचं,’ असा विचारही त्याच्या मनात येत नाही. तो विद्यार्थ्यांचे परस्परसंबंध, प्रतिभा व स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आदी बाबी जोपासण्याचा सतत प्रयत्न करतो. या चित्रपटाला शेवट नाही. कुणाला फार मोठा किताब मिळत नाही. कुणाचा विवाह अथवा घटस्फोट होत नाही. शेवटच्या क्षणचित्रांत शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी दुपारी शाळा संपल्यावर एकत्र फुटबॉल खेळताना दिसतात...
***

‘फ्लेचर’ व ‘फ्रांसवा’ या दोन मनोवृत्ती आहेत. त्या आपल्याला विद्यालयांत, खेळाच्या प्रशिक्षणकेंद्रांत, समाजात, राजकारणात सर्वत्र दिसतात. फ्लेचर हा मूठभर लोकांवरच लक्ष केंद्रित करून, त्यांना हाताशी धरून ‘प्रगती,’ परिवर्तन,’ ‘यश’ हा मंत्र जोरजोरात म्हणतो व स्वतःचं स्थान इतिहासात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. लोक त्यावर मोहित होतात व नंतर त्याच्या मनमानीपणामुळं ‘व्हीपलॅश’चे फटके बसून जखमी होतात. फ्रांसवा काही बोलत नाही. तो कठीण आर्थिक व सामाजिक परिस्थितीतून आलेल्या, विविध विचारप्रणालींच्या लोकांना एकत्रित करून, त्यांचा एकजिनसी व आनंदी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. फ्रांसवा याला उक्तीपेक्षा कृती महत्त्वाची वाटते व झगमगाटापेक्षा समाधान प्रिय वाटतं. कुणाला फ्लेचर याची मनोवृत्ती आवडेल, तर कुणाला फ्रांसवा याची वैचारिक बैठक आवडेल. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्‍न आहे.

पुन्हा एकदा दोन्ही चित्रपटांकडं वळून पाहताना एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती ही की हे दोन्ही चित्रपट सत्यकथांवर आधारित आहेत आणि प्रत्यक्षात दोन्ही शाळांमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे ः फ्लेचर ‘होता’ व फ्रांसवा ‘आहे’ !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com