स्वप्न की तक्रार? (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 25 मार्च 2018

एकमेकांविरुद्ध केवळ तक्रारी करण्याऐवजी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी माझ्या देशातले सर्वच नेते परिणामकारक योजना आखतील, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं स्वप्न नक्कीच आहे. जेव्हा बहुसंख्य नागरिकांना व नेत्यांना असं स्वप्न प्रेरित करेल तेव्हा भारताची नवनिर्मिती होईल, याची मला खात्री आहे. 

एकमेकांविरुद्ध केवळ तक्रारी करण्याऐवजी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी माझ्या देशातले सर्वच नेते परिणामकारक योजना आखतील, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं स्वप्न नक्कीच आहे. जेव्हा बहुसंख्य नागरिकांना व नेत्यांना असं स्वप्न प्रेरित करेल तेव्हा भारताची नवनिर्मिती होईल, याची मला खात्री आहे. 

अलीकडं जगातले चार प्रमुख विचारवंत पुण्यात आले होते. त्यापैकी लॉर्ड ऑल्डरडाईस हे उत्तर आयर्लंडच्या संसदेतले माजी सभापती व सध्या ऑक्‍सफर्ड विद्यापीठातल्या एका संशोधन केंद्राचे संचालक आहेत. दनिलो टर्क हे स्लोवेनियाचे राष्ट्रपती होते. ते युनोचे सहाय्यक महासचिवही होते. मुस्तफा चेरिक हे बोस्नियाचे महाधर्मगुरू आहेत. आसिया बेनसाले अलौवी या मोरोक्कोच्या राजाच्या विशेष दूत आहेत. याशिवाय हे चौघंही विविध विद्यापीठांत अध्यापन करतात व शक्‍य होईल तेव्हा युवकांशी संवाद साधतात. 

पुण्यात असताना त्यांनी सूर्यदत्त शैक्षणिक संस्थेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तेव्हा जगाच्या विविध देशांतून आलेल्या, वेगवेगळ्या क्षेत्रांत कीर्ती मिळवलेल्या व अनेक प्रकारचं अनुभवसंपन्न जीवन जगत असणाऱ्या या चार विद्वानांनी भारतीय युवकांना एकच संदेश दिला : 'तुम्ही स्वप्न पाहा, तक्रार करू नका.' 

त्यांनी अमेरिकेतल्या डॉ. मार्टिन ल्यूथर किंग या नेत्याच्या I have a dream (माझं एक स्वप्न आहे) या भाषणाची आठवण करून दिली. टर्क म्हणाले : ''प्रत्येक देशात विषमता असते. समाजातल्या काही व्यक्तींना अथवा काही घटकांना, आपल्यावर अन्याय होत आहे, असं वाटतं. याला एकही देश अपवाद नाही.'' लॉर्ड ऑल्डरडाईस म्हणाले : ''कित्येक गोष्टी आपल्याला अमान्य असतात. अशा परिस्थितीत आपण समाजाचा व स्वत:चा नाश करायचा की समाजातल्या व जगातल्या घटकांमध्ये नव्या सकारात्मक संबंधांची साखळी बांधायची?'' 

मुस्ताफा चेरिक म्हणाले : ''कोणताही समाज संपूर्ण दोषमुक्त नसतो, म्हणून आपण केवळ तक्रारच करायची ठरवलं तर ते सोपं असतं; परंतु तक्रार करण्यापेक्षा आपण जर नवनिर्माण कसं करायचं याविषयीचं स्वप्न पाहिलं व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सुनियोजित प्रयत्न केले तर चांगले परिणाम होण्याची शक्‍यता असते.'' 

डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांनी 'माझं एक स्वप्न आहे' असं म्हटलं. हे स्वप्न सामाजिक ऐक्‍य, सलोखा, न्याय प्रस्थापित करण्याचं होतं. अमेरिकेतल्या लाखो युवकांनी त्यांना पाठिंबा दिला. जर त्याऐवजी त्यांनी 'माझी एक तक्रार आहे' असा आक्रोश केला असता, तर काही लोक त्यांच्याकडं काही काळ गेले असते; पण त्याचा दूरगामी परिणाम झाला असता का? बराक ओबामा हे कृष्णवर्णीय राजकीय कार्यकर्ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्याचं श्रेय डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या चळवळीलाच जातं. 

दक्षिण आफ्रिकेत असाच अनुभव आला. प्रथम काही वर्षं तिथल्या संघटना 'वर्णद्वेषाविरुद्ध आमची तक्रार आहे' असा नारा देत होत्या. त्यातून काही साध्य झालं नाही. काही वर्षांनी त्यांनी आपली दिशा बदलली व आपल्याला 'काय नको' यापेक्षा 'काय हवं' यावर भर दिला आणि 'नेल्सन मंडेला यांना मुक्त करा आणि त्यांच्या स्वप्नातला देश तयार करा' अशी घोषणा दिली. काही वर्षांत दक्षिण आफ्रिकेतून वर्णद्वेषावर आधारित राजवट संपुष्टात आली. एका नवीन समाजाची निर्मिती झाली. 

दक्षिण आफ्रिकेजवळच रवांडा नावाचा एक छोटा देश आहे. तिथं 25 वर्षांपूर्वी यादवी युद्ध झालं होतं. सुमारे 10 लाख लोकांची हत्या करण्यात आली. त्याबद्दल तुत्सी जमातीचे लोक हुतू जमातीविरुद्ध तक्रार करत. नंतर तिथं पॉल कंगामे नावाचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी आवाहन केलं : ''तुम्ही एकमेकांच्या जमातींविरुद्ध केवळ तक्रारी केल्या तर अजून एक हत्याकांड होईल. त्याऐवजी तुमचं भवितव्याबद्दल स्वप्न काय आहे ते मांडा व आपल्या स्वप्नातला नवा रवांडा कसा निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करा.'' 

सध्या रवांडा हा जगातला सर्वात स्वच्छ देश समजला जातो. तिथं प्लॅस्टिकवर बंदी आहे. रस्त्यात कचऱ्याचा तुकडाही दिसत नाही. पर्यावरण-संवर्धनामुळं हिरव्या झाडांची व स्वच्छ पाण्याची रेलचेल आहे. परदेशी आर्थिक गुंतवणूक वाढत आहे. पॉल कंगामे हे काही सर्व दृष्टीनं आदर्श राज्यकर्ते आहेत असं नाही. ते विरोध सहन करत नाहीत. मात्र, त्यांच्या 'तक्रार सोडून स्वप्न पाहा' या वृत्तीमुळं देशात सकारात्मक बदल होत आहेत हे मात्र खरं आहे. अर्थात केवळ स्वप्न पाहून काही साध्य होत नाही. त्यासाठी परिणामकारक नियोजन व प्रयत्न करणं आवश्‍यक असतं. 

जगातल्या विविध देशांतल्या अनुभवांवरून भारत प्रेरणा घेऊ शकतो. आपल्या इतिहासातही अनेक दाखले आहेत. छत्रपती शिवाजीमहाराजांनी मुघलांच्या जुलमाविरुद्ध केवळ तक्रार केली नाही, तर त्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्य खर्च केलं. महात्मा गांधींनी 'स्वातंत्र्य' हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकांना प्रेरित केलं; पण जर ते 'ब्रिटिशांचा द्वेष करा' एवढंच म्हणून थांबले असते व आपल्या समाजाचं भवितव्य काय हवं, याबद्दल त्यांनी काही मार्ग दाखवला नसता तर कदाचित आपण आणखी काही वर्षं पारतंत्र्यात खितपत पडलो असतो. 

अलीकडच्या काळात भाजपनं 'अच्छे दिन' हे स्वप्न दाखवलं. एक सुरक्षित व संपन्न देश निर्माण करण्याची आशा दाखवली. परिणामी, समाजातल्या सर्व स्तरांतल्या लोकांनी भाजपाला भरघोस मतं देऊन केंद्रात सत्तारूढ केलं व अनेक राज्यांतही त्या पक्षाला सत्ता दिली. 

मात्र, गेल्या वर्ष-दीड वर्षात भाजपमधले अनेक नेते एक वेगळाच सूर आळवताना दिसतात : 'आमची अशी तक्रार आहे, की नेहरूंनी काश्‍मीरबद्दल चुकीचे निर्णय घेतले...आमची अशी तक्रार आहे, की कॉंग्रेस पक्षानं गेल्या 70 वर्षांत भारताचं सर्व दृष्टींनी नुकसान केलं...आमची अशी तक्रार आहे, की डॉ. मनमोहन सिंग यांच्या कालावधीत भ्रष्टाचार बोकाळला. आमची अशी तक्रार आहे की...' कॉंग्रेस पक्षाचे नेतेदेखील तक्रार करतात : 'आमची अशी तक्रार आहे, की इलेक्‍ट्रॉनिक मतदानाची यंत्रं खराब आहेत...आमची अशी तक्रार आहे, की आमचे नेते त्यांच्याकडं जातात...' आम आदमी पक्षही तक्रारीच्या राजकारणात पुढं आहे. 

एक सर्वसामान्य नागरिकाला भाजप, कॉंग्रेस अथवा इतर पक्ष आणि नेते यांच्याकडून काय अपेक्षा आहे? एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं असं स्वप्न आहे की 'माझ्या देशातला शेतकरी श्रीमंत होईल व प्रत्येक युवक चांगला रोजगार, शिक्षण व प्रशिक्षण प्राप्त करेल व हे स्वप्न साकार होण्यासाठी पुढच्या 12 महिन्यांत, 24 महिन्यांत, 60 महिन्यांत काय साध्य करता येईल त्याचा आराखडा आपले नेते जाहीर करतील.' 

एक सर्वसामान्य नागरिकाचं असं स्वप्न आहे की 'दहशतवादी माझ्या देशावर हल्ला करण्याचा विचारच करणार नाहीत. दहशतवाद्यांनी हल्ला करून आमच्या जवानांना अथवा नागरिकांना मारलं तर त्यांच्यावर प्रतिहल्ला करून त्यांना पराभूत करणं हे साहजिकच आहे; पण मुळात दहशतवादी हल्ला करण्याचा विचारच मनात आणणार नाही, असा आपला देश असावा...' असं स्वप्न नागरिकांना प्रिय असेल तर त्यासाठी काय पावलं उचलता येतील व त्यांची परिणामकारकता कशी मोजता येईल, हे जाहीर करणं आवश्‍यक आहे. 

एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं असं स्वप्न आहे की 'प्रत्येक गावात व खेड्यात पाणी एवढं स्वच्छ असावं की ते नळातून घेतल्यावर न उकळता, न गाळता मी पिऊ शकेन.' 

आज सिंगापूरपासून ते स्वीडनपर्यंत सगळीकडं नळातून असंच स्वच्छ पाणी मिळतं. माझ्याही देशात असं निर्मळ जल मला मिळावं, असं सर्वसामान्य नागरिकाचं स्वप्न असायला हवं व उच्च दर्जाचं शिक्षण नगरपालिकेत आणि जिल्हा परिषदांच्या शाळेतून मिळावं व तिथं उद्योगपतींच्या मुलांपासून ते कामगारांच्या मुलांपर्यंत सर्वांनी एकत्र शिक्षण घ्यावं. युरोप खंडातल्या 25 देशांनी हे साध्य केलं आहे. माझ्याही देशात ते शक्‍य व्हावं, असं माझं एक नागरिक म्हणून स्वप्न आहे व त्यासाठी दरवर्षी काय पावलं उचलली जातील, यासंबंधी सुस्पष्ट व शिस्तबद्ध उपाययोजना मला पाहायची आहे. 

आपण नागरिक म्हणून उत्कृष्ट वैद्यकीय केंद्रं, अखंडित वीजपुरवठा, सुंदर रस्ते, नद्या व तळी प्रदूषित न करणारे कारखाने, चीनच्या व अमेरिकेच्या तुलनेनं प्रगत असणारी वैज्ञानिक केंद्रं यांची स्वप्नं पाहिली पाहिजेत. ही स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात, याची तपासणीही केली पाहिजे. 

माझी कोणत्याही नेत्याविरुद्ध, कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध काहीच तक्रार नाही. मी समाजमाध्यमांत इतरांबद्दल रोज तक्रारी करून मला काहीच साध्य होणार नाही. एकमेकांविरुद्ध केवळ तक्रारी करण्याऐवजी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी माझ्या देशातले सर्वच नेते परिणामकारक योजना आखतील, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं स्वप्न नक्कीच आहे. जेव्हा बहुसंख्य नागरिकांना व नेत्यांना असं स्वप्न प्रेरित करेल तेव्हा भारताची नवनिर्मिती होईल, याची मला खात्री आहे. 

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: sundeep waslekar writes about changing politics