esakal | आपलं डोकं ठिकाणावर आहे काय? (संदीप वासलेकर)
sakal

बोलून बातमी शोधा

sundeep waslekar

आपलं डोकं ठिकाणावर आहे काय? (संदीप वासलेकर)

sakal_logo
By
संदीप वासलेकर

प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?'

सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात प्लेगची साथ पसरली होती व हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. जे बचावले ते स्थलांतराच्या प्रयत्नात होते. त्या परिस्थितीत ब्रिटिश राज्यकर्ते अतिशय असंवेदनशील पद्धतीनं वागले. त्यांनी महिलांवर अत्याचार केले. लोकांच्या धार्मिक भावनांचा अपमान केला. हे सर्व साथ आटोक्‍यात आणण्याच्या नावानं घडलं; परंतु घराघरात प्लेगमुळं मृत्यूचं थैमान सुरूच होतं, तेव्हा लोकमान्य टिळकांनी त्यांच्या लेखणीद्वारे सरकारवर आसूड ओढले होते. ता 6 जुलै 1897 रोजी त्यांनी "केसरी'च्या अग्रलेखातून प्रश्‍न विचारला होता ः "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?'
आज या अग्रलेखाची आठवण करून द्यायची वेळ आली आहे. सद्य परिस्थितीत प्रश्‍न केवळ सरकारचा नाही; तर जे काही घडतंय त्याकडं आपण पाहायला तयार नाही म्हणून हा प्रश्‍न आपल्या सर्वांसंबंधी आहे. असं काय घडतंय?
गेल्या वर्षी "इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च' या भारतातल्या अग्रगण्य वैद्यकीय संशोधन संस्थेनं एक अहवाल प्रसिद्ध केला. या संस्थेची विश्वासार्हता सर्वमान्य आहे. आता या संस्थेचा अहवाल वाचून तिच्यावर "राष्ट्रविरोधी', "पाकिस्तानधार्जिणी' वगैरे, हल्ली नेहमी केले जातात तसले आरोप करण्याआधी अजून एक माहिती लक्षात घेतली पाहिजे. या संस्थेनं हा अहवाल "लॅन्सेट' या वैद्यकीय क्षेत्रातल्या जागतिक पातळीवरच्या प्रथम क्रमांकाच्या नियतकालिकात प्रकाशित केला आहे. "लॅन्सेट'मध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी तो जगातल्या तज्ज्ञांनी स्वीकारावा लागतो.

या अहवालानुसार, भारतात सन 2017 मध्ये हवेच्या प्रदूषणामुळे 12 लाख लोकांचा बळी गेला. त्यानंतर जी विविध तज्ज्ञांनी माहिती प्रकाशित केली आहे, तीनुसार सन 2018 मध्ये सुमारे 15 लाख भारतीय लोक वायुप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडले.
आपल्या आत्मघातकी प्रकृतीची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेकडं उपलब्ध आहे. सन 2000 मध्ये वायुप्रदूषणामुळं एक लाख लोक मृत्युमुखी पडले. हे प्रमाण वाढत सन 2014 मध्ये सहा लाखांपर्यंत आलं. त्यानंतर ते वाढतच गेलं. याशिवाय मागील वर्षांमध्ये दरवर्षी पाच-सहा लाख लोक जलप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडले.
या सगळ्याची गोळाबेरीज केली तर सन 2014 पासून गेल्या पाच वर्षांत हवेचं व पाण्याचं प्रदूषण वाढल्यानं सुमारे एक कोटी लोकांचा बळी गेला.

जगात सुमारे 50-60 देश एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्या असलेले आहेत. गेल्या पाच वर्षांत कित्येक देशांच्या व भारतातल्या पुण्यासारख्या शहरांच्या लोकसंख्येच्या अनेक पट लोक केवळ वायुप्रदूषणामुळं व जलप्रदूषणामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत.
एवढी प्रचंड मनुष्यहानी होऊनही रोजच्या मथळ्यांमध्ये याची नोंद नाही. समाजमाध्यमांमध्येही या विषयावर चर्चा नाही, जनआंदोलनं नाहीत. स्वीडनमध्ये आज तरी प्रदूषणाचा प्रश्‍न नाही. तिथं कुणाचा वायु-जलप्रदूषणामुळे मृत्यू होत नाही; परंतु असं भविष्यात होऊ नये म्हणून ग्रेटा नावाच्या शाळकरी मुलीनं आंदोलन सुरू केलं व त्याला विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला. शाळाशाळांमधून मोर्चे निघाले. भविष्याकाळात होऊ शकणारं प्रदूषण थांबवण्यासाठी आजच उपाययोजना करण्याची मागणी तिथली वृत्तपत्रं, वाहिन्या, समाजमाध्यमं मोठ्या प्रमाणावर करत आहेत. स्वीडनचे पंतप्रधान कोण आहेत हे लोकांना माहीत नाही; परंतु हवामान शुद्धीकरण चळवळीची "नेता' बनलेल्या सोळावर्षीय ग्रेटाचं नाव तिकडं प्रत्येकाच्या ओठी आहे. इतकंच नव्हे तर, जगातल्या अनेक देशांमध्येही हे आंदोलन पसरत चाललं आहे.
...आणि आपल्याकडं प्रदूषणानं पाच वर्षांत सुमारे एक कोटी जणांचे बळी जाऊनही आपण हा लेख वाचून तो बाजूला ठेवणार आणि नाश्‍ता खाता खाता निवडणुका, सिनेमा, क्रिकेट यावर चर्चा करणार? आज टिळक हयात असते तर त्यांनी नक्कीच विचारलं असतं ः "आपले डोके ठिकाणावर आहे काय?'
मला दुसराच प्रश्‍न विचारायचा आहे. केंद्रीय गृहमंत्रालयात "नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो' नावाचा विभाग आहे. या विभागाची माहिती म्हणजे भारत सरकारची माहिती आहे. त्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत सुमारे पाच-सहा लाख भारतीय नागरिकांनी आत्महत्या केल्या; त्यापैकी सुमारे एक लाख शेतकरी होते. ही आकडेवारी सरकारी आहे. गेल्या पाच वर्षांतली आकडेवारी जरी इथं दिली असली तरी या सर्व समस्यांची सुरवात अनेक वर्षांपूर्वी झाली आहे. अलीकडं या समस्येचं प्रमाण वाढलं आहे एवढंच.

या आत्महत्यांच्या आकडेवारीत दडलेली एक कटू वास्तवता म्हणजे, गेल्या पाच वर्षांत सुमारे 35000 ते 40000 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. "मागील वर्षात 9000 हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या,' अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत दिली होती. मी याचा उल्लेख मागील एका लेखात केलेला होता.
मृत्यूचं हे महाभयानक संकट आपली पर्यावरणव्यवस्था, शिक्षणपद्धती, ग्रामीण अर्थनीती, सामाजिक स्वास्थ्य कसं आहे हे दाखवतं; पण जर आपण वर्तमानपत्रं, समाजमाध्यमं, राजकीय नेत्यांची भाषणं पाहिली तर भारत एवढ्या भयंकर मृत्यूच्या छायेत आहे याची कल्पनाही येत नाही.

सध्याचा निवडणुकांचा प्रचार पाहता धर्म, जाती, राजकीय नेत्यांची घराणी, पाकिस्तान व नेत्यांचे वैयक्तिक गुण-दोष हेच विषय राजकारणी मंडळींना परिचित आहेत, असं वाटतं. आज जर लोकमान्य असते तर त्यांनी, राजकारणी नेते कशाला प्राधान्य देतात ते बघूनन, त्यांना डोकं तपासून पाहण्याचा सल्ला दिला असता.
मात्र, हे प्रश्‍न राजकारणापलीकडचे आहेत. प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे हे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनी सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानं आत्महत्या केली आहे काय?'
शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?'

loading image