नॉर्मंडीचा जाहीरनामा (संदीप वासलेकर)

नॉर्मंडीचा जाहीरनामा (संदीप वासलेकर)

ता. 4 जूनला आम्ही सहा जणांनी एकत्र येऊन 'नॉर्मंडी जाहीरनाम्या'वर समारंभपूर्वक स्वाक्षऱ्या केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 'न्यूयॉर्क टाइम्स' व इतर पाश्‍चिमात्य वर्तमानपत्रांमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मी तो फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांना आम्हा सहा जणांच्या वतीनं सुपूर्द केला. 

बरोबर 75 वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धाला कलाटणी देणारी एक घटना घडली होती. या घटनेमुळं वर्षभरात हिटलरचा पराभव झाला व दुसरं महायुद्ध समाप्त झालं. दरवर्षी जून महिन्यात या घटनेची आठवण होते. 

ती घटना 'नॉर्मंडी लॅंडिंग' या नावानं इतिहासात प्रसिद्ध आहे. फ्रान्सच्या उत्तर सीमेवरच्या समुद्रपट्टीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ता. सहा जून 1944 रोजी हजारो अमेरिकी, कॅनेडियन व ब्रिटिश सैनिक सागरमार्गे येऊन थडकले. त्यांनी नाझी जर्मनीच्या सैन्यावर हल्ला केला व फ्रान्सच्या नॉर्मंडी या प्रांताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. एकदा नॉर्मंडीमध्ये पाय घट्ट रोवल्यावर जर्मनीकडं कूच करणं शक्‍य झालं. सुमारे वर्षभरानं जर्मनीचा पराभव झाला व नाझी भस्मासुराचा अस्त झाला. 

युद्धात विजय प्राप्त झाला; पण त्यासाठी खूप मोठी किंमत चुकवावी लागली. विजेत्या राष्ट्रांचे सुमारे 75 हजार सैनिक व नागरिक एकट्या नॉर्मंडीच्या रणांगणात मारले गेले. त्यापैकी बहुसंख्य युवक होते. महाविद्यालयीन विद्यार्थी होते. त्यांना बंदुका वापरायचं प्रशिक्षण मिळालेलं नव्हतं; पण राष्ट्रकार्य म्हणून त्यांना युद्धावर पाठवण्यात आलं होतं. 

दुसऱ्या बाजूला जर्मन सैन्यानंही आपल्या युवा पिढीची अशीची आहुती दिली होती. सर्व बाजूंनी मिळून सुमारे पाच ते सहा कोटी लोक दुसऱ्या महायुद्धात प्राणाला मुकले. याशिवाय अनेकजण लुळे-पांगळे झाले ते वेगळेच. कोट्यवधी लोकांची कुटुंबं उद्‌ध्वस्त झाली. मुलं अनाथ झाली. महिला विधवा झाल्या. हिटलरला विरोध केला गेला नसता तर त्यानं संपूर्ण युरोपवर व नंतर जगातल्या इतर अनेक देशांवर अत्याचार केले असते. विरोध केला गेला नसता तर हाल व अत्याचार आणि विरोध केला गेला तर युद्धात मृत्यू! 

मानवी स्वभावाच्या या अविवेकी प्रवृत्तीची आठवण करून देण्यासाठी, 'नॉर्मंडी लॅंडिंग' या घटनेला 75 वर्षं झाल्यानिमित्त त्या राज्य सरकारनं अनेक प्रयत्न केले. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे या महिन्याच्या सुरवातीला 

'नॉर्मंडीचा जाहीरनामा' या नावानं एक जाहीरनामा जगापुढं सादर करण्यात आला. 
हा 'नॉर्मंडी जाहीरनामा' लिहिण्यासाठी सहा जणांची समिती नॉर्मंडीच्या राज्य सरकारनं स्थापन केली होती. त्यापैकी एक होते इजिप्तचे डॉ. मोहंमद अलबरदाई. शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिकाचे ते मानकरी आहेत. ते अनेक वर्षं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेचे संचालकही होते व अणुऊर्जेचा गैरवापर होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. दुसऱ्या सदस्य होत्या अमेरिकेच्या ज्योडी विल्यम्स. जमिनीखालील सुरुंगांवर बंदी आणण्यासाठी त्यांनी जागतिक करार घडवून आणला. त्याही शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी आहेत. तिसऱ्या सदस्या होत्या लेमा बोवी. त्यांनी विविध धर्मांच्या महिलांना संघटित करून लायबेरियाच्या राष्ट्रप्रमुखांना तिथलं युद्ध समाप्त करण्यास भाग पाडलं. यांनाही शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. चौथे सदस्य होते डॉ. डेनिस मुकवेगे. कोंगोतल्या यादवी युद्धात ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाले होते, अशा 80 हजार महिलांवर शल्यक्रिया करून त्यांनी त्यांना जीवदान दिलं. या वर्षीचं शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक मुकवेगे यांना मिळालं आहे. पाचवे सदस्य होते इंग्लंडमधले तत्त्ववेत्ते, प्राध्यापक अँथनी ग्रेलिंग आणि सहावा सदस्य होतो मी. प्राध्यापक ग्रेलिंग यांनी व मी काही इतर चौघांसारखं कार्य केलेलं नाही; पण जागतिक परिस्थितीवरचे आमचे विचार लक्षात घेऊन आम्हाला या समितीत निमंत्रित करण्यात आलं होतं. याशिवाय मार्टिन रीस या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांनादेखील नॉर्मंडी सरकारनं निमंत्रित केलं होतं. मात्र, ते प्रकृतिअस्वास्थ्यामुळे समितीत अधिकृतरीत्या भाग घेऊ शकले नाहीत; परंतु त्यांनी उपयुक्त असं मार्गदर्शन केलं. 

ता. 4 जूनला आम्ही सहा जणांनी एकत्र येऊन नॉर्मंडी इथं जाहीरनाम्यावर समारंभपूर्वक स्वाक्षऱ्या केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 'न्यूयॉर्क टाइम्स' व इतर पाश्‍चिमात्य वर्तमानपत्रांमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्या संध्याकाळी मी तो फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांना आम्हा सहा जणांच्या वतीनं सुपूर्द केला. 

असाच जाहीरनामा सन 1955 मध्ये बर्ट्रांड रसेल व अल्बर्ट आईनस्टाईन यांनी काढला होता. आईनस्टाईन यांनी त्यांच्या निधनापूर्वी सही केलेलं ते शेवटचं पत्रक होतं. सन 2019 चा 'नॉर्मंडी जाहीरनामा' हा 1955 मधल्या त्या 'रसेल-आईनस्टाईन जाहीरनाम्या'पासून स्फूर्ती घेऊन तयार करण्यात आला होता. त्या जाहीरनाम्यातले महत्त्वाचे मुद्दे मी पुढं देत आहे. 

*** 

'आपण मानवजातीचा विनाश करू या का? अथवा युद्धाची संकल्पना मानव त्यागेल का?' हा प्रश्‍न रसेल व आईनस्टाईन यांनी शीतयुद्धात विचारला होता. मानवाच्या अस्तित्वाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा हा प्रश्‍न आज अधिक महत्त्वाचा आहे. त्या वेळेपेक्षा आजची परमाणू शस्त्रं हजारो पटींनी घातक आहेत. त्यापैकी 2500 अण्वस्त्रं 'हेअर ट्रिगर ऍलर्ट'वर आहेत (म्हणजे ती पाच मिनिटांच्या आत वापरली जाऊ शकतात). मानवी जीवन संपुष्टात आणण्यासाठी नवीन जिवाणूंचा शोध लावण्यात येत आहे. जगातली मोठी राष्ट्रं 'किलर रोबोट्‌स' तैनात करण्याच्या तयारीत आहेत. परिणामी, यापुढं जीवन-मृत्यूबाबतचा निर्णय मनुष्यरूपातील सैनिक नव्हे तर यंत्रे घेतील. मानवानं स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्‍न यंत्रावर सोपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संपूर्ण मानवी सृष्टी एका कृष्णविवराच्या काठावर आहे. मानवाचं अस्तित्व संपण्याचा धोका मोठा आहे. 

शस्त्रास्त्रस्पर्धेवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत; परंतु बलाढ्य शक्तिमान राष्ट्रांना युद्धखोरीला आळा घालण्यात रस नाही. वास्तविक, जगात आजपर्यंत कोणतीही महासत्ता कायमस्वरूपी टिकलेली नाही, या वास्तवाला इतिहास साक्षीदार आहे. गेल्या हजारो वर्षांत प्रत्येक महासत्तेचं झालेलं अधःपतन म्हणजे या देशांमधल्या सत्ताधीशांच्या मूर्खपणाचा पुरावा आहे. पूर्वी महासत्तांच्या लढायांमध्ये कोट्यवधी लोक मारले जात; परंतु तंत्रज्ञान तेव्हा फारसं अद्ययावत झालेलं नसल्यानं जग वाचत असे. 

युद्ध करणं हा काही मानवी स्वभाव नाही. युद्ध करणं हा कुणीतरी 'पसंती'नं घेतलेला निर्णय असतो. सर्वसाधारणतः उत्क्रांती ही सहकार्य व सहजीवन यातून होत असते. जेव्हा जेव्हा जगात अस्तित्व धोक्‍यात आणणारे प्रसंग घडले तेव्हा तेव्हा मानवानं काहीतरी मार्ग शोधला. गेल्या काही वर्षांत आपण काही ठराविक प्रकारच्या युद्धसामग्रीवर जागतिक बंदी घातली. आता युद्धाच्या कल्पनेवरच बंदी आणून गरिबी, पर्यावरण, रोगराई या खऱ्या प्रश्‍नांकडं लक्ष द्यायची वेळ आली आहे. संपूर्ण पृथ्वीतलावरचे सर्व लोक शेवटी एकच आहेत. आपण सर्व जण श्‍वास घेतो, विचार करतो, प्रेम व द्वेष करतो, आशा-निराशेचा अनुभव घेतो. आपल्यातलं साम्य हे आपल्यातल्या फरकांपेक्षा मोठं आहे. आपल्या मानवतेची आपण आठवण ठेवू या. बाकी सर्व विसरून जाऊ या. 

युद्धविरहित कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी, नैतिक मूल्यांचं पुनरुत्थान करण्यासाठी आणि मानवाच्या नियतीला पुकारण्यासाठी एका नवीन आंतरराष्ट्रीय सुरक्षापद्धतीवर आधारित 'ग्लोबल क्रॉंट्रॅक्‍ट'ची आज गरज आहे. सर्व देशांना व लोकांना समान मान मिळेल व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर राखण्यात येईल अशा सामूहिक सुरक्षाव्यवस्थेची आज गरज आहे. 

*** 

वरील विचारांनी सुरवात असलेला व जगाला नवीन दिशा दाखवणारा हा 'नॉर्मंडी जाहीरनामा' फारसा मोठा नाही. तो नॉर्मंडी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर फ्रेंच भाषेत उपलब्ध आहे. मी तो इंग्लिशमध्ये पुढील संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. www.strategic foresight.com/ downloads/ EN%20 Normandy%20 Manifesto.pdf 'वसुधैव कुटुम्बकम्‌' अशी परंपरा असलेल्या आपल्या संस्कृतीला हा जाहीरनामा नक्कीच नवीन वैचारिक दिशा दाखवेल. 

'नॉर्मंडीचा जाहीरनामा'ची समिती. मागच्या रांगेत (डावीकडून) अँथनी ग्रेलिंग, संदीप वासलेकर, डॉ. डेनिस मुकवेगे. पुढच्या रांगेत (डावीकडून) ज्योडी विल्यम्स, डॉ. मोहंमद अलबरदाई, लेमा बोवी. 

'सप्तरंग'मधील सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com