स्मरण स्वामी विवेकानंदांचं (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 14 जानेवारी 2018

आपण ‘महासत्ता’ आणि ‘महान राष्ट्र’ या दोन संकल्पनांमधला फरक समजून घेतला पाहिजे. विवेकानंदांचे विचार वाचले तर भारत एक ‘महान राष्ट्र’ व्हावं व आपल्या सैद्धान्तिक व वैचारिक सामर्थ्यावर आपण विश्‍वाचं नेतृत्व करावं, असा संदेश मिळतो. सध्या जग ज्याला ‘महासत्ता’ समजतं, तशी महासत्ता होण्याचा संदेश विवेकानंदांनी कुठंही दिलेला दिसत नाही.

आपण ‘महासत्ता’ आणि ‘महान राष्ट्र’ या दोन संकल्पनांमधला फरक समजून घेतला पाहिजे. विवेकानंदांचे विचार वाचले तर भारत एक ‘महान राष्ट्र’ व्हावं व आपल्या सैद्धान्तिक व वैचारिक सामर्थ्यावर आपण विश्‍वाचं नेतृत्व करावं, असा संदेश मिळतो. सध्या जग ज्याला ‘महासत्ता’ समजतं, तशी महासत्ता होण्याचा संदेश विवेकानंदांनी कुठंही दिलेला दिसत नाही.

स्वामी विवेकानंदांची जयंती नुकतीच (१२ जानेवारी) झाली. त्यांनी धर्म, राष्ट्र व विज्ञान अशा तीन घटकांचं संवर्धन करण्यासाठी आयुष्य खर्च केलं. विवेकानंदाचे विचार एवढे स्पष्ट होते, की त्यावर भाष्य करण्याची गरज नाही; परंतु २०१८ मध्ये भारताला त्यांच्या विचारांचं स्मरण करून देण्याची मात्र नितांत आवश्‍यकता आहे.
विवेकानंदांनी शिकागो इथली सर्वधर्मपरिषद गाजवली, याचा आपल्याला अभिमान वाटतो; पण ते तिथं प्रत्यक्षात काय बोलले व त्याचं आज आपण कसं अनुकरण करावं, यावर आपण किती विचार करतो?

‘‘आम्ही (हिंदू) वैश्विक पातळीवर सहिष्णुता मानतो व सर्व धर्मांचा सत्य म्हणून स्वीकार करतो... सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठपणा आणि धर्मांधपणा या विकृतींनी बऱ्याच काळापासून पृथ्वीला ग्रासलं आहे. त्यांनी आपल्या सृष्टीत हिंसाचार माजवला आहे, आपल्या पृथ्वीला पुनःपुन्हा रक्तानं माखलं आहे. या भयंकर विकृती नसत्या तर मानवी संस्कृतीची सध्यापेक्षा खूप प्रगती झाली असती. आज सकाळपासून धर्मांधता, तलवारीच्या अथवा लेखणीच्या दुरुपयोगानं केल्या गेलेल्या वेदना व व्यक्तीव्यक्तींमधल्या दुर्भावना या मनोविकृतींचा नायनाट होण्यासाठी घंटानाद झाला आहे.’’

त्याच व्यासपीठावरून समारोपाच्या भाषणात विवेकानंद जे म्हणाले होते, त्याचा सारांश असा ः
‘‘विविध धर्मांचं ऐक्‍य हे एखाद्या धर्माचा विजय व दुसऱ्या धर्माचा नाश होऊन कधीच साध्य होणार नाही. पावित्र्य ही काही कुण्या एका धर्माची मक्तेदारी नाही. जगातल्या प्रत्येक विचारसरणीनं अप्रतिम व्यक्तींना जन्म दिला आहे, हे सत्य आहे व म्हणूनच माझी जगातल्या प्रत्येक धर्माच्या अनुयायांना प्रार्थना आहे ः मदत करा व संघर्ष करू नका, विनाशाऐवजी सर्वसमावेशकतेचा स्वीकार करा, ऐक्‍यातून शांततेचा शोध घ्या.’’
आजच्या भारतात घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक नेत्याचं व सार्वजनिक क्षेत्रातल्या व्यक्तीचं मत आणि राजकीय प्रचार हे सगळं विवेकानंदांनी शिकागोत मांडलेल्या वैचारिक चौकटीचा कस लावून तपासलं पाहिजे.

पुण्यात ‘समर्थ भारत व्यासपीठ’ नावाची एक संस्था आहे. विवेकानंदांचे ३६५ विचार संकलित करून एक पुस्तक या संस्थेनं प्रसिद्ध केलेलं आहे. ‘दिवसाला एक विचार’ अशी त्यामागची भूमिका आहे. हे ३६५ विचार वाचल्यावर, विवेकनंदांच्या मते भारताचं जगातलं स्थान वैचारिक सामर्थ्यानं सन्मान मिळालेलं असावं असं दिसतं. सत्तेचा पाठपुरावा करून जगात लष्करी झुंडशाहीनं भारतानं प्राबल्य निर्माण करावं, असा आग्रह त्यांच्या विचारांतून कुठंही दिसत नाही. या पुस्तकात दिलेल्या विवेकानंदांच्या मतानुसार, प्रत्येक देशातल्या लोकांची एक प्रकृती असते व त्या प्रकृतीनुसार ते लोक आपल्या देशाचं जगातलं स्थान ठरवतात. रोम व ग्रीसच्या लोकांचा आक्रमकता हा स्वभाव होता. त्यांनी युद्धं केली. काही काळ वैभव उपभोगलं व नंतर स्वतःच्या देशाचा सर्वनाश पाहिला. विवेकानंद म्हणतात ः ‘‘राजकीय महत्त्व अथवा लष्करी सत्ता हे भारताचं ध्येय कधीच नव्हतं व भविष्यातही ते कधी असणं शक्‍य नाही. आपलं ध्येय हे वैचारिक शक्ती वृद्धिंगत करून तिचा जागतिक प्रसार करण्याचं आहे. भारतानं दुसऱ्या कोणत्याही देशाला कधी अंकित केलेलं नाही, हीच भारताची महानता आहे. आपण सहिष्णुतेचा विचार जगाला दिला आहे.’’

भारतानं जगाचं नेतृत्व विश्वगुरू या नात्यानं करावं, असा विवेकानंदांचा आग्रह होता. इतर देशांवर हल्ले करून आणि तिथल्या संस्कृतींचा विध्वंस करून महासत्ता होण्याचा विचार त्यांच्या भाषणांत अथवा लेखनात कणभरही दिसत नाही.
सध्या आपण ‘महासत्ता’ हा मंत्र सातत्यानं जपत असतो; पण ‘महासत्ता’ म्हणजे काय या संकल्पनेवर कोणतीही चर्चा झालेली दिसत नाही. जगात महासत्तेचा अर्थ विध्वंसक सत्ता असा अभिप्रेत असतो. एखादा देश मनात येईल तेव्हा दुसऱ्या देशावर अण्वस्त्र असल्याचे खोटे आरोप करून जोराचा हल्ला करतो, तिथल्या महिलांना व बालकांना मारतो. तिथली घरं व शाळा उद्‌ध्वस्त करतो आणि त्याच वेळी जे देश दहशतवाद पसरवतात, अशा देशांना दम दिल्यासारखं वरकरणी दाखवून कवटाळतो, पैसे पुरवतो, प्रभावी शस्त्रं विकतो. अशी विकृत धोरणं असलेल्या देशाला आपण ‘महासत्ता’ म्हणायचं का आणि भारताला ‘महासत्ता’ बनवण्याचे धडे अशा महासत्तेपासून घ्यायचे का?

आपण ‘महासत्ता’ आणि ‘महान राष्ट्र’ या दोन संकल्पनांमधला फरक समजून घेतला पाहिजे. विवेकानंदांचे विचार वाचले तर भारत एक ‘महान राष्ट्र’ व्हावं व आपल्या सैद्धान्तिक व वैचारिक सामर्थ्यावर आपण विश्‍वाचं नेतृत्व करावं, असा संदेश मिळतो. सध्या जग ज्याला ‘महासत्ता’ समजतं, तशी महासत्ता होण्याचा संदेश विवेकानंदांनी कुठंही दिलेला दिसत नाही.
विवेकानंदांचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे ‘जागृत व्हा.’ त्यांच्या अनेक भाषणांत व पत्रलेखनात त्यांनी कठोपनिषदामधल्या यम व नचिकेत यांच्यातल्या संवादाचा उल्लेख केलेला आहे.
‘उत्तिष्ठत्‌ जाग्रत्‌ प्राप्य वरान्निबोधत्‌ ।
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया
दुर्गम्‌ पथस्तत्कवयो वदन्ति।।’

‘‘जागे व्हा व जोपर्यंत आपलं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत कार्यरत राहा.’’
असे होण्यासाठी सकारात्मक शिक्षण देण्याचा त्यांचा आग्रह होता. विवेकानंदांच्या विचारांमध्ये महिलांचं शिक्षण, शेतीला अनुरूप शिक्षण, औद्योगिक शिक्षण यांना महत्त्वाचं स्थान आहे; परंतु सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण हे उत्तम चारित्र्य घडवण्याचं आहे.

सध्याच्या काळात जे शिक्षण केवळ शाळा-महाविद्यालयांतून देण्यात येतं; त्या शिक्षणापुरतं ते मर्यादित नाही. इंटरनेट, माध्यमांमधल्या चर्चा, राजकीय भाषणं यांतूनही शिक्षण देण्यात येतं. ते सकारात्मक दृष्टीनं दिलं तर देश घडवण्यासाठी मनं तयार होऊ शकतील.  
विवेकानंदांच्या पुतळ्याला केवळ हार घालून आपलं कर्तव्य संपणार नाही, तसंच विरोधकांविषयी कायमच नकारात्मक भाषेत बोलत राहिल्यानंही विवेकानंदांच्या विचारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल.

राजकीय नेते असोत अथवा युवक असोत, सगळ्यांनीच सध्या नकारात्मक मनोवृत्तीचा, परस्परांबद्दल नकारात्मक भाषा वापरण्याचा त्याग करण्याची गरज आहे. सकारात्मक शिक्षणाचा व संवाद करण्याचा विवेकानंदांचा जो संदेश आहे, त्याचं स्मरण आज सगळ्यांनीच देशहितासाठी करायला हवं आहे. भारत एक महान राष्ट्र होऊ शकतं; परंतु त्यासाठी जागृत होण्याची गरज आहे.

Web Title: sundeep waslekar write article in saptarang