शिक्षणातून शांततेकडं... (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar

"इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएट' म्हणजे "आयबी' डिप्लोमा अभ्यासक्रमाची सुविधा ज्या शाळांमध्ये असते त्या शाळेतल्या अभ्यासक्रमात आपल्या देशाची व जगाची ओळख करून देणारे विषय असतात. "समाजसेवा' व "ज्ञानाचा सिद्धान्त' हे विषय सक्तीचे असतात. समाजसेवा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांना खूप महत्त्व दिलं जातं.

खंडाळ्यातल्या "कोहिनूर अमेरिकन स्कूल' या शाळेला भेट देण्याचा योग मला अलीकडच आला. तिथं "इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएट' म्हणजे "आयबी' डिप्लोमा अभ्यासक्रमाची सुविधा आहे. अकरावी-बारावीसाठी हा अभ्यासक्रम असतो. या अभ्यासक्रमाची रचना उच्च माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमापेक्षा खूप वेगळी असते व तिथं शिक्षणातून विश्वशांतीचं संवर्धन करण्याचा उद्देश असतो. तिथं कला व विज्ञान, तसंच समाजसेवा या विषयांचं शिक्षण एकत्रित घ्यावं लागतं. अकरावीपासूनच केवळ एका विषयात विशेषीकरण (स्पेशलायझेशन) करायला अनुमती नसते. "प्रत्येक विद्यार्थ्यानं भाषा, विज्ञान व समाज अशा सर्वांगांनी आपली बुद्धिमत्ता विकसित करणं आवश्‍यक आहे', हा विचार मूलभूत समजून शिक्षणाकडं पाहिलं जातं.
मी या "स्कूल'मध्ये गेलो तेव्हा विद्यार्थ्यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन अतिशय शिस्तीनं, वेळेनुसार केलेलं असल्याचं मला दिसलं. कार्यक्रमाचा जो भाग 5.55 ला संपणार होता तो अगदी त्याच वेळेला संपला.
5.54 ला अथवा 5.56 ला संपला नाही.
कार्यक्रम ठरल्यानुसार 5.30 ला सुरू झाला व 7.30 ला संपला.
राष्ट्रगीत संपलं तेव्हा 7.30 च झाले होते. 7.31 झालेले नव्हते. एवढं शिस्तबद्ध आणि शब्दशः "काटे'कोर आयोजन 17-18 वर्षांच्या मुला-मुलींनी केलेलं पाहून मला खरंच आश्‍चर्य वाटलं. त्यातली काही मुलांची भाषणं आणि काही मुलांनी सादर केलेले संगीताचे कार्यक्रम हे कसलेल्या वक्‍त्यांशी, व्यावसायिक कलाकारांशी तुलना करण्याजोगे होते.

जगातल्या लाखो शाळांमधल्या फक्त 3000 शाळांमध्ये आयबी डिप्लोमा हा अभ्यासक्रम आहे. भारतात सुमारे 100 ते 120 शाळांमध्ये ही सोय आहे. बहुसंख्य "आयबी शाळा' या निवासी असतात. अभ्यासाशिवाय एकत्र सलोख्यानं कसं राहायचं, स्पर्धेपेक्षा सहकार्याला कसं महत्त्व द्यायचं, आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा कोवळ्या वयात कसा विचार करायचा याचं प्रशिक्षण या शाळांमधून विद्यार्थ्यांना देण्यात येतं. भारतातल्या या शाळांमध्ये इतरही आशियाई देशांमधून विद्यार्थी-विद्यार्थिनी येत असतात. त्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख होते व भारतीय विद्यार्थ्यांना जगाच्या इतर देशांतले वर्गमित्र-मैत्रिणी मिळतात. त्यातून आयुष्यभराचं स्नेहमय नातं निर्माण होतं. जगाच्या इतर देशांत आपल्या हक्काची प्रेमळ घरं मिळतात.
भारतात पहिली आयबी डिप्लोमा शाळा "महिंद्र युनायटेड वर्ल्ड कॉलेज' या नावानं पुण्याजवळ मुळशी इथं सुमारे 20 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. त्यानंतर बंगळूर इथं "इंडस इंटरनॅशनल स्कूल'ची स्थापना झाली. या शाळेची पुण्याजवळच एक शाखा 8-10 वर्षांपूर्वी उघडण्यात आली आहे.

माझ्या धाकट्या मुलाला पुण्याजवळच्या "इंडस इंटरनॅशनल स्कूल'मध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे हा अभ्यासक्रम मी जवळून पाहू शकलो. या संस्थांमध्ये सर्वसमावेशक असं धोरण असतं. विद्यार्थ्यांमध्ये "हुशार' आणि "ढ' असा भेदभाव केला जात नाही. अभ्यासात व इतर कार्यक्रमांत सगळ्यांना समान वागणूक दिली जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांत सगळ्यांना समाविष्ट करण्यात येतं. निवडक विद्यार्थ्यांवर लक्ष देण्याचा प्रकार जो इतर शाळांमध्ये होतो तसा तो इथं होत नाही. आपल्या देशाची व जगाची ओळख करून देणारे विषय अभ्यासक्रमात असतात. "समाजसेवा' व "ज्ञानाचा सिद्धान्त' हे विषय सक्तीचे असतात. समाजसेवा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांना खूप महत्त्व दिलं जातं.
मी ज्या ज्या वेळी माझ्या मुलाला भेटण्यासाठी पुण्याला जात असे तेव्हा तेव्हा त्याची शाळा, मित्र व शिक्षक पाहून "आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही' अशी खंत मला वाटत असे. जेव्हा शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांचं व पालकांचं स्नेहसंमेलन आयोजिण्यात आलं होतं तेव्हा माझ्या मुलाच्या भावनेप्रमाणेच "आता आपल्याही आयुष्यातल्या एका अध्यायाची अखेर झाली,' अशी माझीही भावना होऊन खूप हुरहूर वाटली होती. अनेक वर्षं त्या आठवणी स्मरणात राहिल्या.
म्हणूनच अलीकडे जेव्हा "कोहिनूर अमेरिकन स्कूल'चे अध्यक्ष सुनील कर्वे यांनी मला अखेरच्या दिवशीच्या स्नेहसंमेलनासाठी पाहुणा म्हणून येण्याचं आमंत्रण दिलं तेव्हा मी ते आवर्जून स्वीकारलं. तिथं मी विद्यार्थ्यांशी संवाद साधून काही मुद्दे मांडले. ते महाराष्ट्रातल्या इतरही विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजेत म्हणून मी इथं ते संक्षिप्तपणे मांडत आहे.

"अभ्यास करा, परिश्रम करा, यश मिळवा' असं वडीलधारी मंडळी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतात. ते काही महत्त्वाचं नाही. अठराव्या वर्षी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून बाहेरच्या जगात प्रवेश करताना विद्यार्थ्यांसाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात.
पहिली गोष्ट म्हणजे, युवकांनी स्वतःचा शोध स्वतः घेतला पाहिजे.
मी कोण आहे? या जगात माझं अस्तित्व असण्यामागचं कारण काय असावं? माझ्या समाजाशी, निसर्गाशी, विश्वाशी माझे काय संबंध आहेत? माझं उत्तरदायित्व काय आहे? असे प्रश्‍न विद्यार्थ्यांनी स्वतःला नेहमी विचारले पाहिजेत. आपल्या प्रत्येकाची काहीएक नियती असते. अंतर्मनाचा आवाज प्रामाणिकपणे ऐकल्यावर तिचा शोध लागतो. तो शोध लागल्यावर नियतीला निश्‍चयाची साथ घ्यावी लागते. नियती आणि निश्‍चय यांच्या गुणाकारातून निर्मिती होत असते, म्हणून स्वतःचा शोध घेणं अत्यावश्‍यक आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या वैचारिक बैठकीचा नैतिक पाया निश्‍चित केला पाहिजे. यश व अपयश हे आयुष्याचं योग्य परिमाण नव्हे. आपण करतो ते योग्य आहे की अयोग्य आहे हे परिमाण योग्य
होय. यशापेक्षा योग्य मूल्यं केंद्रवर्ती मानून आयुष्याचा प्रवास केला पाहिजे.
तिसरी गोष्ट म्हणजे, स्वतःचे "स्वतःपण' सकारात्मकदृष्ट्या अबाधित राखले पाहिजे. प्रत्येकानं कुण्या सेलिब्रिटीचं अनुकरण करून तसं होण्यासाठी
जिवाचा आटापिटा करण्याची गरज नाही. वडील उद्योजक आहेत म्हणून मुलांनीही उद्योजक व्हायलाच पाहिजे असं काही नाही. आई डॉक्‍टर आहे म्हणून आपणही डॉक्‍टर व्हायला हवं, असं संबंधित पाल्यानं मानायचं कारण नाही. स्वतःची जी आवड आहे ती आवड जोपासला जाणार मार्ग शोधण्यात आयुष्याची मजा आहे.
ही त्रिसूत्री अमलात आणली तर, समाजातल्या विविध घटकांकडं सामंजस्यानं पाहिलं तर व जगाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण शिक्षणाकडून शांततेकडं प्रवास करू शकतो. यात स्वतःची मानसिक शांतता, सामाजिक शांतता व विश्वशांती अशा सर्व पातळ्यांवर परिवर्तन घडवून आणणं शक्‍य आहे.

खंडाळ्यात त्या सायंकाळी 7.30 ला "जय जय हे' म्हणून राष्ट्रगीताचे अखेरचे शब्द सर्वांनी उच्चारले व आपलं दोन वर्षांचं सहजीवन या क्षणी संपत आहे याची जाणीव होऊन विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. मी तिथून बाहेर पडलो. नकळत माझाही हात खिशातल्या रुमालाकडं गेला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com